esakal | जगभरात गांधीप्रभाव गांधीविचारात ‘भाईचारा’
sakal

बोलून बातमी शोधा

जगभरात गांधीप्रभाव गांधीविचारात ‘भाईचारा’

जगभरात गांधीप्रभाव गांधीविचारात ‘भाईचारा’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महात्मा गांधी यांची हत्या झाली, त्या दिवशी जगप्रसिद्ध पाकिस्तानी कवी फैज अहमद फैज खूप अस्वस्थ होते. त्यांनी पाकिस्तान टाइम्समध्ये गांधीजींवर विषेश संपादकीय लिहिले. त्या वेळी त्यांचे हात थरथरत होते. नेमके त्या वेळी काश्मीरवरून भारत-पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव होता. युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीत फैज अहमद यांनी गांधीजींच्या अंत्ययात्रेला हजर राहण्याचा निर्णय घेतला. यातून फैज अहमद फैज यांची गांधीजींबद्दलची वैयक्तिक आस्था आणि पाकिस्तानच्या भावना, त्यांचा संदेश सीमेपलीकडे पोहोचवण्याची त्यांची धडपड दिसून येते.

फैज सांगायचे, फाळणीदरम्यान महात्मा गांधींनी त्यांचे कर्तव्य निभावलं; मात्र लोक आपले कर्तव्य विसरले. १९४७ सारख्या एका मोठ्या घटनेवर फैज साहेबांनी केवळ एक कविता लिहिली. एवढी मोठी घटना केवळ एका कवितेत कशी सामावू शकते, हा प्रश्न मला नेहमी पडायचा. त्यामुळे मी त्यांना एकदा विचारलं, की तुम्ही एकच कविता का लिहिली. फैज साहेब शांत झाले, त्यांच्या तोडून एकच शब्द बाहेर पडला. we couldn’t cope. एका शब्दात त्यांनी फाळणीचे दु:ख व्यक्त केलं.

फाळणी अनिवार्य होती. त्यामुळे गांधीजी अखेर त्यासाठी तयार झाले; मात्र गांधीजी म्हणायचे ठीक आहे. आपण वेगळे होऊयात; मात्र आपल्यातला भाईचारा टिकला पाहिजे. दोन देशांच्या नकाशावर लाईन खेचल्यात, हृदयावर नाही, असा गाधींचा विचार होता, असे फैज सांगायचे.

या परिस्थितीत गांधीजी एक मोठे माणूस म्हणून आठवतात. कारण त्यांनी आयुष्यभर लोकांमध्ये सद्‌भाव, बंधुभाव, मैत्री कायम राखण्यासाठी प्रयत्न केले. आजच्या वातावरणात द्वेष पसरला आहे. सर्वत्र अराजकतेचे वातावरण आहे. आपण माणूस असल्याचा विसरही लोकांना पडला आहे. अशा वेळी गांधीजींची खूप आठवण येते. धार्मिक दंगली थांबवायला गांधीजी सामोरे जायचे. दंगली थांबल्या नाहीत, तर ते अन्नत्याग करायचे. शाततेसाठी, लोकांसाठी आपला जीव धोक्यात घालणारा तो वेगळा माणूस होता. त्यामुळे आता हे युद्ध, द्वेष थांबवला पाहिजे. माणूस परग्रहावर जाऊन पोहोचला; मात्र आपण आपले छोटे-छोटे तंटे, नाराजी घेऊन बसलो आहोत.

(लेखिका जगप्रसिद्ध पाकिस्तानी कवी, लेखक फैज अहमद फैज यांची मुलगी असून त्या फाईन आर्टच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या नॅशनल कॉलेज ऑफ आर्ट, लाहोरच्या प्रोफेसर आहेत.)

अमेरिकेतून पूनम शर्मा

गांधी ते महात्मा...

