सीमापारची 'रोड ट्रिप' (माधव गोखले)

माधव गोखले madhav.gokhale@esakal.com
रविवार, 9 सप्टेंबर 2018

पुणे ते सिंगापूर असा मोठा प्रवास मिलिंद, मृणालिनी प्रिंप्रीकर या दाम्पत्यानं मुलगी सईबरोबर केला. गाडीतून असा सीमेपारचा प्रवास आणि तोही कुटुंबासमवेत हे जरा विशेषच. या प्रवासात या कुटुंबाला अनेक खाचखळग्यांचा सामना करावा लागला, नवे मित्र-मैत्रिणी मिळाले आणि कडू-गोड अनुभवांची शिदोरीही मिळाली. या आगळ्यावेगळ्या "रोड ट्रिप'विषयी.

पुणे ते सिंगापूर असा मोठा प्रवास मिलिंद, मृणालिनी प्रिंप्रीकर या दाम्पत्यानं मुलगी सईबरोबर केला. गाडीतून असा सीमेपारचा प्रवास आणि तोही कुटुंबासमवेत हे जरा विशेषच. या प्रवासात या कुटुंबाला अनेक खाचखळग्यांचा सामना करावा लागला, नवे मित्र-मैत्रिणी मिळाले आणि कडू-गोड अनुभवांची शिदोरीही मिळाली. या आगळ्यावेगळ्या "रोड ट्रिप'विषयी.

"पाऊस प्रचंड होता... आणि अंधारही. देश, रस्ता, माणसं सगळंच अनोळखी. संपूर्ण रस्त्यावर फक्त आम्हीच. तिघं पिंप्रीकर- मी, मिलिंद, सई आणि म्यानमारच्या पर्यटन विभागानं आम्हाला दिलेला एक गाईड आणि त्याच्याबरोबरचा ब्रह्मी लियाझन ऑफिसर. गाडीच्या हेडलाईट्‌समध्ये रस्त्याचा अंदाज घेत मिलिंद गाडी चालवत होता. चाकांखालच्या रस्त्याचा अंदाजच येत नव्हता. खूप उशीरही झाला होता. यावेळपर्यंत आम्ही मुक्कामावर पोचायला हवं होतं; पण पाऊस इतका होता आणि रस्ताही डोंगरातला, अडचणीचा. अचानक रस्ता वळला. वळून अगदी थोडं अंतर गेलो असू नसू, आमच्यामागं काहीतरी हालचाल जाणवली. रिअर व्ह्यू मिररमध्ये बॅटऱ्यांचे झोत दिसायला लागले. आम्हाला थांबण्याचा इशारा होता. अगदी आतापर्यंत सुनसान असणाऱ्या रस्त्यावर एकदम माणसं कुठून आली, याचा विचार करेपर्यंत मिलिंदनी गाडी कडेला घेऊन थांबवली. गाडीच्या बाहेर एक सैनिक उभा होता. आमच्या बरोबरचा लियाझन ऑफिसर आणि तो सैनिक यांच्यात आम्हाला अगम्य असणाऱ्या ब्रह्मी भाषेत काहीतरी बोलणं झालं आणि उलगडा झाला. चुकून आम्ही चक्क एका प्रोहिबिटेड एरियात शिरलो होतो. अपेक्षित नसताना अचानक एक गाडी थेट प्रोहिबिटेड एरियातच शिरल्यामुळं त्या गार्डस्‌चीही धांदल उडाली असणार. समज-गैरसमजांच्या जंजाळातून शेवटी त्यांच्यातल्याच एकानं आम्हाला पुढचा रस्ता दाखवला...''

ृमृणालिनी पिंप्रीकरांकडून हा किस्सा ऐकताना माझ्या डोळ्यासमोर हॉलिवूडी युद्धपटातले प्रसंग येत होते. चेन लिंक फेन्स, कोसळणारा पाऊस, वर-खाली होणारे प्रखर प्रकाशझोत आणि सैनिकांच्या गराड्यातली गाडी वगैरे. आता हा प्रसंग सांगताना मृणालिनींच्या आवाजात, चेहऱ्यावर तणाव दिसत नाही; पण मणिपूरमधून ब्रह्मदेशात प्रवेश केल्याकेल्या पहिल्याच दिवशी घडलेला हा प्रसंग ऐकताना पुण्यापासून-सिंगापूरपर्यंत स्वतःची गाडी स्वतः चालवत प्रवास करण्यासाठी बाहेर पडलेल्या पिंप्रीकरांची काही मिनिटांकरता काय स्थिती झाली असेल, याची कल्पना येऊ शकते.

