भाष्य जगण्यातल्या विरोधाभासावर (महेश बर्दापूरकर)

महेश बर्दापूरकर barmahesh@gmail.com
रविवार, 9 डिसेंबर 2018

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा विपरीत परिणाम यांवर मार्मिक भाष्य करण्यात आलं. युक्रेनच्या सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित "डोनबास' या चित्रपटानं महोत्सवात बाजी मारली. युनेस्को गांधी पुरस्कार प्रवीण मोरछले दिग्दर्शित "वॉकिंग विथ द विंड' या चित्रपटानं पटकावला. महोत्सवात गाजलेल्या चित्रपटांबद्दल...

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा विपरीत परिणाम यांवर मार्मिक भाष्य करण्यात आलं. युक्रेनच्या सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित "डोनबास' या चित्रपटानं महोत्सवात बाजी मारली. युनेस्को गांधी पुरस्कार प्रवीण मोरछले दिग्दर्शित "वॉकिंग विथ द विंड' या चित्रपटानं पटकावला. महोत्सवात गाजलेल्या चित्रपटांबद्दल...

पणजीत झालेल्या एकोणपन्नासाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) चित्रपटांनी यंदा प्रेक्षकांना जगण्यातल्या लढ्याची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विसंगतीचीही अनुभूती मिळवून दिली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतल्या सर्व पंधरा चित्रपटांच्या कथांमध्ये नावीन्य होतंच; मात्र त्याचबरोबर जगण्याच्या लढाईचा धागा एकाही चित्रपटानं सोडलेला दिसला नाही. ही विसंगती यादवी युद्धामध्ये स्वतःचा फायदा शोधणाऱ्या सरकारी अधिकारी, सैनिक आणि मीडियाची होती, पर्यावरणाला ओरबाडणाऱ्या स्वार्थी मनुष्य स्वभावाची होती, बाप-मुलातल्या नात्यातील होती आणि दोन जीवांतल्या प्रेमाला आपल्या तालावर नाचवणाऱ्या समाजाचीही होती.

युद्ध आणि "फायदा'
महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या "डोनबास' या चित्रपटानं या विसंगतीचा परमोच्च बिंदू गाठला. युक्रेनच्या या चित्रपटामध्ये यादवीच्या काळात दहशतवादी विरुद्ध लष्कर या लढाईत दोन्ही बाजूंकडून सर्वसामान्यांचा कसा उपयोग केला जातो, याचं अत्यंत विदारक आणि त्याचवेळी ब्लॅक ह्यूमरच्या अगानं जाणारं कथानक जबरदस्तच होतं. लष्कर खोटे स्फोट घडवून आणत नागरिकांचा बळी घेतं, मीडिया लोकांच्या खोट्या प्रतिक्रिया घेत टीआरपी मिळवतो, डॉक्‍टर या परिस्थितीचा फायदा घेत औषधांचा काळाबाजार करतात, तर पोलिस ही परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी पुन्हा नागरिकांच्याच खिशात घात घालतात. "दुष्काळ आवडे सर्वांना'सारखंच "युद्धही आवडे सर्वांना' असा हा मामला. विरोधभासाचं टोक गाठणाऱ्या या चित्रपटाला महोत्सवातला सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरवलं गेलं नसतं, तरच नवल! "डिव्हाईन विंड' या स्पर्धेतल्या आणखी एका चित्रपटात दहशतवादी मानसिकता आणि त्यात सर्वसामान्य नागरिकाला ओढण्यासाठीचे प्रयत्न यांतलं द्वंद्व टिपण्यात आलं होतं. एका विशिष्ट मानसिकतेनं ग्रासलेले लोक आपला लढा हेच जगातलं अंतिम सत्य आहे आणि त्यासाठी आपण कोणत्याही टोकाला गेलं पाहिजे, या मानसिकतेपर्यंत पोचल्याचं दिसतं. अल्जीरियातील सहारा वाळवंटातील दुर्गम टिमिमौन या शहरात राहणाऱ्या अमीन या सुशिक्षित बेरोजगार मुलाची आयसिसच्या जाळ्यात अडकत जाण्याची गोष्ट हा चित्रपट सांगतो. नूर ही या संघटनेची महिला दहशतवादी अमीनला या जाळ्यात ओढण्यासाठी थेट त्याच्या घरात प्रवेश करते, त्याचा बुद्धिभेद करत एका दहशतवादी हल्ल्यासाठी त्याला तयार करते. आपली मानसिकता आणि करत असलेली कृती यांतलं अंतर हळूहळू अमीनच्या लक्षात येतं आणि कथा वेगळाच ट्‌विस्ट घेते.

