दीदी म्हणजे सौंदर्य

दीदी अगदी एकरूप होऊन गात होती. डोळे गाताना बंद व्हायचे अन् लगेच दुसरी ओळ वाचण्यासाठी उघडायचे.
Lata Mangeshkar
Lata Mangeshkarsakal

अजीब दास्ताँ है ये

कहाँ शुरू, कहाँ खतम

ये मंझिले है कौन सी

न वो समझ सके, न हम

दीदी अगदी एकरूप होऊन गात होती. डोळे गाताना बंद व्हायचे अन् लगेच दुसरी ओळ वाचण्यासाठी उघडायचे. अर्धोन्मीलित नेत्रांनी स्वरांचं हे विश्व उभारणारी दीदी ही जगाच्या मापदंडानुसार तशी सुंदर बाई नाही; पण तिच्याइतकं सुंदरदेखील कुणीच नाही. होय! दीदी नखशिखान्त सुंदर होती. इतकं सौंदर्य असल्याखेरीज एखाद्या विशाल राष्ट्राचा चेहरा बनणं का शक्य आहे!

शुभ्र साडी, मोजके दागिने, डोळ्यांवरचा तो जाड भिंगांचा चष्मा...किती सात्त्विक ते रूप! स्वतःला गायक म्हणून सिद्ध करण्यात रमलेल्या आजच्या पिढीनं दीदीचा आदर्श घ्यावा तर तो दीदीच्या या साध्या पेहराव्यापासून! त्यानंतर, कितीही कठीण गीतात स्वतःच्या चेहऱ्यावर ती जपून ठेवत असलेल्या निर्विकार शांत भावांमधून! दीदी ही गायनाइतकीच सौंदर्यशास्त्रातही जन्मजात निपुण असावी.

तिनं आयुष्यभर श्वेत वसनं परिधान केली; परंतु त्यांत कधीही तोच तोचपणा दिसला नाही. जगानं ठरवलेले परिपूर्ण सौंदर्याचे सारे निकष मागं टाकून ती ‘सत्यं शिवं सुंदरम्’मधल्या ‘शिव’तत्त्वाच्या सौंदर्याला जणू भिडलेली असावी. तिची ही सौंदर्याची जाण तिच्या पेहराव्यात तर दिसतेच; परंतु त्याच सौंदर्याचं विराट रूप म्हणजे दीदीचं गायन!

‘अजी रूठकर अब’मधल्या ‘जी’ आणि ‘रू’ यांमध्ये दीदीनं जे कमालीचं नागमोडी वळण घेतलेलं आहे किंवा ‘नैनों में बदरा छाए’मधल्या ‘गरवा लगा ले’च्या ‘ले’नंतरची ती जागा यांमध्ये दीदीचं हेच स्त्रीसुलभ सौंदर्य दिसून येतं.

वस्तुवादी, आत्मवादी, भाववादी हे सौंदर्याचे तीन मुख्य प्रकार.

मनुष्याच्या बाबतीत याचा विचार जर केला तर यातलं वस्तुवादी सौंदर्य मनुष्याला जन्मजात मिळत असल्यानं ते त्याच्या स्वतःच्या हातात नसतं. आत्मवादी सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असल्यानं तशी दृष्टी असणारे आस्वादक मनुष्याच्या अवतीभवती असावे लागतात. मात्र, भाववादी सौंदर्य हे आस्वादकाचे भाव जागृत करणारे असल्यानं त्यावर मनुष्याचं काही प्रमाणात नियंत्रण असतं.

सप्त सुरांची आभा दीदीच्या भोवती फेर धरून असायची. त्या आभेचा प्रभाव तिच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वावरच असा काही पडला होता की, तिच्या प्रत्येक हालचालीत एक विलक्षण मार्दव आणि सौंदर्य जाणवायचं.

