अस्वस्थ करणारे व्रण

भारतीय समाज व्यवस्थेमधील प्रत्येक समाजघटकाचा उत्कर्ष व्हावा, यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्या योजनेंतर्गत त्या-त्या समाजघटकांचे जगणे समृद्ध व्हावे, अशी अपेक्षा असते.
Dahan Book
Dahan BookSakal
Summary

भारतीय समाज व्यवस्थेमधील प्रत्येक समाजघटकाचा उत्कर्ष व्हावा, यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्या योजनेंतर्गत त्या-त्या समाजघटकांचे जगणे समृद्ध व्हावे, अशी अपेक्षा असते.

आश्रमशाळांमधील गैरसोयींबद्दलच्या असंख्य बातम्या माध्यमात येत असतात. त्याआधारे जनमानसाच्या मनात काही प्रमाणात त्यातील उणिवांची जाणीव होत असते. मात्र, बातमी किंवा लेखांएवढेच आश्रमशाळेचे दु:ख नाही. त्यापलीकडच्या असंख्य जखमा किती खोलवर रुतल्या आहेत, याचे वास्तव सांगणारी ‘डहाण’ ही कादंबरी अनिल साबळे यांनी वाचकांसमोर ठेवली आहे. आश्रमशाळेत नेमके काय काय होते आणि तिथले व्यवहार किती संतापजनक असू शकतात, त्याचे ‘व्रण’ समाजमनाला अस्वस्थ करणारे आहेत.

भारतीय समाज व्यवस्थेमधील प्रत्येक समाजघटकाचा उत्कर्ष व्हावा, यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्या योजनेंतर्गत त्या-त्या समाजघटकांचे जगणे समृद्ध व्हावे, अशी अपेक्षा असते. मात्र त्या राबवणाऱ्या यंत्रणेत भ्रष्टाचाराची प्रवृत्ती फोफावली तर त्याचा फायदा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाही. आश्रमशाळांसारख्या निवासी शिक्षण योजनेतून दुर्गम भागात राहणारा समाज शिक्षणसंपन्न व्हावा, अशी अपेक्षा होती. मात्र स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही या योजनेचे उद्दिष्ट खरेच साध्य झाले का, याचे उत्तर ‘डहाण’ कादंबरीत उलगडून दाखवले आहे.

आजच्या युवा लेखकांपैकी एक महत्त्वाचे लेखक अनिल साबळे यांनी अलीकडेच लिहिलेल्या साहित्यकलाकृतींची चर्चा वाङ्‍मयीन वर्तुळात चर्चेत आहे. त्यांच्या ‘टाहोरा’ या कवितासंग्रहला २०२० ते २०२२ या कालावधीत महत्त्वाचे पुरस्कारही मिळाले. त्यांच्या ‘पिवळा पिवळा पाचोळा’ या कथासंग्रहाला शासनाच्या राज्य वाङमय पुरस्कारासह महाराष्ट्र फाउंडेशनचा प्रतिष्ठित पुरस्कार अलीकडेच मिळाला आहे. हे पुरस्कार जाहीर होतानाच अनिल साबळे यांची तिसरी साहित्यकलाकृती ‘डहाण’ प्रकाशित झाली.

अनिल साबळे हे कवी, कथाकार म्हणून प्रसिद्ध झाल्यानंतर ‘डहाण’च्या रूपाने ते कादंबरीकार म्हणून प्रकाशझोतात येत आहेत. ही साहित्यकलाकृतीही त्यांना कादंबरीकार म्हणून ओळख मिळवून देईल, इतकी ताकद त्यांच्या शैलीने अधोरेखित केली आहे. आश्रमशाळेत स्वयंपाकी म्हणून काम करणारा अंकुश नागरे ‘डहाण’चा नायक आहे. अंकुश एम.ए.; बी.एड. असला, तरी तो इयत्ता चौथीची पात्रता आवश्‍यक असणाऱ्या ‘स्ययंपाकी’च्या नोकरीला आहे. त्यामुळे वास्तवतेकडे त्याची बघण्याची समज या कादंबरीला न्याय देणारी ठरली आहे.

