esakal | एका पर्वावरचा तटस्थ दृष्टिक्षेप (माधव गोखले)
sakal

बोलून बातमी शोधा

book review

एका पर्वावरचा तटस्थ दृष्टिक्षेप (माधव गोखले)

sakal_logo
By
माधव गोखले

"नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले हे मंडलोत्तर राजकारणातलं आणि कॉंग्रेसनं सत्तेसाठी आघाडीपर्वाची महती मान्य केल्यानंतर राष्ट्रीय राजकारणातलं सर्वांत मोठं वळण आहे. सन 2014च्या लोकसभा निवडणुकीत प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या कॉंग्रेसची पार दाणादाण झाली आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. या विजयाचे नायक नरेंद्र मोदी होते. या दृश्‍य राजकीय बदलाच्या पोटात राजकारणापलिकडंही देशाच्या वाटचालीत वळण आणणारे अनेक छोटेमोठे बदल दडले होते. दीर्घकाळात देशातलं जनमानस मध्याकडून उजवीकडे नेण्याच्या चिकाटीच्या प्रयत्नांना आलेलं ते यशही होतं...

मोदी यांच्या सत्ताकाळातले प्रमुख निर्णय, राजकीय बदल, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आघाडीवरची स्थित्यंतरं, बदलती राजकीय परिभाषा, संस्कृती, मुख्य प्रवाहात आलेला बहुसंख्याकवाद यांचा धांडोळा "मोदीपर्व'मध्ये घेतला आहे. तसंच समाज म्हणून देशावरचे परिणाम, "आयडिया ऑफ इंडिया' किंवा देशाच्या वाटचालीचे आधार कोणते यावर होत असलेले परिणाम याविषयीचं समग्र आकलन मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीचं द्वेष आणि अंधभक्ती या टोकाच्या दृष्टीकोनांपलीकडे केलेलं हे विश्‍लेषण आहे...' या शब्दांत "सकाळ'चे संपादक-संचालक श्रीराम पवार आपल्या "मोदीपर्व' या ताज्या पुस्तकाची भूमिका स्पष्ट करतात.

राजकीय परिस्थिती आणि त्याभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास करणाऱ्या वाचकांच्या दृष्टीनं हे पुस्तक अत्यंत महत्त्वाच्या कालखंडात प्रसिद्ध झालं आहे. जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्रातील सतराव्या लोकसभेचे सदस्य निवडणाऱ्या सर्वांत मोठ्या निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान सुरू झालं आहे. आणखी काही तासांनी मतदानाचा हा शेवटचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर जाहीर होणारे एक्‍झिट पोल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि एकंदरच देशाच्या पुढच्या वाटचालीबद्दलचे अंदाज बांधायला सुरवात करतील, निवडणुकांचे निकाल लागतील, त्यावर सर्व बाजूंनी चर्चा झडतील, मतमतांतराचं कवित्व पुढचे काही आठवडे सुरू राहील. मात्र, या सगळ्या गलबल्यात आणि त्यानंतरही "मोदीपर्वा'वर टाकलेला हा तटस्थ दृष्टिक्षेप अभ्यासकांसाठी एक महत्त्वाचा दस्तावेज ठरेल.

श्रीराम पवार गेल्या सात वर्षांहून अधिक काळ "सप्तरंग'मधल्या त्यांच्या "करंट-अंडरकरंट' या सदरातून नियमितपणे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटनांविषयी भाष्य करणारं स्तंभलेखन करत आहेत. वर्तमान वास्तवावर भाष्य करणाऱ्या त्यांच्या या स्तंभानं या सात वर्षांच्या प्रवासात वृत्तपत्रीय लिखाणात आपला असा वाचक निर्माण केला आहे. स्तंभलेखनाला किंवा एकंदरीतच वृत्तपत्रीय लिखाणाला तात्कालीकतेची मर्यादा असते हे जरी गृहीत धरलं, तरी वेगवेगळ्या घटना-घडामोडींच्या संदर्भात त्या त्या वेळी केलेलं भाष्य, टीकाटिप्पणी, घटितांचं, निर्णयांचं, निर्णयांच्या परिणामांचं विश्‍लेषण जेव्हा काळाची एक नेमकी चौकट घेऊन एका सूत्रात मांडलं जातं, तेव्हा ते राजकीय भाष्यकारांसह, अभ्यासकांच्या आणि समाजातल्या एकूणच सजग वाचकांसाठी महत्त्वाचं ठरतं. "मोदीपर्व' या कुळीचं पुस्तक आहे.

