मोदकाख्यान (माधव गोखले)

माधव गोखले madhav.gokhale@esakal.com
रविवार, 27 ऑगस्ट 2017

गणरायाचा आवडता मोदक म्हणजे जिभेला आणि डोळ्यांना तृप्त करणारा पदार्थ. देवांनी पार्वतीला दिलेल्या महाबुद्धी नावाच्या अमृताच्या मोदकापासून सुरू झालेला हा प्रवास आज मोदकाच्या ‘कोलेस्टेरॉल-फ्री’ अवतारासारख्या नानाविध रूपांपर्यंत आला आहे. मोदकांच्या जातकुळीतले, त्यांच्याशी साधर्म्य दाखवणारे पदार्थ माणसाच्या एकंदर खाद्यसंस्कृतीला गेल्या सुमारे चार हजार वर्षांपासून माहिती आहेत. सगळीकडं या ‘डम्पलिंग्ज’चा वावर आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात आज जगाच्या विविध भागातली ही डम्पलिंग्ज अवघ्या खाद्यब्रह्माला भुरळ घालताहेत.

गणरायाचा आवडता मोदक म्हणजे जिभेला आणि डोळ्यांना तृप्त करणारा पदार्थ. देवांनी पार्वतीला दिलेल्या महाबुद्धी नावाच्या अमृताच्या मोदकापासून सुरू झालेला हा प्रवास आज मोदकाच्या ‘कोलेस्टेरॉल-फ्री’ अवतारासारख्या नानाविध रूपांपर्यंत आला आहे. मोदकांच्या जातकुळीतले, त्यांच्याशी साधर्म्य दाखवणारे पदार्थ माणसाच्या एकंदर खाद्यसंस्कृतीला गेल्या सुमारे चार हजार वर्षांपासून माहिती आहेत. सगळीकडं या ‘डम्पलिंग्ज’चा वावर आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात आज जगाच्या विविध भागातली ही डम्पलिंग्ज अवघ्या खाद्यब्रह्माला भुरळ घालताहेत.

‘मो  दक डेज आर हिअर अगेन....’ आपल्या खाद्ययात्रेतला हा एक राजस पदार्थ. बुद्धिदात्या गणरायाचा आवडता.

आठ-पंधरा दिवसांपूर्वी व्हॉट्‌सॲपवर एक पोस्ट फिरत होती. मोदकांचा आस्वाद घेण्यातला आनंद तितक्‍याच रसभरीत शब्दांत सांगणारी ही पोस्ट ज्यांनीज्यांनी वाचली असेल त्यांनात्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन गेली असणार. हे व्हॉट्‌सॲप नावाचं प्रकरण मात्र एकदम भारी आहे. एकविसाव्या शतकात जगण्यासाठी अन्न-वस्त्र-निवाऱ्याइतकंच आवश्‍यक असणाऱ्या महत्त्वाच्या आयुधांपैकी एक असलेल्या स्मार्टफोनमध्ये असणाऱ्या असंख्य ॲप्सपैकी एक -एवढीच या व्हॉट्‌सॲपची ओळख नाहीये. व्हॉट्‌सॲपनं आपली आयुष्यं क्रांतीच्या भलत्याच वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवली आहेत. मुख्य म्हणजे या व्हॉट्‌सॲपनं आपल्याला एकदम ‘फॉरवर्ड’ बनवलं आहे. (इथं ‘फॉरवर्ड’चा अर्थ ‘प्रगत’ किंवा ‘पुढारलेला’ असा नसून, हातातल्या फोनवर जे येईल ते ‘पुढं ढकलणारा असा घ्यावा.) तर, उकडीच्या मोदकांबद्दलची ती पोस्ट अशीच फिरतफिरत माझ्यापर्यंत आली, तेव्हा मूळ पोस्टकर्त्यांची ओळख पुसली गेली होती. फक्त (त्या मूळ लेखकाचं) नशीब इतकंच, की पोस्ट कुणा दुसऱ्याच्या नावावर खपवलेली नव्हती.

