जे जे सुचेल ते ते लिहा...! (माधव गोखले)

माधव गोखले madhav.gokhale@esakal.com
रविवार, 8 एप्रिल 2018

अश्विन सांघी. "कृष्णा की', "चाणक्‍याज्‌ चॅन्ट', "सियालकोट सागा,' "कीपर्स ऑफ द कालचक्र' या वाचकप्रिय फिक्‍शन थ्रिलर्सचे लेखक. "बेस्ट सेलिंग' लेखकांमधलं एक महत्त्वाचं नाव. अध्यात्म, विज्ञान, राजकारण, व्यवसाय, कायदा, गुन्हेगारी विश्व आदींमधल्या कल्पनारम्य कथानकांना पुराणकथांची, त्यातल्या मिथकांची, श्रद्धा-अंधश्रद्धांची जोड देऊन वेगळीच वाट चोखाळणारे लेखक म्हणून सांघी यांचं नाव सध्या आघाडीवर आहे. त्यांच्याशी झालेली ही बाचचीत...

अश्विन सांघी. "कृष्णा की', "चाणक्‍याज्‌ चॅन्ट', "सियालकोट सागा,' "कीपर्स ऑफ द कालचक्र' या वाचकप्रिय फिक्‍शन थ्रिलर्सचे लेखक. "बेस्ट सेलिंग' लेखकांमधलं एक महत्त्वाचं नाव. अध्यात्म, विज्ञान, राजकारण, व्यवसाय, कायदा, गुन्हेगारी विश्व आदींमधल्या कल्पनारम्य कथानकांना पुराणकथांची, त्यातल्या मिथकांची, श्रद्धा-अंधश्रद्धांची जोड देऊन वेगळीच वाट चोखाळणारे लेखक म्हणून सांघी यांचं नाव सध्या आघाडीवर आहे. त्यांच्याशी झालेली ही बाचचीत...

फिक्‍शन थ्रिलर्सची भुरळ पडली नाही असा वाचक विरळाच. कल्पनेतल्या या रहस्यानं आणि साहसानं जगभरातल्या वाचकांना पिढ्यान्‌पिढ्या खिळवून ठेवलं आहे. विज्ञान, राजकारण, व्यवसाय, कायदा, गुन्हेगारी विश्वाबरोबरच या कल्पनारम्यतेला पुराणकथा, त्यातली मिथकं, इतिहास, वेदान्त, अध्यात्म, पारंपरिक श्रद्धा-अंधश्रद्धांची जोड देत कथानकाला एका वेगळ्याच वाटेनं घेऊन जाणाऱ्या थ्रिलर्सनी गेल्या काही वर्षांपासून एक नवी वाट चोखाळली आहे. पाश्‍चात्य साहित्यविश्वात डॅन ब्राऊनसारख्या लेखकांनी अलीकडच्या काळात ही नवी शैली दमदारपणे रुजवली. इंग्लिश भाषेतून लेखन करणाऱ्या नव्या पिढीतल्या भारतीय लेखकांनीही ही लेखनशैली यशस्वीपणे हाताळली. अश्विन सांघी हे या नव्या लेखनवाटेवरून चालणाऱ्या व्यावसायिक "बेस्ट सेलिंग' लेखकांमधलं एक महत्त्वाचं नाव. त्यांच्या आतापर्यंतच्या सगळ्या पुस्तकांची मराठीसह अन्य भारतीय भाषांमध्ये भाषांतरं झाली आहेत आणि "कृष्णा की', "चाणक्‍याज्‌ चॅंट' आणि "सियालकोट सागा' या पुस्तकांवर चित्रपट आणि वेबसिरीज येऊ घातल्या आहेत. "कीपर्स ऑफ द कालचक्र' ही त्यांच्या "भारतमाले'तली ताजी कथा. क्वांटम फिजिक्‍सबरोबर अध्यात्माविषयी बोलणाऱ्या या त्यांच्या नव्या फिक्‍शन थ्रिलरच्या निमित्तानं ते नुकतेच पुण्यात आले होते. त्या वेळी त्यांच्याशी या नव्या लेखनशैलीबाबत गप्पा झाल्या. त्या गप्पांचा हा संपादित अंश...

