esakal | क्षितिजे अपार : ऑनलाईन ‘उदरभरण’
sakal

बोलून बातमी शोधा

क्षितिजे अपार : ऑनलाईन ‘उदरभरण’

क्षितिजे अपार : ऑनलाईन ‘उदरभरण’

sakal_logo
By
डॉ. समीर दलवाई

लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या आणि ऑनलाईन शाळा सुरू झाल्या. मुलं आई-वडिलांच्या बाजूला बसून शिकू लागली. समोर शिक्षकच नाहीत, म्हणून आई घास भरवतेय. हे उदरभरणाचे चित्र ६५ टक्के विद्यार्थी ऑनलाईन क्लास सुरू असताना दिसते आहे.

माझ्या वर्गात माधव नावाचा माझा मित्र होता. माधव हा वृत्तीने खादाड. वर्ग सुरू झाला, की त्याचे ध्यान पुस्तकात कमी, घड्याळाकडे जास्त असायचे. म्हणजे कधी एकदा तास संपतात नि डबा उघडतो, असे त्याला होऊन जायचे. एकच नव्हे, दोन डबे त्याच्या दप्तरात असायचे. शाळेच्या दोन सत्रांत तो ते दोन्हीही डबे रिकामे करायचा. वर त्याची कल्पनाही कुणाला सुचणार नाही अशीच. म्हणजे आपल्या सर्वांना तास सुरू असताना शिक्षकांनी जर का खाण्याची मुभा दिली असती, तर किती बरं झालं असतं नई! दोन डब्यांचा ताप नाही. झालंच तर तास संपण्याची वाट पाहावी लागली नसती. शिवाय मी खाताना पकडलोही गेलो नसतो!! त्याच्या या कल्पनेवर आम्ही खळखळून हसायचो आणि ओरडायचो... माधव, हे कदापि शक्य नाही...

‘अर्ली चाइल्डहूड असोसिएशन’च्या वतीने नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात, माधवने कधीकाळी रंगवलेले स्वप्न २०२१ मध्ये सत्यात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. याचं सारं श्रेय कोरोना काळास द्यावे लागेल. लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या आणि घरून शिकणं नि कामही सुरू झालं. मुलं आई-वडिलांच्या बाजूला बसून शिकू लागली. आता ज्याची भीती म्हणा वा काळजी (आमच्या लहानपणी जशी माधवला वाटत होती.) ती आजच्या मुलांसमोर राहिलेली नव्हती. समोर शिक्षकच नाहीत, तर मग भर तोबरा. आई घास भरवतेय. बाबा म्हणतात, अरे नीट चावून खा रे!! इथे सांगावं लागेल, की ६५ टक्के विद्यार्थी ऑनलाईन क्लास सुरू असताना उदरभरण करीत आहेत. बरं, भारतातल्या आई-वडिलांचं आणि मुला-मुलींचं खाण्याच्या बाबतीतलं सूत्र वेगळं आहे. म्हणजे जन्मदात्यांचं कर्तव्य म्हणून त्यांचा शिक्षणाकडे कमी, खाण्याकडे कल अधिक झुकलेला दिसेल.

माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या बहुतेक पालकाच्या तोंडी एकच एक प्रश्न असतो, माझ्या मुलाने जास्तीत जास्त खावं, यासाठी काय करता येईल? आता मुलाने ‘खाते-पिते’ व्हावे यासाठी एक साधी युक्ती आई-वडील वापरतात, ती म्हणजे त्याला काही तरी दाखव. म्हणजे तो टीव्ही बघत असताना त्याला भरवलं की तो भरपेट खातोच. बालरोगतज्ज्ञांच्या क्लिनिकमध्ये ठेवलेल्या वजनयंत्राचा काटा सरसर हलू लागला, की आईवडिलांच्या डोळ्यात आनंद मावता मावत नाही. टीव्ही, मोबाईलचं त्याला व्यसन लागतं. सारं प्रकरण पालकांच्या हाताबाहेर जातं. मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ कमी करा, कमी करा असे सातत्याने इंडियन ॲकेडमी ऑफ पेडिॲट्रिक्स वा अनेक बालरोगतज्ज्ञ पालकांना बजावत असतात, पण लक्षात कोण घेतो?