‘अंतर्बाह्य सौंदर्यानं भरलेला हा पदार्थ जिभेला आणि डोळ्यांना तृप्त करतो...’ बस्स... हे लिहिणारा किंवा लिहिणारी अंतर्बाह्य मोदकांच्या प्रेमात असणार.
मोदक करणं हे एकूणच कौशल्याचं काम. नजाकतीनं करण्याचं. म्हणजे तांदूळ स्वच्छ धुवून, ते सावलीत वाळवून, दळून ते त्याची उकड काढेपर्यंतची एक स्टेप. उकड काढण्यासाठी पाणी तयार करताना ‘मोहन’ घालणं, हा एक स्वतंत्र कार्यक्रम असतो. मोहन म्हणजे पाण्यात तेल किंवा तूप घालायचं का तेला-तुपात पाणी, हे कळण्यापासून तयारी लागते. मग छान पिवळ्या रंगाचा गूळ आणि ओल्या खोबऱ्याचं सारण जमायला हवं. उकड काढल्यावर हाताला तेल आणि पाणी लावून ती मळायची. इतकं सगळं सुरळीत पार पडलं, तर मग गाडी मोदक वळण्याकडं वळते. बरं, हे वळण पुन्हा सरळ नाहीच. मळलेल्या उकडीचा गोळा घेऊन त्यात एक खळगा करायचा. ही मोदकाची पारी. मोदक उकडीचा असो किंवा कणकेचा, पारी पातळ हवी. पारी जाड झाली, तर मोदकाची चव जाते; पण पारी पातळ आहे म्हणून मोदक फुटता कामा नये. मग त्या पारीत सारण भरून कळ्या किंवा मुखऱ्या करून तो मोदक बंद करायचा आणि मोदकपात्रात केळीच्या पानाच्या तुकड्यावर ठेवून वाफवायचा. मोदकाच्या पारीच्या कळ्या आणि मोदकाचं नाक ही स्वतंत्र कौशल्यं आहेत. नाहीतर एवढा घाट घालूनही मोदक ‘जमले नाहीत’चा शिक्का बसतो तो वेगळाच.

पद्मपुराणातल्या सृष्टीखंडात महर्षी व्यास मोदकाची कथा सांगतात. या आख्यायिकेनुसार, मोदकाची निर्मिती प्रत्यक्ष देवांनी केली आहे. सर्वप्रथम पूजा कोणाची करावी, या संजयाच्या प्रश्‍नाचं उत्तर देताना व्यास महर्षी मोदकाची कथा सांगतात. एकदा सर्व देवांनी विशेष श्रद्धेनं अमृतापासून तयार केलेला, आनंददायक असा मोदक देवी पार्वतीकडं दिला. त्या मोदकाचं नाव महाबुद्धी. देवांनी बनवलेला हा मोदक विशेष होता. त्याच्या केवळ वासानं अमरत्व प्राप्त होईल; हा मोदक सेवन करणारा सर्वशास्त्रार्थतत्त्वज्ञ, सर्व शस्त्रास्त्रविद्यापारंगत आणि सर्व तंत्रांत निपुण होईल; तसंच तो लेखक, चित्रकार आणि ज्ञानविज्ञानतत्त्ववेत्ता होऊन सर्वज्ञ होईल, अशी त्या मोदकाची ख्याती होती. स्कंद आणि गणेश ही शंकर आणि पार्वतीची दोन मुलं. दोघांही मुलांनी पार्वतीकडं त्या मोदकाची मागणी केल्यावर, मोदक मिळवण्यासाठी पार्वतीनं दोन्ही मुलांना शंभर सिद्धी प्राप्त करण्याची अट घातली. हे ऐकताच स्कंद मोरावर बसून जगातल्या सर्व तीर्थांमध्ये स्नान करून एका क्षणात परत आला. बुद्धिमान गणेशानं मात्र आईवडिलांना श्रद्धेनं प्रदक्षिणा घातली आणि तो त्यांच्यासमोर उभा राहिला. पार्वती म्हणाली ः ‘‘सर्व तीर्थांत केलेलं स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व प्रकारची यज्ञयागादिक व्रतं, नाना प्रकारचे यमनियम, हे सर्व आईवडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाएवढंही होऊ शकत नाही. तेव्हा, गणेश शंभर पुत्रांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण त्यानं आईवडिलांची पूजा केली आहे. त्यालाच मी हा मोदक देते. यामुळंच गणेशाला यज्ञयागात, वेदशास्त्रादी स्तवनात, नित्य पूजाविधानात प्राथम्य मिळेल, असा वरही शंकर-पार्वतीनं गणेशाला दिला. गजाननाला मोदक प्रिय झाला तो तेव्हापासून...आणि गणपतीच्या अनेक नावांमध्ये आणखी एका नावाचीही भर पडली- मोदकप्रिय. अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथन केल्यानंतर प्रकट झालेल्या अमृतकुंभासाठी देव आणि दानवांमध्ये एक युद्ध झालं. युद्धाच्या धामधुमीत अमृतकुंभातले चार थेंब जमिनीवर सांडले. त्यापैकी एक थेंब पडला उज्जैनला क्षिप्रा नदीत. महाकालेश्‍वराच्या या अमृतक्षेत्री असलेल्या गजाननाच्या सहा मंदिरांमधलं एक मंदिर या मोदकप्रियाचंही आहे.

