मोठेपणा ‘तेंडुलकरी दृष्टी’चा

महेश एलकुंचवार, ज्येष्ठ नाट्यलेखक
शनिवार, 19 मे 2018

विजय तेंडुलकरांच्या नाटकातील जोरकसपणा, त्यातला ताजेपणा, कोणत्याही प्रश्‍नाकडे अनपेक्षित कोनामधून पाहणारी खास तेंडुलकरी दृष्टी आजही आपल्या मनाचा कब्जा घेऊ शकते. तेंडुलकर नसते तर त्यांच्यानंतर आलेल्या आम्ही कशाप्रकारचे लिहिले असते, असा प्रश्‍न कधी कधी मनात येतो. यातच तेंडुलकरांचे मोठेपण.

विजय तेंडुलकरांच्या नाटकातील जोरकसपणा, त्यातला ताजेपणा, कोणत्याही प्रश्‍नाकडे अनपेक्षित कोनामधून पाहणारी खास तेंडुलकरी दृष्टी आजही आपल्या मनाचा कब्जा घेऊ शकते. तेंडुलकर नसते तर त्यांच्यानंतर आलेल्या आम्ही कशाप्रकारचे लिहिले असते, असा प्रश्‍न कधी कधी मनात येतो. यातच तेंडुलकरांचे मोठेपण.

मराठी नाटकाचा विचार करताना तेंडुलकरपूर्व व तेंडुलकरोत्तर असे दोन स्पष्ट कालखंड लक्षात येतात. तेंडुलकरांनी मराठी नाटकाचा चेहरामोहरा इतक्‍या निर्णायक पद्धतीने बदलवला की कोंडीत सापडल्यासारखे मराठी नाटक सगळी मरगळ झटकून एकदम ताजेतवाने झाले व नव्या दिशेने नव्या उत्साहाने ते वाटचाल करू लागले. 

पण खूप लोक समजतात तसा तो अपघात नव्हता व हा बदल आणि हा बदल घडण्यासाठी कारणीभूत ठरलेले तेंडुलकर काही आगापिछा नसताना घडले, असे काही नाही. तेंडुलकर १९५७-५८च्या सुमारास लिहू लागले. त्याआधीच नवकथा, नवकविता, नवसमीक्षा बहरून आलेली होती व मराठी साहित्यविश्‍व एका नव्या उजाळ्याने भरून गेलेले होते. सर्व वातावरणातच नव्याचा शोध, प्रयोगशीलता व आधुनिकता यांचे नवे वारे वाहू लागले होते.

तेंडुलकरांच्या आगमनाला ही सर्व पार्श्‍वभूमी होती व ती सशक्त होती. या सर्व बदलाचा पहिला हुंकार मराठी नाटकात ऐकू आला तो तेंडुलकरांच्या रूपाने. ही पार्श्‍वभूमी नसती, तर तेंडुलकरांनी जे व जसे लिहिले तसे लिहिले असते का, असा प्रश्‍न मनात आल्यावाचून राहत नाही. मर्ढेकरांनंतर गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगुळकर, विंदा करंदीकर ही मंडळी या नव्या क्रांतीची पाईक होती व ती तेंडुलकर येण्याआधी सुप्रतिष्ठितही झाली होती, हे लक्षात घेतले की तेंडुलकरांच्या लेखन प्रेरणांच्या नावीन्याचा स्रोत कुठे आहे त्याचा निश्‍चित उलगडा होतो. 

नाटकातला बदल इतर माध्यमांपेक्षा नेहमीच थोडा सावकाश, थोडा उशिरा होतो. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे नाटक या घटनेतला प्रेक्षकांचा सहभाग. तोच नसला, तर नवे नाटक कितीही क्रांतिकारी असले तरी पडून राहील. नुसती संहिता क्रांतिकारी असून चालत नाही, तर ती प्रयोगक्षम हवी व प्रेक्षकांच्या मनोधारणांना आवाहन करणारी हवी. हे तर खरेच, पण तिचे जुन्याशी असलेले नातेही ती मध्ये जाणवत असल्यास प्रेक्षक ती पटकन स्वीकारतात. 

तेंडुलकरांनी नवीन प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला, कारण त्यांना या सगळ्या गोष्टी साधल्या होत्या. त्यांच्या ‘श्रीमंत’ या नाटकाचा गाभा आधुनिक होता, त्यातली व्यक्तिदर्शने सांकेतिकतेच्या चौकटी मोडून स्वतंत्र, आधुनिक मनांनी जगत होती; पण ही सर्व आपल्यासमोर आली ती पारंपरिक तीन अंक, वास्तववादी मांडणी या स्वरूपातच. त्यामुळे हे नाटक बघताना नव्या प्रेक्षकांना तसे ओळखीचेही वाटत होते व त्याचवेळी नवीनही. प्रेक्षकांना हादरवून टाकील व नाटकाविषयीच्या आपल्या कल्पना ते तपासून त्या बदलवून टाकतील अशी त्यांची सुरवातीची नाटके नव्हती. ते त्यांनी नंतर केले. ‘सखाराम बाइंडर’ने महाराष्ट्र हादरला व ‘घाशीराम कोतवाल’ने मोहरला. ‘घाशीराम’मध्ये तर प्रथमच निग्रहाने ते नव्या नाट्यशैलीची घडण करताना दिसतात. त्यानंतर मात्र त्यांनी ते पुन्हा केलेले नाही. त्याची त्यांना गरजही वाटली नाही. त्यांना सांगादाखवायचे असे तेच इतके नवे, प्रक्षोभक असे, की दृश्‍यात्मकतेच्या नव्या परी न शोधताही ते त्यांना सांगता येत असे. 

कोणत्याही नाटककाराचा नाट्यविचार, त्याची नाटकाविषयीची धारणा आधीच तयार होती व तीनुसार तो लिहू लागला असे होत नाही. लिहिता लिहिताच तो स्वतःला शोधत जातो, परंपरेतले आपल्याला काय हवे, काय नको याचा निर्णय घेत जातो, स्वतःला घडवत जातो. हा अखंड चालणारा, न संपणारा प्रवास आहे. आर्तोने आधी नाट्यविषयक संकल्पना मांडली व त्यानुसार तो नाटके करू लागला किंवा ग्रोटोवस्कीने ज्याप्रमाणे नाटकाचे स्वतःचे तत्त्वज्ञान तयार करून त्याप्रमाणे आपली नाटके घडवली असे काही बहुसंख्य नाटककारांच्या बाबतीत म्हणता येत नाही. बेकेट, आयनेतू हे दोन-चार अपवाद. 

असे असले तरी तेंडुलकरांचे समग्र नाट्यविश्‍व डोळ्यासमोर आणले, की त्यातला जोरकसपणा, त्यातला ताजेपणा, कुठल्याही प्रश्‍नाकडे अनपेक्षित कोनामधून पाहणारी खास तेंडुलकरी दृष्टी आजही आपल्या मनाचा कब्जा घेऊ शकतात. तेंडुलकर नसते तर त्यांच्यानंतर आलेल्या आम्ही कशाप्रकारचे लिहिले असते, असा प्रश्‍न कधी कधी मनात येतो. यातच तेंडुलकरांचे मोठेपण.

Web Title: mahesh elkunchwar article vijay tendulkar