सर्वात भव्य चैत्यगृह

इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून ते इसवी सन चौथ्या शतकापर्यंत या ठिकाणी लेणीनिर्मितीची प्रक्रिया सुरू होती.
lohagad visapur fort and aai ekvira dongar Karla Caves tourist attraction
lohagad visapur fort and aai ekvira dongar Karla Caves tourist attraction Sakal

- केतन पुरी

मुंबई-पुणे महामार्गावरून जाताना एका बाजूला लोहगड-विसापूर किल्ल्यांची जोडी दिसते, तर त्याच्या विरुद्ध बाजूला आई एकवीरा देवीचं मंदिर असलेला पवित्र डोंगर लक्ष वेधून घेतो. लोणावळ्यापासून अगदी जवळ असलेला हा परिसर ट्रेकर, पर्यटक, अभ्यासकांना कायम खुणावत आलेला आहे.

इथं असलेले लोहगड, विसापूर, राजमाचीसारखे बलाढ्य किल्ले आणि भाजे, बेडसे, कोंढाणेसारख्या लेणी कायम त्यांना खुणावत असतात. पावसाळ्यात हा परिसर निसर्गदृष्ट्या कशाच्याही तुलनेत कमी भासत नाही.

याच भागात असणारा एक अतिशय महत्त्वाचा लेणीसमूह म्हणजे ‘कार्ले’. दोन हजार वर्षांचा इतिहास लाभलेल्या या लेणींना आणि आई एकवीरा देवीच्या मंदिराला भेट देण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येनं लोक येत असतात. देशातल्या धार्मिक स्थापत्याच्या यादीत कार्ले लेणी स्वतःचं वेगळं महत्त्व टिकवून आहे.

इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून ते इसवी सन चौथ्या शतकापर्यंत या ठिकाणी लेणीनिर्मितीची प्रक्रिया सुरू होती. एकूण सोळा लेणींचा समूह आहे. ब्राह्मी लिपीत लिहिलेले ३५ पेक्षा जास्त शिलालेख या लेणींच्या निर्मितीची कहाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. सातवाहन तसेच पश्‍चिमी क्षत्रप या राजघराण्याचे शिलालेख आढळत असले,

तरीसुद्धा लेणी निर्मितीसाठी देणगी प्रामुख्यानं व्यापारी, व्यापारी संघ आणि भिक्खूंनी दिल्याचं वाचावयास मिळतं. त्यातही, ‘धेनूकाकट’ नामक गावातून सर्वांत जास्त प्रमाणात देणगी आल्याचं या शिलालेखांमधून समजतं. ‘धेनूकाकटा यवनस सिहधयान थबो दानं’ म्हणजे, धेनूकाकट येथील सिहध्यान नामक यवन व्यक्तीकडून या स्तंभाचे दान देण्यात आले, अशा स्वरूपाचे उल्लेख या लेखांमधून वाचावयास मिळतात. हे गाव आज नक्की कुठे असावे, याविषयी अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत.

या लेणीचं पुरातन नाव ‘वलूरक’ असल्याचंही समजतं. प्राचीन कल्याण आणि सोपारा बंदरांना जोडणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यापारी मार्गावर असणारी कार्ले लेणी प्रसिद्ध आहे ती भव्य चैत्यगृहामुळं. असं सांगितलं जातं, की हे देशातलं सर्वांत भव्य चैत्यगृह आहे. चाळीस खांबांनी सजलेल्या या चैत्यगृहात अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत.

चैत्याचा आकार गजपृष्ठाकार आहे. स्तंभांच्या शीर्षभागावर हत्ती, घोडे यांसारखे प्राणी आणि त्यांच्या पाठीवर आरूढ झालेले मिथुन शिल्पं आपलं लक्ष वेधून घेतात. चैत्यगृह पश्चिमाभिमुखी आहे. प्रवेशद्वारावर भव्य सिंहस्तंभ आहे. त्यावरही शिलालेख कोरलेला दिसून येतो. हा स्तंभ आपल्याला अशोकाच्या प्रसिद्ध स्तंभांची आठवण करून देतो.

हा स्तंभ मागं टाकून काही पावलं चालत गेल्यास आपल्याला चैत्यगृहाचा व्हरांडा नजरेस पडतो. हा भाग पूर्णपणे गौतम बुद्ध, बोधिसत्त्व आणि मिथुन शिल्पांनी भरून गेलेला आहे. इथं कोरलेले हत्ती नयनरम्य आहेत.