ब्रह्मांडपुराण, नारदपुराणातल्या गणपती व्रतांमध्ये आणि अन्य काही व्रतांमध्ये नैवेद्याच्या संदर्भानं मोदक येतो. ‘यो मोदकसहस्रेण यजति। स वाञ्छितफलमवाप्नोति।’...या मोदकप्रियाला हजार मोदकांचा नैवेद्य दाखवणाऱ्या भक्ताला इष्टफल प्राप्ती होते, असं गणपती अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीमध्ये म्हटलं आहे. दुर्गा भागवत यांच्या एका लेखात विष्णुपुराणात नोंदवलेल्या भोजनातल्या पदार्थांचे संदर्भ आहेत. त्यात साखरेचे पायस, शाली नावाच्या उत्तम तांदळाचा भात, लाडू, स्वादिष्ट वडे, घारगे, मांडे यांच्या जोडीला मोदकही आहेत.
भारतीय पुराणांचे अभ्यासक मोदकाचे विविध अर्थ सांगतात. मोद म्हणजे आनंद देतो तो मोदक. चतुर्हस्त गणेशाच्या पारंपरिक रूपात एका हातात अंकुश, दुसऱ्या हातात परशू, तिसऱ्या हातात मोदक असतो; आणि चौथा हात आशीर्वादासाठी उंचावलेला असतो. अभ्यासकांच्या मते हा मधुर मोदक तत्त्वज्ञानाचं प्रतीक आहे.
पूर्व, पश्‍चिम आणि दक्षिण भारतात मोदक, कडबू, कानवले, कौळकटे, कुडुमु, पीठा, इलायडा अशा विविध नावांनी पिढ्यांकडून पिढ्यांकडं आलेल्या मोदकाचे पुराणातले उल्लेख त्याचं प्राचीनत्व दाखवत असले, तरी भारतवर्षात सर्वत्र पूजल्या जाणाऱ्या सगळ्यात प्रिय देवतेला सगळ्यांत प्रिय असणाऱ्या नैवेद्याचा नेमका प्रवास हे कोडंच आहे; पण पुराणांतरी देवांनी पार्वतीला दिलेल्या महाबुद्धी नावाच्या अमृताच्या मोदकापासून सुरू झालेला हा प्रवास आज मोदकाच्या ‘कोलेस्टेरॉल-फ्री’ अवतारासह नानाविध रूपांपर्यंत आला आहे.

