बुगडी माझी सांडली गं...

महाराष्ट्राच्या साहित्यपरंपरेत लोकगीत, शाहिरी वाङ्मय, पोवाडा, वासुदेव इत्यादींचा समावेश होतो. त्यातलाच एक प्रकार म्हणजे लावणी.
Lavani
LavaniSakal

बुगडी माझी सांडली गं...

जाता साताऱ्याला गं

जाता साताऱ्याला

महाराष्ट्राच्या साहित्यपरंपरेत लोकगीत, शाहिरी वाङ्मय, पोवाडा, वासुदेव इत्यादींचा समावेश होतो. त्यातलाच एक प्रकार म्हणजे लावणी. लावण्याची ओढ जीमध्ये असते ती लावणी... सौंदर्यांची, सौष्ठवाची, लावण्याची महती सांगते ती लावणी! लावणीतून कधीकधी अध्यात्मसुद्धा सांगितलं जातं. ‘दे रे कान्हा चोळी अन् लुगडी’ ही पिंजरा सिनेमातली लावणी आध्यात्मिक आहे. संतांनीसुद्धा ईश्वरभक्तीसाठी लावणीचं रूपक वापरलं आहे.

‘बसले मी होते रंगमहाली... आरसे लाविले चार... हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल...’ असं लावणीचं रूपक संत एकनाथमहाराजांनी हरिदर्शनासाठी वापरलं आहे. बोर्डावरची लावणी आणि बैठकीतली लावणी असे लावणीचे प्रकार आहेत.

ही बोर्डावरची लावणी बघा...

बुगडी माझी सांडली गंऽऽऽ

जाता साताऱ्याला गं जाता साताऱ्याला

चुगली नका सांगू गंऽऽऽ

माझ्या म्हाताऱ्याला गं माझ्या म्हाताऱ्याला

दर दहा वर्षांनी बदलणाऱ्या प्रत्येक पिढीला या लावणीची भुरळ पडावी अशी या लावणीत जादू आहे तरी काय!

दहा-बारा वर्षांच्या कन्यकांपासून ते नव्वदीच्या आजोबांपर्यंत सगळेच आजही माना डोलावतात या लावणीवर. गत सात दशकं ही जादू सुरूच आहे. आजही टीव्हीवरच्या रिॲलिटी शोज् मध्ये मराठी गाण्यांच्या किंवा नृत्यांच्या स्पर्धेत या लावणीचा कुठं तरी समावेश असतोच असतो. कोणत्याही मराठी वाद्यवृंदाचा कार्यक्रम ‘बुगडी माझी’शिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

लावणी पूर्वी फक्त तमाशातून सादर केली जायची. तमाशातल्या लावणीला ‘बोर्डावरची लावणी’ असा शब्दप्रयोग आहे. पश्चिम महाराष्ट्रात दिवाळीनंतर गावोगावी जत्रा भरतात. या जत्रांमध्ये तमाशाचे फड भरतात. त्यांतून लावणी रंगत असते.

सर्वसामान्य जनांच्या मनोरंजनासाठी त्यांना रुचतील अशा लौकिक, ऐतिहासिक वा शृंगारिक विषयावर ढोलकी आणि कडा या वाद्यांच्या तालावर लावणी गायिली जाते. काळानुसार बदल होत होत तीत तुणतुणं, डफ, झांज, हार्मोनिअम, तबला इत्यादी देशी वाद्यांची भर पडली तरी ढोलकी मात्र कायम राहिली. घुंगरांची छमछम लावणीला नेहमीच पूरक असते.

मराठी चित्रपटात तमाशा पहिल्यांदा अवतरला तो १९४७ मध्ये. ‘राजकमल कलामंदिर’चा ‘लोकशाहीर राम जोशी’ हा तो चित्रपट. गदिमा म्हणजेच ग. दि. माडगूळकर यांनी त्यात लावण्या लिहिल्या होत्या. अशा रीतीनं बोर्डावरची लावणी सिनेमाच्या पडद्यावर आली. मराठी चित्रपटात लावणीचं आणि तमाशाचं युग सुरू झालं.

हा सांस्कृतिक बदल मोठा होता; कारण, त्याआधी चित्रपटांचे विषय ऐतिहासिक किंवा पौराणिक असायचे. ‘सांगत्ये ऐका’ हा चित्रपट आला सन १९५९ मध्ये. त्यातल्या लावण्या चांगल्याच गाजू लागल्या. लावण्यांच्या प्रसिद्धीमुळे या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. प्रस्तुत लावणी ही त्याच चित्रपटातली आहे :

‘बुगडी माझी सांडली गं...’

माझ्या शेजारी तरूण राहतो

टकमक टकमक मला तो पाहतो

कधी खुणेने जवळ बाहतो

कधी नाही ती भुलले गं बाई

त्याच्या इशाऱ्याला, त्याच्या इशाऱ्याला

शेजारचा तो रुबाबदार तरुण माझ्याकडं रोज टकमक पाहत असतो. एके दिवशी बाबा घरी नसल्याचं हेरून तो चक्क घरात आला. त्याला बसायला मी पाट दिला. त्याचं स्वागत केलं. त्यानं चांगलीच धिटाई दाखवली. नंतर एके दिवशी तो दोन खिलाऱ्या बैलांची गाडी घेऊन कसा आला...पिवळी साडी लेऊन मीपण गाडीत कशी बसले... आम्ही साताऱ्याच्या बाजाराला कसे गेलो...आणि परत येताना कानातली बुगडी कुठं तरी गळून पडल्याचं लक्षात आलं.. आता बाबा विचारतील की ‘बुगडी कुठाय’, तर म्हाताऱ्याला मी काय उत्तर देऊ...? अशी प्रेमाची एक मजेदार कहाणी गदिमांनी या फक्कड लावणीतून पेश केली आहे.

