नाट्यजाणिवांचे समृद्ध संचित

नाटक हे फक्त मनोरंजनाचेच साधन नाही तर समाजमनावर काही ओरखडे उमटत असतात, त्याचे प्रतिबिंबही नाटकात असू असते, याची तीव्र जाणीव करून देणारे जयंत पवार यांचे ‘अधांतर’ हे नाटक!
book adhantar
book adhantarsakal

जयंत पवार यांनी लिहिलेल्या ‘अधांतर’ नाटकाने पारंपरिक चौकट मोडली. त्यानंतर नाटकावर ‘अधांतर : भूमी व अवकाश’ हा ग्रंथ अलीकडेच प्रकाशित झाला. हा ग्रंथ अभ्यासकांच्या नाट्यजाणिवा समृ करणारा आहे...

नाटक हे फक्त मनोरंजनाचेच साधन नाही तर समाजमनावर काही ओरखडे उमटत असतात, त्याचे प्रतिबिंबही नाटकात असू असते, याची तीव्र जाणीव करून देणारे जयंत पवार यांचे ‘अधांतर’ हे नाटक! या नाटकाचा आशय-विषय, संवाद लेखनासह सादरीकरणाने मराठी रंगभूमीला नवा आयाम दिला. हे नाटक रंगभूमीवर येऊन २५ वर्षें उलटून गेली.

दरम्यानच्या काळात या नाटकाचे महत्त्वही अधोरेखित झाले. अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. त्यानंतर आता या नाटकावरचा एक दस्तावेज ‘अधांतर : भूमी व अवकाश’ नावाने ग्रंथरूपात अलीकडेच प्रकाशित झाला. राजू देसले संपादित या ग्रंथात जयंत पवार यांनी सांगितलेली ‘अधांतर’ची जन्मकथा आहे. नाटकाचे दिग्दर्शक, कलावंतांच्या या नाटकाविषयीच्या आठवणी आहेत.

या नाटकाशी संबंधित असलेल्यांसह विजय तेंडुलकर, भालचंद्र नेमाडे, रत्नाकर मतकरी, वसंत आबाजी डहाके, कमलाकर नाडकर्णी, संजय पवार, शांता गोखले, दीपक करंजीकर, रवींद्र लाखे, प्रवीण बांदेकर आदी अनेक दिग्गजांच्या नजरेतून ‘अधांतर’ समजून घेणे वाचकांना आणि नाट्य अभ्यासकांना समृद्ध करणारे आहे.

जयंत पवार यांचे ‘अधांतर’ नाटक मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपानंतरच्या काळातील घटनांचा उद्‌गार आहे. अनेक अर्थाने हे नाटक मुंबईतील बदललेल्या परिस्थितीचा वेध घेते. धुरी नावाच्या कुटुंबाची ही कथा असली तरी, अशाच लाखो गिरणी कामगारांची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पत कशी ढासळत गेली, त्याचे हे नाटक प्रातिनिधिक रूप आहे.

मराठी रंगभूमीवर माईलस्टोन ठरलेल्या या नाटकाची जन्मकथा स्वत: जयंत पवार यांनी या ग्रंथात मांडली आहे. स्पर्धेसाठी नवं नाटक लिहून दे, हा आग्रह करणारी माणसं नाटक लिहिणाऱ्याच्या वाट्याला येत असतात. जयंत पवार यांनी त्यांची नाटकं सादर करणाऱ्या संस्थेतील मित्रांचे असेच लाड पुरवले होते. पुरस्कारही मिळाले; परंतु त्या आनंदात जयंत पवार रमले नाहीत.

नवं नाटक लिहिण्याचा आग्रह होत असताना त्यांना खुणावत होती त्यांनीच लिहिलेली ‘वाळवी’ ही एकांकिका. तो एक दीर्घांक होता, पण बरच सांगायचं राहून गेलं होतं. त्यातली पात्रं न्याय मागत होती. एकेका पात्रांचा स्वतंत्रपणे विचार करून, ती-ती व्यक्तिरेखा एकमेकांपेक्षा भिन्न स्वभाव-वैशिष्ट्याचा आलेख दाखवत होती.

त्या अर्थाने ‘वाळवी’ संहितेत उमटली नव्हती. त्यासाठी प्रत्येक कॅरेक्टरचा स्वतंत्रपणे विचार करण्याची प्रक्रिया, त्यांची भाषा, त्यांचा वावर असे सारे संदर्भ जयंत पवार यांच्या ‘अधांतरचा जन्म’मध्ये आहे.

