
लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनाला आज ५५ वर्षे उलटून गेली. मात्र त्यांच्या विचारांचा, साधेपणाचा आणि प्रामाणिकतेचा प्रभाव आजही देशावर कायम आहे. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र, माजी केंद्रीय मंत्री अनिल शास्त्री यांच्याशी संवाद साधून शास्त्रीजींच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांना दिलेला उजाळा...
ताश्कंद येथे शास्त्रीजींचे निधन झाले. त्या दौऱ्यात ते मला घेऊन जाणार होते. मी माझ्या कॉलेजच्या मित्रांनाही सांगितले होते. मी खूप उत्साही होतो. मात्र काही कारणांमुळे या दौऱ्यावर एकटे जाण्याचा सल्ला त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिला. अगदी आईलाही घेऊन सोबत जाऊ नका, असे त्यांनी सांगितले. शास्त्रीजी- बाबूजी ताश्कंदला एक आठवडा राहिले. तिथे त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. ते ताश्कंदला गेले त्या दिवशी मी सकाळी लवकर उठलो. घरचे सर्व सदस्य त्यांना विमानतळावर सोडायला गेले, मी गेलो नाही. त्या सकाळी बाबूजी माझ्याकडे आले. त्यांनी प्रेमाने माझ्या गालांना स्पर्श केला. मी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. आठवडाभरानंतर भेटू, असं म्हणत ते निघाले. त्यानंतर बाबूजी कधीच परतले नाहीत. त्यांचं आकस्मिक निधन हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. नाराज असल्यामुळे त्या दिवशी पहिल्यांदा बाबूजींना सोडायला गेलो नाही, पाया पडलो नाही. हे मी कधीच विसरू शकत नाही. याचा त्रास होतो. पश्चात्ताप होतो. ती खंत आजही कायम आहे.
शास्त्रीजींचा मृत्यू संशयास्पदच
शास्त्रीजींच्या मृत्यूसंदर्भात विचारणा करणाऱ्या एका आरटीआयला राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणामुळे उत्तर देऊ शकत नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. एका मित्र देशासोबत संबंध वाईट होऊ शकतात, असेही त्यांनी उत्तर दिले. या सर्व गोष्टीमुळे आमचा संशय वाढला. सर्वांना वाटते की, शास्त्रीजींचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. मी लहान होतो, मला निश्चित सांगता येत नाही. मात्र शास्त्रीजींचे पोस्टमार्टम झाले नव्हते. पोस्टमार्टमची मागणी करण्याच्या मनस्थितीत आई नव्हती. ताश्कंदमध्ये शहरापासून २० किलोमीटर अंतरावर एका भारतीय पंतप्रधानांची राहण्याची व्यवस्था केली. शास्त्रीजींच्या खोलीत फोन नव्हता. घंटी नव्हती. आजूबाजूला ॲम्बुलन्स नव्हती. तब्येत बिघडल्यावर शास्त्रीजींना स्वत: डॉक्टरकडे जावे लागले. तो खून नव्हता, मात्र निष्काळजीपणा शंभर टक्के होता. ज्या थर्मासमधून दूध प्याले, तो थर्मास मिळाला नाही. शास्त्रीजींकडे कायम एक लाल डायरी असायची. ती आम्हाला मिळाली नाही. पंतप्रधानपदावर असणाऱ्या व्यक्तीसोबत असा निष्काळजीपणा दाखवणे योग्य नव्हते. यातून संशय वाढणे स्वाभाविक आहे.
रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा
मी सहा वर्षांचा असताना शास्त्रीजींनी रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला बोलावून विचारलं की, तुझे वडील आता मंत्री नाहीत, याचे तुला दु:ख तर नाही ना? मी म्हणालो, बाबूजी, मी आता खूप खूश आहे. कारण तुम्ही आता आम्हाला भरपूर वेळ देणार. मात्र लवकरच माझ्या नशिबी निराशा आली. कारण काँग्रेसने शास्त्रीजींना पक्ष संघटनेची जबाबदारी दिल्यामुळे ते पहिल्यापेक्षा जास्त बिझी झाले. मात्र त्यांना आपल्या मुलाची चिंता होती. मुलं काय विचार करतात, त्यांचे भविष्य खराब नको व्हायला याची ते काळजी घ्यायचे.