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जंयतीनिमित्त बोलताना अमेरिकन काँग्रेसच्या सभापती नॅन्सी पेलोसी म्हणाल्या, ‘‘महात्मा गांधी यांनी जगभराप्रमाणे अमेरिकेतही खूप बदल घडवले. त्यांनी दिलेल्या प्रेरणेसाठी अमेरिका कायम महात्मा गांधींचा ऋणी राहील. गांधीजींनी मशाल मार्टिन ल्यूथर किंग यांच्याकडे सोपवली, ती मशाल तेवत राहील, ही सर्वांची जबाबदारी आहे. गांधीजींच्या जन्मानंतर १५० वर्षे, मार्टिन ल्यूथर किंग यांच्या जन्माच्या ९० वर्षांनंतर आजही जगभरात समानता, मानवी अधिकारासाठी सुरू असलेल्या चळवळीला पाठिंबा देण्याची गरज आहे. या तरुणांना महात्मा गांधी, मार्टिन ल्यूथर किंग यांचा वारसा पुढे नेण्याइतपत सक्षम करूयात.’’

महात्मा गांधी त्यांच्या हयातीत कधीच अमेरिकेत गेले नाहीत; मात्र त्यांचे विचार अमेरिकेत पोहोचले. नागरी असहकार चळवळीची प्रेरणा त्यांना एका अमेरिकन लेखकाकडून मिळाली. दक्षिण आफ्रिकेत कारागृहात असताना गांधींनी अमेरिकन लेखक हेन्पी डेव्हिड थोरयू यांचा नागरी असहकारावरचा निबंध वाचला. त्या दिवशी गांधीरूपी मशालीने पेट घेतला होता. महात्मा गांधींनी तो विचार प्रत्यक्ष आंदोलनात परावर्तित केला. याच चळवळीने डॉ. मार्टिन ल्यूथर किंग यांना प्रेरित केले.

किंग यांचे अमेरिकेतील नागरी हक्क आंदोलन हे गांधीजींच्या अहिंसा, सत्याग्रहाच्या तत्त्वज्ञानावर आधारलेले होते. १९५९ मध्ये मार्टिन ल्यूथर किंग, त्यांच्या पत्नी आणि सहकाऱ्यासोबत भारतात आले. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘सत्याग्रहाच्या ताकतीवर भारत ब्रिटिशाच्या जोखडातून स्वतंत्र झाला. गांधीजींच्या अहिंसक पद्धतीने घडवलेल्या सामाजिक बदलाच्या तत्त्वांना आमच्या चळवळीला दिशा दिली.’’

मात्र अलिकडे अमेरिकेत झालेल्या ब्लॅक लाईव मॅटर आंदोलनादरम्यान गांधीजींच्या सुरुवातीच्या आयुष्यात केलेल्या काही वांशिक विधानावरून राळ उठवली गेली. वाशिंग्टन, कॅलिफोर्निया इथल्या बापूंच्या पुतळ्याची विटबंना करण्याचा प्रयत्न झाला. काही अपवाद वगळले, तर अमेरिकेच्या जनमानसावर गांधीजींच्या विचारांचा पगडा कायम आहे.

(लेखिका ज्येष्ठ पत्रकार असून, त्या इंडिया-अमेरिका टुडेच्या कार्यकारी संपादक आहेत.)

युरोपमधून मालिनी नायर

युरोपात गांधी तत्त्वज्ञान

हेगमधील एका रस्त्याला महात्मा गांधींचे नाव देण्यात आले आहे. योगायोगाने याच शहरात जगभरातील मानवाधिकाराचे रक्षण करणारे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायालय आहे, हा निव्वळ योगायोग असला, तरी तो सर्वार्थाने चांगला संदेश देतो.

संपूर्ण युरोपभर गांधीजींचे पुतळे आहेत. अनेक रस्त्यांना त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर स्टॅम्प निघालेत. बापू जयंतीला तिथले भारतीय लोक मोठ्या उत्साहाने एकत्र येतात. नेदरलँडमध्ये शासकीय अधिकारी, भारतीय डिप्लोमॅट आणि तिथले भारतीय संयुक्त रीतीने गांधी जयंती साजरी करतात. कोरोनाचे सावट असताना ऑनलाईन पद्धतीने गांधी जयंती त्याच उत्साहात साजरी झाली. आधुनिक युगात त्यांची मूल्ये आणि तत्त्वज्ञान जिवंत असल्याचा हा पुरावा आहे.