मृणालिनी, मिलिंद आणि सई पिंप्रीकर दोन महिन्यांपूर्वी पुण्याहून सिंगापूरला स्वतःची गाडी घेऊन गेले होते. पुण्याहून निघाल्यानंतर आपली आठ राज्यं आणि नंतर चार देश असा हा एकंदर प्रवास. यातलं प्रत्यक्ष ड्रायव्हिंग साधारण चौदा दिवसांचं, अंतराच्या भाषेत बोलायचं, तर जवळपास पावणेनऊ हजार किलोमीटर. गुगल मॅपवर पाहाल, तर मुक्काम वगैरे जमेला न धरता हा प्रवास एकंदर 118 तासांचा आहे. साधारणतः मित्रा-मित्रांचे असे साहसी प्रवास कानावर असतात. एकट्यादुकट्यानंही असे प्रवास केल्याची उदाहरणं आहेत; पण लेकीसह स्वतः गाडी चालवत असे दीर्घ पल्ल्याचा प्रवास करणारं पिंप्रीकर दाम्पत्य विरळंच. त्यातही मृणालिनी आणि मिलिंदना भेटल्यावर दोन आणखी धमाल गोष्टी समजल्या. हा त्यांचा पहिला प्रवास नाही. हे त्रिकूट 1998 पासून म्हणजे गेली दोन दशकं असे लांबलांबचे प्रवास करताहेत. त्यांचा पहिला प्रवास होता नागपूरपासून कन्याकुमारीपर्यंत, आणि लेक सई तेव्हा जेमतेम सहा महिन्यांची होती.

पिंप्रीकरांच्या प्रवासाबद्दल पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा आठवली सिडनी -लंडन कार रेस. मी सातवी-आठवीत असताना वडिलांबरोबर अलका टॉकीजच्या चौकातल्या गर्दीत उभं राहून सुसाटत गेलेल्या गाड्या बघितल्याचं आठवतंय. सिडनीहून म्हणजे जगाच्या एका टोकापासून लंडनपर्यंत कोणीतरी गाडी चालवत जातं आणि जाताना आपल्या शहरातून जातं ही कल्पनाच 1977 मध्ये अद्‌भुत असणार- कारण या गाड्या पुण्याला पोचायच्या एखाददुसरा दिवस अलीकडंपलीकडं घरातल्या-वाड्यातल्या मोठ्या माणसांच्या गप्पात तो विषय असल्याचं अंधुकसं आठवतं. पिंप्रीकरांशी बोलताना एका बाजूला ही आठवण होती; आणि दुसऱ्या बाजूला पिंप्रीकरांबद्दलचं कुतूहल.
आम्ही भेटलो ते एका पावसाळी सकाळी. मिलिंद पिंप्रीकरांसारख्या पुण्याजवळच्या भूगाववरून कामासाठी रोजच्या रोज चाकणला जाणाऱ्या ऑटोमोबाईल इंजिनिअरांसाठी रविवारची सकाळ म्हणजे खरंतर सुखाची सकाळ. मस्त लोळत पडावं, उशिरा उठावं, ब्रेकफास्टला काहीतरी मस्त चमचमीत खावं, ......, (अनुभवी जाणकारांनी आपल्याला झेपेल तशा रिकाम्या जागा भरून घ्याव्यात); पण इथं मिलिंद आणि मृणालिनी धावण्याची एक छोटी स्पर्धा करून आले होते. भर पावसात. नेत्रतज्ज्ञांच्या एका संस्थेनं ही स्पर्धा आयोजित केली होती. दहा किलोमीटरचा पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यात आणखी दोन किलोमीटर पळायचं होतं. या टप्प्यात दोन-दोनच्या जोड्या करून धावताना एका वेळी एका जोडीदारानं डोळ्याला पट्टी बांधून धावायचं आणि दुसऱ्यानं त्याला ट्रॅक फॉलो करायला मदत करायची, असा त्या स्पर्धेचा एक भाग होता. मृणालिनीचा स्पर्धेत नंबर आला होता आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ""पहिलं बक्षीस आहे माझं हे,'' त्या सांगत होत्या. मी मनातल्या मनात पिंप्रीकरांना शंभरपैकी दोनशे मार्क देऊन टाकले.