मोदकांच्या जातकुळीतले, त्यांच्याशी साधर्म्य दाखवणारे पदार्थ माणसाच्या एकंदर खाद्यसंस्कृतीला गेल्या सुमारे चार हजार वर्षांपासून माहिती आहेत. आफ्रिकेतल्या, दक्षिण अमेरिकेतल्या आदिम रहिवासी, सुदूर पूर्वेकडचे चीन, जपान, इंडोनेशियादी प्रदेशांपासून युरोपातल्या पुढारलेल्या अभिजनांच्या खाद्यसंस्कृतीपर्यंत सगळीकडं या ‘डम्पलिंग्ज’चा वावर आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात आज जगाच्या विविध भागातली ही डम्पलिंग्ज अवघ्या खाद्यब्रह्माला भुरळ घालताहेत.
अगदीच व्याख्याबिख्यांची आडवळणं घ्यायची म्हटली, तर त्यात्या भौगोलिक क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या तांदूळ, गहू, ओट्‌स, मका, सोयाबीन, बार्ली, ज्वारी अशा धान्यांच्या पिठांच्या किंवा ब्रेडच्या किंवा बटाट्याच्या आवरणात भाज्या, फळं, कडधान्य, सुकामेवा, मांस, मासे अशा असंख्य पदार्थांचं सारण भरून उकडलेले, वाफावलेले, तळलेले, भाजलेले मोदक म्हणा, मोमोज म्हणा, करंज्या म्हणा, कचोरी म्हणा किंवा ‘सम्बुसा’ अशा नावानी मध्य आशियात उगम पावून आता अक्षरशः जगभर पसरलेले सामोसे म्हणा- ते म्हणजे ‘डम्पलिंग्ज.’ गोलाकार, लांबट, ठेंगणे-ठुसके, टोकदार नाकाचे, चंद्रकोरीच्या आकाराचे, त्रिकोणी, चौकोनी. तुपाच्या धारेबरोबर, वेगवेगळे सॉसेस, चटण्या-लोणच्यांबरोबर, सूप्समध्ये बुडवून किंवा नुसतेच खायचे. (वाचतावाचता मिळालेली आणि आत्ता सामोशांवरून सहज आठवलेली नोंद म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या सामोशाची. गिनिज बुकमधल्या एका नोंदीप्रमाणं लंडनमधल्या बल्लवांनी बनवलेला हा सामोसा साडेतीनशेपेक्षा जास्त पौंडाचा होता. आपल्याकडंही दर गणेशात्सवात हौशी मंडळींनी पाच-पन्नास किलो वजनाचा मोदक करून तो नैवेद्य ‘श्रीं’ना अर्पण केल्याच्या बातम्या वाचायला मिळतात.)  

‘मोमो‘ मी पहिल्यांदा पाहिले ते मिझोरामची राजधानी ऐजॉलमध्ये. संपादकांच्या एका परिषदेच्या निमित्तानं तिथं जाणं झालं होतं. सर्वशिक्षा अभियानाचा भाग म्हणून तिथल्या सरकारनं चालवलेल्या एका शाळेत आम्ही गेलो होतो. त्या शाळेच्या दारात एका छोट्या स्टोवर एक पसरट भांडं ठेवून मोमोज विकणारी ती मुलगी बसली होती. त्या ‘उकडलेल्या करंज्या’ खाण्याचा काही धीर झाला नाही; पण तिच्या भोवती उभं राहून कसल्याशा पानावर घेऊन, आरडाओरडा करत मोमोज खाणाऱ्या मुलांकडं पाहता त्या मोमोजची लोकप्रियता लक्षात येत होती. मोमोज खरं तर मूळचे तिबेटमधले; पण ‘चिंडियन’ पदार्थांसारखं आपल्यापुरतं आपण त्यांचं भारतीयीकरण करून टाकलं आहे. हा तसा मूळचा मांसाहारी पदार्थ; पण आता पनीर, चीझ आणि भाज्या वापरून बनवलेल्या मोमोजच्या शाकाहारी व्हर्जन्सवरही खाद्यप्रेमींनी पसंतीची मोहोर उठवली आहे. उकळत्या पाण्यावर वाफेवर मोमोज उकडताना त्याचा अर्क पाण्यात उतरतो. अनेक ठिकाणी ते पाणी भाज्या वगैरे घालून सूप म्हणूनही सर्व्ह करतात.

भारतीय पुराणांमध्ये साक्षात देवांनी अमृतापासून बनवलेला पदार्थ म्हणून येणारा मोदक चिनी इतिहासात मात्र भलत्याच संदर्भानं येतो. चिनी डम्पलिंग्जच्या नोंदी इसवीसनपूर्व सव्वादोनशे वर्षांपर्यंत मागं जातात. त्या काळातल्या हूग लिआंग नावाच्या एका लष्करी अधिकाऱ्याला विष भरलेलं डम्पलिंग खायला घातलं होतं, अशी एक कथा सापडते. जिॲओझी हा चीनधला सर्वात लोकप्रिय मोदकप्रकार. आपल्याकडं जसे थंडीच्या दिवसांत झुंजुरमासात किंवा भोगीच्या जेवणात स्निग्ध पदार्थ आवर्जून खाल्ले जातात, तसे चीनमध्ये विंटर सॉल्स्टिसच्या दिवशी (२१ किंवा २२ डिसेंबरला) आणि नववर्षदिनाच्या आधीच्या संध्याकाळी जिॲओझी हवेतच हवेत.  

