esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

प्रज्ञावंतांच्या हुकुमशाहीतले बंदिस्त गांधी

प्रज्ञावंतांच्या हुकुमशाहीतले बंदिस्त गांधी

sakal_logo
By
- राहुल गडपाले

गांधी जयंतीला सरकारी कार्यालयातील गांधींच्या तसबिरी साफ होतात. पुतळे स्वच्छ होतात; मात्र अपूर्ण आणि अर्धवट प्रज्ञावंतांच्या हुकुमशाहीच्या बेड्यांमध्ये अडकलेले गांधी आणखी बंदिस्त होत जातात. हल्लीच्या समाजमाध्यमांच्या विद्यापीठात तर गांधींची रोज रॅगिंग होते. त्यांना रोज एका नव्या सत्याचा सामना करावा लागतो. त्याचे परिणाम भोगावे लागतात. गांधींच्या अंतर्विरोधी असण्याच्या बतावण्या करणारे रोज गांधींवर टीका करतात. जगासमोर मात्र गांधीनामाचे गोडवे गातात. गांधी त्यांना रुचतही नाही आणि पचतही नाहीत; पण गांधी हे रिफाईंड पॉलिटिकल टूल आहे आणि त्याशिवाय जगाला भारताचा दुसरा ब्रँड माहीत नाही.

हल्ली समाजाचा चेहरा पाहण्याचा नवा आरसा आपल्याला सापडलाय. समाजमाध्यम असे त्या आरशाचे नाव. या समाजमाध्यमाच्या ज्ञानगोलात कायम बुद्धीचे प्रदर्शन भरते. अवघा समाज जणू काळ्याकुट्ट अंधारात गुडूप झालेला आहे. त्या समाजाला आशेचा किरण दाखवायचा असेल तर आपल्याच प्रतिभा उजळवून जगाला कसे प्रकाशझोतात आणता येईल, अशा आत्मप्रेरणेचे अनेक प्रकाशदीप लावले जातात. विचार मांडण्यापेक्षाही बुद्धिप्रदर्शनाच्या हेतूने मांडलेले प्रकाशतारकांचे दिवटे इतर दिव्यांच्या प्रकाशात काहीसे लुकलुकतात आणि लुप्त होतात. वाईट याच गोष्टीचे वाटते की, या प्रज्ञेच्या हवनकुंडात बरे आणि वाईट दोघांचीही राखच होते. या राखेतून अविचाराचा भेसूर राक्षसी धूर उठतो. त्या धुरातून समाजाच्या अध:पतनाला कारणीभूत ठरणारी स्वार्थी जळमटे तयार होतात. ती समाजजीवनाचा पाया पोखरायला लागतात. भारताचे राजकारण, समाजकारण आणि लोकशाहीचे स्तंभ कुठलेही असोत, त्यांचा खोलवर रुजलेला विचार, पाया गांधींचा आहे, हे विसरून चालत नाही. प्रज्ञावंतांच्या हुकुमशाहीत सर्वात जास्त राजकीय लाभ घ्यायचा तो महात्मा गांधींचाच; पण गांधी ही काही एका दिवसात समजणारी गोष्ट नाही.

प्रत्येक वेळी, प्रत्येक जण आपल्याला हवा तसा गांधीविचारांचा अर्थ काढतो. राजकारण्यांनी तर गांधींना निव्वळ पोस्टरबॉय करून ठेवले आहे; पण केवळ तैलचित्रात अडकतील किंवा विराट पोलादी प्रतिमेसमोर खुजे ठरतील, ते गांधी नव्हेत. सत्य आणि अहिंसेसारख्या आध्यात्मिक संकल्पनांना समाजाच्या गळी उतरवण्यासाठी गांधींनी केलेले काम हे जास्त महत्त्वाचे आहे. देशाला त्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले किंवा गांधींचे धोरण दुटप्पी आणि अंतर्विरोधी होते, या गोष्टी त्यामुळे दुय्यम ठरतात. भारतात जगाला दाखवण्याचा गांधी वेगळा आणि समजून घेण्याचा गांधी वेगळा आहे. जगासमोर आणला जातो तो केवळ एक पुतळा; पण जेव्हा खासगीत गांधींवर चर्चा करायची असते तेव्हा गांधीवाद अधिक प्रखर होतो. त्याची प्रखरता मग गांधी हत्येच्या मारेकऱ्यांवर स्तुतिसुमने उधळण्यापर्यंत जाते. स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार गांधी बदलत नसतो. भारताचा आणि अमेरिकेचा गांधी निराळा नसतो. यशाची हमखास गॅरंटी देणारे पॉलिटिकल टूल म्हणून गांधींचा सतत वापर होतो. तेव्हा गांधी पुन्हा पुन्हा समजून घेण्याची गरज वाटते.