आज अचानक घरी तो आला

पैरण-फेटा न् पाठीस शेमला

फार गोड तो मजसी गमला

दिला बसाया पाट मी बाई

त्याला शेजाऱ्याला, माझ्या शेजाऱ्याला

सातारा, सांगली, कोल्हापूर अशा पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामीण मराठी बोलीभाषेचं सौंदर्य माडगूळकरांच्या या गीतात दिसतं. बुगडी हा कानात घालायचा एक लोंबता दागिना आहे. पैरण म्हणजे आहे. शेमला म्हणजे फेट्याचा पाठीवर रुळणारा शेवटचा भाग. गदिमा स्वत: त्याच भागातले. साहजिकच तिथली भाषा त्यांच्या लेखनात येते.

येण्याआधी बाबा परतुन

पोचणार मी घरात जाउन

मग पुसतिल का ना पाहुन

काय तेव्हा सांगू मी गं बाई

त्या बिचाऱ्याला, त्या बिचाऱ्याला

ग्रामीण तरुणीच्या चोरट्या प्रेमाची कथा ऐकवत, ते प्रेम कसं उघडकीला येईल, हे सांगताना गदिमांनी अगदी गद्य वाटावी अशा सोप्या शब्दांत रचलेली कहाणी आणि त्यासाठी केलेली शब्दरचना मस्त आहे. त्या शब्दांचे आशा भोसले यांनी केलेले उच्चार मोठे ठसकेबाज आहेत. दर दोन शब्दांनंतर एक लहानसा पॅाझ घेत घेत गायल्या आहेत त्या.

तशा गायकीनं गाण्याला एक विशिष्ट ताल किंवा ठेका आल्यानं ते अधिक श्रवणीय वाटतं. उदाहरणार्थ : बुगडी माझी - सांडली गं - जाता साताऱ्याला - गं जाता साताऱ्याला. इथं प्रत्येक दोन शब्दांनंतर पॅाझ आहे. या पंक्तीतल्या प्रत्येक शब्दाच्या उच्चाराची ढब नीट ऐका. त्यातली गंमत कळेल. ‘चुगली नका सांगू गं.. ’ यातल्या ‘गं.. ’ या शब्दाच्या उच्चारात लावणीतली गंमत आहे.

या ठसकेबाज लावणीचे संगीतकार होते वसंत पवार. त्यांना ‘लावणीसम्राट’ म्हणायला हरकत नाही. तरीही या गाण्याला मुखडा कसा असावा ते त्यांना सुचत नव्हतं. तेव्हा, त्यांचे सहायक असलेले राम कदम यांनी मुखड्याची चाल तयार केली आणि वसंतरावांनी पुढचं गाणं पूर्ण केलं. कमीत कमी वाद्यांत त्यांनी छान ठेका पकडला आहे.

‘चुगली नका सांगू गं, कुणी माझ्या म्हाताऱ्याला’ ही ओळ रिपिट करताना त्यात ‘चुगली नका सांगू गं, कुणी हिच्या म्हाताऱ्याला गं हिच्या म्हाताऱ्याला’ असा बदल करून ती पंक्ती कोरसच्या तोंडी दिल्यानं गाण्याची रंगत वाढली आहे.

आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात तमाशातलं हे लावणीनृत्य तरुण जयश्री गडकर यांनी झोकात सादर केलं आहे. चापून-चोपून नेसलेलं नऊवारी लुगडं; गळ्यात मोहनमाळ, वझटीक, कमरेवर मेखला असे अंगावर आणि चेहऱ्यावर मिरवणारे अलंकार, केसांत माळलेली फुलांची वेणी अशा साज-शृंगारात त्यांचं रूपसौंदर्य उठून दिसतं.

त्यांची नेत्रपल्लवी, सुहास्य, पदन्यास, हस्तमुद्रा, लाजून दोन्ही हात मुखकमलावर ठेवणं, मानेच्या हालचाली...असं सारं काही आकर्षक आहे. त्याला दाद द्यावीशी वाटते. मुद्राभिनय आणि देहबोली यांचा सुंदर आविष्कार त्यांनी दर्शवला आहे. खरं तर, तमाशा कसा असतो ते त्यांनी कधी पाहिलंसुद्धा नव्हते. तरीही त्यांनी अनेक तमाशापटांतून लावण्या पडद्यावर सादर केल्या.

तुणतुणं, ढोलकी वाजवणारे वादक आणि नायिकेला साथ देणाऱ्या नृत्यांगना यांनी मस्त कामगिरी केली आहे. कोल्हापुरी फेटा बांधलेला सूर्यकांत हा मराठीतला त्या काळचा तगडा नायक लावणी ऐकत श्रोत्यांत-प्रेक्षकांत बसलेला दिसतो. ही लावणी जणू त्याच्याचसाठी असावी असं एकूण वातावरण गाण्यात आहे. दिग्दर्शक अनंत माने यांची करामत म्हणजे ही लोकप्रिय लावणी.

फक्कड लावण्यांमुळे महाराष्ट्रात सर्वत्र प्रचंड यश ‘सांगत्ये ऐका’ला मिळालं. पुण्याच्या आर्यन सिनेमागृहात ‘सांगत्ये ऐका’ तब्बल १२५ आठवडे मुक्काम ठोकून होता! त्याचा परिणाम म्हणून साठच्या दशकात तमाशापटांची मोठी लाट मराठी चित्रसृष्टीत आली होती. याच चित्रपटातल्या आणखी एक अभिनेत्री हंसा वाडकर यांनी आत्मचरित्र लिहिलं व त्या पुस्तकाला त्यांनी नाव दिलं ‘सांगत्ये ऐका’.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com