नाटक लिहून पूर्ण झाले. वाचले, पण काहींना ते अपुरं, ओबडधोबड वाटलं. नाटककार म्हणून जयंत पवारांचीही चिडचिड झाली. अस्वस्थ झाले. याच अस्वस्थेत पुन्हा ते तपशील टाकत राहिले. या प्रक्रियेत अनेकदा नाटक गुंडाळून ठेवावं असंही त्यांना वाटलं; पण पात्र रात्रंदिवस त्यांचा पिच्छा सोडत नव्हते.

एका सर्वोत्तम नाटकासाठी लेखकाला कायकाय सहन करावे लागते, कितीदा पुनर्लेखन करावे लागते, त्यात किती वर्षे जातात याविषयीचा सारा प्रवास जयंत पवार यांनी खूप सविस्तर मांडला आहे. ते नव्या नाट्यलेखकांनी आवर्जून वाचलेच पाहिजे, नाटकाच्या अभ्यासक्रमात त्याचे अध्यायन होणे गरजेचे आहे.

‘अधांतर’ आकार घेण्याच्या पूर्वीपासूनच दिग्दर्शक मंगेश कदम जयंत पवार यांच्या लेखनप्रवासाचे साक्षीदार आहेत. त्यामुळे ‘वाळवी’चे ‘अधांतर’ होण्यासाठीचा सहा वर्षांचा खडतर काळ आणि ‘अधांतर’च्या प्रयोगासाठी केलेली धावाधाव त्यांनी उत्तमरीत्या शब्दबद्ध केली आहे. काही संदर्भ हे प्रत्येक लेखात पुन:पुन्हा येतात, पण ती पुनरावृत्ती नव्हे. ते एकमेकांच्या म्हणण्याला पुष्टी देणारे आहेत.

‘अधांतर’मधल्या व्यक्तिरेखा साकारणारे कलावंत आणि दिग्दर्शक मंगेश कदम, लेखक-दिग्दर्शक यांच्या लेखांत ते जाणवते. नाटकाची गोष्ट, त्यातील घटना, व्यक्तिरेखा वेगवेगळे संदर्भ घेऊन येतात. तपशील अधिक घट्ट होतात. मंगेश कदम यांनी दिग्दर्शक म्हणून या नाटकाचा किती खोलवर विचार केला, याचीही प्रचिती येते.

‘अधांतर’ रंगमंचावर आल्यानंतर त्याचे पुस्तक प्रकाशित झाले. अनिरुद्ध खुटवड यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातर्फे २००९ मध्ये ‘अधांतर’चा प्रयोग केला. त्यानंतर २०१२ मध्ये पुण्यातील फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे आणि २०१४ मध्ये एनएसडीतर्फे ‘अधांतर’चे हिंदी भाषेतील प्रयोगाचे दिग्दर्शन केले.

त्यांनी त्यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याने हे नाटक राष्ट्रीयस्तरावर पोहचवले. त्यासाठी त्यांनी नारायण सुर्वे यांनी गायलेली ‘गिरणीची लावणी’ या कवितेचा आणि पोस्टर डिझाईनसाठी प्रसिद्ध चित्रकार सुधीर पटवर्धन यांनी चितारलेल्या ‘लोअर परेल’ या चित्रांचा आधार घेऊन वेगवेगळे कलामाध्यम ‘अधांतर’ला जोडले. कलाकृती अधिक प्रभावी करण्यासाठी हे संहिताबाह्य दिग्ददर्शीय प्रयोग अनिरुद्ध खुटवड यांचे वैशिष्ट्य अधोरेखित करणारे आहेत.

या ग्रंथातील आणखी एक महत्त्वाची आठवण म्हणजे प्रसिद्ध अभिनेते, कवी किशोर कदम (सौमित्र) यांची. ‘निसटलेले अधांतर’ असे या आठवणीचे शीर्षक आहे. किशोर कदम यांना ‘अधांतर’मधील बाबाची भूमिका करण्याची गळ मंगेश कदम यांनी घातली होती, पण ती सौमित्र यांनी का नाकारली आणि प्रयोग झाल्यानंतर त्यांना काय वाटले, ते या ग्रंथातच वाचायला हवे.

नाटकभर ‘अधांतर’ तोलून धरणारी व्यक्तिरेखा म्हणजे आई. ती साकारली ज्योती सुभाष यांनी! या व्यक्तिरेखेचा खोलवर विचार करताना ज्योतीताई ‘अधांतर’मय कशा झाल्या, हे फार आपुलकीने त्यांनी मांडले आहे. महत्त्वाचे म्हणजे या नाटकाचा शेवट करण्यासाठी त्यांनी सुचवलेली कल्पना लेखक-दिग्दर्शक म्हणून जयंत पवार आणि मंगेश कदम यांनी मान्य केली. ती रसिकांनाही भावली.