याच ठिकाणी एक लांबलचक शिलालेख कोरलेला असून त्यात ‘भूतपाल याने जंबूद्वीपातील अप्रतिम लेणीचे निर्माण केले,’ असा उल्लेख वाचावयास मिळतो. गौतम बुद्ध किंवा बोधिसत्त्व पद्मपाणीची प्रतिमा महायान काळात निर्माण केली गेली.

हीनयान आणि महायान यांच्यातील तत्त्वज्ञानाचा फरक आणि त्यामुळं लेणीस्थापत्यात झालेले बदल आपण मागील काही लेखांमधून समजून घेत आहोत. कार्ले लेणी समूहावर महायान तत्त्वज्ञानाचा जबरदस्त पगडा आपल्याला जाणवतो. चैत्यगृहात प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूने असलेली भव्य अष्टकोनी स्तंभांची रांग आणि त्याच्या मधोमध कोरलेला स्तूप आपले लक्ष वेधून घेतो.

इथं असणारी सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे, स्तूपावर असणारी छत्रावली. गौतम बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं जतन करण्यासाठी तसेच त्यांची साधना करण्यासाठी स्तूपाची निर्मिती करण्यात आली. लुंबिनी, कुशीनगर, सारनाथ, सांची इ. ठिकाणी असणारे स्तूप आणि त्यामागे असणारा हा संदर्भ आपण भरपूर वेळा ऐकला आहे-वाचला आहे.

लेणीमध्ये कोरलेला स्तूप हा गौतम बुद्धांच्या अस्तित्वाचं प्रतिनिधित्व करतो, अशी मान्यता आहे. या स्तूपाचे अनेक भाग पडतात. स्तूपाच्या अर्धगोलाकृती भागास ‘ब्रह्मांड’ असं संबोधलं जाते. त्यावर असणाऱ्या चौकोनी भागास ‘हर्मिका’ असं म्हणतात. त्यावर सरळ आणि काहीसा काठीसदृश भाग असतो, ज्याला ‘छत्रयष्टी’ म्हणण्यात येतं.

सर्वांत वरच्या भागावर ‘छत्र’ किंवा ‘छत्रावली’ असते. संपूर्ण भारतात कार्ले येथील एकमेव चैत्य आहे, जिथे लाकडात निर्माण केलेले छत्र अजूनही सुस्थितीत आहे. त्यावरील नैसर्गिक रंगात केलेली कलाकुसर सुद्धा अतिशय स्पष्टपणे दिसते.

कार्ले लेणी समूह प्रसिद्ध आणि अभ्यासकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. या लेणीमध्ये असणाऱ्या शिलालेखांमधून अनेक राजघराण्यातील व्यक्तींची तसेच यवन (ग्रीक) व्यक्तींची, इतर काही व्यापारी स्त्री-पुरुषांची नावं आपल्याला समजून येतात. पुण्यापासून अगदी जवळच असणाऱ्या भाजे-कार्ले-बेडसे लेणींना अभ्यासपूर्ण नजरेनं भेट देण्याची आणि त्यांच्या खऱ्या इतिहासाला जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याची गरज आहे.

पुरा-पर्यटन सदरात भारतातील सर्वांत प्रथम धार्मिक वास्तू म्हणून बघितल्या जाणाऱ्या लेणींच्या जन्माची कथा, थेट बिहार ते महाराष्ट्र हा प्रवास, त्यांचे प्रकार आणि त्यांचं असणारं ऐतिहासिक महत्त्व आपण मागील काही लेखांमधून समजून घेतलं.

अशोकपूर्व काळातील अनेक वास्तू किंवा स्थापत्यकीय उदाहरणे उत्खननाच्या माध्यमातून जगासमोर आली आहेत. पण, सुस्थितीत असलेल्या आणि लिखित पुराव्यांच्या आधारे काळाची सुनिश्चिती करता येणाऱ्या वास्तूंची ओळख आपण करून घेतली.

यामुळं विशिष्ट लेणी, तिच्या निर्मितीचा काळ, उद्देश, त्या वास्तूवर असणारा विशिष्ट संप्रदायाचा पगडा आणि त्या माध्यमातून समजून येणारी धार्मिक-सांस्कृतिक परिस्थितीची थोडक्यात पण महत्त्वाची ओळख आपल्याला झाली.

यानंतर महाराष्ट्रात किंवा दख्खन भागात अनेक लेणी निर्माण झाली. पण त्यात सर्वांत उल्लेखनीय आणि अविश्वसनीय भासणारे दोन उदाहरणे आहेत. ज्यांची ओळख आपण पुढील काही लेखांमधून करून घेणार आहोत. त्या ऐतिहासिक वास्तू म्हणजे ‘अजिंठा आणि वेरुळ’.

(लेखक हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन - मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com