आधुनिक जीवनशैली, आत्ताचा काळ, त्यातले संघर्ष, राजकारण, श्रद्धा-अंधश्रद्धा यांची इतिहासाशी, पुराणकथांशी, त्यातल्या मिथकांशी सांगड घालत कथेचा डोलारा उभारणारी एक वेगळी शैली तुमच्यासारख्या लेखकांनी रुजवली. या कल्पना कुठून आल्या?
अश्विन ः
माझ्या बाबतीत हे सगळं अचानक घडलं. मी कधीच माझ्या कथा शोधत गेलो नाही. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ः "यू डोंट गो लुकिंग फॉर द स्टोरी, द स्टोरी कम्स्‌ लुकिंग फॉर यू...' (तुम्ही कथा शोधू नका, कथा तुम्हाला शोधत येतात). माझ्या बाबतीत असंच झालं. गोष्ट तुमच्या आजूबाजूला असतेच, आपल्याला बऱ्याचदा ती दिसत नाही इतकंच.
-माझ्या "भारत सिरीज'मधल्या सगळ्या कथा अशाच आल्या माझ्याकडं. सुरवात झाली ती "रोझाबल लाईन'पासून. ही कथा मला श्रीनगरमध्ये सापडली. "चाणक्‍याज्‌ चॅंट 'अशीच राजकारणावर चाललेल्या गप्पांमधून मिळाली. माझ्या आत्याशी राजकारणावर बोलत असताना तिनं एक मुद्दा मांडला ः "गेल्या अडीच-तीन हजार वर्षांमध्ये राजकारण बदललेलं नाही.' मग विचार केला, तीन हजार वर्षांपूर्वीचं राजकारण आणि आधुनिक राजकारण एकमेकांसमोर ठेवून पाहता येईल का? "कृष्णा की' आली ती विष्णूच्या दहाव्या अवताराच्या कल्पनेतून. आमचं कुटुंब व्यापारविश्वातलं आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षांच्या काळाकडं पाहण्याचा एका व्यावसायिकाचा दृष्टिकोन काय असेल, या विचारातून "सियालकोट सागा' आली. काही वर्षांपूर्वी एका मठातल्या पुजाऱ्यांना विशिष्ट पद्धतीनं पूजा करताना पाहिलं. त्यांच्या पूजाविधीचा भाग म्हणून ते पाण्याची मंडलं बनवत होते. मला ती आपल्याकडच्या पूजाविधीतल्या यंत्रांसारखी वाटली. मग मी त्या संबंधानं वाचत गेलो त्यातून मी "कीपर्स ऑफ द कालचक्र' लिहिली.

पण या पुराणकथा आधुनिक जीवनपद्धतीशी किंवा आजच्या काळातल्या जगण्याशी जोडण्याची ही अलीकडच्या वाचकांना आवडलेली शैली आहे, त्याबद्दल काय सांगाल?
अश्विन ः
या पुराणातल्या, इतिहासातल्या कथा आपल्या जगण्याचा एक भाग आहेतच. रामायण-महाभारतातल्या कथा आजी-आजोबांकडून ऐकतच आपण वाढलो. आज परिस्थिती बदलली आहे. वेगवेगळ्या कारणांमुळं आजच्या पिढीचा आपल्या मुळांशी असलेला संपर्क क्षीण होतो आहे. ही पिढी असेल, परदेशात स्थायिक झालेली आपली मंडळी असतील, ते ही मुळं शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आजच्या पिढीतल्या वाचकाला या जुन्या गोष्टी नव्या पद्धतीनं जर सांगितल्या तर त्याला त्या भावतात, असं मला वाटतं. गोष्ट कदाचित तीच असेल; पण सांगण्याची पद्धत वेगळी असेल.

