भर समुद्रातील गलबत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचे तत्कालीन संपादक माधव गडकरी यांनी १३ नोव्हेंबर १९७७ च्या अंकात विजय तेंडुलकर यांच्यावर लिहिलेल्या लेखाचा संपादित अंश.

‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचे तत्कालीन संपादक माधव गडकरी यांनी १३ नोव्हेंबर १९७७ च्या अंकात विजय तेंडुलकर यांच्यावर लिहिलेल्या लेखाचा संपादित अंश.

विजय तेंडुलकर या नावाचे गलबत भर समुद्रात उभे आहे. नाटककार म्हणून अखिल भारतीय कीर्ती त्यांनी संपादन केली आहे. संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी, दिल्लीचे ड्रामा स्कूल, येथील इतर भाषिकांच्या नाट्यसंस्था यांचा सल्लागार म्हणून त्यांचा संबंध आहे. त्यांचा घाशीराम गाजतो आहे, रंगभूमीवर नाना नाचतो आहे. वादळे उठत आहेत, शमत आहेत. मुख्यमंत्र्याच्या जीवनावर लिहिलेले नवे नाटक ‘भाऊ मुरारराव’ रंगमंचावर आहे. सर्वत्र त्यांच्या नाटकांची चर्चा चालू आहे. त्यांची एकीकडे भ्रमंतीही चालू आहे. ‘युक्रांद’च्या कार्यकर्त्यांना तेंडुलकर आपले वाटतात. नाट्यदिग्दर्शक, कलावंत, लेखक यांनी त्यांचे घर भरलेले असते. कधी अरविंद देशपांडे पाय दुमडून बसलेले असतात, तर कधी जब्बार पटेल पाय गुंडाळून नव्या योजना आखत असतात. या सर्वांना घेऊन, मग हे गलबत निघते. 

गेली दहा वर्षे आम्ही शेजारी आहोत. त्यामुळे तेंडुलकर कसे, गलबतासारखे चालतात ते मी नेहमी पाहत आलो. हे गलबत तसे गंभीर आहे. एकटे चालणारे आहे. खूप खोल पाण्यातून चालणारे आहे. त्याने खूप सोसलेही आहे. नाटक उभे राहिले आहे, पडताना पाहिले आहे. आपली नाटके नव्या प्रयोगासाठी, नव्या वाटचालीसाठी त्यांनी कुर्बान केलेली आहेत. म्हणून हे गलबत कुणाकडे पाहून चटकन हसत नाही. त्यांचे एकूण वागणे ‘फटकून’ या शब्दात मोडणारे आहे. साहित्य संमेलनांना ते जात नाहीत.

नाट्यसंमेलनाकडे ते फिरकत नाहीत. तेंडुलकर हे डोंबिवलीकर; परंतु तेंडुलकरांच्या नाटकांना विरोध झाला तो डोंबिवलीतूनच. परंतु या सर्व उपेक्षेने हा माणूस गडबडलेला मी पाहिलेला नाही. तडजोड टाळणारे हे गलबत आहे, म्हणून सुखाचा प्रवास त्यांना अजूनही लाभलेला नाही. इतके विपुल लेखन करणाऱ्या मराठीतील मातब्बर साहित्यिकाला जीवन संघर्षासाठी आजही धडपडावे लागत आहे. त्यांचे ‘शांतता कोर्ट’ देशभर गाजले. परंतु शांततेने राहता येईल व लिहिता येईल असा एक चार खोल्यांचा फ्लॅट विकत घेण्याइतके पैसे या नाटकाने त्यांना दिले नाहीत. 

एक बेडरुम, एक गॅलरी, एक बैठकीची खोली, एक स्वयंपाकघर अशा जागेत ते विलेपार्ल्यास राहतात. डोंबिवलीस असताना मुंबईस नभोवाणीवर कार्यक्रमास ते जात. तिथं त्यांना कु. निर्मला साखळकर (आजच्या सौ. तेंडुलकर) भेटल्या. गलबताची खरी डोलकाठी हीच. ती मजबूत आहे. म्हणून चालले आहे. सदैव हसतमुख. तेंडुलकरांपेक्षा अधिक मनमोकळ्या. त्यांनी व नाटककाराच्या मुलींनी ते घर हसरे ठेवले आहे. तेंडुलकर ‘मराठा’ दैनिकात होते, तो काळ त्यांच्या दृष्टीने बराच सुखाचा म्हणावा लागेल. आचार्य अत्रे व तेंडुलकर हे विचार प्रकृतीने अगदी वेगळे; परंतु ‘मराठा’ दैनिकातील वास्तव्याने त्यांना खूप काही दिले. ‘शांतता कोर्ट’ या नाटकाच्या पंचविसाव्या प्रयोगाला मी हजर होतो. आचार्य अत्रे खास आले होते. परंतु त्या वेळी तेंडुलकर ‘मराठा’तून बाहेर पडले. लेखक व नाटककार म्हणून त्यांना स्वतंत्रपणे जगायचे होते.