१९३१ मध्ये गांधीजींनी पहिल्यांदा पॅरिसचा दौरा केला. युरोपियन प्रसारमाध्यमांनी १९३० सालच्या त्यांच्या मिठाच्या सत्याग्रहाला ठळक प्रसिद्धी दिली होती; तर १९३२ मध्ये टाइम्स मॅगझीनने गांधीजींना ‘मॅन ऑफ द इयर’ म्हणून अंकात स्थान दिले. युरोपच्या दौऱ्यावर असताना हजारो लोक त्यांना भेटण्यासाठी, ऐकण्यासाठी जमले होते. ब्रिटिशांविरोधातील भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी युरोपियन जनमताचा पाठिंबा मिळावा, हा हेतू त्या दौऱ्यामागे होता. तो बऱ्यापैकी यशस्वी झाला.

गेल्या कित्येक वर्षांपासून जागतिक नेते गांधीजींच्या अंहिसेच्या तत्त्वांचा पुरस्कार करताना दिसतात. अँजेला मर्केल यांनीही २०२० मध्ये गांधी पुतळ्याचे अनावरण केले. त्यांची ब्रेक्झिटची शांत, संयमी हाताळणी गांधी विचाराला अनुसरून होती, असे म्हटले जाते.

गांधीजींचे मित्र, नोबेल पारितोषिकप्राप्त फ्रेंच तत्त्वज्ञ रोमेन रोलँड यांनी गांधीजींना भारतीय येशू ख्रिस्त असल्याचे म्हटले. गांधी केवळ भारतीय नव्हे, तर प्रत्येक युगात त्यांचे विचार जपले जातील. पश्चिमेकडील लोक ख्रिस्ताचा संदेश विसरले होते. गांधीजींच्या विचाराने ते विचार पुनर्प्रस्थापित झाले. युरोपसाठी ते ख्रिस्त फेरआगमनासारखे होते. अनेकांसाठी ते स्वतंत्र विचारवंत, जीन-जॅक्स रॉसयू आणि टॉलस्टाय यांच्या विचारांचे मिश्रण होते. सभ्यतेचे तुणतुणे वाजवणे सोडून साधेपणाकडे, निसर्गाकडे परतण्याचा संदेश गांधींनी दिला. त्याचा परिणाम मला स्वित्झरलँडच्या पर्वतरांगेतही जाणवला.

(लेखिका नेदरलँडस्थित

ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

बॅरिस्टर टू महात्मा द. आफ्रिकेतून गॅरी गोविंदसॅमी

भारताने आम्हाला बॅरिस्टर दिला. आम्ही त्यांना महात्मा म्हणून परत केले. त्यानंतर ते बापू म्हणजे भारताचे राष्ट्रपिता बनले. संपूर्ण जगाचे मोहनदास करमचंद गांधी यांच्यावर खूप प्रेम आहे. जगभरात देशातील संसद, लोकप्रतिनिधी, न्यायालये आणि प्रार्थनास्थळांच्या स्वागतालाही महात्मा गांधींचे छायाचित्र, पुतळे सज्ज असतात. दक्षिण आफ्रिका किंवा संपूर्ण आफ्रिका खंड याला अपवाद नाही.

जोहान्सबर्ग इथल्या गांधी पुतळ्याला माल्यार्पण करण्यासाठी लोक जमतात. पीटरमॅरीझबर्ग स्टेशनवर गांधींची आठवण करण्यासाठी लोक गोळा होतील. याच रेल्वे स्टेशनवरून गांधीजींना रेल्वेगाडीखाली फेकले होते.