कादबंरीची सुरुवात अंकुश नागरेची स्वयंपाकी म्हणून बदली झालेल्या दुर्गम भागातील वीरगाव आश्रमशाळेत पोहोचण्यासाठीच्या प्रवासाने होते. धो-धो पाऊस सुरू असताना आडवळणावरच्या गावात पोहचण्याची कसरत वाचकांना गुंतवून ठेवते. वीरगावात पोहोचताच विषारी सापाला पकडण्यात गुंतलेल्या गावाने त्याचे स्वागत झाले. तिथून लांब असलेल्या आश्रमशाळेत जाण्यासाठी त्याने शॉर्टकट निवडला, पण ती वाट धोक्याची वाटताच पुन्हा मुख्य रस्त्याने गेला. शाळेत पोहोचल्यावर तिथले मास्तर, मुलं-मुली, स्वयंपाकघरातले सहकारी, प्रभारी मुख्याध्यापक अशा असंख्य व्यक्तिरेखा या कथेत येतात. त्यांचे भाव-स्वभाव हळूहळू उकलत आश्रमशाळेतले सारे तपशीलवार कथन एकेक धक्के देत, उत्सुकता वाढवत गुंतवून टाकते.

अंकुशची पत्नी आणि एक छोटी मुलगी आहे. तो रुजू होण्यासाठी आश्रमशाळेत येतो आणि काही दिवसांनंतर वीरगावात एक खोली भाड्याने घेऊन आपले बिऱ्हाड आणायला गावी जातो. बिऱ्हाडासोबत सायकल आणण्याची धडपडही छान विणली आहे. तत्पूर्वी इतका शिकूनही शेवटी स्वयंपाकीच झाला, हे काही गावकऱ्यांचे टोमणे वाचवण्यासाठी त्याची कसरतही अधोरेखित झाली आहे. आपण स्वयंपाकी असलो, तरी मोठी शाळा असल्याने तिथे शैक्षणिक पात्रतेच्या बळावर अकरावीला मराठी शिकवण्याची संधी मिळेल, अशी त्याला आशा होती. त्या आशेवर कसे पाणी फेरले जाते आणि स्वयंपाकखोलीशी त्याचे नाते कसे विणले जाते, याची रंजक कथा कादंबरीभर वेगवेगळ्या टप्प्यावर उकलत जाते.

ही कथा वरवर आश्रमशाळेतील व्यवस्थेवर भाष्य करणारी वाटत असली, तरी या कादंबरीत अनेक पदर उलगडत जातात. माणसातील विकृतीचे दर्शन घडते. भ्रष्टाचार करण्याचे विविध प्रकार दिसतात. सधन असणाऱ्या माणसांमध्ये नसलेली माणुसकी आणि जे गरीब आहेत, पण त्यांच्यात असलेली कणव असे समाजमनाचे वास्तव ‘डहाण’मध्ये अधोरेखित झाले आहे.

स्वयंपाकखोलीतून कडधान्य, शिजलेले पदार्थ, भरलेले गॅस सिलिंडर पळवण्याची मानसिकता असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरातील ‘अंधार’रूपी दारिद्र्य या कादंबरीचा महत्त्वाचा टप्पा आहे. चोरी करणाऱ्या माणसांच्या घरात समृद्धी कधीच वास करत नसते, तिथे दारिद्र्यच जन्माला येऊ शकते, याची अप्रत्यक्षरीत्या जाणीव करून दिली आहे. संपन्नता प्रामाणिक माणसाच्या घरातच नांदू शकते, हा विचार पेरण्याचे व्रत या कादंबरीचे अंतर्गत सूत्र असल्याचा भास होतो.

अंकुश स्वयंपाकी असला, तरी त्याची नजर चौफेर हिंडत असते. आश्रमशाळेचे वेगवेगळे कोनाडे तो शोधक नजरेने न्याहाळतो. तो आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना आतून-बाहेरून दिवसागणिक ओळखायला लागतो. मुलांच्या कल्याणासाठी असणाऱ्या योजनेचा फायदा लाभार्थ्यांना मिळण्याऐवजी या यंत्रणेतील माणसंच स्वत:चे कल्याण कसे करून घेतात, यावर ‘डहाण’ भाष्य करते. प्रामाणिकपणे या सरकारी आश्रमशाळा चालवल्या तर या योजनेचा हेतू साध्य होऊ शकतो, याची खात्री पटते; पण ओरबाडणारे हात योजनेचा उद्देश कसा चिरडून टाकतात, याविषयीची चीड वाचकांच्या मनात पेरत या कादंबरीचा नायक कथा पुढे नेतो.

स्वयंपाकघर हे फक्त विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था करणारे ठिकाण नाही, तर त्यात येणारे साहित्य प्रत्येक जण कसा पळवत राहतो, याचे वेगवेगळे प्रसंग कादंबरीत आहेत. स्वयंपाकघर हा भ्रष्टाचाराचा उकिरडाच वाटतो.