पवार म्हणतात त्याप्रमाणं "मोदीपर्व' हा देशातल्या राजकीय धुमाळीचा काळ आहे. पाच वर्षांपूर्वी आजच्या दिवशी निवडणुकांचे निकाल लागलेले होते आणि या "मोदीपर्वा'चा उदय झाला होता. नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रीय राजकारणात केंद्रस्थानी येणं मध्यममार्गी राजकारणाला छेद देणारं होतं. पंतप्रधान होण्याच्या आधी आणि नंतरही मोदी घेत असलेल्या भूमिका, त्यांनी निर्माण केलेल्या प्रतिमा, त्यांचं राजकारण, बहुआयामी व्यक्तिमत्त्व, निर्णयप्रक्रिया, त्यांचं परराष्ट्र धोरण, चीन आणि पाकिस्तान संदर्भात त्यांना घेतलेल्या भूमिका यांचा परिणाम म्हणून त्यांना टोकाचं समर्थक लाभलं आणि दुसऱ्या बाजूला त्यांना सातत्यानं विरोध करणारे विरोधकही. नजीकच्या घटना-घडामोडींचं त्या त्या वेळी केलेलं विश्‍लेषण एका सूत्रात गुंफून "मोदीपर्व' वाचकांना या टोकाच्या दृष्टीकोनांपलीकडं नेण्याचा प्रयत्न करतं.

"मोदीपर्व'ची मांडणी एकंदर पाच भागांमध्ये आहे. पहिला भाग 2014च्या सत्तांतराच्या आधीच्या घटनांचा मागोवा घेतो. मोदीपर्व सुरू झालं, त्या 2014च्या निवडणुकीचं वातावरण कसं तयार होत गेलं याचा ऊहापोह या भागात केला आहे. "विकासाच्या आघाडीवर', "मुत्सद्देगिरीची कसोटी' आणि "इतिहासाची मोडतोड' हे त्यानंतरचे तीन भाग गेल्या पाच वर्षांचा प्रवास वाचकासमोर मांडतात. विकासाच्या आघाडीवर मोदी सरकारचे प्रयत्न, त्या दिशेनं घेतलेले निर्णय, त्यांचे परिणाम, परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या पातळीवर मोदी यांनी केलेले प्रयत्न, त्यांचं फलीत आणि इतिहासाचं एक विशिष्ट आकलन समोर ठेवण्याचं सातत्यानं झालेले प्रयत्न या विषयी या भागात भाष्य केलेलं आहे. शेवटच्या "2014नंतरची देशांतर्गत राजकीय परिस्थिती' या भागामध्ये मोदीकाळातल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारे, त्यातल्या यशापयशाची चर्चा करणारे लेख आहेत. पवार प्रस्तावनेत लिहितात त्याप्रमाणं त्यांनी मोदीकाळातल्या पाच वर्षांत जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचं विश्‍लेषण केलं होतं. या काळातलं मंथन, विचारांची आणि कल्पनांची देवाणघेवाण, अनेक राजकीय आणि बिगरराजकीय घटकांशी संवाद यातून साकारलेलं आकलन समग्रपणे या पुस्तकाच्या रूपानं आता वाचकांच्या हातात आलं आहे.

पुस्तकातल्या सत्तेचाळीस लेखांकडे जाण्यापूर्वी "मोदीपर्व' अशाच शीर्षकाच्या नव्यानं समाविष्ट केलेल्या दीर्घ लेखानं पवार यांनी या पुस्तकात एक मोलाची भर घातली आहे. "मोदीपर्वा'तल्या अनेक पैलूंचा एकत्रितपणे चिकित्सक आढावा घेणारा हा दीर्घ लेख अभ्यासक आणि चोखंदळ वाचकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. या दीर्घ लेखानं हे पुस्तक तात्कालीकतेच्या पलीकडं नेलं आहे. या आधीची राजकीय समीकरणं मोडीत काढत नरेंद्र मोदी यांचं निर्णायकपणे सत्तेवर येणं, "अच्छे दिन'ची स्वप्न पेरणी, त्यांची प्रतिमानिर्मिती, त्यांचं राजकारण, धडाकेबाज कार्यपद्धती, परदेश दौरे, गेल्या पाच वर्षांत झालेला बहुसंख्याकवादाचा बोलबाला, आर्थिक आघाडीवरचे त्यांचे निर्णय, योजना, आर्थिक सुधारणा यांच्या बरोबरीनंच संरक्षण, शिक्षण, विज्ञान, आरोग्य, शेती अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करणाऱ्या या दीर्घ लेखानं या पुस्तकाचं मोल उंचावलं आहे.

इंग्रजी साहित्याच्या तुलनेत मराठी साहित्याच्या एकंदर पसाऱ्यामध्ये नजीकच्या भूतकाळाचा आढावा घेत समकालीन वास्तवावर भाष्य करणाऱ्या पुस्तकांची अनेकदा उणीव भासते. हा मुद्दा लक्षात घेतला, तर "मोदीपर्व'सारख्या पुस्तकाचं महत्त्व अधोरेखित होतं. वर उल्लेख केल्याप्रमाणं, घटना-घडामोडींच्या त्या त्या वेळी केलेल्या विश्‍लेषणाला, त्यावरच्या भाष्याला तटस्थ मांडणी करत एका सूत्रात गुंफल्यानं "मोदीपर्व' अभ्यासकांचं पुस्तक ठरतं. देशातलं राजकारण आणखी एका निर्णायक टप्प्यावर उभं असताना आणि त्यानंतरच्या काळातही "मोदीपर्व' समजावून घेण्यासाठी श्रीराम पवार यांच्या या पुस्तकाचा निश्‍चितच उपयोग होईल.

पुस्तकाचं नाव : मोदीपर्व
लेखक : श्रीराम पवार
प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे
पानं : 264, किंमत : 400 रुपये