आपल्या मोदकांसारखेच जगाच्या अनेक भागांमध्ये डम्पलिंग्ज तिथल्यातिथल्या संस्कृतीचा भाग आहेत. मक्‍याच्या पिठाचे आफ्रिकेतले फूफू, बन्कू, केन्के, तिह्लो, मेल्क्को; चीनमधले गौटी, वान्टान किंवा ‘चिंडियन’ फूडमधले खवय्येप्रिय स्प्रिंग रोल्स; चीनमधून इंडोनेशियात गेलेले सिओम; जपानी डॅंगो, निकुमान करंज्यांसारखे ग्योझा; शंकरपाळ्यासारखे दिसणारे इटालियन रॅव्हिओली; अमेरिकेतले टॉर्टिला किंवा चिकन, टर्की, स्ट्रॉबेरी, ॲपल, हॅम किंवा बटरबीन डम्पलिंग्ज; अफगाणीस्तान, कझागीस्तान, उझबेकीस्तानातले मंटी किंवा मंटू; योमारी पुन्हीच्या, पौर्णिमेच्या, दिवशी नेपावमध्ये होणारे योमारी; ब्रिटनमधले नॉरफोक, कॉस्टवोल्ड डम्पलिंग, रशियन पेलेमनी, ब्राझीलमधले बोलिंहा डी कार्न... मोदकांच्याच कुळातली ही डम्पलिंग्ज जगभरातल्या खाद्यप्रेमींच्या प्राधान्ययादीत असतात.
मोदकांचा आस्वाद तब्येतीत घ्यावा, असं आपण म्हणतो, तसंच जॉर्जियन सिन्कालीचंही आहे. सिंन्काली खाण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. मुख्य म्हणजे सिन्काली खाताना काटाचमच्यांचा वापर करणं शिष्टसंमत नाही. दिसण्यात अगदी आपल्या मोदकांची बहीण शोभेल, अशा सिन्कालीचं नाक खात नाहीत. नाकाला धरून सिन्काली उचलायची; पण नाक मोडून बशीत ठेवायचं. खाल्लेल्या सिन्कालींचा हिशेब मग या मोडून ठेवलेल्या नाकांवरून लावला जातो.

जव्हार भागातल्या एका आदिवासी पाड्यावर मोदकाशी जवळीक सांगणारा एक पदार्थ खाल्ल्याचं आठवतं. एका स्वयंसेवी संस्थेसाठी काम करणाऱ्या माझ्या एका मित्राला त्याच्या संस्थेनं आर्थिक मदत दिलेल्या प्रकल्पांच्या कामाची पाहणी करायची होती. त्याच्याबरोबर मीही हिंडत होतो. एका रात्री पाड्यावर मुक्कामाला असताना पाहुण्यांसाठी म्हणून खास हा पदार्थ बनवला होता. घरधनी त्याला काहीतरी म्हणत होता, आता आठवत नाही. पण तांदळाच्या पिठीच्या गोळ्यात गुळाचे खडे घालून केलेले ते ‘मोदक’ खाताना मध्येच लागणारी गुळाची चव अजून जिभेवर आहे.