निसर्ग आणि मानवी हाव
बल्गेरियाच्या "अगा' या चित्रपटामध्ये निसर्गाला ओरबडल्यास त्याचे किती घातक दुष्पपरिणाम होऊ शकतील, यावर जळजळीत भाष्य करण्यात आलं. यासाठी एका विस्तीर्ण आणि दुर्गम बर्फाळ प्रदेशात एकट्याच राहणाऱ्या जोडप्याची कथा मांडण्यात आली. प्राप्त नैसर्गिक साधनांचा योग्य वापर करून जगणाऱ्या या जोडप्याची मुलगी अगा शहरात निघून गेली आहे. बर्फ वितळू लागताच या जोडप्याचे नेहमीप्रमाणे हाल सुरू होतात. आपल्या मुलीच्या शोधार्थ गेलेल्या वडिलांना निसर्गाच्या विरुद्ध वागल्यानं मानवाला भविष्यात सहन कराव्या लागणाऱ्या संकटाची जाणीव होते. केवळ एकाच प्रसंगाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी मानसिकतेवर भाष्य केलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक मिल्को लाझारोव्ह यांना विशेष ज्युरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

स्पर्धेतल्या "द अनसीन' या अर्जेंटिनाच्या चित्रपटामध्येही पाण्याचं दुर्भिक्ष्य आणि त्यामुळं मानवाला कराव्या लागणाऱ्या स्थलांतरावर भाष्य करण्यात आलं. जमिनीखालच्या पाण्याचा अनियंत्रित वापर मनुष्याला कोणत्या संकटापर्यंत नेऊ शकतो, यावर चित्रपट भाष्य करतो. त्यासाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या आणि त्यामुळं देशातल्या युद्धजन्य भागात अडकलेल्या जोडप्याची कथा मांडण्यात आली. इथंही युद्धाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून आपला फायदा करून घेणारी यंत्रणा आहेच. हे जोडपं अशाच संकटात सापडतं, मात्र एक छायाचित्रकार त्यांना मदत करतो. युद्धभूमीतून बाहेर पडण्याचा या तिघांचा हा प्रवास अंगावर रोमांच उभे करतो.

युक्रेन याच देशाच्या यादवीच्या पार्श्‍वभूमीवर फुलणाऱ्या प्रेमाची कथा सांगणारा "व्हेन द ट्रीज फॉल्स' वेगळा चित्रपट ठरला. या चित्रपटात पारंपरिक मूल्यं पाळणाऱ्या घरातली तरुणी लॅरिसा आणि तिचा जिप्सी प्रेमी स्कार यांची अनोखी प्रेमकथा दाखवण्यात आली. गावातले लोक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या स्कारवर प्रेम करण्याच्या आरोपावरून लॅरिसावर बहिष्कार टाकतात. ती स्कारबरोबर पळून जाण्याची योजनाही आखते. मात्र, ही योजना असफल झाल्यावर तिची परिस्थिती अधिक बिकट बनते. स्कार गुन्हेगारी जग सोडून लॅरिसासाठी पुन्हा सामान्य आयुष्य जगण्याचा निर्णय घेतो. त्यांच्या प्रेमाची परीक्षा पाहणारे अनेक प्रसंग येतात आणि त्यातून यशस्वी होण्यासाठी त्यांची धडपड किती यशस्वी होते, हे चित्रपटाच्या उत्तरार्धात दाखविण्यात आलं. युक्रेनमधलं भीषण दारिद्रय आणि वंशवाद, तसंच घनदाट जंगलांतलं छायाचित्रण, वेगवान कथानक आणि शेवट यांमुळं चित्रपट वेगळा ठरला. लॅरिसाची भूमिका साकारणाऱ्या ऍनास्ताशिया पुश्‍तोवितला महोत्सवातल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. "इ मा योव्ह' या मल्याळी चित्रपटात अंतिम संस्कारांची प्रथा आणि त्यामागची मानसिकता यांवर उपरोधिक भाष्य करण्यात आलं. या चित्रपटासाठी लिजो जोस पेलिस्सरी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा, तर चंबन विनोद यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

