विश्वाचे आर्त (माधव गोखले)

माधव गोखले
रविवार, 12 मे 2019

आययूसीएनची (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) निसर्गाला असणारा धोका दर्शवणारी रेड लिस्ट नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही यादी आहे नामशेष झालेल्या, होण्याच्या काठावर असणाऱ्या, या यादीत येण्याच्या मार्गावर असलेल्या पृथ्वीवरच्या प्रजातींची. आजमितीला पृथ्वीवरचे 27 टक्के प्राणी, पक्षी, किडे, सरिसृप, वनस्पती, मासे, प्रवाळक्षेत्रे या यादीत आहेत. मनुष्यप्राण्यामुळंच घडून येणारी ही हानी वेळीच रोखण्यासाठी मनुष्यप्राण्यानंच आता काही ठोस पावलं उचलण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, त्यासाठी आपल्या काही सवयी आपण बदलायला हव्यात. त्या बदलायला आपण काही राजी नसतो.

आययूसीएनची (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) निसर्गाला असणारा धोका दर्शवणारी रेड लिस्ट नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही यादी आहे नामशेष झालेल्या, होण्याच्या काठावर असणाऱ्या, या यादीत येण्याच्या मार्गावर असलेल्या पृथ्वीवरच्या प्रजातींची. आजमितीला पृथ्वीवरचे 27 टक्के प्राणी, पक्षी, किडे, सरिसृप, वनस्पती, मासे, प्रवाळक्षेत्रे या यादीत आहेत. मनुष्यप्राण्यामुळंच घडून येणारी ही हानी वेळीच रोखण्यासाठी मनुष्यप्राण्यानंच आता काही ठोस पावलं उचलण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, त्यासाठी आपल्या काही सवयी आपण बदलायला हव्यात. त्या बदलायला आपण काही राजी नसतो. आपलं हे "राजी नसणं' आपल्याला आता बदलावं लागेल. एवढा मुद्दा जरी या अहवालाच्या निमित्तानं आपल्यापर्यंत पोचला तरी ती एका बदलाची नांदी ठरेल.

