छत-खिडकीचा चित्राविष्कार

प्रसिद्ध चित्रकार तपन मडकीकर यांच्या अमूर्त शैलीतील ‘थ्रू द विंडोज’ या शीर्षकांतर्गत कलाकृतींचे प्रदर्शन वरळीतील नेहरू सेंटरच्या कलादालनात सुरू आहे.
Drawing
DrawingSakal
Summary

प्रसिद्ध चित्रकार तपन मडकीकर यांच्या अमूर्त शैलीतील ‘थ्रू द विंडोज’ या शीर्षकांतर्गत कलाकृतींचे प्रदर्शन वरळीतील नेहरू सेंटरच्या कलादालनात सुरू आहे.

मुंबईतील नेहरू सेंटरच्या कलादालनात सुरू असलेली चित्रप्रदर्शने अनाहुतपणे एकमेकांशी नाते सांगणारी आहेत. प्रसिद्ध चित्रकार तपन मडकीकर यांच्या कलाकृतींचे शीर्षक ‘थ्रू द विंडोज’; तर नागपुरातील लेखक-कादंबरीकार प्रमोद वडनेरकर यांची चित्रे ‘रूफ’ शीर्षकांतर्गत प्रदर्शित झाली आहेत. अर्थात छत आणि खिडकीतून कलारसिकांना काय दिसते, हे उत्कंठा वाढवणारे आहे.

प्रसिद्ध चित्रकार तपन मडकीकर यांच्या अमूर्त शैलीतील ‘थ्रू द विंडोज’ या शीर्षकांतर्गत कलाकृतींचे प्रदर्शन वरळीतील नेहरू सेंटरच्या कलादालनात सुरू आहे. मनाच्या खिडकीचे भावविश्व उमटविणारे हे प्रदर्शन कलारसिकांशी संवाद साधते.

प्रसिद्ध प्रिंटमेकर तपन मडकीकर यांची ही चित्रमालिका कागद आणि कॅनव्हासवर साकारली आहे. खिडकी घराचा जसा महत्त्वाचा घटक असतो, तसाच तो मानवी देहातील मनाचाही असतो. खिडकी हा विषय वेगवेगळ्या कलावंतांनी वेगवेगळ्या माध्यमातून आविष्कृत केला असला तरी या खिडकीचे माहात्म्य काही संपत नाही. ती काळासोबत नवी रूपं घेऊन कलाकारांच्या मनावर आणि त्यांच्या कलाकृतींवर अधिराज्य गाजवत आली आहे. याच खिडकीने तपन मडकीकरांच्या कॅनव्हॉसवर आपले घर बांधले आहे.

खिडकीतून दिसणारा निसर्ग मानवी मनाला खुणावत असतो. कधीकधी खिडकी आणि निसर्ग मिळून कलासौंदर्याचा भाग होतो. ही गुंतांगुत तपन यांच्या अमूर्त शैलीतील सूचक रंगभाषा आहे. खिडकी माणसाच्या जगण्याला उजेड देते. घराबाहेरचे जग दाखवते. आपल्याला मात्र घरातील अंधारात सुरक्षित असल्याचे भासवते. चित्रकाराने मनःचक्षूच्या खिडकीतून रसिकांना निसर्गसौंदर्याचे दृश्‍य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्त्वाचे म्हणजे प्रिंटसाठी वापरलेले चित्रांचे ब्लॉक काही कलाकृतीसोबत प्रदर्शनात असल्याने, त्याचे बिंब-प्रतिबिंब असा दुहेरी आस्वाद ज्ञानरंजन करणारे आहे. ‘थ्रू द विंडोज’ ही चित्रमालिका तपन यांच्या मनाची एक खिडकी आहे. ती खिडकी त्यांचे विचार प्रतिबिंबित करते. या चित्रांमधून मनाच्या खिडकीतून उमटणारे भावविश्व दिसते.

अनेक वर्षे अभियंते म्हणून नोकरी करणारे नागपूरचे प्रमोद वडनेरकर यांनी सेवानिवृत्तीनंतर लेखणी आणि कुंचला हाती धरला आहे. लेखक म्हणून त्यांच्या कादंबऱ्यांनी साहित्य क्षेत्रात ओळख कमावली. सोबतच कुंचला हातात घेऊन वेगवेगळ्या विषयांवर चित्रेही काढली. त्यांनी याच छंदातून साकार केलेल्या त्यांच्या ‘रूफ’ या विषयावरील चित्रमालिकेतील कलाकृती १२ एप्रिलपासून नेहरू कलादालनात प्रदर्शित झाल्या आहेत.

मानवी जीवन जगण्यासाठी प्रत्येकालाच निवारा मिळणे ही मूलभूत गरज आहे. त्या निवाऱ्यातील छत ऊन, वारा, पावसापासून माणसाचे रक्षण करत असते. हे छत वेगवेगळ्या प्रकारात रेखाटून प्रमोद वडनेरकर यांनी त्यांच्या कलाकृतीत वैविध्यतेचा धागा गुंफला आहे. छतासोबत इमारती दिसतात, त्या इमारतीसोबत आपल्याला आकाशही दिसते. माणसासाठी छत आणि निसर्गासाठी आकाशच छत झाल्याचा विचार त्यांच्या या चित्रमालिकेने अधोरेखित केला आहे.

प्रमोद वडनेरकर यांची चित्र मूर्त आणि अमूर्त अशा मिश्रशैलीचे प्रतिनिधित्व करणारी आहेत. त्यामुळे विषयानुरूप छत प्रत्येक चित्राचा भाग वाटत असले, तरी त्या छताच्या अवती-भवतीच्या प्रतिकांत अमूर्त विचारांची पेरणी केल्याचा भास होतो. या छतांमध्ये गावोगावच्या बहुमजली इमारतीही दिसतात आणि डोंगरावर चढलेल्या झोपड्यांचे छतही दिसतात. त्यामुळे चित्रकाराने समाजात असलेल्या विषमतेवरही अप्रत्यक्षपणे भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

छताच्या बॅकग्राऊंडवर वेगवेगळ्या वसाहतींचे गारुड आपल्या मनावर असतेच. तसेच ते रंगलेखकाच्या मनावरही असावे. त्यामुळे ही चित्रे फक्त चित्रे नाहीत, तर तुमच्या-आमच्या निवाऱ्यातील छतातला फरक अधोरेखित करणारी आहेत.

निवाऱ्याबाबत आपल्या मनात काही ठसठशीच प्रतिमा तयार झाल्या आहेत. त्या प्रतिमा बहुतांश तिरकस छपरांच्या आहेत. कलाकृतीत पेश केलेली चित्रे बाह्य आकारापुरती मर्यादित नाहीत, तर छप्परांच्या आतील शक्ती रंग आणि रेषांच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न चित्रकाराने केला आहे.

mahendra.suke@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com