लाभले अम्हांस भाग्य.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Shrikant Bahulkar

लाभले अम्हांस भाग्य....

ख्यातनाम संस्कृतज्ज्ञ, बौद्ध विद्येचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. श्रीकांत बहुलकर यांना नुकताच श्री. ग. माजगावकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या निमित्ताने...

गोष्टी जेव्हा आपल्या खूप जवळ असतात आणि आपला त्यांच्याशी रोजच संबंध येतो तेव्हा बरेचदा त्याचं मोठेपण ध्यानी येत नाही. प्रा. डॉ. श्रीकांत बहुलकर यांना नुकतेच दोन सन्मान जाहीर झाले तेव्हा ही बाब प्रकर्षानं जाणवली. १५ जुलैला सरांना ऑक्सफर्ड विद्यापीठाची मानाची वरिष्ठ फेलोशीप मिळाली; पुढच्याच आठवड्यात (ता.२१) श्री. ग. माजगावकर पुरस्कारासाठीही सरांची निवड झाली. सरांना २०१४-१५चा साहित्य अकादमीचा भाषा सम्मान जाहीर झाला, त्याही वेळी अशाच भावना मनात दाटून आल्या होत्या. २०१९ मध्ये त्यांना दिलेल्या महामहोपाध्याय पां. वा. काणे सुवर्णपदक प्रदान सोहळ्याचा मी साक्षीदार होतो. या सर्वच प्रसंगी सुरेश भटांनी लिहिलेली ‘लाभले अम्हांस भाग्य’ हीच ओळ मनात रुंजी घालते.

बहुलकर सरांचा आणि माझा परिचय झाला तो टिळक महाराष्ट्र विद्यापीठात ते प्राचार्य असताना. १९९२-९३ मध्ये मी तिथे पारंगत करत असताना जरी मला त्यांच्याकडे थेट शिकता आलं नाही तरी नंतर १९९७ मध्ये सरांबरोबर बोधिचर्यावतार हा आचार्य शांतिदेवांचा प्रसिद्ध बौद्ध ग्रंथ त्यावरील भाष्यासहित वाचण्याची संधी मला लतामुळे मिळाली. लता ही माझी पत्नी, सरांची थेट विद्यार्थिनी. त्यावेळी प्रथमच सरांच्या विद्वत्तेचा आणि त्यांच्या संस्कृत भाषा आणि बौद्ध साहित्याविषयीच्या प्रेमाचा साक्षात्कार झाला. सर इतके भावविभोर होऊन बोधिचर्यावतार शिकवत की, ते ऐकताना अनेकदा माझ्या अंगावर रोमांच आल्याचं अजूनही स्पष्टपणे आठवतंय. त्यावेळी जुळलेला हा ऋणानुबंध उत्तरोत्तर दृढ झाला. लतासाठी ते पित्यासमान होतेच, पण पुढे आमच्या कुटुंबाचा अविभाज्य घटकच बनले.