अरण्यवाचनात रमणाऱ्या माझ्या एका मित्राच्या भाषणात एक विधान नेहमी असायचं..."पृथ्वीवर नांदणाऱ्या जीवसृष्टीचं माणसावाचून फार अडणार नाही, किंबहुना नाहीच अडणार; पण या जीवसृष्टीतलं एखादं झाड, एखादा प्राणी, पक्षी, मासा, साप अगदी किडा-मुंगीही जेव्हा संपून जाते त्या वेळी माणसाच्या जगण्याची भरून न येणारी हानी झालेली असते."मग जेव्हा निसर्ग, जीवसृष्टी, पर्यावरण, माणूस आणि निसर्गाचा संघर्ष याबद्दल अधिकाधिक वाचायला लागलो त्या वाचनात कधीतरी आययूसीएनच्या म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या रेड लिस्टला थडकलो. आययूसीएनची ही धोका दर्शवणारी रेड लिस्ट आहे नामशेष झालेल्या, होण्याच्या काठावर असणाऱ्या, या यादीत येण्याच्या मार्गावर असलेल्या पृथ्वीवरच्या प्रजातींची. आजमितीला पृथ्वीवरचे 27 टक्के प्राणी, पक्षी, किडे, सरिसृप, वनस्पती, मासे, प्रवाळक्षेत्रे या यादीत आहेत. अर्थात हे काही नवीन नाही. सन 1965 मध्ये सुरवात झाल्यापासून आययूसीएन याबाबत सातत्यानं अभ्यास करत आहे. हे सगळं आज पुन्हा नव्यानं आठवण्याचं कारण म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या इंटरगव्हर्नमेंटल सायन्स-पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टिम सर्व्हिसेसचा (आयपीबीईएस) धोक्‍यात असलेल्या निर्सगाच्या जागतिक परिस्थितीचा आढावा घेणारा ताजा अहवाल. एकंदर 50 देशांमधल्या 145 तज्ज्ञांनी एकत्र येऊन लिहिलेला हा अहवाल 1800 पानांचा असणार आहे, असं या अहवालाबद्दलच्या बातम्यांमध्ये म्हटलं आहे. आयपीबीईएसनं दिलेल्या माहितीनुसार, या 145 तज्ज्ञांशिवाय जगभरातल्या आणखी 310 अभ्यासकांनीही या अहवालासाठी योगदान दिलं आहे. संपूर्ण अहवालाची अजूनही प्रतीक्षा आहे; पण पॅरिसमध्ये झालेल्या आयपीबीईसच्या सातव्या अधिवेशनात गेल्या सोमवारी या ग्लोबल ऍसेसमेंटचा सारांश प्रसिद्ध झाला व जगभरातल्या धोरणकर्त्यांसाठी प्रसिद्ध झालेल्या या सारांशावर आता चर्चा सुरू झाली आहे. अहवालाच्या सारांशाच्या 40 पानांत मांडलेली अनेक निरीक्षणं माणसाला एकंदरच विकासप्रक्रियेचा पुन्हा विचार करायला लावणारी आहेत.
निसर्गाची एकतानता सांभाळणारे घटक मानवी हस्तक्षेपामुळे होणारी वृक्षतोड, प्रचंड मोठ्या प्रमाणावरील मासेमारी, विकासप्रकल्प यामुळे संकटात सापडत आहेत, हे अधोरेखित करताना पृथ्वीवर नांदणाऱ्या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या, जलचरांच्या वनस्पतींच्या तब्बल 10 लाख प्रजातींना नामशेष होण्याचा धोका असल्याचा इशारा हा अहवाल लिहिणाऱ्या अभ्यासकांनी दिला आहे. यातल्या काही प्रजाती तर येत्या काही दशकांतच लुप्त होण्याचा धोका आहे. मनुष्यजातीचे आर्थिक विकासासाठी चालणारे अविरत प्रयत्न आणि वातावरणातले बदल यांचा हा एकत्रित परिणाम आहे, असंही मत हा अहवाल नोंदवतो. गेल्या 50 वर्षांचा आढावा घेणारा हा अहवाल आतापर्यंतचा सर्वात व्यापक असल्याचं सांगितलं जातं. तीन वर्षं या अहवालावर काम सुरू होतं. आर्थिक प्रगतीचे मार्ग आणि त्यांचे निसर्गावर होणारे परिणाम यांच्यातला संबंधांचं एक सर्वसमावेशक चित्र मांडताना जवळजवळ 15 हजार शास्त्रीय आणि सरकारी अहवालांचा अत्यंत सुसूत्रपणे धांडोळा घेत तज्ज्ञांच्या या चमूनं या अहवालात जैवविविधता आणि पर्यावरणावर गेल्या 50 वर्षांत झालेल्या परिणामांचा वेध घेतला आहे. जगभरात निसर्गाचा जो ऱ्हास होतो आहे, त्याचा सध्याचा वेग "न भूतो' असा आहे व विविध प्रजाती नष्ट होण्याचा वेगही वाढला आहे आणि या साऱ्याचे जगभरातल्या लोकांवर गंभीर परिणाम होऊ शकतात, हा या अभ्यासाचा महत्त्वाचा निष्कर्ष. या परिस्थितीला माणसाकडून मिळणारा सध्याचा प्रतिसाद अत्यंत अपुरा आहे, असंही अहवाल लिहिणारे तज्ज्ञ सांगतात.

आपण आणि पृथ्वीवरच्या अन्य सर्व प्रजाती ज्या पर्यावरणीय परिस्थितीवर अवलंबून आहेत तिचं आरोग्य कधी नव्हे एवढ्या वेगानं ढासळत आहे. आपण जगभरातल्या आपल्या अर्थव्यवस्था, उपजीविकेची साधनं, अन्नसुरक्षा, आरोग्य आणि आपल्या जगण्याचा एकंदरच जो दर्जा आहे त्याचा पायाच भुसभुशीत करत आहोत, असं आयपीबीईएसचे अध्यक्ष सर रॉबर्ट वॅटसन यांनी या निष्कर्षांवर भाष्य करताना म्हटलं आहे. मात्र, सर वॅटसन यांच्या मते, अजूनही वेळ गेलेली नाही; पण स्थानिक पातळीपासून ते जागतिक पातळ्यांपर्यंत सर्व स्तरांवर आत्ता लगेच सुरवात करावी लागेल. त्यांनी वापरलेला शब्द आहे "ट्रान्सफॉर्मेटिव्ह चेंज' (परिवर्तनशील बदल). म्हणजे क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी आवश्‍यक ठरणाऱ्या तत्त्वांच्या पातळीवरच्या, व्यावहारिक आणि धोरणांच्या पातळीवरच्या बदलांची प्रक्रिया. आधुनिक कॉर्पोरेट जगतात वापरल्या जाणाऱ्या या संज्ञेचा अर्थ त्यासाठी कदाचित नव्यानं समजून घ्यावा लागेल. या प्रक्रियेचा पुन्हा अंगीकार करून अजूनही निसर्गरक्षण करता येईल, स्थिती पुन्हा पूर्वपदावर आणता येईल, स्रोतांचा अधिक चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेता येईल. यातूनच आपली बहुतेक जागतिक उद्दिष्टंही सफल होतील, असंही ते म्हणतात.