कधीकाळी आश्रमशाळेत दिसणारी घूस घर पोखरत असली, तरी माणसंही त्या घुशीपेक्षा काही कमी नाहीत, याची प्रचीती वेगवेगळ्या प्रसंगातून येते. ट्रक भरून आलेले धान्य असो वा तेल-मीठ-साखर, स्वयंपाकघरात जाण्यापूर्वी त्या वस्तूंना पाय फुटतात. स्वयंपाकघरात साठवलेले साहित्यही थोडेथोडे करून कर्मचारी लुटत राहतात. स्वयंपाकखोलीतले वर्णन करताना काही प्रसंग लेखकाने फार उत्तमरीत्या रेखाटले आहेत. ‘पंचवीस किलो पिठाची गोण साठेनं बेवारस प्रेतासारखी ओढत आणली, तेव्हा मागे पांढरीफटक रेषा उमटली.’ अशी काही वाक्य लेखकाच्या निरीक्षणशैलीची श्रीमंती सांगणारी आहेत.

अंकुश नागरे हा नायक वेगवेगळी वळणे घेत आपल्या परोपकारी स्वभावाने फिरत राहतो. आश्रमशाळेतील मुलांना पुरेसे जेवण मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न करत राहतो. ते उपाशी राहू नयेत, याची काळजी घेतो; पण शाळेत असलेले गॅस सिलिंडर परस्पर पळवल्याने, कधी काम करणारी माणसं नसल्याने शाळेच्या पोरांच्या वाट्याला खिचळी खाण्याची वेळ येते. त्याचे शल्य त्याला बोचत राहते. दिवसागणिक येणाऱ्या वेगवेगळ्या भ्रष्टाचारी वृत्तीविषयीची चीड असणारा अंकुश उपाशीपोटी दिवसभर काम करतो; पण मुलांसाठी असलेले अन्न तो कधीही स्वत: घेत नाही. आपण त्या भ्रष्ट प्रवृत्तीचे कधीही वाटेकरी व्हायचे नाही, हे व्रत स्वीकारून तो प्रामाणिकपणे नोकरी करत राहतो.

आश्रमशाळेत निवासी असलेल्या कर्मचाऱ्यांशी त्याचे खटकेही उडतात; पण निगरगट्ट झालेली भ्रष्ट प्रवृत्ती त्याला नष्ट करता येत नाही. त्यासाठी लागणारे पद त्याच्याकडे नाही. तपासणी करणारी यंत्रणा आश्रमशाळेत येते आणि वरवर जबाबदार असणाऱ्यांना धारेवर धरते. नोकरी गमवाल, अशी भीती दाखवून तेही या भ्रष्टाचाराचेच वाटेकरी होतात. या साऱ्या बाबींची चीड मनात येऊन अंकुशला ते बघत राहण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. एकीकडे त्याचा प्रामाणिकपणा आणि दुसरीकडे काहीच करू शकत नसल्याची खंत त्याला अस्वस्थ करते.

या कादंबरीतील कथेचा काळ कुठेही स्पष्टपणे नोंदवला गेला नसला, तरी कादंबरीत आलेल्या फोनच्या कॉईनबॉक्सचा उल्लेख या कथेचा काळ सांगण्यास पुरेसा ठरणारा आहे. जागतिकीकरणानंतर साधारणत: १२-१५ वर्षानंतरचा हा कालखंड असण्याची शक्यता आहे. कादंबरी आता वाचकांच्या हातात असली, तरी त्यात कुठेही मोबाईलचा संदर्भ आलेला नाही.

दळणवळणाच्या साधनांत एसटी बस, टेम्पो असे उल्लेख आहेत. कादंबरीतील कथेचा प्रवास साधारण सुरुवातीपासून शेवटाकडे जाताना तीन वर्षांचा आहे. या तीन वर्षांतले अनुभव अंकुशच्या सोबतीने वाचकांना आश्रमशाळेत घेऊन जातात. शेजारच्या निसर्गाशी आपले घट्ट नाते विणतात. एकीकडे समृद्ध निसर्ग मनात भरतो.

दुसरीकडे फोफावलेला अनिर्बंध भ्रष्टाचार वाचकांच्या मनावरही ओरखडे करतो. डहाण म्हणजे व्रण, जखमेची खूण. ती खोलवर झालेली जखम आपल्याही मनात सलत राहते...

कादंबरी : डहाण

लेखक : अनिल साबळे

प्रकाशक : लोकवाङ्‍मय गृह, मुंबई

पृष्ठसंख्या : ३६६

मूल्य : ४५० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com