गात असताना तर, ही मीरेसारखी दिसते की सीतेसारखी दिसते, असा प्रश्न मला पडायचा! जोपर्यंत स्वर तिच्या मुखी रुंजत असायचे तोपर्यंत ती स्वर-आभा तिच्याभोवती एक तेजोवलय निर्माण करायची आणि स्वर संपताच स्वतःच्या संवेदनशील मनाची एक नवीन आभा तिच्या भोवती निर्माण व्हायची. तिच्या अतिकोमल पायांनी स्टुडिओत प्रवेश केला की तिच्या पदरवानं सारा स्टुडिओ खाडकन् जागा व्हायचा.

निर्माता, दिग्दर्शक, संगीतदिग्दर्शक, कवी/गीतकार, नायक, नायिका यांच्या आगमनाकडं मुद्दामहून दुर्लक्ष करणारे वादकगण स्वतःच्याही नकळत उभे राहायचे. एरवी आरडाओरडा करणारे अॕरेंजर एकदम शांत व्हायचे. नामवंत नायक-नायिकांचे फोटो काढायला आलेल्या फोटोग्राफर्सचे कॅमेरे दीदीकडं वळत. मोठमोठे दिग्दर्शक, निर्माते दीदीला बघून ताडकन् उठत.

दीपक बगैर कैसे परवाने जल रहे है

कोई नही चलाता और तीर चल रहे है

अशी ही अचानकपणे साऱ्या स्टुडिओत पसरलेली गंभीरता!

खरं तर सौंदर्याच्या उपरोक्त तीन प्रकारांव्यतिरिक्तही एक अजून प्रकार आहे : समन्वयवादी सौंदर्य. जिथं वरील तीनपैकी एखादं सौंदर्य - ज्याला ‘प्रमेय’ म्हटलं जातं - आणि त्याचा आस्वादक म्हणजे ‘प्रमाता’ अथवा चेतक यांचं मीलन होतं आणि त्यानं जे साकारतं ते समन्वयवादी सौंदर्य!

अनाहताचे बोल मीरेला ऐकू यावेत...ते तिनं मर्त्य जगाला ऐकवण्यासाठी पायात घुंगरं बांधावीत आणि त्या घुंगरांच्या तालात तन्मय होऊन बेफिकीर झालेल्या मीरेसोबतच सामान्य जनांनी ते ब्रह्मसत्य पाहावं असं ते दृश्य म्हणजेच समन्वयवादी सौंदर्य! सौंदर्याचा तो उत्पात!

दीदी आपल्यातल्या मूलभूत भाववादी सौंदर्याच्या आधारावरच या समन्वयवादी सौंदर्यापर्यंत सामान्यजनांना घेऊन जात असे. अशी होती सुती; पण स्वच्छ पांढऱ्या साडीतली... हातात मध्येच चकाकणारी एखादी बांगडी, अंगठी, एक साधं गळ्यातलं आणि अजिबात मेकप् नाही अशा साध्या-सहज रूपातली दीदी...सुंदर नायिकांना लाजवेल असं अगदी निखळ, निर्मळ हास्य असलेली...

आणि तिचे डोळे! प्रत्यक्ष हृदयात उतरणारे...दया, करुणा यांची दाटी झालेले, मनाचा ठाव घेणारे आणि किती करुण!

जख्मो से भरा है

किसी मजबूर का सीना

जखमांनी भरलेलं ‘मजबूर’, असहाय्य, सारे रस सामावलेले ते डोळे साऱ्या जगासाठी ‘सरकार-ए-मदीना’कडं आपल्या घाशीव ओठांनी पसायदान मागणारे! त्याच वेळी कुणी जराही मूर्खपणा केला तर किंवा अहंभाव दर्शवला तर अत्यंत मिष्किल होणारे आणि राग आला तर आगीसारखे धगधगणारे.