या अहवालात नोंदवलेली इतरही काही निरीक्षणं सध्याची परिस्थिती समजून घेण्याच्या दृष्टीनं पुरेशी बोलकी आहेत. जमिनीवरच्या एक तृतीयांश पर्यावरणात आणि 66 टक्के समुद्री पर्यावरणात मानवी हस्तक्षेपामुळं मोठे बदल झाले आहेत. स्थानिक समाजगटांच्या अखत्यारीत असणाऱ्या भागांमध्ये मात्र बदलांचं हे प्रमाण खूप कमी आहे. जगातली एक तृतीयांश जमीन आणि गोड्या पाण्याचे जवळपास 75 टक्के स्रोत आता पिकांखाली आहेत किंवा पशुपालनासाठी वापरले जातात. जमिनींचा कस कमी झाल्यानं जगातल्या 23 टक्के जमिनींची उत्पादकता कमी झाली आहे. समुद्रकिनाऱ्यांलगतचे अधिवास नाहीसे झाल्यानं जगभरातल्या 10 ते 30 कोटी लोकांवर पुरांची आणि वादळांची टांगती तलवार आहे. सन 1992 नंतर नागरी वस्त्यांमध्ये जवळजवळ दुप्पट वाढ झाली आहे. पाणथळ जागांपैकी 85 टक्के जागा संपून गेल्या आहेत. प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणात सन 1980 नंतर दहापट वाढ झाली आहे. समुद्री कासवांच्या 86 टक्के प्रजाती, समुद्री पक्ष्यांच्या 44 टक्के आणि समुद्रातल्या सस्तन प्राण्यांच्या 43 टक्के प्रजातींसह किमान 267 प्रजातींना प्लॅस्टिकच्या या वाढत्या प्रदूषणाचा फटका बसतो आहे. या सगळ्याचा माणसाशी संबंध असणाऱ्या अन्नसाखळीवर परिणाम होऊ शकतो. हरितगृह वायू-उत्सर्जन, प्रक्रिया न केलेलं शहरी आणि ग्रामीण भागांतलं सांडपाणी, उद्योगांमुळं होणारं प्रदूषण, खाणींतून होणारं प्रदूषण, तेलगळती आणि विषारी कचरा...या सगळ्याचा जमिनीवर, गोड्या पाण्यावर आणि समुद्राच्या पाण्याच्या दर्जावर आणि एकूणच पर्यावरणावर वाईट परिणाम होतो आहे.