अहिंसा हा शब्द भारतीयांना कधीच नवा नव्हता. गौतम बुद्ध आणि जैन धर्माने अहिंसेच्या तत्त्वाचे महत्त्व कायम अधोरेखित केले. या दोन्ही धर्मांच्या मूल्याधारित धर्मशिक्षणाचा पायाच मुळात अहिंसेच्या तत्त्वावर आधारलेला होता. भारतीयांना ही संकल्पना प्रचलित असली, तरी ती केवळ धर्मग्रंथापुरतीच मर्यादित होती. तोपर्यंत जगण्याच्या व्यवहारात अहिंसा केवळ बोलायची गोष्ट होती. गांधींमुळे अहिंसेचा विचार समाजमनात रूढ झाला. विरोधी शक्तींसोबत लढण्यासाठी शस्त्र पुरेशी ठरणार नाहीत, याची गांधींना जाणीव होती. त्याउलट अहिंसा हे असे शस्त्रे होते ज्याचा वापर अगदी कुणीही करू शकत होते. गांधींनी अहिंसेची पाळंमुळं राजकीय जीवनात रुजवल्याने केवळ अध्यात्माच्या विचारबेड्यांमध्ये अडकून पडलेले अहिंसेचे तत्त्व बंधमुक्त झाले. समाजजीवनाचा भाग झाले. रक्तपात झाल्याशिवाय, युद्धभूमीवर भांडल्याशिवाय स्वातंत्र्य मिळत नाही, असा इतिहास असताना आपल्या लढ्याचे प्रमुख शस्त्र म्हणून अहिंसेच्या तत्त्वाचा वापर करणे, हे गांधींसारखा महत्त्वाकांक्षी माणूसच करू शकत होता. होय! गांधी अत्यंत महत्त्वाकांक्षी होते. प्रत्येक चळवळीचे नेतृत्व स्वतःकडे ठेवण्यासाठी अनेक प्रसंगी त्यांनी घेतलेल्या भूमिका ते महत्त्वाकांक्षी होते, हे अधोरेखित करतात.

गांधींपासून महात्मा होईपर्यंतच्या प्रवासात गांधींना अनेकदा आपल्या भूमिका बदलाव्या लागल्या. काही कालसुसंगत नव्हत्या म्हणून, तर काही वेळा सोयीस्कररीत्या त्यांनी आपल्या भूमिका बदलल्या. अगदी युद्धाच्या बाबतीतच गांधी दरवेळी वेगळ्या भूमिकेत दिसले. १९०७ मध्ये झालेल्या झुलूच्या युद्धात त्यांनी सेवाकार्य केले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्यांनी सैनिक भरतीचे काम केले. आपल्या कमकुवत लोकांमध्ये जीव ओतायचा असेल, तर त्यांना लष्करात सहभागी करायला हवे, असे त्यांना वाटत होते. त्यांच्या या कार्याला गुजरातमधून फार प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले. वैष्णव आणि जैन धर्माने गुजरातला बरबाद करून टाकल्याची त्यांची झालेली भावनादेखील त्यांनी विनोबांकडे व्यक्त केल्याचे दाखले आहेत. १९४७ मध्ये काश्मीरचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मात्र त्यांनी नेहरूंना तिकडे सैन्य पाठविणे किती गरजेचे आहे, हे समजून सांगितले. गांधींनी घेतलेल्या या भूमिका त्या-त्या वेळच्या परिस्थितीला अनुसरून घेतल्या गेल्या; पण त्यामुळे त्यांनी अहिंसेच्या तत्त्वाशी फारकत घेतली असे होत नाही. अहिंसा म्हणजे एका गालावर मार खाल्ल्यानंतर दुसरा गाल पुढे करायचा, अशी काहीशी खुळचट समजूत भारतीय समाजमनाने करून घेतली आहे. मुळात अहिंसेचे तत्त्व अंगीकारताना आत्मरक्षणाचा नैसर्गिक हक्क गांधींनी कधीच नाकारला नाही, हे समजून घेतले पाहिजे.