वैदिक, बौद्ध साहित्यावर काम

वैदिक साहित्य, खास करून अथर्ववेदाच्या क्षेत्रातील सरांचे काम जगविख्यात आहे. देशोदेशीच्या विद्यापीठांमध्ये, विद्वत्परिषदांमध्ये त्यांनी विषयावर अनेक कार्यशाळा घेतल्या, व्याख्याने दिली. त्यांचे लिखाण अनेक ग्रंथांमधून व संशोधन नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहे. १९७८ मध्ये सरांना जपानच्या नागोया विद्यापीठात बौद्ध तंत्रांचा अभ्यासासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांचा बौद्ध अध्ययन क्षेत्रात प्रवेश झाला. प्रा. ताचिकावा यांच्यासारख्या बौद्ध तंत्र विषयातील श्रेष्ठ विद्वानाच्या सान्निध्यात व नंतर पुण्यातील प्रा. व्ही. व्ही. गोखले यांच्या सोबतीत सरांचा या क्षेत्रातील अभ्यास वाढला व बहरला. बौद्ध संस्कृत ही विलक्षण भाषा आहे. त्यात आपल्याला पाली, प्राकृत व वैदिक संस्कृताची अनेक वैशिष्ट्यं आढळतात. सरांच्या वैदिक संस्कृताच्या ज्ञानाचा या क्षेत्रात काम करताना त्यांना खूपच उपयोग झाला. १९९३ मध्ये सारनाथ येथील केंद्रीय उच्च तिब्बती शिक्षा संस्थानचे तत्कालीन संचालक प्रा. समधोंग रिन्पोछे यांनी बौद्ध तंत्र ग्रंथांच्या चिकित्सक आवृत्तीच्या कामी मदतीसाठी सरांना खास सारनाथला बोलावून घेतले. तेथील सहकाऱ्यांच्या सोबतीने सरांनी विमलप्रभा या कालचक्रतंत्रावरील टीकेच्या शेवटच्या दोन भागांचे संपादन केले. तीन वर्षं सारनाथमध्ये राहिल्यानंतर सर जरी पुण्यात आले तरी या विषयातील त्यांचे काम पुढेही चालूच राहिले. प्रा. नवांग समतेन हे तिब्बती संस्थानाचे कुलगुरू झाल्यानंतर सरांनी दुर्लभ बौद्ध ग्रंथ शोध अनुभागाचे प्रमुख म्हणून सहा वर्षे काम पाहिले. २०१२ मध्ये पत्नीच्या निधनानंतर मात्र सरांनी पुण्यातच राहण्याचा निर्णय घेतला.

भारतातील संस्कृतचे अध्ययन हे केवळ वेद, उपनिषदे, दर्शने आणि महाकाव्यं एवढ्यापुरतं मर्यादित असल्याने बौद्ध संस्कृतच्या क्षेत्रात काम करणारे विद्वान भारतात अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतके. महाराष्ट्राला व्ही. व्ही. गोखले, पु. वि. बापट, आणि प. ल. वैद्य यासारख्या बौद्ध संस्कृताच्या विद्वानांची परंपरा लाभली आहे. आज बहुलकर सर या परंपरेचे एकमेव वारस म्हणावे लागतील.

उत्तम भाषांतरकार

महाराष्ट्रात बौद्ध संस्कृताच्या अभ्यासाला चालना मिळावी, या उद्देशाने सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही विभागात फ्रॅंकलिन एजर्टन यांच्या बौद्ध संकर संस्कृत पाठमालेच्या मराठी संस्करणाचा प्रकल्प हाती घेतला. या पाठमालेत मराठी अनुवादासोबत बौद्ध संस्कृत शब्दांच्या अर्थाविषयी आणि त्या भाषेच्या व्याकरणासंबंधीच्या मौलिक टिपा समाविष्ट केल्या आहेत. हे काम करताना बौद्ध संस्कृतावरील व त्यातील छंदःशास्त्रावरील त्यांच्या प्रभुत्वाचा प्रत्यय मी वारंवार घेतला आहे. या प्राचीन साहित्याचे मराठी भाषांतर करताना मला त्यांच्यात उत्तम भाषांतरकाराचे दर्शन घडले. लवकरच ही पाठमाला वाचकांना अभ्यासासाठी उपलब्ध होईल. सरांनी संस्कृतमध्येही अनेक उत्तमोत्तम रचना केल्या आहेत.

सरांनी ज्या आत्मीयतेने विविध ज्ञानशाखांचा संग्रह केला तेवढ्याच आत्मीयतेने लोकसंग्रहही केला. त्यांचा मित्रपरिवार, ज्यात त्यांचे विद्यार्थीही येतातच, इतका मोठा आहे की जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी त्यांची आपली म्हणून म्हणावी अशी घरं निर्माण झाली. सरांसोबत कुठेही जा, त्यांच्या ओळखीचं कोणी ना कोणी भेटतंच आणि बहुलकर, तुम्ही इथे? असा प्रश्न अचानकच कुठून तरी कानी पडतो. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना ते आपल्यातलेच वाटतात. मग सरांना पुरस्कार मिळाल्याच्या बातम्या जेव्हा येतात तेव्हा अचानकच जाणवतं की आपण केवढ्या मोठ्या भाग्याचे धनी आहोत. आणि सहजच ओठांवर शब्द येतात - लाभले अम्हांस भाग्य.

- महेश देवकर

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पाली भाषा विभागाचे प्रमुख आहेत)