फुले विचारांचा समग्र वेध

सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक परिवर्तनासाठी झालेल्या चळवळींवर, साहित्य आणि सांस्कृतिक व्यवहारावर फुले विचारप्रणालीचा काय प्रभाव पडला याचा शोधही त्यात घेण्यात आला.
mahatma phule social cultural literature significance
mahatma phule social cultural literature significanceSakal

- डॉ. अनिल सपकाळ

महात्मा फुले यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक परिवर्तनवादी भूमिकेतून पुढे येणाऱ्या विचारप्रणालीची सैद्धांतिक मांडणी त्यांच्यावर आधारित ‘महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य’ ग्रंथात करण्यात आली आहे. हा ग्रंथ त्यांच्या विषयीचे विचारविश्व खुले करतो. आज शनिवारी या ग्रंथाचे प्रकाशन होत आहे.

मराठी साहित्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांच्या प्रभावांची चिकित्सा करण्याच्या हेतूने ‘महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य’ या विषयावर मुंबई विद्यापीठाचा मराठी विभाग आणि फुले-आंबेडकर अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच एक चर्चासत्र घेण्यात आले. सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक परिवर्तनासाठी झालेल्या चळवळींवर,

साहित्य आणि सांस्कृतिक व्यवहारावर फुले विचारप्रणालीचा काय प्रभाव पडला याचा शोधही त्यात घेण्यात आला. चर्चासत्रात वाचल्या गेलेल्या शोधनिबंधांमध्ये काही लेखांची भर घालून ‘महात्मा फुले यांची विचारधारा आणि मराठी साहित्य’ ग्रंथ आकारास आला आहे. फुलेप्रणीत ज्ञानव्यवहारावर तो प्रकाश टाकतो.

‘महात्मा फुले यांची विचारधारा आणि मराठी साहित्य’ ग्रंथाच्या प्रकाशनाची जबाबदारी मुंबई विद्यापीठाचा मराठी विभाग आणि मुंबई लोकवाङ्मय गृहाने पार पाडली आहे. महात्मा फुले यांच्या आजपर्यंतच्या संपादित गौरव ग्रंथांमधील तो महत्त्वाचा ठरतो.

महात्मा फुले यांच्या विचारांचा वेध त्यात घेण्यात आला असून आधुनिक मराठी साहित्याच्या इतिहासाच्या संदर्भात पुनर्विचार केला गेला आहे. आजपर्यंत प्रकाशित झालेल्या फुले यांच्यावरील महत्त्वाच्या गौरव ग्रंथांमध्ये त्या त्या काळातील अभ्यासकांनी वेगवेगळ्या पैलूंचा शोध घेतला आहे. प्रस्तुत ग्रंथामध्ये अलीकडच्या अभ्यासकांनी महात्मा फुले यांच्या ग्रंथांचे पुनर्वाचन केले आहे.

ते अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रंथात केवळ सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय आणि वैचारिक चिकित्सा नसून मराठी साहित्य आणि संस्कृती व्यवहारावर असलेले फुले विचारांचे प्रभाव तपासले गेले आहेत.

समकालीन अभ्यासकांनी वेगवेगळ्या नवीन दृष्टिकोनातून केलेले पुनर्वाचन भावी पिढीसाठी पायाभूत ठरणारे आहे. फुले विचार आणि कार्यासंदर्भातील मांडणी अभ्यासकांसाठी उपयुक्त व्हावी म्हणून त्या दृष्टीने संपादित ग्रंथ तयार केला गेला आहे.

महात्मा फुले आपली कृती आणि कार्यातून आधुनिक भारतात नव्या विचारांचे जागरण करत होते. आधुनिक महाराष्ट्राच्या प्रबोधन काळात त्यांचे कार्य क्रांतिकारी होते. धर्म आणि जात भेदभावाच्या व्यवस्थेत नाकारलेल्या शूद्र-अतिशूद्र आणि स्त्रियांना सामाजिक न्याय देण्यासाठी ते कृतिशील कार्यक्रम राबवत होते.

सामाजिक पुनर्रचनेसाठी प्रयत्न करत होते. मुलींच्या शिक्षणासाठी जशी त्यांनी शाळा सुरू केली तशीच पाण्यापासून अपेक्षित असलेल्या अतिशूद्रांना आपली विहीर खुली केली. विधवा परित्यक्ता स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करणारे महात्मा फुले बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करून वरच्या जातीतील स्त्रियांना मोकळा श्वास घ्यायला आधार देत होते.

रचनात्मक कार्याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. आधुनिक काळात त्यांनी सर्वप्रथम प्रस्थापित शोषणाची ऐतिहासिक मीमांसा करून स्त्री-शूद्रांच्या मानवी अधिकारांचा पाठपुरावा केला.

आधुनिक काळाच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले यांचे विचार केवळ सुधारणावादी राहत नाही तर आमूलाग्र परिवर्तनाचे तत्त्वज्ञान म्हणून उभे राहतात. त्यातूनच त्यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी धर्मचिकित्सेची दृष्टी उभी राहते.