आज जे सत्य आहे ते उद्यादेखील सत्य असेल, असे होत नाही. सत्य सतत बदलत असते; पण सत्याचा पाठलाग करून सत्याची सत्यता पडताळून पाहत राहणे आणि सत्यशोधनाच्या कामात सतत पुढे जात राहणे, हा मुळात मानवी स्वभाव आहे. या सत्याच्या संकल्पनेला धार्मिक आणि ईश्वरी संकल्पनेतून मुक्त करून गांधींनी भारतीय समाजावर फार मोठे उपकार केले आहेत. सुरुवातीला मांडलेल्या सत्याच्या संकल्पनेत ईश्वरालाच सत्याचे रूप मानण्यात आले होते. मात्र कालांतराने गांधींनी त्याच्या अगदी विरोधी भूमिका घेत सत्य हेच ईश्वर असल्याची मांडणी केली. त्यामुळे सत्याची प्रतिष्ठा वाढली आणि ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल असलेल्या शंकेलादेखील जागा उरली नाही. भारतीय समाजमनाचा कानोसा घेत गांधींनी बदललेल्या काही भूमिका अनेकदा सामाजिक स्वास्थ्याला पोषक ठरल्या आहेत. मुळात ईश्वरावर इतकी गाढ श्रद्धा असणारा गांधींसारखा माणूस अशी भूमिका घेतो, यावर विश्वास बसत नाही; पण गांधी हे एक पारंगत राजकीय रसायन होते.

समाजमनाचा पोत जाणून घेऊन त्यात आवश्यक बदल केल्याने घडणारे परिणाम त्यांना ठावूक होते. म्हणूनच दगडधोंड्यांमध्ये देव शोधणाऱ्या भारतीयांना, सत्य ही ईश्वर है, सांगून त्यांनी सत्याच्या अधिक जवळ नेले. तत्त्वज्ञानाच्या अखत्यारीतील अध्यात्माची कास गांधींनी धरली होती. तुरुंगातील मौनकाळात त्यांनी अध्यात्माच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे हल्ली अध्यात्माला धर्माच्या बेड्यांत अडकवण्याचे काम सुरू आहे. मात्र गांधींचा अध्यात्माचा प्रवास त्या तुलनेत बराच पुढारलेला होता, असे मानायला हरकत नाही. गांधीजींच्या हातून झालेल्या अनेक चुका त्यांनी नंतरच्या काळात दुरुस्त केल्या. ज्या दुरुस्त होत नव्हत्या, त्या किमान त्यांनी त्यांच्या जीवनचरित्रात मान्य तरी निश्चितच केल्या आहेत. लोकांनी महात्मा ठरवलेल्या व्यक्तीचा प्रवास नंतर त्याला देवत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करतो. त्याने तो झिडकारला तरी समाज त्याला भरकटवण्याचा प्रयत्न करीत असतो. गांधींनी मात्र स्वतःचे विवेचन इतक्या स्पष्टपणे मांडले, की त्यामुळे गांधींबद्दल मतप्रवाह तयार झाले; पण त्यांना बहुधा त्याची चिंता नसावी म्हणूनच ते स्वत:ला देवत्वाच्या पायऱ्यांवर चढण्यापासून वाचवू शकले. तत्त्वांशी कालसुसंगत तडजोड, आवश्यकता असेल तेथे लवचिक राजकीय भूमिका आणि अध्यात्मातून परममोक्षाच्या अपेक्षेने गांधींचे जीवन भारलेले होते.

