esakal | द ग्रेट रेस्क्‍यू (माधव गोखले)
sakal

बोलून बातमी शोधा

madhav gokhale write thailand rescue operation article in saptarang

द ग्रेट रेस्क्‍यू (माधव गोखले)

sakal_logo
By
माधव गोखले madhav.gokhale@esakal.com

बॅंकॉकच्या उत्तरेला असलेल्या "थाम लुआंग नांग नोन' या गुहांच्या जंजाळात तब्बल सोळा दिवस अडकलेल्या फुटबॉल ऍकॅडमीच्या बारा मुलांच्या आणि त्यांच्या प्रशिक्षकाच्या सुटकेकडं अनेकांचे डोळे लागले होते. "थाम लुआंग नांग नोन रेस्क्‍यू ऑपरेशन' या नावानं ओळखल्या गेलेल्या थायलंडमधल्या या मोहिमेवर गेल्या मंगळवारी पडदा पडला. जूनच्या 23-24 तारखेला सुरू झालेला हा संघर्ष अनेक अर्थांनी वेगळा ठरला. पावणे चारशे तासांपेक्षा अधिक काळ ही सुटकामोहीम सुरू होती.

थाम लुआंग नांग नोन. नावही न ऐकलेल्या या थायलंडमधल्या गुहांनी गेल्या पंधरवड्यात जगभरातल्या अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. बॅंकॉकपासून उत्तरेला अर्ध्यापेक्षा जास्त दिवसाचा पल्ला असलेल्या डोंगराळ भागात म्यानमारच्या सीमेलगतच्या "निद्रिस्त सुंदरी'च्या केशकलापात लपलेल्या गुंफांच्या जंजाळात अडकलेली बारा मुलं आणि त्यांच्या फुटबॉल प्रशिक्षकाच्या सुटकेकडं अनेकांचे डोळे लागले होते. थायलंडच्या नौदलाच्या "स्पेशल वॉरफेअर कमांड'च्या - "नेव्ही सील्स्‌'चे -अत्यंत कुशल दर्यासारंग आणि भारतासह जवळजवळ दीड डझन देशांमधले डायव्हर्स, गुहाशोधक, अत्यंत अडचणीच्या ठिकाणी अडकलेल्या लोकांची सुटका करणारे रेस्क्‍युअर्स, त्यांना मदत करणारे तंत्रज्ञ आपली सगळी कौशल्यं, ज्ञान, अनुभव, हिंमत आणि यंत्रसामग्री पणाला लावून झुंजत होते...सलग सोळा दिवस.
"थाम लुआंग नांग नोन रेस्क्‍यू ऑपरेशन'वर गेल्या मंगळवारी पडदा पडला. जूनच्या 23-24 तारखेला सुरू झालेला हा संघर्ष अनेक अर्थांनी वेगळा ठरला. पावणेचारशे तासांपेक्षा अधिक काळ ही सुटकामोहीम सुरू होती. प्रचंड पाऊस, गुहेत भरलेलं पाणी, कमी होत जाणाऱ्या प्राणवायूची पातळी राखण्याचे शर्थीचे प्रयत्न, मुलं अडकली होती तिथपर्यंतचं जीवघेणं अंतर या सगळ्या प्रतिकूलतांवर मात करण्याचे प्रयत्न सुरू होते. प्रचंड पाऊस, गुहेतलं वाढणारं पाणी, मुलांपर्यंत ऑक्‍सिजन पोचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या नौदलाच्या एका डायव्हरला गमवावा लागलेला जीव...

तब्बल सोळा दिवस जीवन-मरणाचा लंबक आशा आणि निराशा यांच्यादरम्यान झुलत होता. आणि या सगळ्या नाट्याच्या केंद्रस्थानी असलेले ते तेरा जण...शोधपथक आणि सुटकापथक यांच्या हिमतीला जेवढी दाद द्यायला हवी तितकंच कौतुक करायला हवं फुटबॉल प्रशिक्षक इकाफोल एक चॅन्टवॉंग याचं आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या मागोमाग जमिनीच्या पोटात शिरलेल्या त्या मुलांच्याही धीराचं, संयमाचं आणि संघभावनेचं.