-माणसाच्या वापरात असलेल्या बियाण्यांच्या आणि खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सस्तन प्राण्यांच्या जवळपास नऊ टक्के जाती सन 2016 पर्यंत नाहीशा झाल्या होत्या आणि आणखी एक हजार जाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. वातावरणबदलाचे भविष्यातले परिणाम आणि कीड-रोगांना तोंड देण्याच्या बाबतीत आपली कृषी-अर्थव्यवस्था पुरेशी स्थिती-स्थापक नाही, असा जैवविधितेच्या या ऱ्हासाचा एक अर्थ असल्याचं या अभ्यासकांनी म्हटलं आहे. माणसाच्या असण्याचा निसर्गावर सातत्यानं परिणाम होत राहिला आहे; पण माणसानं निसर्गावर ओढलेल्या ओरखड्यांचे वण गेल्या 50 वर्षांत अधिक खोल गेले आहेत. गेल्या पाच दशकांमध्ये पृथ्वीवरच्या अभूतपूर्व अशा नैसर्गिक बदलांचा आढावा घेताना अहवालाच्या सारांशामध्ये पाच थेट मुद्द्याचा उल्लेख करण्यात आला आहे : जमिनीच्या आणि समुद्राच्या उपयोगांत झालेले बदल, निसर्गाचं शोषण, वातावरणातले बदल, प्रदूषण आणि प्राणी-पक्षी-जलचर-वनस्पतींच्या प्रजातींचं स्थलांतर व त्यांचा स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्तीवर होणारा परिणाम. याशिवाय निसर्गावर परिणाम करणारे अनेक अप्रत्यक्ष घटकही असतात आणि देश-काल-स्थलपरत्वे त्यांच्या परिणामांची तीव्रता कमी-जास्त असते. या अहवालाच्या सारांशातच नमूद केल्यानुसार, परिस्थिती आहे तशीच राहण्यात ज्यांचा फायदा असतो त्यांच्याकडून बदलांचे स्वागत होत नाहीच; पण सार्वजनिक हिताचा विचार करून अशा विरोधावर मात करता येऊ शकते. पुढच्या वर्षी चीनमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या "जैविक विविधता परिषदे'च्या दृष्टीनं हा अहवाल महत्त्वाचा असल्याचं सर वॅटसन यांनी म्हटलं आहे. याबाबतीत जगभर विविध प्रयोग सुरू आहेत; विशेषतः तरुण पिढीकडून. या प्रयोगांची नोंदही सर वॅटसन घेतात. हे सारं पहिल्यांदाच सांगितलं जात आहे असंही नव्हे. हा अहवाल लिहिणाऱ्या अभ्यासकांचाही तसा दावा नाही; पण 50 वर्षांत ज्या वेगानं जग बदललं आहे आणि त्या बदलांचे भवतालावर जे परिणाम झाले आहेत, त्याचा हा सर्वंकष आढावा आहे. निसर्गात होणाऱ्या बदलांचा चटका सगळ्यांनाच जाणवत असताना, ही परिस्थिती सुधारण्यातला आपला वाटा आपण कसा उचलणार हे आता अधिक गांभीर्यानं शोधायची वेळ आली आहे. "पर्यावरणस्नेही जीवनशैली' हा केवळ टाळ्या मिळवणारा पुस्तकी शब्द न राहता त्याचा अर्थ त्यापलीकडंही नेता येईल का, याचा विचार पुनःपुन्हा व्हायला हवा. गेल्या काही दशकांत आपल्याला खूप गोष्टींची "सवय' झाली आहे. बदललेल्या, बदलत्या जीवनशैलीवर पांडित्यपूर्ण चर्चा करत असताना, " "बदल' हे एकच न बदलणारं सत्य आहे', वगैरे ज्ञान फॉरवर्ड करत असताना, आतमध्ये कुठंतरी मात्र आपल्या काही सवयी बदलायला आपण राजी नसतो. आपलं हे "राजी नसणं' आपल्याला आता बदलावं लागेल. एवढा मुद्दा जरी या अहवालाच्या निमित्तानं आपल्यापर्यंत पोचला तरी ती एका बदलाची नांदी ठरेल.


जैवविविधता आणि माणसांच्या जगण्यातलं निसर्गाचं योगदान हा आपला समान वारसा आहे आणि मानवतेसाठी सर्वात महत्त्वाचं सेफ्टी नेट (सुरक्षाजाळं) आहे; पण आपलं हे सुरक्षाजाळं आता तुटण्याइतपत ताणलं गेलं आहे. पृथ्वी आणि पृथ्वीवरचे लोक यांच्या शाश्वत भविष्यासाठी अजूनही खूप काही करता येईल; पण प्रजातींची, प्रजातींमधली आणि सृष्टीतली एकूणच विविधता आणि निसर्गाकडून आपल्याला मिळणारं अनेक प्रकारचं योगदान झपाट्यानं कमी होत आहे.

-प्रा. सॅंड्रा डियाझ (अर्जेंटिना)
स्रोतः आयपीबीईएसचं ग्लोबल ऍसेसमेंट अहवालावरील माध्यमांसाठीचं टिपणस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhav gokhale write iucn article in saptarang