या शैलीत लिहिण्यासाठीचा अभ्यास, संशोधन कसं होतं?
अश्विन ः
मी गेली 11-12 वर्षं लिहितो आहे. त्याच्या आधीची 15-20 वर्षं मी पूर्ण वेळ व्यावसायिक होतो. माझ्या प्रत्येक पुस्तकाची निर्मिती-प्रक्रिया साधारणतः दोन वर्षांची आहे. त्यातले आठ महिने ते एक वर्ष इतका काळ अभ्यासात जातो. कथाबीज सापडल्यानंतर अभ्यास आणि संशोधनाचा भाग म्हणून मी त्या कल्पनेच्या आजूबाजूचं खूप वाचतो, आवश्‍यक असेल तिथं प्रवास करतो, ठिकाणं पाहतो, लोकांशी बोलतो. या सगळ्यातून ती कथा आकार घेत असते. उदाहरण द्यायचं झालं तर "चाणक्‍याज्‌ चॅंट' लिहिण्याआधी मी कौटिल्याच्या "अर्थशास्त्रा'चा अभ्यास केला, विशाखदत्ताचं "मुद्राराक्षस' समजून घेतलं. "कृष्णा की' मध्ये मुख्यतः प्रवास होतो तो मथुरा, वृंदावन आणि बेट द्वारका या तीन ठिकाणी. मी या तिन्ही ठिकाणी जाऊन आलो. कारण त्या त्या ठिकाणांचे, नंतर मला वापरता येतील असे, बारीकसारीक संदर्भ मला समजून घ्यायचे होते. काही काही वेळा छोटे छोटे संदर्भ असतात; पण जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट काळाचा विचार करता, तेव्हा ते संदर्भ कितीही छोटे असले तरी अस्सल हवेत. "सियालकोट सागा' लिहिताना पन्नाशीच्या दशकातल्या "बॉम्बे'तला एखादा माणूस आपल्या बायका-मुलांना घेऊन कोणत्या सिनेमाला जाईल...किंवा कथेतला एखादा मुलगा त्याच्या मैत्रिणीला जेवायला कुठं घेऊन जाईल...अस्सल वातावरणनिर्मितीसाठी हे असे संदर्भ उपयोगी पडतात. ही कथा लिहिताना मी खूप लोकांशी बोललो. त्या काळातलं कोलकाता आणि मुंबई समजून घेतली.
"कीपर्स ऑफ द कालचक्र'साठी मला सगळ्यात जास्त अभ्यास करावा लागला. अर्ध्यापेक्षा जास्त पुस्तकात फिजिक्‍स आहे. मी काही विज्ञानाचा विद्यार्थी नाही. आयआयटीच्या काही माजी विद्यार्थ्यांकडून क्वांटम थिअरी म्हणजे काय हे समजून घ्यायलाच मला चारेक महिने लागले. क्वांटम थिअरीतला "क्‍यू'ही मला त्याआधी माहीत नव्हता; पण तीन-चार महिन्यांनी निदान कळायला तरी लागलं होतं.
एक मात्र खरं की पुस्तकाच्या प्रवासात अभ्यास हा सगळ्यात उत्तम भाग असतो. मग तुम्ही तुमच्या कथेचा आराखडा ठरवता, गोष्ट लिहिता, तिचं पुनर्लेखन करता, संपादन करता, मूळ कल्पना आणखी पॉलिश करता...हे सगळं होतं; पण हा फार बोअरिंग भाग असतो.

लेखक म्हणून तुमच्या प्रवासाविषयी काय सांगाल?
अश्विन ः
अगदी तरुण वयापासून माझ्यावर वाचनाचा संस्कार होता. माझे आजोबा कानपूरला असायचे. ते मला दर आठवड्याला एक पुस्तक पाठवायचे. अशी तीनचारशे पुस्तकं त्यांनी मला पाठवली असतील. व्यवसायात असताना एका वर्षी घरातल्या सगळ्यांबरोबर काश्‍मीरला गेलो होतो; सुटी काढून. तिथं लोकांशी बोलताना खूप मनोरंजक माहिती मिळाली. नंतर अनेक महिने मी त्यावर विचार करत होतो, त्या माहितीच्या अनुषंगानं खूप वाचत होतो. "तू हे सगळं लिहून काढ,' असं मला माझ्या बायकोनं सुचवलं. माझे अनुभव आणि त्याअनुषंगानं वाचलेलं सगळं असं मी जेव्हा लिहून काढलं, तेव्हा पहिला ड्राफ्ट अगदीच "रिसर्च पेपर'सारखा झाला होता. बायकोला दाखवल्यावर ती म्हणाली ः "हे ठीक आहे; पण तू हे गोष्टीसारखं का लिहीत नाहीस?' मग मी लिहीत गेलो. पहिल्या पुस्तकाची आणखी एक मजा असते व ती म्हणजे ते लिहिताना लेखक म्हणून तुमची काहीच ओळख निर्माण झालेली नसते, तुम्ही यशस्वी लेखक वगैरे नसता, त्यामुळं तुम्ही खूप मोकळेपणानं लिहीत जाता.