पिंप्रीकर मूळचे नागपूरचे. मिलिंद ऑटोमोबाईल इंजिनिअर आणि मृणालिनी लहान मुलांच्या कपड्यांचं दुकान चालवायच्या. मृणालिनी मिलिंदच्या मामेबहिणीची मैत्रीण. मिलिंदला गाडी चालवण्याचं वेड. मृणालिनी गाडी चालवत नाहीत; पण त्यांना प्रवासाची आवड. हा एक वेगळा समसमा संयोग या दाम्पत्याच्या पथ्थ्यावर पडला. सई तर कळत नव्हतं तेव्हापासून आई-बाबांबरोबर सफरी करते आहे.

कन्याकुमारीनंतर लांबच्या अशा सफरी म्हणजे लेह आणि भूतान. सहा वर्षांपूर्वी भूतानहून आल्यानंतर डोक्‍यात घोळणारा पुढचा प्लॅन होता लंडनचा. (म्हणजे माझी आठवण अगदीच अनाठायी नव्हती..) लंडनच्या दृष्टीनं थोडीथोडी तयारीही सुरू केली होती. वेळेचा हिशेब मांडताना लंडन ट्रिपसाठी पुरेशी सुटी मिळणार नाही, असं लक्षात आलं आणि पिंप्रीकरांनी मोहरा पश्‍चिमेकडून थेट पूर्वेकडं वळवला. सिंगापूरचा अभ्यास सुरू झाला. ईशान्य भारत आणि त्याच्या पूर्वेकडच्या देशांचा नकाशा पाहिला, तर अरुणाचल, नागालॅंड, मणिपूर आणि मिझोरामला लागून असलेला म्यानमार (म्हणजे पूर्वाश्रमीचा ब्रह्मदेश.) या म्यानमारचा हिरवा पट्टा अंदमानच्या समुद्रातून मलाक्काच्या सामुद्रधुनीपर्यंत ओढत खाली नेला, की त्याचं शेवटचं टोक म्हणजे सिंगापूर. हा पट्टा आपण नकाशात अनेकदा पाहिलेला असतो; पण याच पट्ट्यातून गाडी चालवत भारतातून थेट मायानगरी सिंगापूर गाठता येऊ शकतं हे कधी डोक्‍यातही येत नाही.

नेमक्‍या याच पट्ट्यातून पिंप्रीकरांचा प्रवास झाला. मेच्या 31 तारखेला पुण्याहून निघाल्यावर पहिला मुक्काम राजस्थानातल्या झालावरला. मग उत्तर प्रदेशातलं गोरखपूर, पश्‍चिम बंगालमधलं मदारीहाट. तिथून नागालॅंडची राजधानी असलेलं कोहिमा आणि पाचव्या दिवशी भारत-म्यानमार सीमेवरचं मोरेह
सीमेवरचा भारत-म्यानमार मैत्री पूल ओलांडून म्यानमारमध्ये प्रवेश केल्यावर पिंप्रीकरांच्या प्रवासातल्या दुसऱ्या एक्‍सायटिंग टप्प्याला सुरवात झाली. म्यानमारमधून थायलंड मग मलेशिया. जोहर बाहरू हे सिंगापूरकडं जाताना मलेशियातलं शेवटचं गाव. पुण्याहून निघाल्यानंतर बरोबर बाविसाव्या दिवशी पिंप्रीकर सिंगापूरला पोचले.

या सगळ्या प्रवासाचं नियोजन करताना पासपोर्ट, व्हिसासारख्या औपचारिकतांव्यतिरिक्त आणखीही काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. म्यानमार आणि थायलंडमध्ये संपूर्ण प्रवासात तिथल्या पर्यटन विभागाचे दोन प्रतिनिधी सतत तुमच्याबरोबर असतात. थायलंडला जाणाऱ्या विमान प्रवाशांप्रमाणं रस्त्यानं येणाऱ्या पर्यटकांना "व्हिसा ऑन अरायव्हल'ची सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळं व्हिसा इथून निघतानाच घ्यावा लागतो. थायलंडमध्ये जेव्हा तुम्ही तुमची गाडी घेऊन जाता, तेव्हा तुम्ही ती तात्पुरती "एक्‍स्पोर्ट' करत असता. त्या "एक्‍स्पोर्ट' आणि "इंपोर्ट'ची एक स्वतंत्र फी आहे. ही फी म्हणजे कारनेट- ती प्रचंड असते. परत येताना गाडी बोटीनं आणायची असेल, तर त्यासाठीचे नियम वेगळे आहेत. प्रत्यक्ष प्रवासाच्या कितीतरी आधी या सगळ्या तयारीला सुरवात करूनही प्रवासाला निघण्याच्या आधीच्या आठवड्यापर्यंत वेगवेगळी कागदपत्रं हातात येत होती. ""पंधराशेच्या आसपास ई-मेल केलेत मी या ट्रिपसाठी...'' मिलिंद सांगतात. एका क्षणी तर 31ला निघू की नाही, असा मिलिंदना प्रश्‍न पडला होता
रस्त्यानं केलेले प्रवास तुम्हाला खूप समृद्ध करतात, हा जसा अनेकांचा अनुभव तसाच तो मिलिंद आणि मृणालिनी यांचाही. माणसांचे खूप नमुने थेट अनुभवायला मिळतात. विमानप्रवासासारखे हे प्रवास परीटघडीचे नसतात. अशा प्रवासांमधला जिवंतपणा हा अनुभवानंच समजू शकतो. तीन-सव्वातीन आठवड्यांचा प्रवास पुन्हा सांगताना मिलिंद एक मुद्दा आवर्जून नोंदवतात ः ""संपूर्ण प्रवासात रस्त्यांची स्थिती अतिशय उत्तम होती; पण सगळ्यात चांगले रस्ते थायलंडमध्ये होते.''

