
जयेंद्र लोंढे - jayendra.londhe@esakal.com
महाराष्ट्राच्या मातीतील खेळ म्हणून कुस्तीकडे बघितले जाते. याच मातीतील खाशाबा जाधव यांनी १९५२च्या हेलसिंकी ऑलिंपिकमधील कुस्ती या खेळामध्ये ब्राँझपदक पटकावत इतिहास रचला. महाराष्ट्रात याचदरम्यान कुस्ती या खेळाचा प्रसार व प्रचार वेगाने होऊ लागला. ‘महाराष्ट्र केसरी’ या स्पर्धेचा उगमही याच कालावधीत झाला. महाराष्ट्रातीलच नव्हे देशातीलही प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विजयी ठरलेल्या महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंनी पुढे जाऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देदीप्यमान यश मिळवले. आता २९ जानेवारीपासून अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर या स्पर्धेतील विजयी वीर व त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवलेला ठसा यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.