अलीकडं "पुस्तकाचं प्रमोशन' हादेखील खूप महत्त्वाचा भाग बनला आहे. तुमच्या मार्केटिंगच्या बॅकग्राउंडचा तुम्हाला काही उपयोग झाला का?
अश्विन ः
मार्केटिंगचं एक तत्त्व आहे - "जोपर्यंत उघडलं जात नाही तोपर्यंत दार खटखटवत राहायचं!' केवळ मार्केटिंगअभावी मागे राहिलेले अनेक उत्तम लेखक आहेत. आणि "जो दिखता है वोही बिकता है' या सूत्रावर माझा पहिल्यापासून मोठा विश्वास! माझं पहिलं पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर मी मुंबईत "केम्प्स कॉर्नर'च्या पुस्तकांच्या दुकानात गेलो. त्यांना विचारलं ः ""अश्‍विन सांघी म्हणून एक नवा, ब्रिलियंट लेखक आहे...! तुमच्या दुकानात त्याचं एखादं पुस्तक आहे का विक्रीला?''
काउंटरवरच्या माणसानं त्याच्या कॉम्प्युटरवरची यादी तपासली आणि म्हणाला ः ""हो, आहे. त्यांच्या एका पुस्तकाच्या तीन प्रती आहेत.''
मी विचारलं ः ""कुठं आहेत?''
मग त्यानं दुकानाचा जो कोपरा दाखवला तिथं आपणहून कुणी जाऊन पुस्तकं पाहिली असती अशी शक्‍यता अजिबात नव्हती. मी त्या प्रती उचलल्या. रुमालानं त्यांच्यावरची धूळ पुसली आणि दुकानाच्या दर्शनी भागातल्या रॅकवर आणून ठेवल्या.

"वाचनाची सवय कमी होत आहे, तरुण पिढी वाचत नाही,' असं सध्या बोललं जातं, तुम्हाला काय वाटतं?
अश्विन ः
मला असं वाटत नाही. उलट माझ्या समजुतीनुसार, ज्या देशांत प्रकाशनव्यवसाय भरभराटीत आहे, अशा थोड्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. एक मात्र आहे, की पारंपरिक पुस्तकांना आता खूप पर्याय निर्माण झाले आहेत. आमची पिढी लहान होती तेव्हा वाचनालयं आणि तिथली पुस्तकं एवढाच पर्याय होता. आताही माध्यम कोणतंही असेल, ई-बुक्‍स असतील, मूव्ही क्‍लिप असेल, व्हिडिओ गेम असेल...पण या सगळ्याला एक चांगली कथा लागतेच.

लिहू इच्छिणारी खूप तरुण मुलं आहेत. "अश्विन सांघी' होणं हे त्यांचंही स्वप्न असू शकतं. तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल?
अश्विन ः
आपल्याला लिहिता येतं, असं खूप लोकांना वाटत असतं; पण ते लिहीत नाहीत, ही त्यांची सगळ्यात मोठी चूक असते. लिहायला लागा! ब्लॉग लिहा, आणखी काही लिहा...पण लिहायला लागा. सुरवातीला शिकत असताना आपण कुणाची तरी नक्कल करतच असतो; त्यात काहीच गैर नाही. त्यातूनच आपण शिकत असतो. महत्त्वाचा भाग म्हणजे, अपयशाच्या शक्‍यतेनं दबून-दडपून जाऊ नका किंवा नकार मिळाला म्हणून खचूनही जाऊ नका. आपल्या लेखनाचं कौतुक होईल का, ते प्रसिद्ध होईल का याचाही फार विचार करू नका, आधी लिहायला सुरवात करा. आणि महत्त्वाचं म्हणजे पोटापाण्यासाठी तुम्ही जो उद्योग करता आहात, त्याच्याकडं दुर्लक्ष करू नका! कारण, रॉयल्टी मिळायला नेहमीच उशीर होत असतो.
आणखी एक महत्त्वाचं म्हणजे, कितीही यशस्वी झालात तरी पाय जमिनीवर ठेवा! तुम्ही लिहिता ते शब्द तुमचे नसतात. तो सरस्वतीदेवीचा आशीर्वाद असतो, तुम्ही फक्त तो पोचवणारं माध्यम असता.

Web Title: madhav gokhale write article in saptarang