नेल्सन मंडेला यांनी महात्मा गांधींचे तत्त्वज्ञान स्वीकारले. तेव्हा ब्रिटीश सरकारच्या अन्यायकारक कायद्याविरोधात भारतीयांना एकत्र आणण्यात गांधींनी मोलाची भूमिका बजावली. ब्रिटिशांनी ऑरेंज फ्री स्टेटमध्ये राहण्यास भारतीयांना बंदी घातली होती. त्याच्याविरोधात गांधींनी आंदोलन केले. शेकडो आंदोलनकर्त्यांसोबत गांधीजींना तुरुगांत जावे लागले. पंतप्रधान आणि गवर्नर जॅन स्मूट्स यांना या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. त्यांनी चर्चेचे आमंत्रण दिले; मात्र इतर आंदोलनकर्त्यांची सुटका होत नाही, तोपर्यंत आपण चर्चेला येणार नाहीत, असे गांधीजींनी स्पष्ट केले. शेवटी ब्रिटीश अधिकाऱ्याला झुकावे लागले. सत्याग्रहींची सुटका करावी लागली. इथून सत्याग्रहाच्या तत्त्वज्ञानाला बळ मिळाले.

दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात महात्मा गांधींना नायक म्हणून गौरविले जात असताना, प्रोफेसर अश्विन देसाई यांनी त्यांच्या पुस्तकात गांधीजींनी अप्रत्यक्षपणे ब्रिटिश राज्यकर्त्यांना पाठिंबा दिला असल्याचे सांगितले. आफ्रिकन लोकांबद्दल तिरस्कार दाखवताना त्यांनी अंग्लो-बोअर युद्धात ब्रिटिश साम्राज्याचे वाहक म्हणून काम केले. त्यांनी या युद्धात जखमींना मदत केल्याचा आरोप झाला. आफ्रिकन नागरिकांना वगळून गोऱ्यांच्या राजकीय प्रवाहात भारतीय लोकांना आणण्याचा प्रयत्न त्यांचा होता, असं देसाई सांगतात.

तरुण पिढीने गांधींना बदमान करण्यासाठी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर हल्ले करण्यासाठी याचा वापर केला. आफ्रिकेत सर्वत्र, विशेषतः कट्टरपंथी आफ्रिकन, गांधी कशासाठी, कुणासाठी लढत होते, असा प्रश्न करतात. कृष्णवर्णी आफ्रिकनचा ते द्वेष करायचे, असा त्यांचा आरोप आहे. घानात बापूंना देशद्रोही म्हटले गेले. विद्यापीठ परिसरातील त्यांचा पुतळा हटवण्यासाठी आंदोलन झाले. पुतळा हटवल्यानंतर उत्सव साजरा केला गेला. आफ्रिकेतही कट्टरपंथी विचाराच्या पक्षांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याची विंटबना केली. आफ्रिकन नागरिकांच्या उत्थानासाठी गांधीजींचे काहीच योगदान नाही. त्यांना केवळ आफ्रिकेतील भारतीयांच्या सुरक्षेततेची काळजी होती, असे त्यांचे म्हणणे आहे.

जोहान्सबर्ग शहरातील गांधी चौकाचे नामकरण करण्याची मागणी काही पक्षांनी केली. दक्षिण आफ्रिकेत अनेक भागांत गांधीविरोधातील चळवळीला बळ मिळाले आहे; मात्र जेव्हा संपूर्ण जग अहिंसेच्या प्रणेत्याला मानवंदना देण्यासाठी सज्ज आहे, त्या घडीला तत्कालीन गव्हर्नर जॅन म्यूट यांच्या वाक्याचे स्मरण होते. आठवण म्हणून गांधीजींनी त्यांना स्वत:च्या चपलेची जोडी पाठवली, त्या वेळी ते म्हणाले, ‘‘महात्मा गांधींना सांगा की एवढ्या मोठ्या माणसाची चप्पल घालून उभे राहण्याची माझी लायकी नाही.’’

(लेखक दक्षिण आफ्रिकेतील डर्बनस्थित

ज्येष्ठ पत्रकार, संपादक आहेत.)

loading image
go to top