कुठली तरी दैवी शक्ती असते. आपण केवळ निमित्तमात्र असतो. त्या एका शक्तीच्या प्रेरणेने जगात सर्व गोष्टी घडतात, यावर गांधीजींची श्रद्धा होती. देशद्रोहाच्या खटल्यातून त्यांची सुटका झाल्यानंतर तर ते आणखीनच अध्यात्माकडे वळले होते. त्यानंतरच्या काळात बराच काळ त्यांनी मौन पाळले. गांधी चरित्र अनेकांनी लिहिली-वाचली असतील. त्यांचा अभ्यास केला असेल; मात्र गांधी जवळून अभ्यासल्यानंतर त्यांच्यातली एक गोष्ट तुम्हाला नक्की भावते, ती म्हणजे नकळत्या वयात झालेल्या अनेक चुकांची गांधींनी आपल्या लिखाणामधून स्वत: कबुली दिली आहे. बऱ्याच लहान वयात त्यांचा कस्तुरबा यांच्याशी विवाह झाला होता. त्यानंतर त्यांनी पत्नीला दिलेल्या चुकीच्या वागणुकीची कबुलीदेखील दिली आहे. ज्या सत्याला ईश्वर माना, असे गांधी सांगतात, त्या सत्याचा सामना करण्याची धिटाई त्यांनी दाखवली. कामवासनेसंदर्भातही ते स्पष्टपणे बोलले. ‘गांधी : नेकेड अॅम्बिशन’ या पुस्तकात ब्रिटिश लेखक जॅड अॅडमने गांधींच्या व्यक्तिमत्त्वाच्या या निराळ्या पैलूंचे फार उत्कृष्ट वर्णन केले आहे. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात गांधींचा वैश्विक संत होण्याचा प्रवास सुरू झाला. रेव्ह डोक याने गांधींचे पहिले चरित्र लिहिले. महायुद्धातल्या मनुष्य आणि वित्तहानीने झालेल्या वैफल्यग्रस्त जगाला अहिंसेचे महत्त्व गांधींच्या रूपाने अधोरेखित व्हायला लागले. जागतिक पातळीवर गांधींची ख्याती पोहोचवली ती रोमॉं रोलॉं यांनी. त्यांच्यामुळे भारत आणि ब्रिटिशांव्यतिरिक्त जगाला गांधींची खऱ्या अर्थाने ओळख व्हायला लागली.

गांधी समजून घ्यायचे असतील, तर ती साधी गोष्ट नाही. जगभरात गांधी विचारांना वाहून घेतलेले आणि त्यावर संशोधन करणारे अनेक लेखक, विचारवंत आहेत. त्यांनाही गांधी कधी शब्दांमध्ये नेमके बंदिस्त करून सांगता येतील, असे वाटत नाही. स्वत: गांधींनी केलेल्या लिखाणात त्यांनी स्वत:ला पुस्तकासारखेच उलगडून समोर ठेवले आहे. ते वाचताना लोक भ्रमित होतात आणि गांधींबद्दलचे बरेवाईट मतप्रवाह तयार होतात. गांधी जयंतीला सरकारी कार्यालयातील गांधींच्या तसबिरी साफ होतात. कबुतरांनी घाण केलेले पुतळे स्वच्छ होतात; मात्र अपूर्ण आणि अर्धवट प्रज्ञावंतांच्या हुकूमशाहीच्या बेड्यांमध्ये अडकलेले गांधी आणखी बंदिस्त होत जातात. हल्लीच्या समाजमाध्यमांच्या विद्यापीठात तर गांधींचे रोज रॅगिंग होते. त्यांना रोज एका नव्या सत्याचा सामना करावा लागतो. त्याचे परिणाम भोगावे लागतात. गांधींच्या अंतर्विरोधी असण्याच्या बतावण्या करणारे रोज गांधींवर टीका करतात. जगासमोर मात्र गांधीनामाचे गोडवे गातात. गांधी त्यांना रुचतही नाही आणि पचतही नाहीत; पण गांधी हे रिफाईंड पॉलिटिकल टूल आहे आणि त्याशिवाय जगाला भारताचा दुसरा ब्रँड माहीत नाही. त्यामुळे गांधी हवेतच... असतील तसे.

rahulgadpale@gmail.com

loading image
go to top