आक्रोशाच्या जगात...

महाराष्ट्र, छत्तीसगडच्या सीमेवरील गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटी असलेल्या गावांमध्ये जायचं. तिथल्या लोकांशी बोलायचं. हे गेल्या अनेक वर्षांपासून माझं काम आहे.
border naxalite area
border naxalite areasakal

महाराष्ट्र, छत्तीसगडच्या सीमेवरील गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटी असलेल्या गावांमध्ये जायचं. तिथल्या लोकांशी बोलायचं. हे गेल्या अनेक वर्षांपासून माझं काम आहे. मी राज्यातल्या सीमेजवळच्या अनेक भागांत फिरलो. पण जिथे नक्षलवादासारखा प्रश्न गंभीर आहेत, त्या भागात असणाऱ्या गावांची अवस्था, त्या लोकांची मानसिकता खूप वेगळी आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा, एटमपल्ली, भामरगड हे तालुके अजूनही विकासापासून खूप दूर आहेत. या भागातील लोक त्यांच्याकडच्या थोड्या दौलतीवर खूश आहेत; पण सरकारच्या अनेक जाचक अटीनं त्यांचं जगणं मुश्कील झालंय. या भागात आता कुठं चांगुलपणाची पणती पेटू लागली आहे. आम्ही एका गावात गेल्यावर कोणीही आमच्याशी बोलणं तर सोडा, कोणी आमच्याकडे पाहतही नव्हते. आमच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्याच्या मदतीनं आम्ही गावच्या मुखियाला गाठलं.

गावातले मुखिया अतिशय बुजुर्ग व्यक्तिमत्त्व. मी किसन यांना विचारलं, ही लोकं एवढी का घाबरली आहेत? किसन म्हणाले, ‘‘ पोलिसांचे खबरे पावलोपावली आहेत. गावात येणाऱ्या नवीन माणसाला बोललं तर तो नक्षलवाद्यांशी संबंधित होता. तो गावामध्ये कट रचतोय, असाच बोलबाला होऊन पोलिसांकडे प्रकरण जाते. मग त्या प्रकरणातून आख्ख्या गावाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.’’ मागच्या ४० वर्षांतले अनेक अनुभव किसन सांगत होते.

पोलिसांच्या माध्यमातून कोंबिंग ऑपरेशन, फायरिंग, एन्काउंटर यावर किशन काही बोलायला तयार नव्हते. ‘‘आम्हाला गावात राहायचे आहे, असे प्रश्न विचारू नका,’’ असे किसन सांगत होते. किसनच्या मदतीने गावामध्ये आम्ही बऱ्यापैकी रुळलो. दोन-चार तासांनंतर गावातल्या काही लोकांशी आम्ही बोलायला सुरुवात केली. बेसिक गरजाही पूर्ण न झालेले कुटुंब मी आजूबाजूला पाहत होतो. एका आजीशी व त्याच्याबरोबरच्या महिलांशी मी बोलत होतो. त्या बोलण्यातून बऱ्याच बाबी कळत होत्या.

अनेक जणींचे पती जेलमध्ये वर्षानुवर्षांपासून आहेत. त्यांना जेलमध्ये का टाकले हे त्यांना माहिती नाही. अनेकींच्या नवऱ्यांवर अत्याचार करून त्यांना मारण्यात आले. त्यांचे तुकडे तुकडे करण्यात आलेत. दोन वेळचे खायचे मिळवायचे कसे? आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, हा या सगळ्या लोकांसमोर अत्यंत गंभीर असलेला प्रश्न होता.

तरीही यांचा मुख्य प्रश्न होता, आजूबाजूला पोलिस, नक्षली रूपाने असलेला हुकूमशाह आपल्याला जनावरांसारखी वागणूक देतो, हे कधी थांबणार आहे. मी ज्या आजीशी बोलत होतो तिचं नाव सगुणा. सगुणा म्हणजे त्या गावाचा संस्कारी दागिना होत्या. सगुणा आजी म्हणाल्या, ‘‘एक काळ होता बाबा. गाव आनंदानं सतत भरून आलेले असायचं; पण मागची तीस वर्षे इतकी कठीण गेली की विचारलाच नको? आता अलीकडे चार वर्षांपासून वातावरण बरं आहे.