त्या अर्थाने त्यांचे ‘अधांतर’मय होणे अधोरेखित होते. त्यांच्यासह ‘नरू’ साकारणाऱ्या संजय नार्वेकर यांनीही ‘अधांतर’च्या निमित्ताने गिरणीच्या आठवणींवर प्रकाशझोत टाकला आहे. ‘‘प्रत्येक माणसात एक कॅमेरा असतो. तो कॅमेरा आजूबाजूच्या घटना नकळतपणे टिपत असतो आणि त्याचं फुटेज मेंदूत कुठेतरी साठवून ठेवत असतो. नंतर कधीतरी, केव्हातरी हे फुटेज आठवणी म्हणून समोर येतं.’

हे त्यांच्याच आठवणीतले फुटेज त्यांना ‘नरू’ साकारताना कसे उपयोगी पडले याचा पट त्यांनी मांडला आहे. ‘अधांतर’मध्ये वेगवेगळ्या, पण महत्त्वाच्या भूमिका साकारणारे नव्हे भूमिका जगणारे भरत जाधव, राजन भिसे, अनिल गवस, लीना भागवत, आशीष पवार, हेमंत भालेकर यांच्या आठवणीही महत्त्वाच्या आहेत.

या ग्रंथात असणारा विजय तेंडुलकर यांचा लेख म्हणजे जयंत पवार यांचा यथार्थ गौरव आहे. भालचंद्र नेमाडे यांनी ‘अधांतर’चा गौरव ‘ऐतिहासिक स्वरूपाचं साहित्यसर्जन’ असा केला आहे. वसंत आबाजी डहाके यांनी ‘हे नाटक आधुनिक, अभिजात शोकांतिका’ म्हटले आहे.

रत्नाकर मतकरी, रवींद्र लाखे, संजय पवार, समर खडस/नचिकेत कुलकर्णी, शांता गोखले, कमलाकर नाडकर्णी, आशुतोश पोतदार, अशोक राणे, माया पंडित, रवींद्र इंगळे चावरेकर, प्रवीण बांदेकर, रामू रामनाथन, प्राजक्त देशमुख, डॉ. महेंद्र कदम, डॉ. लीना केदारे, संजय आर्वीकर, एकनाथ पगारल, अनिल फराकटे, उदय कुलकर्णी, संध्या नरे-पवार, रणधीर शिंदे, गणेश मतकरी या सर्व मान्यवरांनी ‘अधांतर’ची केलेली चिकित्सा अभ्यासपूर्ण आहे.

दीपक करंजीकर यांनी मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपाचा सामाजिक, सांस्कृतिक वेध घेत तत्कालीन राजकीय परिस्थितीवर मुद्देसूद भाष्य केले आहे. ‘‘मुंबईच्या समाजजीवनाचा हा एक असा स्नॅपशॉट आहे, ज्याला वगळून, मुंबईबद्दल भविष्यात समग्र असं काहीही सांगता येणं शक्य नाही.

आजचं आणि उद्याचं ‘मुंबई’ हे चकचकीत, करकरीत आणि आंतरराष्ट्रीय महानगर उभारताना, कदाचित या एकेकाळच्या जागत्या इतिहासाची पानं टरकावली जातील आणि त्या अवकाशात जगलेली माणसं आणि त्या हाडामासाचं पर्यावरण यांच्या चिंध्या होतील. एका जिद्दी, जगण्याची जिगर जोपासणाऱ्या समाजाचे कश्‍चितकपटे उडतील आणि म्हणून या नाटकाचं महत्त्व आहे.’’ करंजीकर यांनी ‘अधांतर’च्या निमित्ताने व्यक्त केलेले विश्‍लेषण डाक्युमेंटेशनच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आहे.

‘अधांतर’ नाटक १९९६मध्ये रंगमंचावर आले आणि त्याने इतिहास रचला. वेगवेगळ्या अंगाने त्या कलाकृतीची चिकित्सा झाली. व्यावसायिक रंगभूमीवर त्याचे असंख्य प्रयोग झाले. त्या नाटकावरचा ‘अधांतर : भूमी व अवकाश’ हा ग्रंथ मराठी रंगभूमीचा महत्त्वाचा दस्तावेज आहे.

ग्रंथ : अधांतर- भूमी व अवकाश

संपादक : राजू देसले

प्रकाशक : लोकवाङमय गृह, मुंबई

पृष्ठसंख्या : ४४०

मूल्य : ६०० रुपये

mahendra.suke@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com