महाराष्ट्रात ‘पाणीबाणी’चं संकट

उन्हाळ्याचा पहिला महिना असलेल्या मार्चपासूनच राज्यात सूर्य आग ओकू लागला आहे. यामुळं राज्यातल्या नद्या-नाले, ओढे व विहिरी कोरड्या पडत आहेत. भूजल पातळी आणखी खोल गेली आहे. यामुळं विंधनविहिरींची क्षमता संपली आहे.
maharashtra water crisis due to less rainfall summer heat
maharashtra water crisis due to less rainfall summer heat Sakal

उन्हाळ्याचा पहिला महिना असलेल्या मार्चपासूनच राज्यात सूर्य आग ओकू लागला आहे. यामुळं राज्यातल्या नद्या-नाले, ओढे व विहिरी कोरड्या पडत आहेत. भूजल पातळी आणखी खोल गेली आहे. यामुळं विंधनविहिरींची क्षमता संपली आहे. धरणांनी तळ गाठला असून यापैकी काही कोरडी ठणठणीत झाली आहेत. यामुळं राज्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यातून महाराष्ट्रात पाणीबाणी निर्माण झाल्याचं चित्र आतापासूनच पाहावयास मिळू लागलं आहे.

मुळात गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात पाऊस कमी झाल्यानं यंदा उन्हाळ्याच्या आधीपासून म्हणजेच मागील पावसाळ्याच्या शेवटापासूनच काही गावं आणि वाड्या-वस्त्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील प्रगत जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील काही गावांना सलग बारा महिने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जसजशी उन्हाची तीव्रता वाढत आहे, तसतशा राज्यातील पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. परिणामी आजघडीला राज्यातील सुमारे दोन हजारांहून अधिक गावं आणि वाड्या-वस्त्यांना एक हजार ५५३ टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे.

गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात आजच्या तारखेला राज्यातील केवळ ३० गावं ७७ वाड्यांना फक्त ३० टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. जसजसा उन्हाचा चटका वाढू लागला आहे, तसतशी पाण्याची टंचाई अधिक तीव्र होऊ लागली आहे. शिवाय अद्याप कडक उन्हाळा समजले जाणारे एप्रिल आणि मे हे दोन महिने बाकी आहेत. सध्याच्या पाणीटंचाईचं रूप एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत अधिक उग्र रूप धारण करणारे आहे.

त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात टॅंकरची संख्या ही चार ते पाच हजारांच्या घरात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमधील ४० तालुक्यांमध्ये गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात खूपच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळं राज्य सरकारनं हे सर्व तालुके अवर्षणप्रवण तालुके म्हणून जाहीर केले आहेत. या यापैकी २४ तालुक्यांमध्ये गंभीर, तर अन्य १४ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मुळातच या तालुक्यांमध्ये पाऊस कमी झाल्यानं, तेथील भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या नंदुरबार (जिल्हा नंदुरबार), चाळीसगाव ( जिल्हा जळगाव), भोकरदन, जालना, बदनापूर,

अंबड, मंठा (सर्व जिल्हा जालना), छत्रपती संभाजीनगर (जिल्हा छत्रपती संभाजीनगर), सोयगाव, मालेगाव, सिन्नर, येवला (सर्व जिल्हा नाशिक), बारामती, पुरंदर (दोन्ही जिल्हा पुणे), वडवणी, धारूर, अंबाजोगाई (सर्व जिल्हा बीड), रेणापूर (जिल्हा लातूर), वाशी, धाराशिव, लोहारा (सर्व जिल्हा धाराशिव) आणि बार्शी, माळशिरस, सांगोला (सर्व जिल्हा सोलापूर) आदी तालुक्यांचा समावेश आहे.

याशिवाय महाराष्ट्रातील १४ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यांमधील पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले आहे. यामध्ये सिंदखेडा (जिल्हा धुळे), बुलडाणा, लोणार (जिल्हा बुलडाणा), शिरूर, दौंड, इंदापूर (जिल्हा पुणे), करमाळा, माढा (जिल्हा सोलापूर), वाई, खंडाळा (जिल्हा सातारा), हातकणंगले,गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) आणि शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा आणि मिरज (जिल्हा सांगली) यांचा समावेश आहे.

चार जिल्ह्यांना सर्वाधिक झळ

राज्यात पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर (पूर्वाश्रमीचे औरंगाबाद) आणि कोकण हे महसूल विभाग आहेत. या सर्व विभागांमध्ये मिळून मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून एकूण ३३ जिल्हे आहेत. पाणीटंचाईची सर्वाधिक झळ या ३३ पैकी छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक आणि सातारा या चार जिल्ह्यांतील गावांना बसली आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक टॅंकर

यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची सर्वाधिक झळ मराठवाड्याला बसली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव (पूर्वाश्रमीचे उस्मानाबाद), लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या आठ जिल्ह्यांमधील एकूण ४९७ गावं आणि १५० वाड्या-वस्त्यांना ७६३ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

या आठपैकी नांदेड जिल्ह्याचा अपवाद वगळता उर्वरित सातपैकी छत्रपती संभाजीनगर व जालना या दोन जिल्ह्यांना सर्वाधिक पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर या एकाच जिल्ह्यात तब्बल ३८५ टँकर सुरू आहेत‌.