ब्रह्मदेशात त्यांच्याबरोबर असलेले दोन्ही गाईड त्यांच्याच बरोबर प्रवास करत होते, तर थायलंडमधले सरकारी गाईड वेगळ्या गाडीतून त्यांच्या आगेमागे होते. ""ब्रह्मदेशातल्या गाईडबरोबर त्याच्या ब्रह्मी आणि आमच्या भारतीय इंग्लिशमध्ये खूप गप्पा झाल्या,'' मृणालिनी सांगत होत्या. ""त्यांच्या अनेक चालीरितींबद्दल तो बोलला. एका ठिकाणी वाटेत आम्हाला एक साप आडवा गेला. त्यावरून त्या गाईडनं त्याच्या बहिणीची आठवण सांगितली. बेडूक पकडायला गेलेले असताना त्याच्या बहिणीचा सर्पदंशानं मृत्यू झाला होता. दोन वर्षांनी शेजारच्या एका घरात आपल्या बहिणीनं पुनर्जन्म घेतला, असा त्याचा ठाम विश्‍वास होता.''

म्यानमारच्या या भागातल्या निसर्गसौंदर्यानं भुरळ घातल्याचं मृणालिनी यांनी आवर्जून सांगितलं. त्यांच्याच शब्दात सांगायचं, तर ""अजून तरी फार ढवळाढवळ केली नाहीये माणसानं (तिथं)...'' थायलंडच्या प्रवासातही एरवी टूर कंपन्यांच्या ग्लॉसी ब्रोशरमध्ये न सापडणारी अयुथाया (ही थायलंडची जुनी राजधानी), सुखोथायीसारखी ठिकाणं त्यांच्या टूर मॅपवर होती. उत्तर थायलंडमधून बॅंकॉकला येताना जंगलातून जाणाऱ्या एका हायवेवर माकडांसाठी पूल बांधलेले दिसले. रस्ता ओलांडताना माकडं वाहनांच्या धडकेत जखमी होण्याचा किंवा जीव गमवावा लागण्याचा धोका कमी करण्यासाठी घेतलेली ही काळजी होती. म्यानमार आणि थायलंडमध्ये पेट्रोल भरल्यावर पाण्याची बाटली देतात, हेही जरा वेगळं वाटलं. बाहेर डिझेल तुलनेनं खूप स्वस्त आहे, असंही एक निरीक्षण त्यांनी नोंदवलं. संपूर्ण ट्रिपसाठी त्यांना 28 हजार रुपयांचं डिझेल लागलं.

"खाण्यापिण्याचे किती हाल झाले?' या प्रश्‍नावर मृणालिनी मोकळेपणे हसल्या. ""जेवायला बसलो, की खूप गोष्टी लक्षात यायच्या. एकतर आपली शाकाहाराची कल्पना आपल्या या शेजाऱ्यांना मान्य नाही. भात आणि नारळाबरोबर सुकी मासळी वापरून केलेल्या पेस्टचा वापर- त्यामुळे बऱ्याचशा लोकल पदार्थांना माशांचा वास असायचा. म्यानमारमध्ये दोन दिवस तर आम्ही फक्त आंबे खाऊन राहिलो होतो. चहा सगळीकडे प्यायला जातो; पण आपल्यासारखा नाही. ग्रीन किंवा ब्लॅक टी. काही ठिकाणी तुम्ही कॉफी मागवलीत, तरी कॉम्प्लीमेंटरी ग्रीन टी येतोच. मलेशियात आम्ही ज्या मैत्रिणीच्या घरी उतरलो होतो, तिच्याकडे आपलावाला दूधबिध घातलेला चहा प्यायल्यावर जीवात जीव आला.''