जर्मनीतल्या वायमारजवळचं हायशीलहॅम गाव डम्पलिंगप्रेमींची पंढरी आहे. इथलं थुरिंगयान डम्पलिंग वर्ल्ड हे जगातलं बटाट्यांच्या डम्पलिंगचं एकमेव म्युझियम आहे. बटाटे गोळा करण्यापासून, ते बटाटे किसून त्याची डम्पलिंग करण्याच्या यंत्रसामग्रीपासून त्या सगळ्या प्रक्रियेपर्यंत अनेक गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव या संग्रहालयात घेता येतो. संग्रहालयाचे वेगळेपण म्हणजे इथं असलेल्या काही वस्तू चाखताही येतात. पर्यटकांना एका अवाढव्य डम्पलिंगमधून फेरफटका मारता येतो, मुलांसाठी डम्पलिंग क्रॉल्स बॉक्‍सेस आणि डम्पलिंग पिरॅमिड्‌स आहेत. इथं डम्पलिंगवर चर्चासत्र होतात. कदाचित मोठ्या आकाराच्या डम्पलिंगसाठी छोट्या आकाराचे बटाटे वापरावेत की नाही, असे विषय असतीलही या चर्चासत्रांत; पण तुम्हाला हौस असेल तर एखादी डम्पलिंग रेसिपी घेऊन इथं तुम्हाला तुमचं पाककौशल्यही आजमावता येऊ शकतं. (‘पर्यटकांनी बनवलेले पदार्थ खाण्याचा प्रेमळ आग्रह संचालकांना करू नये. केल्यास आधी नम्रपणे नकार मिळेल. त्यानंतरही आग्रह कायम राहिल्यास अपमान होऊ शकतो,’ असा सल्लावजा धमकी देणारी खास पुणेरी लडिवाळ (!) भाषेतली पाटी इथं आहे की नाही, याबाबत खातरीशीर माहिती उपलब्ध नाही.) स्वतः काही बनवण्याचा आणि खाण्याचा उत्साह (पक्षीः धमक) नसेल, तर अगदी पारंपरिक बटाटा डम्पलिंगपासून त्याच्या आधुनिक अवतारांवरही ताव मारण्याची सोयही इथं आहे.

चीनमध्येही जिॲक्‍झिन राईस डम्पलिंग म्युझियम आहे. जिॲक्‍झिन प्रांतात प्रसिद्ध असणाऱ्या ड्रॅगन बोट उत्सवाच्या निमित्तानं बनणाऱ्या राइस डम्पलिंगची सुरवात कशी झाली आणि तिथून ती संपूर्ण चीनमध्ये कशी पसरली, ही या म्युझियमची मूळ कल्पना. इथंही पर्यटकांना त्यांचं पाककौशल्य आजमावण्याची, किंवा उत्तम राइस डम्पलिंगचा आस्वाद घेण्याची संधी असते.

चीनमधल्या हान राजवटीपासूनचा डम्पलिंगचा इतिहास मांडणारं आणखी एक डम्पलिंग म्युझियम लिऑनिंग प्रांतातल्या डिलियन इथं सुरू झाल्याची एक बातमी मध्यंतरी पाहण्यात आली होती.

गणेशोत्सवाच्या अलीकडं मोदक करण्याचे वर्ग घेणं आता नवीन नाही; पण आपल्या परंपरेतल्या मोदककुळातल्या सगळ्यांना एकत्र आणून त्यांना जगातल्या त्यांच्या आत्ये-मामे-चुलत भावंडांशी जोडून एखादं टुरिस्ट आकर्षण निर्माण करणं हा कदाचित उद्याचा यशस्वी स्टार्टअप असू शकेल.

मला विचाराल तर मोदक म्हणजे उकडीचाच. कणकेचे तळलेले मोदकही खायला चांगले लागतात; विशेषतः त्यातलं साखर आणि सुक्‍या खोबऱ्याचं सारण जमलं असेल तर; पण ‘पक्वान्न’ या शब्दातला रुबाब कणकेच्या मोदकांजवळ नाही. हा उकडीचा मोदक खाणं हा पण एक सोहळा असतो. म्हणजे उचलला मोदक आणि टाकला तोंडात, असं करण्यात हशील नाही. मोदक गंध-स्वादादी पंचेंद्रियांनी खावा. मोदकपात्रातल्या हिरव्या केळीच्या पानावरून गरम वाफाळता मोदक ताटात यावा. पांढराशुभ्र. पारी अशी पातळ असावी, की आतल्या गूळ आणि ओल्या खोबऱ्याच्या सारणाचा तांबूसपणा जाणवून नजर तृप्त व्हावी. मग मोदकाचं टोकदार नाक अलगद मोडून त्यावर गरम तुपाची धार धरावी आणि मग आख्ख्या मोदकाचा एकच घास करावा... आणि तृप्तीचा तो क्षण जपून ठेवावा...

गणपती अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीत केलेल्या प्रार्थनेप्रमाणं मोदकाख्यान मांडण्याच्या या अगदी छोट्याशा प्रयत्नांती सर्व सु‘रस’यात्राप्रेमींसाठी एकच सदिच्छा...  वाञ्छितफलमवाप्नोति।

Web Title: madhav gokhale food write article in saptarang