पॅरिसची सौंदर्यगाथा

पॅरिस हे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचं शहर आहे, हे आता वेगळं सांगायची गरज उरली नाही.
Paris
ParisSakal

एखादं पर्यटनस्थळ आपल्याला जवळचं वाटायला लागतं. तिथल्या विविध जाणिवांशी नातं विणलं जातं. त्याचीच प्रचीती ‘वाटेवरचे गाव’ या पुस्तकात येते.

काही शहरांचं आकर्षण अनेकांना असतं; पण त्या शहरात जाणं स्वप्नच राहतं. प्रसिद्ध लेखिका आणि पदार्थ विज्ञानशास्त्राच्या प्राध्यापिका माधुरी शानभाग यांनाही जागतिक कलापंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पॅरिसने असंच खुणावलं आणि हे शहर त्यांच्यासाठी ‘वाटेवरचं गाव’ झालं. त्याची गोष्ट त्यांनी अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘वाटेवरचे गाव’ या पुस्तकात कथन केली आहे.

पॅरिस हे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचं शहर आहे, हे आता वेगळं सांगायची गरज उरली नाही. आयुष्यात एकदा तरी हे जगविख्यात शहर पाहिलं पाहिजे, असं स्वप्न पर्यटनप्रेमींचं असतं. प्रा. माधुरी शानभाग यांनाही असंच वाटत असलं, तरी खास पर्यटनासाठी जाणे त्यांना शक्यच झालं नव्हतं. वयाची साठ वर्षं बेळगावात गेल्यानंतर त्यांना ही संधी आली आणि त्या शहराच्या त्या इतक्या प्रेमात पडल्या, की त्यांना तिथे जे काही दिसलं, भावलं, आवडलं त्यावर ‘वाटेवरचे गाव’ हे पुस्तक लिहिलं.

प्रा. शानभाग यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांना बेळगावाच्या बाहेर का पडता आलं नाही, याची कारणमीमांसा केली आहे. त्यातच पॅरिसला जाण्याचं निमित्त आणि नंतर वारंवार जाण्याची ओढही मनापासून मांडली आहे. पुढे त्या आपल्याला पॅरिसमध्ये घेऊन जाताना ‘पहिली धावती भेट’मधून या शहराबद्दलची उत्सुकता जागवतात. ही भेट होती १९९५ची. भाच्याच्या लग्नानिमित्ताने भावंडांसह केलेली ही टूर.

यात त्यांनी आयफेल टॉवर, नोत्रदामचे चर्च, शॉझेलिझे, आर्क द ट्राइंफ, पार्लमेंट हाऊस, राजवाडे अन्‌ सेन नदीवरचे महत्त्वाचे पूल असं बसमधून चढत-उतरत पाहिलं. त्याच वेळी एका नाईट क्लबला भेट दिली. इव्हज नावाच्या कल्बमध्ये सादर झालेल्या शोचे वर्णन पॅरिस जगभरातील लोकांचे आकर्षण का आहे, याची साक्ष देणारं आहे.

शो पॅरिसमधला असला, तरी सूत्रधार वेगवेगळ्या देशांतून आलेल्या प्रेक्षकांशी कसं नातं विणतो, याविषयीचं अनुभवकथन थक्क करणारं आहे. त्याच शोमध्ये टॉपलेस मुलींनी केलेलं नृत्य अजिबात अश्‍लील का वाटत नाही, या वर्णनातही हे पुस्तक गुंतवून ठेवतं. पुढच्या प्रकरणात आणखी काय आहे, याविषयीची उत्सुकता जागवते.

‘मनात रुतलेला मनोरा’ या प्रकरणात ‘आयफेल टॉवर’ जगप्रसिद्ध का झाले, याचा रंजक इतिहास झरझर डोळ्यासमोर येतो. या पुस्तकातील साऱ्या गोष्टींचं कथन केवळ प्रवासवर्णन नाही; तर त्या-त्या कलाकृती बघत असताना प्रा. शानभाग यांनी ते सांगण्यासाठी कथासूत्र अवलंबिले आहे. आयफेल टॉवर बसमधून गाईडने दाखवल्यापासून ते तिथवर पोहचेपर्यंत त्याच्या निर्मितीची गोष्ट छान रंगवली आहे.

गुस्ताव्ह आयफेल या वास्तुविशारदाने स्टीलचे बनवलेले डिझाईन पॅरिसच्या निवडसमितीने स्वीकारलं आणि प्रसिद्ध केलं. त्या वेळी हा लोखंडी कचरा जगात सर्वांत सुंदर असलेल्या शहराची शान बिघडवणार, असे तीनशे सह्यांचे पत्रक देऊन विरोध कसा झाला, ही गोष्ट सांगितली. पुढे तोच सांगाडा या शहराचे जगप्रसिद्ध आयकॉन झाला.