टीव्हीसमोर खूप वेळ बसणं म्हणा वा मोबाईलचा अतिवापर कालांतराने घातकच ठरतो, हे अनेकदा काही घटनांमधून सिद्ध झालंय. टीव्हीवरल्या गुन्हेगारीवर आधारित घटना पाहून पाहून त्याचा मेंदूही तेच शोधू लागण्याची भीती अधिकच गडद होते. कारण एकच, लहान बालकांचा घरातल्या सर्वांशी त्याचा असलेला संवादच खुंटतो. याला मानसशास्त्रीय भाषेत ‘आभासी स्वमग्नता’ (व्हर्च्युअल ऑटिझम) म्हणता येईल.

भारतीय पालकांना पोषण आणि अन्न यातील फरक कळायला लागला आहे. यासाठी ते बराच वेळ डॉक्टरांशी, न्यूट्रिनिस्टशी संवाद साधतात काही ऑनलार्इन व्हिडीओ पाहतात. त्यातील माहिती टिपून घेतात, पण त्यांचं तीन वर्षांचं मूल जेव्हा त्याच्या आवडीचं चमचमीत जेवण मागवतं तेव्हा साऱ्या मेहनतीचं काय, असा प्रश्न पडावा.

बदल नक्कीच स्वीकारावा, पण तो का स्वीकारावा याला काही तर्कसंगतता आहे. म्हणजे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘का’ या प्रश्नाला बगल देऊन पुढ्यात जे येईल ते स्वीकारले जात आहे. सर्वांत धक्कादायक म्हणजे टीव्ही बघताना खाल्ले तर त्याचे शरीरावर विपरित परिणाम होतात. याची कल्पना असूनही ६३ टक्के पालक त्यांना टीव्ही बघताना वा मोबाईलवर गेम खेळताना भरवत असल्याचे; तर २५ टक्के पालक मुले ताटातलं पूर्ण खात असल्याने सोयीचे जात असल्याचे सांगत असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. व्यासंगी बालशिक्षण तज्ज्ञ स्वाती पोपट-वत्स म्हणतात, की पालकांना नेहमी चिंता असते ती वेळेची. म्हणजे मुलांची ऑनलाइन क्लासची वेळ आणि जेवणाची वेळ एकच असते आणि एखादवेळ क्लास खूपच लांबला तर मुले तशीच उपाशी बसून राहतात. अशा वेळी पालकांची अडचण होते.

आणि आता सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, शाळा सुरू झाल्यावर काय होईल? मुलं वर्ग सुरू असताना एकमेकांचे डबे उघडून तुझी चपाती, माझे नूडल्स. तुझा पुलाव, त्याचा जॅम’ असं वाटप करून पोटोबा करतील का, अशी स्थिती येऊन ठेपली आहे.

तरीही, आशादायी चित्र अजून आहेच. मुलं आताशा घरच्या वातावरणाला कंटाळली आहेत. त्यांना शाळा हवी आहे. जी शिस्त पाळून मुलं याआधी वर्गात बसत होती, ती आजही काही विसरली आहेत, असे म्हणता येणार नाही. शिक्षक, पालक आणि पाल्य यांच्या समन्वयातून हे ऑनलाईनच्या अनारोग्यातून सुटता येईल. आज आपल्या देशात गुणवत्तेला कमी नाही. गरज आहे ती फक्त इच्छाशक्तीची. कारण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणं शाळा व्यवस्थेतील ‘माधव’ काढून टाकायचा असेल तर कोरोनानंतर येणाऱ्या नव्या आव्हानांपासून पळून चालणार नाही; तर त्यांना नव्या ताकदीनं भिडावं लागेल. शिक्षणव्यवस्थेतला हा आरोग्यदायी घास प्रत्येक मुलाच्या मुखी लागल्यास ती अधिक जोमानं सुदृढ होण्यास वेळ लागणार नाही.

samyrdalwai@gmail.com

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, न्यू होरायझन चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटरचे संस्थापक व ‘अर्ली चाइल्डहूड असोसिएशन’चे संस्थापक-उपाध्यक्ष आहेत. दोन दशकांपासून मुलांच्या विकास आणि वर्तनाचे अभ्यासक आहेत.)

loading image
go to top