

Maharashtra Premier League History
esakal
गमतीची गोष्ट अशी, की स्पष्ट दिसणारे नुकसान होत असतानाही कोणी संघमालक उघड नाराजी प्रकट करत नाही. सगळे नुसतेच, फक्त मी एकटाच बैठकीत बोलतो, असे म्हणतात. तीन वर्ष स्पर्धा धूमधडाक्यात भरवली गेली. ताम-झाम खूप होता पण त्यात क्रिकेटचा आत्मा शोधावा लागत होता.
ज्या टी-२० क्रिकेटला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अगदी सुरुवातीला जास्त भाव दिला नाही, तेच टी-२० क्रिकेट मागून येऊन पुढे गेले आहे. २००८ साली आयपीएल चालू झाले आणि पहिल्याच मोसमाने लोकांना भुरळ पाडली. लगेच राज्य क्रिकेट संघटनांच्या मनात स्थानिक पातळीवर टी-२० लीग चालू करायचे विचार घोळायला लागले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने सर्वांत पहिली उचल खाताना लगेच महाराष्ट्र प्रीमिअर लीग चालू केली. एमसीएचे स्वत:चे मैदान नसल्याचा फायदा पहिल्या एमपीएलला झाला. सामने पीवायसी, पूना क्लब आणि डेक्कन जिमखाना मैदानावर झाले. अंतिम सामना बघायला डेक्कन जिमखाना मैदानावर क्रिकेट रसिक प्रेक्षकांनी खच्चून गर्दी केली. विजयी फटका मारल्यावर प्रेक्षक मैदानात खेळाडूंना भेटायला घुसल्याचे दृश्य माझ्या डोळ्यासमोर रेंगाळते आहे. संघमालकांना आर्थिक फायदा झाला नसला, तरी पहिल्या एमपीएल मोसमाने संघमालकांना भरपूर समाधान दिले आणि मी संघमालक होतो, हा मिरवण्याचा आनंद दिला. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने उत्तम नियोजन स्पर्धेचे करताना खर्चही अवास्तव केला नाही.