प्रेम वाटलं तर समस्त मातांच्या डोळ्यांतला वात्सल्यभाव ओसंडणारे आणि माया वाटली तर आईच्या कुशीतल्या उबेसारखे आणि भुकेलं तोंड पाहिलं तर आईच्या पवित्र दुधासारखे... असे डोळे; फक्त वीणेच्या झंकारात हरवलेल्या शारदेसारखे...असे डोळे; फक्त अशोकवनात बसलेल्या असहाय्य सीतेसारखे...असे डोळे; केवळ ‘म्हारा री गिरिधर गोपाल’ गाणाऱ्या मीरेसारखे...असे डोळे; श्रीकृष्णाची बासरी ऐकून हरवलेल्या राधेसारखे...असे डोळे; फक्त ‘स्वतंत्रते भगवती’चे! सीतेला आपल्या अजस्र बाहुपाशांत अलगदपणे सामावून निजधामाकडे घेऊन निघालेल्या भूमाता भारतदेवीचे! आणि असे डोळे; फक्त दीदीचे...फक्त दीदीचेच!

अशा अनंत शरांनी वलयांकित झालेल्या दीदीच्या सौंदर्यापुढं वस्तुवादी सौंदर्य तर कधीच शरणागत होऊन पार नेस्तनाबूत झालं होतं.

उषाताईनं चितारलेलं मीरेचं एक सुंदर चित्र आमच्या घरात आहे. जगाचा त्याग करणारी पाठमोरी मीरा! हातात एकतारी घेऊन अनंताच्या शोधात निघालेली! खूप सुंदर कलाकृती आहे ती! परंतु तीत त्या मीरेचा चेहरा काही दिसत नाही. मनी प्रश्न येतो, कशी दिसत असेल ती? ‘सावरे रंग राची’ गाताना कसे भाव असतील त्या मीरेच्या मुखावर? ...मग दीदीकडं नजर जाते आणि वाटतं, अशीच दिसत असावी ती!

एकतारीचा विषय निघाला म्हणून या वाद्याचा विचार मनात आला. तसं पाहायला गेलं तर काय या वाद्याचं अस्तित्व! दोन साध्या तारा, एक बांबू आणि पोकळ भोपळा; परंतु या साध्या दिसणाऱ्या वाद्यातून जी सौंदर्य निर्माण करू शकेल ती म्हणजे मीरा! शेकडो तारांनी संपन्न असलेल्या वाद्याला मूलतःच स्वसौंदर्य असतं; परंतु मुळात दोन तारांची एकतारी किती गरीब...सोशीक...परंतु त्याच वेळी ती वापरणाऱ्या साजिंद्याला सुराबरोबर लयदेखील देणारी! कदाचित्, त्यामुळेच साधू-संतांना ती जवळची वाटलेली असावी.

म्हणून दीदीकडून मीरेची पदं गाऊन घेताना मी मुद्दामच दीदीच्या पट्टीनुसार सफेद एक ते तीनपर्यंत लावता येईल अशी एक एकतारी मिरजेच्या उमरसाहेबांकडून तयार करून घेतली होती. त्यातही दीदीचाच साधेपणा त्या एकतारीत उतरवावा म्हणून कुठलंही नक्षीकाम न केलेली! ‘पपीहा रे पिव की बाणी’ या पदात कुठलंही वाद्य न घेता केवळ त्या एकतारीचेच सूर घेतले.

त्या वेळी काहींना तो आॕर्गनचा ध्वनी वाटला आणि तशी माझ्यावर टीकादेखील झाली; परंतु आज वाटतं, ती टीकादेखील एक सौंदर्यच आहे. ‘मुझे ग़म भी उनका अजीज़ है’ अशी ही स्थिती! कारण, दीदीचे स्वर आणि त्यांत मिसळलेला एकतारीचा लयबद्ध सूर यातून आस्वादकाला आॕर्गनसारख्या जन्मजात समृद्ध असलेल्या वाद्याचा आभास होणं हेच तर खरं समन्वयवादी सौंदर्य!

आणि म्हणूनच, हे सौंदर्य निर्माण करू शकणारी माझी दीदी ही खऱ्या सौंदर्याची अनभिषिक्त सम्राज्ञीच! आज दीदी या जगात नाही. काळाच्या ओघात ती एकतारीदेखील वाळवी लागून नष्ट झाली; परंतु ते सौंदर्य, जे या दोघींच्या समन्वयानं निर्माण झालं, ते मात्र शाश्वत आहे! मीरेला ऐकू आलेल्या त्या अनाहत नादाप्रमाणेच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com