आपले विचार मांडण्यासाठी ते आधुनिक नाटक, गद्य लेखन, प्राचीन संवादपद्धती, पोवाडे आणि कथनांचा आविष्कार तंत्र म्हणून स्वीकार करतात. त्यांच्या लेखनातून नवे सामाजिक अवकाश उभे राहते. त्यांच्या लेखनातून चिकित्सापद्धतीचे शास्त्र निर्माण होते...

व्यवस्थेला प्रश्न विचारले जातात. महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणा आणि प्रभाव त्यांच्या समकालावर जसे होते तसेच त्यांच्या नंतरच्या काळावरील पडलेले आहेत. समाज-साहित्य-संस्कृतीतील प्रत्येक क्षेत्रावर त्यांच्या विचारांचा प्रभाव पडलेला आहे. त्याचा आढावा ग्रंथात घेण्यात आला आहे.

ग्रंथ एकंदर तीन खंडांत विभागला गेला आहे. त्यातील पहिला विभाग ‘महात्मा फुले : सांस्कृतिक चिकित्सा’ असा आहे. दुसऱ्या भागात साहित्याची चिकित्सा करण्यात आली आहे. तिसऱ्या भागात ‘महात्मा फुले यांच्या विचारांचा मराठी साहित्यावरील प्रभाव’ तपासून बघितला आहे.

ग्रंथात महात्मा फुले यांच्या समग्र साहित्यातून अभिव्यक्त झालेल्या ज्ञाननिर्मितीच्या सिद्धांतांचे विविध अवकाश महत्त्वाच्या विचारवंत, संशोधक आणि अभ्यासकांनी उलगडून दाखवले आहेत. मराठीतील अभ्यासकांनी महात्मा फुलेनिर्मित साहित्याचे पुनर्वाचन केले आहे.

संपादनातील तिसऱ्या भागात समीक्षकांनी आधुनिक मराठी साहित्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांच्या प्रभावांची चर्चा केली आहे. ती चर्चा अभ्यासविषयक नवी वाट निर्माण करण्यास उपयुक्त ठरेल. ग्रंथात महात्मा फुलेकेंद्री चिकित्सा, विश्लेषण आणि मूल्यमापन पद्धतीला उजाळा देण्यात आला आहे.

महात्मा फुले यांच्या संघर्षाचे तत्त्वज्ञान, विचारांची जडणघडण, पुरोहितशाही विरुद्ध बंड, चिकित्सा पद्धती आणि प्राकथांचा अन्वयार्थ यांच्या अनुषंगाने जनार्दन वाघमारे, श्रीनिवास हेमाडे, भारत पाटणकर, गेल ऑम्व्हेट, महेश गावस्कर, उमेश बगाडे आदींनी लेखन केले आहे.

महात्मा फुले यांची इतिहास दृष्टी आणि त्यांच्या वैचारिकतेवरील बौद्ध प्रभावाच्या अनुषंगाने अनुक्रमे नारायण भोसले व सचिन गरुड यांनी लिहिलेले आहे. दिलीप चव्हाण आणि सुप्रिया गायकवाड यांच्या लेखातून फुले यांच्या कार्यातील विवाह संस्थेच्या संदर्भात विवेचन केले आहे. ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्यातील अनुबंधासंदर्भात आशालता कांबळे यांनी मांडणी केली आहे. महात्मा फुले यांच्या संगीत विचारावर संजय मोहाड यांचा लेख ग्रंथात आहे.

डॉ. वंदना महाजन यांचे संपादन सहाय्य ग्रंथास लाभले आहे. महात्मा फुले यांच्या साहित्यावर वेगवेगळ्या अभ्यासकांनी आश्वासक लेखन केले आहे. त्यात नितीन रिंढे, दत्ता भगत, सतीश पावडे, रणधीर शिंदे, यादव गायकवाड, प्रल्हाद लुलेकर आणि केदार काळवणे यांचा समावेश आहे. महात्मा फुले यांच्या पत्रकारितेविषयी संध्या नरे-पवार यांनी मांडणी केली आहे.

महात्मा फुले यांच्या साहित्य विचारांचा विविध साहित्य प्रकारांवरील प्रभाव एक महत्त्वाचा विभाग आहे. त्यात ‘महात्मा फुले यांची विचारधारा आणि मराठी साहित्य’ हा नागनाथ कोत्तापल्ले यांचा बीजलेख आहे. मराठी साहित्यावरील प्रभाव आणि अनुबंधाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या अभ्यासकांनी लेखन केले आहे.

मराठी साहित्य विचारांच्या संदर्भात सुधाकर शेलार, वैचारिक लेखनावरील प्रभावाविषयी महेश खरात व कवितेवरील प्रभावावर आशुतोष पाटील यांनी लेखन केले आहे. महात्मा फुले आणि मराठी कादंबरी याचे अनुबंध महेंद्र कदम यांनी उलगडून दाखवले आहेत.

सुनील रामटेके यांनी मराठी नाट्यसृष्टीवरील प्रभावांची महात्मा फुले यांची विचारधारा आणि मराठी पत्रकारितेवर जयदेव डोळे यांनी भाष्य केले आहे. सत्यशोधक साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य प्रवाहावर अनुक्रमे अरुण शिंदे, भगवान फाळके आणि रुपाली शिंदे यांनी लिहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com