एव्हरेस्टवर चढाई करण्याचा एकदा नव्हे दोनदा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या जॉर्ज मॅलरी नावाच्या गिर्यारोहकाला एकदा कोणीतरी विचारलं ः ""का सर करायचय एव्हरेस्ट तुम्हाला?'' त्यावर मॅलरी उत्तरले होते ः ""बिकॉज इटस्‌ देअर... कारण ते तिथं आहे.'' साहसवेडी लोकं साहस का करतात, त्यातून आजच्या मॅमेजमेंटच्या भाषेत बोलायचं तर "टेक अवे' काय असतो? पिंप्रीकरांना विचाराल तर उत्तर मिळतं ः ""माणसांचे चांगले अनुभव हीच या ट्रिपमधली कमाई.'' कितीतरी अनुभव आहेत त्यांचे. "पुण्याला पोचलात का,' अशी आवर्जून फोन करून चौकशी करणारा लेहचा हॉटेल मॅनेजर, बर्फावरून गाडी कशी चालवावी याच्या टिप्स देणारा चांग ला पासला भेटलेला ट्रक ड्रायव्हर, सहा महिन्याच्या मुलीसाठी स्वतःच्या घरात स्वयंपाक करू देणारं दक्षिणी कुटुंब, "आती क्‍या खंडाला...' गाण्यामुळं खंडाळ्याविषयी उत्सुकता वाटून खंडाळा बघायला आलेला आणि वडापावाच्या प्रेमात पडलेला भूतानमधला हॉटेल मॅनेजर, आणखी कोणी कोणी. माणसं समजतात. परिस्थिती स्वीकारण्याबाबतची समज वाढते. बदलत जाणारी प्रदेशचित्रं तुमच्या जाणिवांमध्ये भर घालतात. सईला काय वाटतं या ट्रिप्सबद्दल, हे समजून घ्यायला तिला मेल पाठवला होता. "सई शिक्षणाच्या निमित्तानं पुण्याबाहेर असते, मी पिंप्रीकरांना भेटलो तोपर्यंत ती परत गेली होती.' तिच्या मते, अशा ट्रिप्समुळं माणसं खूप चांगली समजतात. तुमच्याबरोबर प्रवास करणारा हमसफर तर कळतोच; पण तुम्हीही तुम्हाला नीट कळता. आणि इतरही अनेक गोष्टी नव्यानं उलगडत जातात, ते वेगळंच.

पिंप्रीकर आता पुन्हा पश्‍चिमेचा विचार करताहेत. पुरेशी रजा मिळणार नाही म्हणून या वर्षी हुकलेली लंडनची ट्रिप अजूनही पिंप्रीकरांच्या प्लॅनमध्ये आहे. साधारण आराखडा तयार आहे आणि वर्ष असेल 2021-22!

या देशांत नेऊ शकता गाडी
भारतातून गाडी चालवत कुठंपर्यंत जाता येईल? सहज कुतुहलापोटी महाजालावर शोध घेतला तर किमान वीस देशांची सफर करता येईल अशी माहिती मिळाली. ब्रिटन आणि श्रीलंकेसारख्या काही देशांमध्ये जाताना फेरीबोटीतून गाडी न्यावी लागेल; पण स्वतःची दुचाकी किंवा चारचाकी घेऊन चीन, कझाकिस्तानमधून रशिया, तुर्कस्तान, स्वित्झर्लंड, फ्रान्स, स्पेन, झेक प्रजासत्ताक अशा देशांची ट्रिप प्लॅन करता येऊ शकेल, असं काही फिरस्त्या मंडळींचं म्हणणं आहे.

वीस दिवसांत सुरत ते सिंगापूर
लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्‌मधल्या एका नोंदीनुसार दक्षिण आशियातला सर्वांत जलद प्रवास करण्याचा विक्रम सुरतच्या चार मित्रांच्या नावावर आहे. या नोंदीनुसार डिसेंबर 2015मध्ये त्यांनी सुरत ते सिंगापूर असा प्रवास वीस दिवसांत पूर्ण केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhav gokhale write road trip article in saptarang