ड्रायव्हिंग लायसन्स
१९६५ मध्ये मी १६ वर्षांचा असताना कार चालवायला शिकलो. माझ्याकडे आता ड्रायव्हिंग लायसन्स असायला पाहिजे, असे मला वाटले. त्यावेळी परवाना मिळवण्यासाठी १८ वर्षांची अट होती. मी शास्त्रीजींचे खासगी सचिव कैलास नारायण यांना सांगून लायसन्स बनवून देण्यास सांगितले. तासाभरात मला लायसन्स मिळाले. मला त्याचा खूप आनंद झाला, अभिमान वाटला. शास्त्रीजींना ते लायसन्स दाखवण्यासाठी मी उशिरापर्यंत जागलो. ते घरी आल्यावर त्यांना आनंदाने लायसन्स दाखवले. ते म्हणाले, ‘‘तुझे वय १६ आहे, मग तुला हे लायसन्स कसे मिळाले?’’ मी ताडकन म्हणालो, ‘‘कारण मी पंतप्रधानाचा मुलगा आहे.’’ शास्त्रीजींचा चेहरा गंभीर झाला. ‘‘देशाच्या कायद्याचे उल्लंघन पंतप्रधानाच्या मुलाने पंतप्रधान निवासाच्या प्रांगणात केले, मी कसा आनंदी होऊ? मी आज दु:खी आहे. मी कायदे बनवतो, जनतेने त्याचे पालन करावे म्हणून आवाहन करतो आणि माझ्या मुलाने कायदा तोडला.’’ मी ढसाढसा रडलो. बाबूजी म्हणाले, ‘‘अनिल, मी तुला रागावलो नाही, मग तू का रडतो?’’ मी म्हटलं, ‘‘बाबूजी, तुमच्या बोलण्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला. ज्या पद्धतीने मला समजून सांगितले ते माझ्या मनाला भिडलं. तुम्ही मला मारलं असतं तरी मी रडलो नसतो.’’ त्यानंतर मी ते लायसन्स परत केले. माझ्या तीनही मुलांचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच त्यांचे लायसन्स बनवले.
मुलाच्या पाया पडले
ज्येष्ठांच्या पाया पडताना पूर्ण सन्मानाने पाया पडायला पाहिजे, असा शास्त्रीजींचा आग्रह होता. मी १५ वर्षांचा होतो. मोठ्यांच्या पाया पडताना मी वरवर पाया पडायचो. माझे हात टोंगळ्यापर्यंत जायचे. शास्त्रीजींनी ते हेरलं. एकदा ते म्हणाले, ‘‘तू नीट पाया पडत नाही. तुझे हात पायापर्यंत पोहोचत नाहीत.’’ मी चूक कबूल केली नाही. तुम्ही कदाचित माझ्या भावंडांना हे करताना पाहिले असेल, असं मी म्हणालो. त्यावेळी शास्त्रीजींनी मला उभे राहायला सांगितले. ते खाली वाकून माझ्या पाया पडले आणि म्हणाले, ‘‘अनिल, तू जर या पद्धतीने पाया पडत असशील तर पाहताना माझी चूक झाली असेल, मात्र तू या पद्धतीने पाया पडत नसशील तर तसे करू नकोस.’’ मला माझी चूक कळली. डोळ्यांत पाणी आले. एका वडिलाने स्वत:च्या मुलाच्या पाया पडून सांगावे, यापेक्षा जगातील दुसरी मोठी शिक्षा काय असेल? त्यानंतर मी मोठ्यांचे आशीर्वाद घेताना वाकून पायाला स्पर्श करायचो. आजही ते पाळतो आहे. आजच्या युवा पिढीला ज्येष्ठांचा सन्मान करायचा असेल, तो योग्य रीतीने करा. केवळ फॅशन किंवा दिखावा म्हणून करण्यात काही अर्थ नाही.
