Video : यशाचे रहस्य संवादातून नाती जोडण्यात

गौरव मुठे
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

प्रख्यात उद्योजिका, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लीला पूनावाला आज (ता. १६ सप्टेंबर) पंचाहत्तरीत पदार्पण करीत आहेत. त्यांच्याशी गौरव मुठे यांनी केलेली बातचीत... 

प्रख्यात उद्योजिका, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लीला पूनावाला आज (ता. १६ सप्टेंबर) पंचाहत्तरीत पदार्पण करीत आहेत. ‘पद्मश्री’, तसेच ‘रॉयल ऑर्डर ऑफ स्वीडन’सारखे मानसन्मान त्यांना लाभले. आजही त्या पूर्वीच्याच झपाट्याने काम करतात. त्यांच्याशी गौरव मुठे यांनी केलेली बातचीत... 

प्रश्‍न : बालपणीची कोणती आठवण महत्त्वाची वाटते?
लीला पूनावाला - भारत- पाकिस्तान फाळणीच्या वेळी आमचं संपूर्ण कुटुंब पाकिस्तानातून भारतात आलं. पाकिस्तानात असतानाच वडिलांचा एका रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर दोन-चार महिन्यांतच आम्ही भारतात आलो. लोणावळ्याच्या निर्वासितांच्या छावणीत आमची रवानगी झाली. आई, तीन सख्खे भाऊ, आजी-आजोबा, चुलतभाऊ असं भलंमोठं कुटुंब. विस्थापनाचे, दारिद्य्राचे चटके आणि अस्थिर वर्तमानामुळे वाटणारी चिंता कुटुंबातल्या मोठ्यांना सतावत होती. त्या वेळी मी जेमतेम पावणेतीन वर्षांची होते. काही महिने छावणीत काढल्यानंतर पुण्यात सदाशिव पेठेत चिंचेच्या तालमीजवळ आजीच्या नातेवाइकांकडे आम्ही आलो. छावणीचा तो तात्पुरता निवारा सुटून एक छोटंसं का होईना, घर मिळालं. 

: तुम्ही कोणाला ‘रोल मॉडेल’ मानता? 
- परिस्थिती माणसाला बरंच काही शिकवून जाते. वडील गेल्यामुळे आईवर घराची जबाबदारी आली. या प्रतिकूल परिस्थितीत आईने मला शिकविले. फक्त भावाला शिक्षण करू दे, असं न म्हणता आईने मलाही शिकवण्यासाठी अहोरात्र कष्ट केले, हे त्याकाळाचा विचार करता महत्त्वाचं होतं. वडील नसताना एका स्त्रीवर घर चालवण्याची जबाबदारी पडली तर ते फार कठीण असतं. आईचा माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. 

 

: मोठ्या समूहामध्ये नोकरी न करता लहान कंपनीत नोकरी का स्वीकारली? 
- शिक्षकांनी सांगितलं होतं, की ‘तुझ्याजवळ जिद्द नि हुशारी आहे’, आपली उद्दिष्टं निश्‍चित कर आणि त्यासाठी भरपूर कष्ट घे. स्वप्न पाहा आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा नेटाने प्रयत्न कर.’ हेच लक्षात ठेवत मी तशी कृतीही केली. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेतला. इंजिनिअरिंग आणि त्यातही मेकॅनिकल इंजिनिअरिंग मुलींसाठी नाही, ते तुला जमणार नाही, असं सांगणारे बरेच लोक आजूबाजूला होते; पण माझा निर्णय ठाम होता. वर्गात मुली अवघ्या दोनच, बाकी सगळे मुलगे. पण वातावरण खेळीमेळीचं होतं. इंजिनिअरिंगमध्ये श्रम आणि शक्तीची गरज लागे, तेव्हा मुलं आम्हा दोघींच्या मदतीला येत. मी पुण्यातील पहिली स्त्री मेकॅनिकल इंजिनिअर झाले. आता प्रश्न होता नोकरीचा. मुलीला नोकरी द्यायला फारसं कुणी उत्सुक नव्हतं. मग मी लहान कंपनीत जायचं ठरवलं. रस्टन हॉर्न्सबीमध्ये मला नोकरी मिळाली. मशिनवर काम करणाऱ्यांमध्ये जाऊन काम करू लागले. त्यांना सांगत होते ‘भाऊ मला हे काम शिकवा.’ ते मला शिकवत. त्याचा खूप फायदा झाला. 