कोण माणसं कुठून गावात येतात, घोषणा देतात. चार पोरांची माथी भडकवतात. ती पोर अशी का वागतात, म्हणून पोलिस आख्ख्या गावाला धोबीपछाड करतात. याची आता गावाला जणू सवय झाली होती. ही अवस्था आमच्या एका गावची नाही तर आसपास असणारी ४० हून अधिक खेडी अशीच आहेत.’’

मी त्या बायकांशी बोलत होतो. तितक्यात किसन मुखिया त्या ठिकाणी आले. त्यांना पाहून त्या सगळ्या महिला एकदम घाबरल्या. त्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं आणि माझ्याकडे पाठ करून बसल्या. माझा पडलेला चेहरा पाहून किसन म्हणाले, ‘‘तुम्हाला या महिलांचं बोलणं ऐकून प्रचंड दुःख झालं असेल. जशा या महिला त्या घरातल्या कर्त्या आहेत. तसा मी या गावातला कर्ता पुरुष आहे. गावातल्या प्रत्येक माणसाचं सुख-दुःख काय मला माहीत आहे.

किसन म्हणाले, ‘‘आता नक्षली कारवाया, त्यांचे काम थांबले आहे बऱ्यापैकी; पण नक्षली कारवाया, नक्षली वातावरण अजून सुरूच आहे. त्यात वाढ होते असं ओढून ताणून सांगणारा एक मोठा वर्ग आहे. त्याचं कारण शासकीय मिळणारा मलिदा आहे. नक्षली वातावरणाच्या नावाखाली मिळणारे वेतन, भत्ते, शासकीय निधी हा अवाच्या सवा आहे. या मिळणाऱ्या मलिद्यामुळे कुणालाही नक्षलवाद पूर्णपणे संपलाय, असं सांगायचं नाही.’’

मी किसन यांना म्हणालो, ‘‘मग विकास होतोय का?’’ किसन म्हणाले, ‘‘कशाचा विकास? पोलिसांच्या सहकार्यातून इथे लोकशाही नांदण्यासाठी मदत होते खरी; पण अनेक वेळा हेच पोलिस अत्याचार तर करीत नाहीत ना, असे वाटायला लागते.’’ माझ्यासोबत असणारे अधिकारी म्हणाले, ‘‘पूर्वी शिक्षा म्हणून या भागात अधिकारी पाठवले जायचे; पण आता असं नाहीये. तिथे चांगलं काम करता येते. इथे वेगवेगळे प्रयोग करता येतात. इथे काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांना मिळणारे वेतन भत्तेही खूप मोठ्या प्रमाणावर आहेत.’’ त्या महिला काहीही बोलत नव्हत्या.

त्या महिला काहीतरी बोलतील या आशेवर बसलेला मी... माझ्याकडे पाहत किशन म्हणाले, ‘‘या महिला तुम्हाला माझ्यासमोर काहीही बोलणार नाहीत. यांना पिढ्यानपिढ्या गप्प राहायची सवय पडली आहे.’’ आजीने आजच तयार केलेले पापड आम्हाला खायला दिले. त्या पापडाला आपलेपणाची चव होती. मी त्या सर्वांचा निरोप घेऊन मी त्या गावातून निघालो. रस्त्यातून जाताना आजी पापड, खारोड्या घेऊन रस्त्यात उभ्या होत्या.

त्यांनी मला आणि माझ्यासोबत असणाऱ्या अधिकारी मित्र यांना ते पार्सल दिले. ते पार्सल नव्हते तर समस्त पीडित असणाऱ्या त्या आक्रोश करणाऱ्या आईचा स्नेह-जिव्हाळा होता. त्या आजीचा नवरा गेला, मुलगा गेला, नातू गेला आता त्या बिचारीने कुणाकडे बघत जगायचे. अशा कितीतरी आजी, कितीतरी गावे आज आक्रोश करीत आहेत. त्यांना आज गरज आहे तुम्हा-आम्हा सर्वांच्या मदतीची. बरोबर ना..?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com