या जीवघेण्या आणि कमालीच्या अनिश्‍चित सुटकामोहिमेला असंख्य पदर आहेत. गेल्या पंधरा-वीस दिवसांतल्या या घटनेच्या बातम्या एकत्रित वाचताना ते जाणवतात. गुहेतली पाण्याची पातळी कमी करण्यासाठी लक्षावधी गॅलन पाणी उपसून बाहेर काढावं लागलं. दहा किलोमीटर लांबीच्या त्या गुहेतून बाहेर काढलेल्या पाण्याचं एक स्वतंत्र उपकथानक आहे. दीड-पावणेदोन डझन पंप पाणी उपसत होते. हे सगळं पाणी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खेड्यांमधल्या शेतांमध्ये पसरत होतं. ते पाणी वळवण्यासाठी, मुरवण्यासाठीही प्रयत्न केले गेले; पण तरीही कितीतरी शेतजमिनीवर पाणी पसरून राहिलं. सिंगापूरच्या "स्ट्रेट टाइम्स'नं लेक लॅपडॉन्गपोईन नावाच्या शेतकऱ्याची मुलाखत प्रसिद्ध केली आहे. लेकचं शेत पाण्याखाली गेलं होतं. नुकसानीबद्दल विचारल्यावर तो म्हणाला ः ""शेती परत पिकेल; पण ते तेरा जीव गेले तर ते परत येणार नाहीत.''

या सगळ्यांची सुटका करण्यासाठी नौदलापासून असंख्य यंत्रणा तर राबल्याच; पण गुहांच्या आजूबाजूच्या गावांतल्या लोकांनी या मदतपथकांसाठी आणि मुलांच्या नातेवाइकांसाठी जी सपोर्ट सिस्टिम उभी केली होती, ती तितकीच महत्त्वाची ठरली.
हा जीवघेणा खेळ सुरू झाला 23 जूनला. चॅन्टवॉंग आणि त्याची "मू पा' (वाइल्ड बोअर) फुटबॉल ऍकॅडमीची टीम रोजच्या सरावानंतर गुहेत गेली. ते गुहेत का गेले होते, याचं निश्‍चित उत्तर अजून मिळालेलं नाही; पण "गार्डियन'च्या एका वृत्तानुसार, त्यांच्यातल्या एका मुलाचा वाढदिवस साजरा करण्याचा त्यांचा बेत होता. या डोई नांग नोंग किंवा "निद्रिस्त सुंदरी'च्या डोंगररांगेचीही एक कहाणी आहे. रोमिओ-ज्युलिएटपासून आजवर असंख्य वेळा सांगून झालेल्या असफल प्रेमाच्या कहाण्यांसारखी हीसुद्धा साठा उत्तरी पूर्ण न झालेल्या प्रेमाची गोष्ट आहे. स्थानिक लोककथेनुसार, फार फार वर्षांपूर्वी एक राजकन्या एका मोतद्दाराच्या प्रेमात पडली. राजाला अर्थातच त्यांचा विवाह पसंत नव्हता. जिवाच्या भीतीनं राजकन्येनं पोटातल्या बाळासह पलायन केलं. या डोंगराळ भागात पोचल्यावर ते दोघंही एका ठिकाणी थांबले. मोतद्दार खाण्याच्या शोधात असतानाच पाठलागावर असलेल्या राजाच्या सैनिकांनी त्याला गाठून मारून टाकलं. इकडं त्याची वाट पाहून निराश झालेल्या राजकन्येनंही प्राण सोडले. तिचं रूपांतर एका मोठ्या पर्वतात झालं, तीच ही डोई नांग नोंग डोंगररांग! माए चान जिल्ह्यात आजही एक टूरिस्ट पॉइंट आहे, तिथून पाहिलं तर समोरची डोंगररांग एखाद्या निद्राधीन तरुणीसारखी दिसते. पर्यटन-व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशानं थाम लुआंग नांग नोन गुहांच्या प्रवेशद्वाराच्या भागात फॉरेस्ट पार्क उभारण्यात आलेलं आहे.