: तुमच्या यशाचं रहस्य काय सांगाल? 
- मी स्त्री-पुरुष भेद मानत नाही, त्यामुळे मी एक स्त्री असले तरी यशस्वी होण्यासाठी अफाट कष्टांशिवाय कुणालाच पर्याय नाही हे माझ्या डोक्‍यात घट्ट होतं. अभ्यास, काम, नियोजन आणि छोटी छोटी ध्येयं ठरवत, त्या दिशेने पुढे जात राहणं, हेच माझ्या यशाचं सूत्र. आजच्या स्पर्धात्मक जगात लोक स्वत-चं हित बघतात. मात्र ‘कामातल्या अडचणी या खऱ्या शत्रू असतात. त्यांच्यावर हल्ला चढवून मार्ग काढला पाहिजे’. मी प्रत्यक्ष वर्कशॉप्समध्ये काम केलं होतं. कामगारांशी माझं जिव्हाळ्याचं नातं होतं. त्यामुळे कोणताही प्रश्न आला, की त्यांच्याशी बोलून, प्रश्न समजून घेत कंपनी आणि कामगार अशा दोघांचंही हित जपलं. त्यामुळे नाती टिकवता आली पाहिजेत. फक्त आपल्या फायद्यासाठी नव्हे, तर नि-स्वार्थीपणे नाती जपल्यास त्याचा कायमस्वरूपी फायदा होतो. तऱ्हेतऱ्हेच्या आणि सगळ्या स्तरांतल्या माणसांशी संवाद साधणं आणि नाती निर्माण करणं हा माझा छंद आहे. 

: तरुण पिढीला काय सांगाल? 
- तरुणांनी अनुभवाधारित शिक्षणावर भर द्यायला हवा. स्पर्धेच्या युगात दररोज नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. नोकरीच्या पारंपरिक संकल्पना बदलत आहेत. डिजिटायझेशन आणि कॉम्प्युटरायझेशनच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजिन्स, ब्लॉकचेन सारख्या तंत्रज्ञानाला भविष्यात मागणी असेल, परिणामी या क्षेत्रात नोकरीच्या संधी असतील. त्यामुळे तरुणांनी शिक्षण घेताना तांत्रिक शिक्षणावर भर दिलाच पाहिजे. शिवाय, पदवी घेतली म्हणजे झाले असा दृष्टिकोन न ठेवता सतत स्वत-ला ‘अपग्रेड’ करणे आवश्‍यक आहे. नोकरीसाठी किती लाखांचे पॅकेज मिळते हे न बघता काय काम मिळणार आहे, ते बघणे जास्त गरजेचे आहे. 

: फाउंडेशन स्थापण्यामागची भूमिका काय होती? 
- हुशार व गरजू मुलींना उच्च शिक्षणात मदत करण्यासाठी ‘लीला पूनावाला फाउंडेशन’ची स्थापना केली आहे. हे फाउंडेशन मुलींना नुसती शिष्यवृत्ती देऊन मोकळं होण्याऐवजी नियमित प्रशिक्षण, ओरिएन्टेशन देऊन त्यांना नोकरी मिळेपर्यंत मदत करते. पुढील वर्षी फाउंडेशनला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. येत्या वर्षात फाउंडेशनने दहा हजारांपेक्षा जास्त मुलींना शिष्यवृत्ती देण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lila poonawalla interview