आश्रयभूमीचं सतत स्मरण ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आश्रयभूमीचं सतत स्मरण !

इस्राईलची १९४८ मध्ये निर्मिती झाल्यानंतर जगातील अनेक देशांमधील ज्यू इस्राईलला स्थलांतरित झाले. त्यात आपल्या देशातले ज्यूदेखील होते.

आश्रयभूमीचं सतत स्मरण !

इस्राईलची १९४८ मध्ये निर्मिती झाल्यानंतर जगातील अनेक देशांमधील ज्यू इस्राईलला स्थलांतरित झाले. त्यात आपल्या देशातले ज्यूदेखील होते. शेजारील शत्रुराष्ट्रांशी झगडत नव्या राष्ट्राच्या उभारणीत या सर्वांनी मोलाचा वाटा उचलला. प्रखर राष्ट्रप्रेम, कौशल्ये, विज्ञाननिष्ठा, धाडस, शौर्य आणि दिवस-रात्र केलेल्या मेहनतीने शक्तिशाली बनलेल्या या छोट्याशा देशातील नागरिकांची दखल सर्व जगाला घ्यावी लागते. वेगवेगळ्या देशांतून आलेल्या या चिवट, जिद्दी इस्रायली लोकांमध्ये मराठी भाषिकांचा टक्का लक्षणीय आहे आणि ते अद्यापही भारतातील आपल्या आश्रयभूमीला विसरले नाहीत. इथल्या आपल्या भूमीसाठी, आपल्या माणसांसाठी ते पुनःपुन्हा येथे येत राहतात. इथे आले असता त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव ओसंडून वाहताना दिसतात.

भारतभूमीवर ज्यूधर्मीय कधी आणि कसे आले याचे ठोस पुरावे नाहीत; पण भारतात मुघल, डच, पोर्तुगीज, पारशी, इंग्रज येण्या पूर्वीपासून त्यांचे वास्तव्य कोकण किनारपट्टीवर होते. असे समजले जाते की, यहुदी अर्थात ज्यू लोक साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी म्हणजे इसवीसन पूर्व ७३० मध्ये पॅलेस्टाईनमधून स्वसंरक्षणाकरिता जहाजातून भारत भूमीकडे निघाले होते. एका आख्यायिकेनुसार यातील एक जहाज अलिबाग तालुक्यातील ‘नवगाव’ या बंदरकिनारी बुडाले आणि त्यातून जे वाचले, त्या सात-आठ जणांनी या भूमीवर आश्रय घेतला. त्यांचे जे वंशज ते बेने-इस्रायली.

‘बेने इस्राईल’ या हिब्रू शब्दाचा अर्थ इस्राईलची लेकरे. आजही या लोकांना बेने इस्रायली अशा शब्दानेच अलिबागमध्ये ओळखले जाते, असे येथील जाणकार सांगतात. थोडी अधिक चौकशी केल्यावर कळले, की भारतभूमीवर ज्या ठिकाणी पॅलेस्टाईनमधून आलेल्या ज्यू लोकांनी पहिले पाऊल ठेवले, त्या ठिकाणी त्यांच्या पूर्वजांचे ‘जेरुसलेम गेट’ या नावाने स्मारक आहे. अलिबागपासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर आडमार्गावर समुद्रकिनारी हे ठिकाण आहे. सहसा कोणी या ठिकाणी फिरकत नाही; पण ज्युईश त्याला भेट द्यायला येतात, तेव्हा या स्थळाची साफसफाई केली जाते. ज्यू लोकांचे धार्मिक कार्यक्रम असतात तेव्हा येथे अनेक जण आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी येतात.

दुरावस्थेत असलेल्या या स्थळाची भव्यता मात्र विलोभनीय दिसते. येथे ज्यू लोक येतात तेव्हा त्या भेटीची व्यवस्था रायगड ज्युईश असोसिएशनचे अध्यक्ष हेरझल भोनकर यांच्यावर असते. या वेळी येथे रंगणाऱ्या मैफिलींची रंगत लाजबाब असते. तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्यात तर या लोकांचे राष्ट्रउभारणीतील कष्ट, त्याग आणि देशप्रेम प्रकर्षाने दिसून येते. तितकीच भारताबद्दलही आपुलकी दिसून येते.

जोनाथान मोझेस वाक्रुळकर, जॉनाथॉन सोलमन, जॉन पेरी पेझारकर, विजू पेणकर हे नेहमी या ठिकाणी येत असतात. त्यांच्याशी चर्चा करताना भाषेची कोणतीही अडचण येत नाही. ते चांगले मराठी बोलतात. येथील इतिहास, राजकारण, परंपरा, लोकसंस्कृती ते विसरलेले नाहीत. ‘महाराष्ट्र श्री’ किताब पटकावलेले विजू पेणकर हे ‘शेकाप’चे आमदार जयंत पाटील यांचे मित्र. त्यामुळे येथील कार्यक्रमांच्या वेळी जयंत पाटीलही आवर्जून हजर असतात. त्याचबरोबर तळा, पेण तालुक्यांतूनही त्यांचे जुने मित्र भेटण्यासाठी येतात. लहानपणी दुरावलेले यातील अनेक जण वयाची सत्तरी गाठलेले मित्र आहेत; परंतु त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. लहानपणीच्या गोष्टी किती सांगू आणि किती नको अशी सर्वांचीच स्थिती झालेली पाहायला मिळते. येथील राजकीय परिस्थितीवर त्यांचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेशी नीतीबद्दल ते भरभरून बोलतात.

