लेझी गर्ल सिंड्रोम!

आजच्या पिढीच्या मताबाबत लगेच जजमेंटल होता येत नाही. मनातल्या मनात कुढत न बसता, कुणाची भीड न बाळगता आजची मुलं आपली बाजू ठामपणे मांडू शकतात.
Children
Childrensakal

- विशाखा विश्वनाथ

आजच्या पिढीच्या मताबाबत लगेच जजमेंटल होता येत नाही. मनातल्या मनात कुढत न बसता, कुणाची भीड न बाळगता आजची मुलं आपली बाजू ठामपणे मांडू शकतात. स्वतःसाठी वेळ काढता येईल असं काम निर्माण करणाऱ्या आजच्या पिढीच्या वागण्याला ‘लेझी गर्ल सिंड्रोम’ म्हणतात. त्यांच्या महत्त्वाकांक्षा आहेत, करिअर गोल त्यांचेही आहेत; पण आता मर मर करत काम करू आणि मग रिटायरमेंटनंतर मौज करू, कमावलेल्या पैशाचा उपभोग घेऊ, हे गणित त्यांना मान्य नाही... त्यांच्या हाका ऐकायलाच हव्यात!

परवा सकाळी ऑफिसमध्ये पोहोचले, तर आमच्या रांगेत फारच शांतता होती. माझ्या बाजूची खुर्ची साडेदहा होऊन गेले तरी रिकामीच. खरं तर तिथे त्या दिवशी नवीन जॉईन होणारी व्यक्ती येऊन बसणार होती. त्या नवीन जॉयनिंगमुळे जवळजवळ सहा जणांच्या जागा बदलल्या होत्या. म्हणूनच टीममधले सगळेच तो इसम पाहण्यासाठी वेगळ्या अर्थाने उत्सुक होतेच.

पण, साडेदहा होऊन गेले तरी खुर्ची रिकामीच म्हटल्यावर, ‘कुछ तो गडबड हैं...’ हे सगळ्यांना कळून चुकलं. तेवढ्यात एचआरने कळवलं आणि सिनियर्सही आले. नवीन जॉईन होणाऱ्या व्यक्तीने रात्री तीन वाजता मेल पाठवून तिला ही संधी नको असल्याचं कळवलं आणि मग नवी पिढी, नव्या संधी आणि नवी नोकरी या सगळ्यावर जोरदार चर्चेला सुरुवात झाली.

हा विषय इतका पसरत गेला, की तो आपसूकच हल्लीच्या पिढीला थोडीच कळणार नोकरीचं, कामाचं, जबाबदारी, कमिटमेंट या सगळ्याचं महत्त्व... यांना कसलाच सिरियसनेस नाही, या तीराला पोहोचणं फार स्वाभाविक होतं. हल्लीची पिढी म्हणजे ‘जेन झी’ हे यात वेगळं सांगणं न लगे. सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा सगळ्याच आघाड्यांवरच्या सगळ्यांना कामाला लावणारी ही मुलं आता २५ वर्षांची होणार असल्याने वेळोवेळी त्यांच्यामुळे बसणारे ‘कल्चरल शॉक’ आता ‘वर्क कल्चर’च्या बाबतीतही जाणवू लागले आहेत.

एव्हाना हे सगळं किती वाईट आहे, ही मुलं कशी बेजबाबदार, आळशी हे तुम्हाला वाटणं फारच स्वाभाविक आहे; पण थांबा इतक्यात जजमेंटल होऊ नका. कारण या नाण्याला दुसरी बाजूही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मनातल्या मनात कुढत न बसता, कुणाची भीड न बाळगता ही मुलं त्यांची बाजू ठामपणे मांडू शकतात.

याच संदर्भातला एक किस्सा अलीकडेच एका चर्चेत ऐकला. एका लीगल फर्मच्या सीईओला त्यांच्या ऑफिसमधली एका इंटर्नने दिलेल्या उत्तराचा त्यात समावेश होता. शनिवारी ऑफिसमधून निघण्याच्या आधी तिला काही काम सांगितलं तेव्हा, ‘सॉरी, माझी घरी जाण्याची वेळ झालीये. हे काम मी आता करायला घेतलं तर माझे पर्सनल प्लॅन्स मला कॅन्सल करावे लागतील.

तुमच्या पिढीला वर्क लाईफ बॅलन्सचं महत्त्व नसेल कळत; पण आमच्या पिढीला ते कळतं. मी उशिरापर्यंत थांबून काम करू शकत नाही आणि म्हणूनच मला ही इंटर्नशिपही पुढे करावीशी वाटत नाही,’ असं सडेतोड उत्तर देऊन ती मोकळी झाली.

थोडक्यात काय, तर ही पिढी वर्क लाईफ बॅलन्सविषयी करिअरच्या अगदी सुरुवातीपासूनच कमालीची खबरदारी घेताना दिसतेय आणि म्हणूनच, या ‘जेन झी’साठी सस्टेनेबल वर्कप्लेसेस कुठल्या असतील, ठरू शकतील, त्यांची काम करण्याची जागा कशी असायला हवी, नोकरीत बॉसला बिचकून राहण्यासाठी नकार देणाऱ्या, नोकरदार नव्हे तर कल्पकतेच्या जोरावर मालक होऊ पाहणाऱ्या, माफक पैसे देणारं आणि स्वतःसाठी वेळ काढता येईल असं काम स्वतः निर्माण करणाऱ्या या पिढीच्या वागण्याला ‘लेझी गर्ल सिंड्रोम’ असं म्हणतात आणि या पद्धतीच्या नोकऱ्यांना ‘लेझी गर्ल जॉब’.

