'जेएनयू'त आंदोलनाची धग; महाराष्ट्रात कॅम्पसमध्ये काय चाललंय?

Maharashtra college university campus and political situation
Maharashtra college university campus and political situation

मुंबई -विरोध आणि मैत्रीही 
नागरिकत्व कायदा, जेएनयू- जामिया इथल्या घटनांवरून मुंबईत निघालेल्या मोर्चांमध्ये मुंबई विद्यापीठ, आयआयटी मुंबई, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस- टीस) संस्थांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होताहेत. या घटनांचं समर्थन आणि विरोध काही विद्यार्थी करत असल्याने कॅम्पसमधील वातावरण तापलेलं असलं, तरी आयआयटी आणि मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी हल्ल्याच्याच चर्चा सुरू आहेत. जेएनयूमधील हल्ल्याचा बहुतांश विद्यार्थी निषेध नोंदवताहेत. या घटनांमुळे आयआयटी कॅम्पसमध्ये लोकशाही आणि देशप्रेमी अशी चर्चा आहे. विचारांमध्ये मतभेद असले तरी सर्वांनी मैत्री कायम राखली आहे, असं केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. करणारा संदीप सावरकर सांगतो. चर्चा तापलेली असली, तरी विरोधी विचारांच्या मित्रापासून दुरावलेलो नाही, असं एमएसडब्ल्यू विभागात शिक्षण घेणाऱ्या आणि जेएनयू घटनेविरोधात आंदोलनातील जितेश पाटील याचं म्हणणं आहे. आज "जेएनयू'मधील शुल्कवाढीविरोधात लढणाऱ्यांवर हल्ले होताहेत. असेच हल्ले मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर होऊ नयेत, यासाठी आम्ही एकत्र येतोय, असं अमीर काझी सांगतो. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

औरंगाबाद-आंबेडकरी चळवळीत अस्वस्थता 
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दिल्लीसारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतो आहे. यामध्ये कुलगुरूंवर थेट आक्षेप घेतले जात आहेत. "अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) विद्यापीठात केलेली आंदोलनं विनापरवाना आणि प्रशासनावर दडपशाही करणारी होती. त्याचवेळी आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही केली,' असा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम करतात. रत्नदीप कांबळे या विद्यार्थ्याला वसतिगृहात जाऊन मारहाण होते. दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्तचा कार्यक्रम बहुजन क्रांती मोर्चाने रोखल्यानंतर कुलगुरूंच्या दालनात तोडफोड होते. मात्र, कुलगुरूंनी काहीच कारवाई केली नाही, असं निकम यांचं म्हणणं आहे. दिल्लीतील प्रकारात डाव्या संघटनांचेच नेते अडकल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे, असा अभाविपचे विद्यार्थी निवडणूक प्रमुख शिवा देखणे यांचा दावा आहे. "विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून आम्ही आंदोलन करतो. विद्यापीठात "सीएए'च्या समर्थनार्थ आंदोलन करत असताना आंबेडकरवाद्यांनी विरोध केला. ही गुंडागर्दीच आहे,' असा प्रतिआरोप देखणे करतात. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे-राजकारण्यांमुळे विपरीत वळण 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातील उत्कर्षा पाटील म्हणते, की देशभरातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांयकडे दुर्लक्ष सुरू असल्यामुळे आंदोलनाच्या स्वरूपात असंतोष बाहेर येतो. याच विभागातल्या रामदास ढवळे याचं मतही असंच आहे. विद्यापीठांमध्ये फक्त आंदोलनंच होतात, असं भासवून मुख्य प्रश्नावला बगल दिली जात असल्याचा आरोप एम. ए. लाइफलॉंग विभागाचा विद्यार्थी सतीश पवार करतो. हिंदी विभागाचा विद्यार्थी दयानंद शिंदे याला वाटतं, की राजकीय पक्षाचे पदाधिकारी विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण देत आहेत. पत्रकारितेचा विद्यार्थी विष्णू नाझरकर सुचवतो, की सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे. एफटीआयआयमधील एडिटिंग विभागातील राज मुजुमदार, एडिटिंग विभागाची सुमंत्रिता घोष यांच्या मते, चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी आणि विद्यापीठातल्या प्रश्नांसाठी विद्यार्थी आंदोलनं करताहेत. आर्ट अँड प्रॉडक्शान विभागाचा राजू कुमार सांगतो, "नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या माध्यमातून जातिवाद केला जात आहे; परंतु, फूटनीती विद्यार्थी कधीच मान्य करणार नाहीत.' 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोल्हापूर-धोरणं परिणाम करणारी 
केंद्र सरकारची धोरणं गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवणारी आहेत. राजकारणाचा परिणाम विद्यार्थ्यांवरही होतोय, असं ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे गिरीश फोंडे यांचं मत आहे. "शेतीमालाच्या भावापासून अनेक प्रश्नव असताना त्यापासून विचलित करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा, नागरिकत्व नोंद यांसारखे विषय पुढे आणले जाताहेत. मुळात हे कायदे समाजात द्वेष पसरवणारे आहेत, ते रद्द झालेच पाहिजेत,' अशी त्यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून, नोंदणी करण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न फसल्यामुळे जेएनयूमध्ये गुंडांनी हिंसा केली आणि या प्रकरणात "अभाविप'ला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा अभाविपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रतीक सौदागर पाटील यांचा दावा आहे. "सीएए' कायद्याविरोधात वातावरण निर्माण करण्याची चाल फसल्यामुळे, हिंसक कृत्याद्वारे लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे, गैरसमज पसरवून देशातील वातावरण गढूळ करायचे हा डाव्यांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे, असं ते म्हणतात.

JNU जेएनयू National Youth Day युवा दिन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com