सत्य घटनेवर आधारित गुन्ह्यांच्या कथा अर्थात ‘ट्रू क्राइम’ प्रकारातील कलाकृतींना गेल्या काही वर्षांत प्रचंड मागणी आहे. खऱ्या घटनांवर आधारित कथानकांसोबतच अशा प्रकारच्या कलाकृतींची विडंबनेदेखील पाहायला मिळतात.
कोइन ब्रदर्स या द्रष्ट्या दिग्दर्शकांनी त्यांच्या नेहमीच्या खोडसाळ शैलीत त्यांच्या ‘फार्गो’ (१९९६) चित्रपटामध्ये ‘धिस इज अ ट्रू स्टोरी’, असे सांगितले होते आणि पुढील काही वर्षांत त्यांच्या या दाव्यात वेळोवेळी बदल करीत ते खोटे रेटले होते. ‘लँडस्केपर्स’च्या बाबतीत मात्र जरा वेगळी स्थिती आहे.
मालिकेच्या प्रत्येक भागाच्या सुरुवातीला ‘धिस इज अ ट्रू स्टोरी’ असे वाक्य येते; पण मग त्यातला ‘ट्रू’ हा शब्द नाहीसा होतो. त्यामुळे उरते फक्त एक कथा. या अगदी साध्या पद्धतीने निर्माणकर्ते त्यांचा दृष्टिकोन ठामपणे ठसवतात.
आपली कलाकृती सत्य घटनांवर आधारलेली आहे, हे प्रसिद्धीपर मजकुरात अधोरेखित करण्यासाठी अनेक लोक धडपड करत असतात. एड सिन्क्लेर् आणि विल शार्प यांना मात्र वास्तवाच्या व सत्याच्या (अनेक) शक्यता कल्पित रूपात समोर मांडत एक कथा सांगायची आहे.
सुझॅन (ओलिविया कोलमन) आणि क्रिस्टोफर एडवर्ड्स (डेव्हिड थ्यूलिस) या इंग्लंडमध्ये राहणाऱ्या मध्यमवयीन जोडप्याने १९९८ मध्ये सुझॅनच्या आई-वडिलांची हत्या केली होती. नंतर त्यांचे मृतदेह त्यांच्याच घराच्या परसात पुरून पुढील चौदा-पंधरा वर्षे त्यांच्या मृत्यूची कुणालाही जाणीव न होऊ देता आपला गुन्हा लपवण्यात एडवर्ड्स दाम्पत्याने यश मिळवले.
आपले खोटे उघडकीस येण्याची शक्यता दिसल्यावर त्या दोघांनी फ्रान्समध्ये पळ काढला; मात्र मधल्या काळात आर्थिक अडचणी वाढत गेल्याने २०१२ मध्ये क्रिस्टोफरने त्याच्या सावत्र आईकडे पैसे मागत असताना तिच्याकडे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या आईने पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर हा जवळपास परिपूर्ण गुन्हा उघडकीस आला.
वरकरणी कुठल्याही इतर ‘ट्रू क्राइम’ कथेप्रमाणे वाटणारे हे प्रकरण अगदीच नीरस पद्धतीने सांगितले जाऊ शकले असते; मात्र निर्माणकर्ता एड सिन्क्लेर् आणि दिग्दर्शक विल शार्प यांना केवळ नाट्यमय रूपांतरात रस नाही.
अवघ्या चार भागांच्या या मालिकेच्या सादरीकरणात ते हाताशी असलेली व एडवर्ड्स दाम्पत्याच्या कथेच्या त्यांच्या मनातील रूपाला साजेशी अशी अनेक चित्रपटीय तंत्रे आणि क्लृप्त्या वापरतात. यातून वास्तव आणि कल्पिताची सरमिसळ केली जाते. उदाहरणार्थ, सुझॅनला जुने चित्रपट व विशेषतः वेस्टर्नपट नि त्यातील गॅरी कूपरचे काम प्रचंड आवडत असे.
मग एडवर्ड्स दाम्पत्याची प्रेमकथा दाखवत असताना मधेच १९४०च्या दशकातील चित्रपटांच्या धर्तीवरील, कृष्णधवल पद्धतीचे चित्रण पाहायला मिळते. एका भागात तर थेट मालिकेतील नेपथ्याची पुनर्रचना केली जाते. परिणामी, मालिकेच्या जगातील वास्तव आणि कल्पना यांसोबतच कलाकार आणि प्रेक्षक यांमधील (चौथी) भिंतही कोसळून पडते; मात्र या साऱ्या केवळ पोकळ युक्त्या नाहीत.
कारण सारे काही एडवर्ड्स दाम्पत्याच्या मनातील कल्पनारम्य जगण्याशी नि विचारांशी सुसंगत आहे. त्या कल्पना किंवा विचार भलेही भ्रामक असतील; पण त्या त्यांच्या कल्पना आहेत. या कल्पना चितारत असताना मालिकेचे निर्माणकर्ते निर्णयात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करण्यासाठी सरसावत नाहीत.
वस्तुनिष्ठता म्हणजे काय की मुळात तीदेखील एक अशक्य वा भ्रामक कल्पना आहे, हा मुद्दादेखील मालिकेतून समोर येतो. एडवर्ड्स दाम्पत्य अस्वस्थ आहे, तसेच वास्तव जगापासून बऱ्याच अंशी दुरावलेले आहे, हे उघडपणे दिसत राहते; मात्र त्यामुळे त्यांच्या गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही; पण त्याचवेळी, त्यांच्या शोकात्मक स्थितीविषयी हळहळ वाटल्यावाचून राहत नाही.
वास्तवाची अनेक प्रतले पाहायला मिळतात. एकीकडे आहे एडवर्ड्स जोडप्याचे वास्तव, जे चित्रपटीय संकल्पनांपासून प्रेरित आहे व प्रचंड दुःखद आहे; मात्र त्यांना त्यांच्या कृतींच्या नैतिक परिणामांची जाणीव व त्यावर विश्वास आहे. दुसरीकडे आहे पोलिसांचं जग, ज्यात गंभीरता आणि गडद विनोदाची सरमिसळ आहे.
पोलिसांचे वागणे काही वेळा (खास ब्रिटिश पद्धतीचे) गमतीशीर असले, तरी त्यात एक पद्धतशीर बोथटपणा आहे. आरोपी आणि तपास अधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनातील विसंगती अगदीच ठळकपणे दिसून येते. त्यामुळेही वास्तवाचे किंवा सत्याचे व्यक्तीनिष्ठ स्वरूप आणि अनेकविध शक्यता खरेतर अशक्यता समोर येतात.
मालिकेची अभिव्यक्तीवादी शैली, वेस्टर्नपटांमधील नैतिकतेच्या संकल्पना, मालिकेच्या आकृतिबंधात सौंदर्यशास्त्रीय स्तरावर केलेले प्रयोग, कोलमन आणि थ्यूलिस या दोन निर्विवादपणे श्रेष्ठ अभिनेत्यांनी केलेली कामगिरी या साऱ्या गोष्टींमुळे ‘लँडस्केपर्स’ फारच उत्तम मालिका ठरते. ती वरकरणी साधीसोपी वाटत असली तरी पाहताना प्रेक्षकाचा कस लावणारी आहे आणि त्यामुळेच पुन:पुन्हा पाहावीशी आहे, कारण दरवेळी काहीतरी नवीन हाती लागण्याची शक्यता निर्माण होते.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.