प्रशिक्षकाबरोबर मुलं आत असतानाच प्रचंड पाऊस सुरू झाला आणि गुहेत पाणी भरायला लागलं. पावसाळ्यात - जुलै ते नोव्हेंबरच्या काळात- या गुहा तशाही पर्यटकांसाठी बंदच असतात. भूगर्भशास्त्रज्ञांच्या भाषेत ही डोंगररांग म्हणजे असंख्य कपारी, गुहा, त्या भरून टाकणारे पाण्याचे झरे असणारं कार्स्टिक फॉर्मेशन आहे. एका मुलाच्या आईनं स्थानिक पोलिसांशी संपर्क साधल्यावर शोध सुरू झाला. गुहेच्या तोंडाशी सायकली आणि इतर साहित्य सापडल्यावर "नेव्ही सील्स्‌'ना पाचारण करण्यात आलं.

लगेचच शोध सुरू झाला; पण पावसामुळं प्रचंड अडथळे आले. नौदलाचे पाणबुडे शोध घेत होते. त्यांना मदत म्हणून थर्मल कॅमेरे बसवलेले ड्रोन आणि प्रशिक्षित श्वानपथकांनी गुहेच्या वरचा आख्खा डोंगर इंच न्‌ इंच तपासला. पाण्याखाली काम करू शकणारे रोबो गुहेत पाठवले गेले; पण या सगळ्या तंत्रज्ञानाच्या मर्यादाही लक्षात आल्या. असं म्हणतात की पूर्वीच्या काळी एखाद्या निर्जन बेटावर अडकलेले दर्यावर्दी जसे आपण अडकल्याचा निरोप असणारी चिठ्‌ठी बाटलीत घालून ती बाटली समुद्रात फेकायचे, जेणेकरून ती कुणाला तरी मिळावी आणि मदत यावी, तशा डोंगरावर सापडलेल्या प्रत्येक भुयारातून थोडे खाद्यपदार्थ, नकाशे आणि मोबाईल फोन असलेल्या "सर्व्हायव्हल बॉक्‍स' गुहेत सोडल्या गेल्या.

थायलंडच्या लष्कराच्या आणि पोलिसांच्या मदतीला आता ब्रिटिश केव्ह डायव्हर्स आणि अमेरिकी सैनिकही आले होते. पहिले दहा दिवस नुसताच आशा-निराशेचा खेळ सुरू होता. कारण, आत गेलेल्या तेरा जणांपैकी एकाचाही ठावठिकाणा लागलेला नव्हता. दरम्यानच्या काळात डोंगरात वरपासून बोगदा खणण्यापासून ते पाऊस संपेपर्यंत वाट पाहण्यापर्यंत अनेक पर्यायांचा विचार होत होता. दहाव्या दिवशी ब्रिटिश केव्ह डायव्हर्सनी गुहेच्या तोंडापासून आत दोन मैलांवर एका कोरड्या उंचवट्यावर चढून बसलेल्या मुलांचा ठावठिकाणा शोधला आणि सुटकानाट्याचा दुसरा अंक सुरू झाला.