त्यांचे आश्रयभूमीवर असलेले प्रेम ओसंडून वाहत असते आणि त्यातून उलगडतो दोन हजार वर्षांचा संघर्षमय इतिहास. भारत सोडून जाताना हा समाज खूप सधन होता; मात्र इस्राईलला गेल्यानंतर देशउभारणीसाठी त्यांना खूप कष्टाची कामे करावी लागली, पण याबद्दल खेद कोणाच्याही बोलण्यात दिसून येत नाही. भारत-इस्राईल या दोन देशांमध्ये जे सौहार्दाचे नातेसंबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहेत, त्यास या मैफिलीतील चर्चा पोषक असते. या मैफिलीत भाग घेण्याचा योग आम्हाला अनेक वेळा आला. मध्यंतरीच्या कोरोनामध्ये या मैफिली फारशा रंगल्या नाहीत; मात्र या नोव्हेंबरपासून त्यांची पुन्हा सुरुवात होत आहे.

अल्पसंख्याक या उपाधीच्या मान्यतेमुळे त्यांना विवाह नोंदणी, मृत्यू नोंदणी करणे सुलभ होईल, तसेच त्यांना शैक्षणिक संस्था सुरू करता येतील, शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि ‘विकास निधी’ मिळवता येईल. अल्पसंख्याकांना त्यांच्या ऐतिहासिक स्थानांचे रक्षण करण्यासाठी खास तरतुदी आहेत. त्यानुसार ज्यू समाज त्यांच्या तशा स्मृतिस्थळांचे जतन प्रभावी रीतीने करू शकेल, अशा मागण्या या चर्चेत प्रामुख्याने मांडल्या जातात. ‘जेरुसलेम गेट’ या स्थळाच्या सुशोभीकरणाचे काम अनेक वर्षे रखडले आहे, याचे सुशोभीकरण करावे यासाठी झालेल्या पत्रव्यवहारावर चर्चा होत असते.

अलिबागमधील जेरुसलेम गेट या स्मारकाबद्दल या लोकांच्या मनात कमालीची आपुलकी आहे, असे नवगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियांका घातकी सांगतात. या स्मारकाला भेट देणाऱ्यांमधून येथील पर्यटनवाढीला प्रोत्साहन मिळते. हे स्मारक आमच्या ग्रामपंचायत हद्दीत आहेत, याचा आम्हालाही गर्व आहे, असेही त्या आवर्जून म्हणाल्या.

एकेकाळी येथे खूप मोठ्या प्रमाणात ज्यू राहत होते. रायगड जिल्ह्यात सध्या जेमतेम ७० ज्यू राहतात. १८४० च्या आसपास २७० कुटुंब म्हणजे दीड हजार ज्यू कुटुंबे एकट्या अलिबागमध्ये राहत होती. त्या वेळी अलिबागची संख्या जेमतेम तीन हजार इतकी होती. आंग्रेंच्या राजवटीत या ज्यू लोकांची चांगली भरभराट झाली, अशी नोंद आंग्रे सरकारांच्या दप्तरी आहे. त्यानंतर हे लोक मुंबई, ठाणे येथे स्थलांतरित झाले. १९५०-६० मध्ये उरलेल्या लोकांनी थेट इस्राईलमध्ये स्थलांतर केले.

अलिबाग तालुक्यातील खंडाळे येथे ज्यू लोकांचे ‘येलिहाउहन्नाबी रॉक’ हे धार्मिक स्थळ आहे. प्रेषित स्वर्गातून उतरत असताना त्याच्या रथाच्या घोड्यांची टाप येथे घसरली, त्याची खूण येथील दगडावर आहे, असा ज्यू लोकांचा विश्वास आहे. ज्यू लोक येथे श्रद्धेने येतात. रायगड जिल्ह्यातील ज्यूंच्या धार्मिक स्थळांबद्दल रेमंड बंदरकर यांना चांगली माहिती आहे. आपले वडील भाई बंदरकर यांच्या निधनानंतरही ‘मक्काबी’ नावाचे मासिक रेमंड बंदरकर यांनी चालवले होते, ते काही वर्षांपूर्वीच बंद पडले.

तळा, अलिबाग, पेझारी, रेवदंडा, बोर्ली, नांदगाव, पेण, पनवेल, अष्टमी, म्हसळा या ठिकाणी ज्यूंची प्रार्थनास्थळे सिनेगॉग आहेत. या प्रार्थनास्थळांकडे दुर्लक्ष होत चालले आहे. नवगाव येथे इंडो-इस्राईल सांस्कृतिक केंद्र सुरू करण्यात येणार होते. दोन वर्षांपूर्वी इस्राईलमधून एक शिष्टमंडळ मुंबईत आले होते. चर्चा झाली; मात्र प्रत्यक्षात काही झाले नाही.