दुसऱ्या महायुद्धात जर्मन फौजा पॅरिसमध्ये घुसल्या तेव्हा हिटलरने आयफेल टॉवर संदेशवहनासाठी वापरू नये, यासाठी देखभाल करणाऱ्या इंजिनियरने काय युक्ती लढवली, ही गोष्ट पॅरिसच्या दस्तावेजीकरणाचा भाग झाली आहे. फ्रान्स सोडताना हिटलरने आयफेल टॉवर पाडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यातून ‘फ्रेंच लोकांचे नाक कापण्याचं समाधान मिळवणार होता’ अशा काही उदाहरणांनी ‘आयफेल’ची कथा रंजक केली आहे.

प्रा. शानभाग यांनी त्यांची काही निरीक्षणे नोंदवताना केलेली भाष्यंही महत्त्वाची आहेत. आयफेल टॉवरसंदर्भात भाष्य करताना त्या म्हणतात, ‘‘विज्ञानाला रुक्ष, अस्थेटिक सेन्स नसलेले, असे हिणवणाऱ्या कलाप्रेमींना सर्वसामान्य जनतेने दिलेलं हे उत्तर आहे. विज्ञानातील गणितीय सौंदर्य हा विज्ञानाला मिळालेला कलेचा स्पर्श आहे.

विज्ञान आणि सौंदर्य एकत्र आलं, तर ती कलाकृती लोकमानसात अढळपद पटकावते, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आज जागतिक मान्यता मिळालेला आपणा सर्वांचा लाडका आयफेल टॉवर हेच सिद्ध करू पाहतो.’

आयफेल टॉवरपासून कोणतं शहर किती अंतरावर आहे, हे दिशेसह नोंदवलेलं आहे. तिथे दिल्ली आणि कोलकाता या दोन शहरांची नावं आहेत, याचा आवर्जून उल्लेख करून आयफेल टॉवरचं भारत कनेक्शन अधोरेखित केलं आहे.

या प्रकणात अनेक निरीक्षणांसह माहिती पुरवताना आपल्याकडील वृत्ती-प्रवृत्तींशीही जोडले आहे.

आयफेल टॉवरमध्ये एका खोलीत दोन पुरुष आणि एक स्त्री असे तिघांचे मेणाचे पुतळे आहेत. त्यातला एक पुतळा मनोऱ्याचे आर्किटेक्ट आयफेल यांचा. दुसरा स्त्रीचा पुतळा आयफेलची मुलगी आणि तिसरा श्रेष्ठ तंत्रज्ञ थॉमस आल्वा एडिसन यांचा. ‘आपल्या देशात पूल असो वा इमारत, काहीही संबंध नसलेल्या पुढाऱ्यांची नावे देऊन मूळ कलाकाराला मात्र अज्ञातच ठेवलं जातं’,

या आपल्याकडील वृत्तीवर प्रा. शानभाग यांनी मारलेली चपराक लक्षवेधी आहे. असे काही थेट भाष्य, काही उदाहरणं सांगून आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. काही ठिकाणी आपल्याकडचे रीतिरिवाज, परंपरा कशा योग्य आहेत, याचीही पाठराखण केली आहे.

रात्रीचं पॅरिस, म्युझियमचं गाव, थडग्यांच्या बागेतील भारलेली दुनिया, मॉन्ट मार्थची चालतीबोलती सफर, कलेचा आणि विज्ञानाचा विणलेला गोफ ही प्रकरणं आपल्यालाही पॅरिसची रंजक सफर घडवणारी आहेत. ‘पितात सारे गोड हिवाळा’ या प्रकरणातून आपल्याला ज्या वातावरणाची सवय नसते, तिथे जाणे आपण टाळतो; पण तिथे त्या वातावरणाचा भाग झाल्यास कसे सराईत होतो.

याची गोष्ट पॅरिसमध्ये शून्य डिग्री तापमानाची सवय कशी झाली, ही गोष्ट प्रा. शानभाग यांनी सुरेख विणली आहे. हे पुस्तक आपल्याला पॅरिस बघण्यासाठीची गुरुकिल्ली आहे. पॅरिसची ही सौंदर्यगाथा आहे.

पुस्तक : वाटेवरचे गाव : मला उमजलेले पॅरिस

लेखिका: प्रा. माधुरी शानभाग

प्रकाशक : नवचैतन्य, मुंबई

पृष्ठसंख्या : १५६

मूल्य : २८० रुपये

mahendra.suke@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com