ं-मुलं सापडली असली तरी प्रत्यक्षात त्यांची सुटका व्हायला किती वेळ लागेल याचा काहीच अंदाज नव्हता. मुलांना खाद्यपदार्थ, वैद्यकीय मदत देण्याबरोबर संपर्क यंत्रणा उभारण्याच्या कामाला तातडीनं सुरवात झाली. जमिनीच्या पोटात अंधार, वाढतं पाणी आणि अनाकलनीय अनिश्‍चिततेसह दहा दिवस घालवल्यानंतर मुलांनी बाहेरच्या जगाशी पहिला संपर्क साधला ः "काळजी करू नका, आम्ही सुरक्षित आहोत.'
आताचा टप्पा खऱ्या अर्थानं खडतर होता. कारण, मुलं सापडली होती, त्यांना सहीसलामत बाहेर आणायचं होतं आणि एकाही मुलाला पोहता येत नव्हतं. पावसाळा संपेपर्यंत वाट न पाहता मुलांना बाहेर आणायचं असेल तर या सगळ्यांना डायव्हिंग आलं पाहिजे आणि पोहताही आलं पाहिजे, ही पूर्वअट होती. आणि हे पोहणं कोणत्याच अर्थानं सोपं नव्हतं. डोंगराच्या पोटात दहा दिवस अडकल्यानंतर, आजवर कधीही न पोहलेल्या मुलांना अतिशय थंड पाण्यात डायव्हिंगची उपकरणं घेऊन दीड किलोमीटरचं अंतर पोहायचं होतं आणि तेवढंच चालायचंही होतं. अनिश्‍चिततेची तलवार डोक्‍यावर होतीच.
डायव्हर्स, डॉक्‍टर्स, लष्कर आणि जगभरातून आलेले तंत्रज्ञ यांच्या प्रयत्नांमुळं जुलैच्या दोन तारखेला मुलं सापडल्यानंतर सहा दिवसांनी सगळे जण सुखरूप पुन्हा माणसांच्या जगात पोचले. मुलांना गुहेत नेताना सगळ्यात पुढं असणारा प्रशिक्षक चॅन्टवॉंग सगळ्यात शेवटी गुहेतून बाहेर पडला.
(दोन दिवस आधी त्यानं सगळ्या पालकांना पत्र पाठवून त्यांच्या मुलांना संकटात लोटल्याबद्दल गुहेतूनच माफी मागितली होती).

***

जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात या सगळ्या बातम्या वाचताना, व्हिडिओ पाहताना राहून राहून, त्या तेरा जणांनी पहिले दहा दिवस कसे काढले असतील; अंधार, पडणाऱ्या-वाहणाऱ्या पाण्याखेरीज दुसरा आवाज नाही; आपण हरवलो हे बाहेरच्या जगाला समजलंय तरी का तेही कळायचा मार्ग नाही; जवळ असलेलं तुटपुंजं खाणं या सगळ्या परिस्थितीत बारा-पंधरा वर्षांच्या त्या मुलांना धीर देण्याचा प्रयत्न करताना चॅन्टवॉंगची स्वतःची मनःस्थिती काय असेल...असे प्रश्‍न होतेच.

ं-माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या भारतातल्या पहिल्या संपूर्ण नागरी मोहिमेचे नेतृत्व करणारे गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या मते, या दुर्घटनेनं संपूर्ण जगाला खूप काही शिकवलंय आणि मुख्य म्हणजे या दुर्घटनेनं माणसातली संघभावना आणि विजिगिषु वृत्ती अधोरेखित केली आहे. झिरपे यांच्या मते, ते सगळे खेळाडू होते म्हणूनच टिकले. त्यांची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती अफाट होती, याचं कारण ते खेळत होते. ते शेवटपर्यंत उभे राहिले. झिरपे म्हणतात तसं, रेस्क्‍यू ऑपरेशन्समध्ये अडकलेल्या माणसाचं मनोधैर्य हा खूप महत्त्वाचा भाग असतो आणि तितकीच महत्त्वाची असते बचावपथकातल्या प्रत्येकाची हिंमत आणि संयम. कारण, अडकलेल्या आणि त्यांना बाहेर काढणाऱ्या अशा दोन जीवांचा प्रश्‍न असतो.
वाटतं, आपण केव्हातरी या ग्रेट रेस्क्‍यूचा अर्थ समजावून घेतला पाहिजे.

loading image