कर्ज काढून कार खरेदी
शास्त्रीजींनी रेल्वे, वाणिज्य आणि गृहमंत्रिपदासारखी मोठी पदे भूषवली. मात्र आमच्याकडे गाडी नव्हती. आम्ही टांग्याने शाळेत जायचो. पंतप्रधान झाल्यावर तरी फियाट कार घ्या, असा आग्रह आम्ही केला होता. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी आम्हाला बोलावून सांगितले की, घरच्यांसाठी कार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सचिवाला बोलावले आणि नव्या गाडीची किंमत विचारली. त्यावेळी नव्या फियाटची किंमत १२ हजार होती. मात्र वडिलांच्या खात्यात होते केवळ सात हजार रुपये. त्यामुळे आम्ही भावडांनी गाडी घेण्याचा निर्णय रद्द करण्याचा आग्रह केला. मात्र शास्त्रीजी म्हणाले, ‘‘मी तुम्हाला कार देण्याचे वचन दिले आणि त्यांनी पंजाब नॅशनल बँकेकडून पाच हजारांचे कर्ज उचलले. फियाट कार खरेदी केली. आजही ही कार लाल बहादूर शास्त्री संग्रहालयात उभी आहे. हजारो लोक तिथे येतात, तिथले मुख्य आकर्षण ही कार आहे. शास्त्रीजींच्या निधनानंतर आईने पेन्शनमधून कारचे कर्ज फेडले.
आयुष्यात स्ट्रगल
वडिलांचे निधन झाले त्यावेळी मी १७ वर्षांचा होतो. सेंट स्टिफनमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत होतो. मी ग्रॅज्युएशन पूर्ण केले. अमेरिकेच्या एका विद्यापीठात मला प्रवेश मिळाला, मात्र आईने मला सांगितले की, ‘‘पुढच्या शिक्षणासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. तू आता नोकरी कर,’’ मी २१ व्या वर्षात नोकरी शोधली. मुंबईत वोल्टाज कंपनीत जवळपास १७ वर्षे नोकरी केली. त्यानंतर मी राजकारणात उतरलो. खासदार, मंत्री झालो. बाबूजींनी दिलेल्या मूल्यांमुळे मी यशस्वी झालो. मला लाल बहादूर शास्त्री यांचा मुलगा म्हणून सन्मान मिळतो, मात्र प्रामाणिक नेता म्हणून लोक माझ्याकडे बघतात. याचा अभिमान वाटतो.
दहा रुपये परत केले
स्वातंत्र्यलढ्यात शास्त्रीजी सहभागी होते. त्यासाठी अनेकदा त्यांना तुरुंगात डांबले जायचे. मात्र आजी आणि आई वडिलांमागे ठाम उभ्या राहत असत. शास्त्रीजी जेव्हा तुरुंगात जात असत तेव्हा एका सैनिकाप्रमाणे त्यांना टिळा लावून, स्वागत करून त्यांना रवाना करायच्या. त्यावेळी लाला लजपत राय, सर्वेंट ऑफ पीपल सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून गरीब स्वातंत्र्यसैनिकांना महिन्याकाठी काही आर्थिक मदत करत असत. ही संस्था आमच्या कुटुबीयांना महिन्याकाठी ५० रुपये पाठवायची. एकदा शास्त्रीजींनी जेलमधून आईला चिठ्ठी लिहून विचारले, की घर ठीक चाललंय का? ५० रुपये वेळेवर मिळतात का? आईने त्यांना चिंतामुक्त करण्यासाठी सांगितले की, घराचा खर्च ४० रुपयांत भागतो. तुम्ही काळजी करू नका. जेव्हा शास्त्रीजींना हे कळलं, तेव्हा त्यांनी त्या संस्थेला पत्र लिहून, आमचा खर्च केवळ ४० रुपयांत भागतो, त्यामुळे यापुढे महिन्याला ५० ऐवजी ४० रुपये पाठवण्याची विनंती केली. उरलेले दहा रुपये दुसऱ्या गरजवंत, गरीब स्वातंत्र्यसैनिकांना देण्यास सांगितले. हा शास्त्रीजींचा मोठेपणा होता. शास्त्रीजींच्या जीवनापासून शक्य तेवढे धडे युवा पिढीने गिरवावे, ते देशासाठी अधिक चांगले काम करू शकतील, असे मला वाटते.