ऑगस्ट २०२३ मध्ये ही संकल्पना समाजमाध्यमांमधून मूळ धरू लागली. एका मुलीने ही टर्म कॉईन केल्यामुळे तिचं नाव ‘लेझी गर्ल सिंड्रोम’ असंच राहिलं आणि ती जगभर बऱ्यापैकी पोहोचली. आता ज्यांना ही संकल्पना ठाऊक नाही ती तरुण मुलंही याच पद्धतीने वागताहेत. समाजकारण, अर्थकारण या सगळ्याचं केंद्र नव्वदच्या दशकात जन्मलेल्यांकडून ‘जेन झी’कडे सरकत असताना हे सगळेच बदल नामांकित कंपन्यांमध्येसुद्धा दिसून येताहेत.

स्टार्ट अप कल्चर भारतात धुमाकूळ घालू लागलंय. आजची तरुण पिढी हायब्रीड किंवा रिमोट वर्किंग करण्याला प्राधान्य देऊ लागलीय, हे सगळं लक्षात घेऊन ‘लेझी गर्ल सिंड्रोम’ आणि ‘लेझी गर्ल जॉब’ या दोन्ही गोष्टी आपण सगळ्यांनीच समजून घेणं गरजेचं आहे. कारण या बदलत्या ट्रेंडचे परिणाम कॉर्पोरेट कल्चरपुरते मर्यादित राहणारे नसून कुटुंबव्यवस्था, लग्नसंस्था या सगळ्यावरही तितकेच होणार आहेत.

आपल्या घरातली, माहितीतली मुलं उद्या अचानक नोकऱ्या नाकारू लागणार आहेत. स्वतःच्या कंपन्या टाकू, स्टार्टअप उभारू, घरातूनच पैसे कमवू, पैसे कमवण्यासाठी व्हिडीओ बनवू, स्वतःचे कोर्सेस डिझाईन करू, असं म्हणणार आहेत. नोकरी केली तरी नऊ तासांचा जॉब, ओव्हरटाईम, वर्क प्रेशर, रोज सकाळी ठराविक वेळेला ऑफिसला पोहोचून त्याच जागेवर बसून काम करायला नकार देणार आहेत.

ऑफिस कलिग्ज आणि टीम लिडर्सला स्वतःच्या पर्सनल स्पेसपासून लांब ठेवणार आहेत. पैसे कमवण्यासाठी त्याच त्या सरधोपट मार्गाच्या नोकऱ्या नाकारून त्यांना स्वतःचा मिलेनियल आणि ‘जेन झी’टच देणार आहेत आणि या सगळ्यामुळे अजिबात घाबरून जाण्याची गरज नाहीय.

कारण या मुलांनी पैसे कमवण्यासाठी मर मर करणाऱ्या मागील पाच दशकांतली माणसं आजूबाजूला पाहिलेली आहेत. सुबत्ता यावी म्हणून नोकरी करणाऱ्या आपल्या आईची धावपळ अनुभवली आहे आणि पैसे कमावूनही मौज करण्याची मुभा न देणारी जिंदगानी जगणारे स्वतःचे ताई, दादा बघताहेत... जास्तीचे काम केल्याने आजाराने ग्रासलेली पिढी पाहू शकताहेत. म्हणून ते वर्क लाईफ बॅलन्स सांभाळून नोकरी करण्याला प्राधान्य देताहेत.

वर्क फ्रॉम होम करून रोज थोडं स्लाईस ऑफ लाईफ अनुभवण्याकडे त्यांचा कल अधिक आहे. त्यांच्या महत्त्वाकांक्षा आहेत, करिअर गोल त्यांचेही आहेत; पण आता मर मर करत काम करू आणि मग रिटायरमेंटनंतर मौज करू, कमावलेल्या पैशाचा उपभोग घेऊ, हे गणित त्यांना मान्य नाही; कारण त्यांनी कोविडचा हाहाकार आणि क्षणभंगुर आयुष्याचा ट्रेलरही बघितलेलाच आहे.

त्यामुळे नोकऱ्या नाकारणाऱ्या, ती करत असताना स्वतःच्या नियम आणि अटी घालणाऱ्या या पिढीची वृत्ती ही ‘मैं चाहे ये करू, मैं चाहे वो करू मेरी मर्जी’ या पूर्वग्रहातून पाहण्याइतकीच नसून, ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ अशीही आहेच. कदाचित ती संपूर्ण बरोबर नसेल; पण संपूर्ण चुकीचीही नाही. त्यांचा स्वतःचा एक कंफर्ट झोन आहे ज्यात ते स्वतःला अधिक महत्त्व देतात.

कदाचित ‘लेझी गर्ल जॉब’ अर्थात, सोशल मीडिया मॅनेजमेंट, डेटा एंट्री, कंटेन्ट क्रिएशन, ग्राफिक डिझायनिंगसारखे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून करता येणारे जॉब करणाऱ्या मुली ‘न नाचणाऱ्या घुमा’ होऊ पाहताहेत आणि मुलं घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं तेच ते न करता नियम आणि अटी लागू म्हणत नवं वर्क कल्चर तयार करण्यासाठी धडपडताहेत.

या दोघांच्याही उत्पन्नाचे स्रोत हे आधीच्या पिढ्यांसारखे महितीतले असतीलच याची तितकीशी खात्री आता घेता येणार नाही आणि म्हणूनच, घरातच काय तुझं, बाहेर पड... जग बघ, नोकरी कर हा तगादा लावणाऱ्या, उत्पन्नाचे स्रोत कुठले, शिक्षण काय हे एवढंच पाहून होऊ घातलेले लग्न नामक व्यवहार करणाऱ्या सगळ्यांनीच ‘लेझी गर्ल सिंड्रोम’च्या पुढल्या हाका वेळीच ऐकायला हव्यात!

vishakhavishwanath11@gmail.com

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’विजेत्या साहित्यिक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com