रायगड ज्युईश असोसिएशन अध्यक्ष आयझेल भोनकर सांगतात, की अलिबाग तालुक्यातील आंबेपूर-मल्याण येथे ‘नेर इस्राईल सिनेगॉग’ या प्रार्थनास्थळाचे काम पूर्ण होत आले आहे, त्याच्या उद्‍घाटनासाठी जानेवारीमध्ये ज्युईश एकत्र येणार आहेत. रोष-हाशान्ना या नावाने नववर्ष साजरे केले जाते. या वर्षी ५ ऑक्टोबर रोजी नववर्ष साजरे झाले. यानिमित्ताने गव्हाच्या चिकाचा हलवा ज्युईश लोकांच्या घराघरांत बनवला जातो. ज्यू लोकांचा दिवाळीसारखा हान्नुका सण डिसेंबरमध्ये साजरा केला जातो. या सणानिमित्त शासनाने सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी आहे. कार्यक्रमपत्रिकेतील विषयांवर चर्चा झाल्यानंतर मित्रत्वाच्या अनौपचारिक गप्पा रंगतात. ज्युईश लोकांचे येथील राहणीमान कसे होते, यावर चर्चा होते.

या लोकांना भारतात कोणताही त्रास नव्हता, तरीही ते स्वखुशीने इस्राईलला स्थायिक झाले. १९५०-६० च्या दरम्यान आपल्या तरुणपणात इस्राईलला गेलेल्यांना रस्ते, इमारती बांधण्याचे मोठ्या कष्टाचे काम करावे लागले. यात काही जण भारतात परतही आले होते. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. कोणालाही इस्राईल देशात जावेसे वाटेल, इतकी प्रगती या देशाने केली आहे. त्याच वेळेस आपण मात्र या ज्यूंना विसरत चाललो आहे. महाराष्ट्रात १९६१ मध्ये १५ हजार ८५१ ज्यू नागरिक होते. तत्पूर्वी ती संख्या ३० हजारांपर्यंत असावी. आता मात्र जेमतेम दीड ते दोन हजार ज्यू नागरिक महाराष्ट्रात राहतात.

महाराष्ट्र सरकारने येथील ज्यू धर्मीयांना २२ जून २०१६ रोजी अल्पसंख्य समाज म्हणून मान्यता दिली. ज्यू समाज त्या निर्णयाची गेली अनेक वर्षे वाट पाहत होता. भारतातील ज्यू लोकांची साहित्यसंपदा विपुल आहे. यातील बहुतांश साहित्य मराठी आणि इंग्रजीमध्ये आहे. या समाजातील लोकांनी २२ लहान-मोठी नियतकालिके चालवली. एडविन रोहेकर, रेचल गडकर, नाथान सातामकर, डॉ. जेरुषा झिराड, निस्सीम इझीकेल, विजू पेणकर (भारतश्री), डॉ. ई. मोझेस ही आणखी काही प्रसिद्ध नावे याच ठिकाणी ऐकायला मिळतात.

वालाची पोपटी ही त्यांची देण!

इस्राईलमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मायबोली या त्रैमासिकाचे संपादक नोह मॅस्सील सांगतात, की विवाहप्रसंगी मंगळसूत्र घालणे, हिरवा चुडा भरणे या प्रथा ते पाळतात. प्रार्थनेच्या वेळी तेलाचा दिवा वापरतात, मेणबत्तीचा वापर नाही. शुभ प्रसंगात आणि सणासुदीला करंजी, पुरणपोळी, उकडीचे मोदक करतात. वालाचा बिरडा हे त्यांचे आवडते कडधान्य. खमंग वासाची वालाची पोपटी ही त्यांचीच देण. सिंचनाची सुविधा नसलेल्या रोहा तालुक्यातील विरझोली, तळा तालुक्यातील गिरणे, अलिबाग तालुक्यातील खंडाळा, पेझारी परिसरात वालाच्या शेतीला त्यांनीच प्रोत्साहन दिले.

या लोकांची आडनावे गावावरून पडलेली आहेत. त्यामुळे ते मूळचे कुठचे राहणारे हे लगेचच ओळखता येते. जसे पेणचे पेणकर, थळचे थळकर, चौलकर, तळेकर, पेझारकर, आवासकर अशी नावे त्यांनी स्वीकारली. आपल्या उद्यमशीलतेमुळे हा समाज भारतात सधन होता. त्यांच्याकडे शेती, जमीनजुमला होता. यावर आता स्थानिकांनी कब्जा केलाय; तर काहींनी कवडीमोलाने विकल्या. आजही इस्राईलमधून येणारे ज्यू त्यांच्या गावांना भेटी देतात, नातेवाइकांची विचारपूस करतात आणि आपल्या वाडवडिलांच्या आठवणींना उजाळा देतात.