निष्ठेला किंमत न दिल्याचा कर्नाटकात काँग्रेसला फटका 

प्रा. डॉ. प्रकाश पवार
Tuesday, 23 July 2019

कर्नाटकात कॉंग्रेस सरकार पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे कॉंग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीनंतर न लावता आलेली शिस्त, असे म्हणता येईल. पक्षातील उमेदवार निवडून आल्यानंतरही हा पक्ष त्या उमेदवाराला पक्षाचा मानत नव्हता. केवळ सत्ताकांक्षेने त्यांना पछाडले होते. 

कर्नाटकात कॉंग्रेस सरकार पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे कॉंग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीनंतर न लावता आलेली शिस्त, असे म्हणता येईल. पक्षातील उमेदवार निवडून आल्यानंतरही हा पक्ष त्या उमेदवाराला पक्षाचा मानत नव्हता. केवळ सत्ताकांक्षेने त्यांना पछाडले होते.  पक्षासाठी काम करायचे असते, पक्षाला उभे करायचे असते, पक्ष वाढवायचा असतो, हेच ते विसरून गेले. त्यांच्यात "पार्टी वर्क स्पिरीट'चा अभाव होता. त्यामुळे कॉंग्रेसच्या हातात असलेल्या लोकांनीच पक्षांतर केले. त्यातील दुसरी घटना लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे कॉंग्रेस पक्षाला जर सुरवातीलाच आपण काठावर आहोत, हे माहीत होते तर त्यांनी प्रतिस्पर्धी पक्षाला कोठेही शिरकावाची संधी द्यायला नको होती. या दूरगामी राजकारणात कॉंग्रेस पक्ष मागे पडला. 

कॉंग्रेस व जनता दलातील (धर्मनिरपेक्ष) मिसमॅनेजमेंटचा फटकाही या पक्षांना बसला. जनता दलाला खूप जागा मिळाल्याचे समाधान होते. संघटन कौशल्यात मात्र दोन्ही पक्ष पिछाडीवर राहिले. त्यामध्ये "कास्ट कॅल्क्‍युलेशन'चा मुद्दाही विचारात घ्यावा लागेल. जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) संस्थापक अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांना आपल्या जातीचे लोक आपल्या भोवती आहेत, असे वाटत होते. कॉंग्रेसचा दलित व ओबीसीतील कुर्ब जातीचे लोक आपल्या बाजूने आहेत, असा ग्रह होता.

कर्नाटकातील राजकारण जातीच्या रेषा ओलांडून पुढे गेले असताना या पक्षातील जाती आधारित विचार चुकीचा होता. त्याला "हिंदू आयडेंटिटी' मिळाली होती आणि हीच अडचण दोन्ही पक्षांसमोर निर्माण झाली. या दोन्ही पक्षांतील हिंदू लोकांना भारतीय जनता पक्ष काही वेगळा पक्ष नाही, असे वाटू लागले. या पक्षापासून कशाला दूर राहायचे, असा विचार त्यांच्या मनात बळावत राहिला. 

लोकसभा निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पक्ष दबा धरून बसला होता. कर्नाटकच्या राजकारणात कोठे अडचण निर्माण होते का, याची त्यांना प्रतीक्षा होती. त्यांच्या व्यूहरचनेचा फॉर्म्युला तयार होता. त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला होता. तो असफल झाल्यानंतर राज्यात लिंगायतांचा नेता पुढे केला. त्यामुळे आपोआपच कॉंग्रेसमधील लिंगायतही शांत राहिले. राज्यकारभार करायला भारतीय जनता पक्ष पात्र आहे, कॉंग्रेस व जनता दल राज्यकारभार करायला लायक नाही, असे वातावरण निर्माण झाले. राज्याची प्रगती करायची असेल तर केंद्राबरोबर अर्थात भाजपसमवेत जावे लागेल, असा विचारही पुढे आला. 

कॉंग्रेस हे शस्त्र आहे. त्याला अनेक कंगोरे आहेत. त्याला हात लावला की हातच रक्तबंबाळ होतो. या पक्षात घराणेशाही व श्रीमंती आहे, निष्ठेला मात्र किंमत दिली जात नाही, राहुल गांधींनाही कोणी विचारत नाही, असा विचार कॉंग्रेस पक्षातील लोक करत आहेत आणि पक्षातून पळ काढताना दिसत आहेत. त्याचा परिणाम म्हणूनच कर्नाटकात सत्तांतर घडून आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lack of discipline in Karnataka Congress hits