शास्त्रीजी कट्टर गांधीवादी
लाल बहादूर शास्त्री यांच्यावर गांधीजींचा मोठा प्रभाव होता. एकदा जवाहरलाल नेहरू त्यांना म्हणाले, ‘‘लाल बहादूर तूच खरा गांधीजींचा अनुयायी आहे. मी तर चुडीदार घालतो, कधी कोट, टाय घालतो.’’ शास्त्रीजी परदेशात गेले तरी त्यांनी धोती, कुर्ता घालणे सोडले नाही. मास्कोसारख्या थंडीच्या देशात ते त्रास करून घ्यायचे, मात्र ते भारतीय पोषाखातच राहायचे.
बेडरूममधील कार्पेटला नकार
पंतप्रधानपदाची शपथ घेऊन शास्त्रीजी घरी परतले. एवढ्या मोठ्या पदावर ते गेले म्हणून बेडरूममध्ये कार्पेट बसवणार असल्याचे मी त्यांना सांगितले. शास्त्रीजी म्हणाले, ‘‘अनिल, या देशात लाखो लोक फूटपाथवर झोपतात. तू माझ्यासोबत मुंबईला चल, तुला दाखवतो.’’ १९६५ मध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर शास्त्रीजींचे ऐतिहासिक भाषण झाले. मी त्या दौऱ्यात त्यांच्यासोबत गेलो होतो. त्यांनी खासगी सचिवाला सांगून मला मुंबई फिरवायला सांगितले. मी बाहेर पडलो तेव्हा मुंबईत फूटपाथवर शेकडो लोक उघड्यावर झोपलेले मी पहिल्यांदा पाहिले. घरी येऊन मी त्यांना म्हटलं, ‘‘मी माझे शब्द मागे घेतो. त्यानंतर मी वैयक्तिक आयुष्यात माझ्या बेडरूममध्ये कार्पेट कधीच बसवले नाही.’’
शास्त्री व्रत
पाकिस्तानसोबत युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने गहू निर्यात थांबवण्याचा इशारा दिला होता. शास्त्रीजी म्हणाले, ‘‘आम्ही भारतीय एक दिवस जेवणार नाही. मात्र अमेरिकेच्या धमकीला भीक घालणार नाही.’’ शास्त्रीजींच्या आवाहनाला देशाने प्रतिसाद दिला. त्यावेळी ४० कोटी भारतीय सोमवारी उपवास ठेवायचे. आज देश अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झालाय, मात्र आमचे कुटुंब आजही उपवास ठेवते. त्याला ‘शास्त्रीजी व्रत’ असे आम्ही म्हणतो. त्यामुळे मन शुद्ध राहाते, शरीरही स्वस्थ राहण्यास मदत होते.
जय जवान जय किसान
शास्त्रीजींचे विचार, त्यांचे आदर्श आजही तेवढेच प्रासंगिक आहेत. ‘जय जवान जय किसान’ हा नारा आजही तेवढाच प्रासंगिक आहे. तो नारा देशाच्या स्वालंबनाचे, अभिमानाचे प्रतीक आहे. शास्त्रीजींचे निधन झाले त्यावेळी त्यांच्याकडे घर नव्हते, शेती नव्हती. एक फियाट कार होती. त्यावरही कर्ज होते. कदाचित ते जगातील पहिले पंतप्रधान असतील, ज्यांनी पदावर असून, कर्जावर कार खरेदी केली असावी.
मुलाखत : विनोद राऊत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.