याशिवाय बीड जिल्ह्यात ९३ आणि धाराशिव जिल्ह्यात ४२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर विभागापाठोपाठ पुणे विभागात सध्या ३१३, नाशिक विभागात २९१, अमरावती ५९ आणि कोकण विभागात तीन टँकर सुरू आहेत. मात्र नागपूर विभागात अद्याप टँकर सुरू झालेला नाही.

तापमान वाढले प्रचंड

महाराष्ट्रातील तापमान दिवसेंदिवस वाढू लागले आहे. सध्या राज्यातील अनेक शहरांमधील तापमान हे ४० अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचलं आहे तर, अन्य दहा जिल्ह्यांतील तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. या दहा जिल्ह्यांमध्ये पुणे, जळगाव, सातारा, सोलापूर, मुंबई, परभणी, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.

पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील मिळून एकूण २६३ गावं आणि १ हजार ५३६ वाड्या-वस्त्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही सर्व गावं आणि वाड्या-वस्त्यांना ३१३ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. विभागातील सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक १४६ टँकर सुरू आहेत. साताऱ्यापाठोपाठ सांगली जिल्ह्यात ७५, पुणे जिल्ह्यात ६४ आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये २८ टँकर सुरू आहेत.

महाराष्ट्रात लघु, मध्यम आणि मोठ्यास्वरूपाची मिळून एकूण दोन हजार ९९४ धरणं आहेत. या सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत सध्या केवळ ४० टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला उपलब्ध पाण्याचं हेच प्रमाण ५५.८५ टक्के इतकं होतं.

यावरून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा हा १५.८५ टक्क्यांनी कमी झाला आहे. या धरणांमधील पाणीसाठ्याची मागील दहा वर्षांची दरवर्षीची सरासरी पाहता, या धरणांमध्ये सरासरी ४९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहत असे. यंदा मात्र या सरासरीच्या तुलनेतही नऊ टक्क्यांनी उपलब्ध पाणीसाठा कमी झाला आहे.

भूजल पातळीत मोठी घट

मागील वर्षीच्या पावसाळ्यात पाऊस कमी झाल्यानं, भूजल पातळीतही मोठी घट झाली आहे. राज्यातील सरासरी पातळी १.०१ मीटरनं खोल किंवा खाली गेली आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात २.५७ मीटर,

जामखेड तालुक्यात १.८२, मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात १.९१ मीटर, विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात १.०९ मीटर, लोणार तालुक्यात २.५१ मीटर, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात १.१६ मीटर, मुळशी तालुक्यात १.५७ मीटर, वेल्हे तालुक्यात १.२८ मीटर आणि खंडाळा तालुक्यात १.९८ मीटरने भूजल पातळी खोल गेली आहे.

जनावरांचे भाव पडले

पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका हा माणसांपेक्षा गुरांना जास्त बसत असतो‌. कारण पाणीटंचाईमुळे हिरवा चारा तर सोडाच, पण साधा चारा मिळत नाही. शिवाय टॅंकरद्वारे दिलं जाणारं पाणी हे केवळ माणसांपुरतंच उपलब्ध होत असतं.

त्यामुळं गुरांचे पाण्यावाचूनही हाल होतात. शिवाय चारा-पाण्याअभावी भाकड जनावरांचं प्रमाण वाढतं. यामुळं पाणीटंचाईच्या काळात गुरांची विक्री करण्याचं प्रमाण वाढतं. यानुसार यंदाही गुरांची विक्री करण्याचं प्रमाण वाढलं आहे. पण सगळीकडंच दुष्काळी स्थिती असल्यानं खरेदी करणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी झाली आहे.

परिणामी पुरवठ्यात वाढ आणि मागणीत घट झाल्यानं गुरांचे भाव पडले आहेत. राज्यातील एकंदरीत पाणीटंचाई स्थितीचं सध्याचं स्वरूप पाहता, यंदा आणखी भीषण टंचाईला सामोरं जावं लागणार आहे, हे स्पष्ट झालं आहे. परिणामी राज्याची वाटचाल बंगळुरुच्या दिशेनं सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. याचा सामना करण्यासाठी तुम्हा-आम्हा सर्वांना सज्ज राहण्याबरोबरच पाण्याचा काटकसरीनं वापर करावा लागणार आहे, हे मात्र निश्चित.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com