परंतु एकीकडे नाटके व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होत नव्हती. डझनभर नाटके तेंडुलकरांनी लिहिली. एका भेटीत त्यांना म्हणालो, ‘‘आता नाटकांवर तुम्ही निश्‍चित घरखर्च चालवू शकत असाल!’’ ते म्हणाले, ‘‘नाटकांचे निश्‍चित काही नसते. एखाद्या महिन्याला पैसे येतात तर एखाद्या महिन्याला काहीच येत नाही.’’ त्यातच तेंडुलकर गेल्या जुलैमध्ये ब्लडप्रेशरच्या विकाराने आजारी झाले. या आजाराने उत्पन्न मिळवून देणारी कामं थांबली होती. सरळ रस्त्याने न जाणारा, जगाशी फटकून वागणारा हा लेखक दैनंदिन जीवनाशी मुकाबला संपत नाही म्हणून खिन्न होतो. 
मला नेहमी जाणवते, की लेखकाची सत्त्वपरीक्षा घेण्याच्या भूमिकेतच समाज बसलेला असतो. तेंडुलकरांसारख्या खऱ्या निर्मितीक्षम लेखकाला नोकरी करावी लागू नये, असे समाज काही निर्माण करत नाहीत. नाटक रंगमंचावर आले की टीकाकार तुटून पडतात. ‘सखाराम बाईंडर’वर केवढे हल्ले झाले. सामान्य लोकांची सर्वसामान्य अभिरुची, समाजाची कसोटी पाहण्याची मनोवृत्ती, नोकऱ्या देणाऱ्यांची उपकाराची भाषा, वृत्तपत्रीय लेखनाच्या मर्यादा व बंधने या सर्व संघर्षातून तेंडुलकर छातीचा कोट करून उभे आहेत. सगळ्या लेखकांपेक्षा ते वेगळे वाटतात. त्यांचा गट नाही. बंधनांचा त्यांना तिटकारा आहे हे त्यांच्या बोलण्यात जाणवते, त्यामुळे आपली सुखदुःखे घेऊन ते चालतात. 

हे गलबत घरून निघते तेव्हा श्रीमती तेंडुलकर गॅलरीतून, ‘अहो तेंडुलकर,’ अशा हाकाही मारतात. गलबत क्षणभर थांबते. निरोपाचा हात करते व पुन्हा चालू लागते. भर समुद्रातून चालल्यासारखे.

साहित्य - 
एकांकिका - अजगर आणि गंधर्व, थीफ : पोलिस, रात्र आणि इतर एकांकिका

कथा - काचपात्रे, गाणे, तेंडुलकरांच्या निवडक कथा, द्वंद्व, फुलपाखरू, मेषपात्रे.

कादंबरी - कादंबरी एक, कादंबरी दोन, मसाज.

चित्रपट पटकथा - अर्धसत्य, अक्रीत, आक्रोश, उंबरठा, कमला, गहराई, घाशीराम कोतवाल, चिमणराव, निशांत, प्रार्थना, २२ जून १८९७, मंथन, ये है चक्कड बक्कड बूम्बे बू, शांतता कोर्ट चालू आहे, सामना, सिंहासन.

दूरचित्रवाणी मालिका - स्वयंसिद्धा.

नाटके - अजगर आणि गंधर्व, अशी पाखरे येती, एक हट्टी मुलगी, कन्यादान, कमला, कावळ्यांची शाळा, गृहस्थ, गिधाडे, घरटे अमुचे छान, घाशीराम कोतवाल, चिमणीचं घर होतं मेणाचं, छिन्न, झाला अनंत हनुमंत, देवाची माणसे, दंबद्वीपचा मुकाबला, पाहिजे, फुटपायरीचा सम्राट, भल्याकाका, भाऊ मुरारराव, भेकड, बेबी, मधल्या भिंती, माणूस नावाचे बेट, मादी (हिंदी), मित्राची गोष्ट, मी जिंकलो मी हरलो, शांतता ! कोर्ट चालू आहे, श्रीमंत, सखाराम बाइंडर, सरी गं सरी.

नाट्यविषयक लेखन - नाटक आणि मी.

बालनाट्ये - इथे बाळे मिळतात, चांभारचौकशीचे नाटक, चिमणा बांधतो बंगला, पाटलाच्या पोरीचे लगीन, बाबा हरवले आहेत, बॉबीची गोष्ट, मुलांसाठी तीन नाटिका, राजाराणीला घाम हवा..

भाषांतरे - आधेअधुरे (मोहन राकेश), चित्त्याच्या मागावर, तुघलक (गिरीश कर्नाड), लिंकन यांचे अखेरचे दिवस (व्हॅन डोरेन मार्क), लोभ असावा ही विनंती (जॉन मार्क पॅट्रिकच्या ‘हेस्टी हार्ट’चे भाषांतर), वासनाचक्र (टेनेसी विल्यम्सच्या ‘स्ट्रीटकार नेम्ड डिझायर’चे भाषांतर), पाच पाहुण्या - पाच विदेशी कथांचा अनुवाद..

ललित - कोवळी उन्हे, रातराणी, फुगे साबणाचे, रामप्रहर.

संपादने - दिवाकरांच्या नाट्यछटा, समाजवेध.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhav gadkari article vijay tendulkar