नोकरी आणि नातं
जगभरातल्या युद्धांचं वार्तांकन करणारा पती आणि तो कायमच मरणाच्या दारात असल्यानं संतुलन गमावून बसलेल्या पत्नीची गोष्ट सांगणारा "53 वॉर्स' हा चित्रपट नात्यांतले अनेक पदर उलगडून दाखवणारा ठरला. कुटुंब आणि पैशांसाठी प्राण पणाला लावून नोकरी करणाऱ्या आजच्या अनेक कुटुंबप्रमुखांची कथा मांडणारा हा सायको थ्रिलर नोकरी आणि नातं या संबंधावर छान भाष्य करून गेला. "अवर स्ट्रगल' या बेल्जिअमच्या चित्रपटातही वर्कोहोलिक पतीमुळं त्याची पत्नी मानसिक संतुलन हरवून बसते आणि घर सोडून जाते. नोकरी, दोन मुलांच्या जबाबदारीच्या कचाट्यात अडकलेल्या पतीला अनेक गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते, अशी चित्रपटाची कथा. "अ ट्रान्सलेटर' या रशियाच्या चित्रपटामध्ये एका प्रोफेसरला नोकरी गमवावी लागते व त्याला एका रुग्णालयात चर्नोबिल दुर्घटनेत कर्करोगानं ग्रस्त मुलांचा भाषांतरकार म्हणून काम मिळतं. या कामात मानसिक व शारीरिकरीत्या गुंतल्यानं त्याचं आपल्या चित्रकार पत्नीकडं झालेलं दुर्लक्ष व त्यामुळं कुटुंबात निर्माण झालेल्या कलहाची कथाही नात्याचे वेगळेच पैलू उलगडून दाखवणारी ठरली.

जाफर पनाही आणि विसंगती!
इराणचे दिग्दर्शक जाफर पनाही त्यांच्या साध्या आणि सोप्या कथा व त्यातून दाखवलेली जीवनाची विसंगती यासाठी जगभर विख्यात आहेत. "द मिरर', "ऑफसाइड' आणि "टॅक्‍सी' यांसारख्या चित्रपटांमुळं ते भारतीय प्रेक्षकांनाही परिचित आहेत. त्यांच्या "थ्री फेसेस' या चित्रपटात खेडेगावात राहणारी एक युवती पालकांनी तेहरानमधल्या नाट्य अकादमीमध्ये प्रवेश घेण्यास मज्जाव केल्यानं स्वतःच्या आत्महत्येचा व्हिडिओ तयार करते आणि प्रख्यात अभिनेत्री बेहनाज जाफरीला पाठवते. चित्रपटाच्या चित्रणामध्ये व्यग्र असलेल्या बेहनाजला व्हिडिओ मिळताच ती अस्वस्थ होते आणि निर्माता जाफर पनाही यांच्याबरोबर या मुलीच्या गावाकडं जायला निघते. या मुलीच्या शोधासाठीच्या प्रवासात या दोघांना अनेक भन्नाट नमुने भेटतात आणि त्या मुलीपर्यंत पोचेपर्यंत कथा अनेक वळणं घेते. इराणमधली नागरिकांची मानसिकता, खेड्यांमध्ये कोणत्याही सुविधा न पोचल्यानं तिथल्या नागरिकांत आलेला तुसडेपणा, फिल्मी लोक आपल्याला मदत करतील म्हणून नागरिकांनी त्यांच्यासमोर मांडलेली गाऱ्हाणी यांसारखे अनेक नर्मविनोदी प्रसंग चित्रपटात येतात. आत्महत्येचा व्हिडिओ टाकलेल्या मुलीचं वास्तव, तिच्या घरच्यांना या दोघांनी दिलेला धडा हा चित्रपटाचा शेवटही भन्नाट.

युनेस्को गांधी पदक
"वॉकिंग विथ द विंड' या प्रवीण मोरछले दिग्दर्शित लडाखी चित्रपटाला आयसीएफटी युनेस्को गांधी पदकानं सन्मानित करण्यात आलं. वर्गात दंगा करताना एका दहा वर्षांच्या मुलाकडून त्याच्या मित्राची खुर्ची मोडते. ती दुरुस्त करण्यासाठी त्यानं केलेल्या प्रयत्नांची निरागस गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली. पहाडी लोकांची जीवनशैली दाखवताना निवडलेले प्रसंग, मुलांचं निष्पाप जगणं या गोष्टी चित्रपटात नेमकेपणानं टिपण्यात आल्या. केवळ झाडांची सळसळ, झऱ्यांचा आणि वाऱ्याचा आवाज याचा संगीतासाठी उपयोग करीत मांडलेलं कथानक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेलं आणि चित्रपटाला मानाचा पुरस्कारही मिळाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahesh bardapurkar write iffi article in saptarang