त्वचेखालील तंत्रज्ञानाने व्यवहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्वचेखालील तंत्रज्ञानाने व्यवहार

तंत्रज्ञानाचा विस्तार इतक्या वेगाने होत आहे, की आपल्या आयुष्याला तंत्रज्ञानाने जणू झपाटले आहे.

त्वचेखालील तंत्रज्ञानाने व्यवहार

- मालिनी नायर

बाजारातील खरेदी, रेल्वेस्थानकावरील तिकीट किंवा विमानतळावर सादर करायचे ओळखपत्र, या सर्व बाबी कोणतेही कार्ड, रोख रक्कम, कागदपत्रे, स्मार्टफोनशिवाय करता आले तर... कल्पनेपलीकडील वाटणारी ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. तुमच्या हाताच्या त्वचेखाली बसवण्यात आलेल्या एका छोट्याशा चीपमुळे सर्व व्यवहार आता एका क्षणात होणार आहेत. ‘वॉलेटमोर’ कंपनीने इंटिग्रेटेड सर्किट आणि रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन ट्रान्सपॉन्डर यंत्रणेच्या साह्याने चालणाऱ्या चीपमध्ये संबंधित व्यक्तीची ओळख, वैद्यकीय माहिती, औषधे, अॅलर्जी आणि संपर्क माहिती साठवली जाते.

तंत्रज्ञानाचा विस्तार इतक्या वेगाने होत आहे, की आपल्या आयुष्याला तंत्रज्ञानाने जणू झपाटले आहे. आपल्या खिशातील स्मार्टफोन असो, मनगटावरील स्मार्टवॉच असो, की कानातील स्मार्ट इअरफोन. कल्पना करा, की वेगाने वाढत जाणारे हे तंत्रज्ञान आपल्या शरीरातच बसवले असेल तर? ही चीप आपल्यावर वैद्यकीय देखरेख म्हणून नाही, तर आपले दैनंदिन आयुष्य अधिक सुखकर करण्यासाठी बसवली जाणार आहे. आतापर्यंत स्वप्नवत वाटणारे हे तंत्रज्ञान ‘वॉलेटमोर’ या ब्रिटिश-पोलिश कंपनीने सत्यात उतरवले आहे. इंटिग्रेटेड सर्किट यंत्रणा आणि रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन (आरएफआयडी) ट्रान्सपॉन्डर असलेली ही चीप माणसाच्या त्वचेखाली बसवली जाते. या चीपमुळे कोणत्याही ठिकाणी गेल्यास आपल्याला खिशातील पाकीट, ओळखपत्र, फाईल आदी सोबत बाळगायची गरज नाही, असा दावा कंपनीने केला आहे. एका सिलिकेट ग्लासच्या आवरणात गुंडाळून ही चीप माणसाच्या त्वचेखाली लावली जाते. या चीपला एक विशिष्ट ओळख क्रमांक असतो. जो बाह्य डेटाबेसमधील माहितीशी जोडलेला असतो. त्यात संबंधित व्यक्तीची ओळख, वैद्यकीय माहिती, औषधे, अॅलर्जी आणि संपर्क माहितीचा समावेश असतो.

‘वॉलेटमोर’ कंपनीने विकसित केलेल्या या चीपचे वजन एक ग्रॅमपेक्षाही कमी आहे. तांदळाच्या दाण्यापेक्षा थोडासा मोठा आकार असलेल्या या चीपची किंमत ३०० डॉलर इतकी आहे. बायोपॉलिमरसारख्या प्लास्टिकचे वेष्टण या चीपभोवती असून त्याच्या कार्यप्रणालीसाठी कुठल्याही ऊर्जेची गरज नाही. तसेच या चीपमध्ये स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या निअर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय कंपनीने आणखी एक आरएफआयडी तंत्रज्ञानावर आधारित मायक्रोचीप तयार केली आहे. त्यातील तंत्रज्ञान क्रेडिट-डेबिट कार्ड किंवा दरवाजा उघडण्याच्या ‘स्कॅन की’प्रमाणे असते. चीप त्वचेखाली बसवण्याची प्रक्रिया खूपच सोपी आणि बिनत्रासाची आहे. एखाद्याला चिमटा काढल्यावर त्रास व्हावा, इतकाच त्रास चीप बसवताना होत असल्याची प्रतिक्रिया काही लाभार्थ्यांनी दिली. शक्यतो ही चीप हाताच्या अंगठ्याच्या वरच्या बाजूला बसवली जाते. ती बसवण्यासाठी लस दिल्याप्रमाणे इंजेक्शनचा वापर केला जातो.

रोपण केलेली चीप डिजिटल वॉलेट अॅपद्वारे कार्यान्वित केली जाते. त्यामुळे संबंधित व्यक्ती जगभरातल्या कुठल्याही कार्ड रीडरपुढे हात फिरवून पेमेंट करू शकतो. आतापर्यंत २०० व्यक्तींच्या त्वचेखाली चीप बसल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही चीप सध्या तरी इंग्लंड, स्वित्झर्लंड आणि इतर युरोपीयन देशांमध्ये विक्रीस उपलब्ध आहे.

मानवी शरीरात चीप बसवण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नाही. १९९८ साली रिडींग विद्यापीठातील केविन वॉरविक या प्राध्यापकाने अशा प्रकारची चीप दंडात बसवून घेतली होती. विद्यापीठातील त्याच्या हालचाली संगणकावर टिपल्या जातात का, हे त्याला याद्वारे पाहायचे होते. त्यानंतर २००० मध्ये फ्लोरिडाच्या अप्लाईड डिजिटल सोल्युशन्सद्वारे अशा प्रकारची चीप तयार करण्यात आली. ती सुरुवातीला ‘वेरिचीप्स’, तर पुढे ती ‘पॉझिटिव्ह आयडी’ म्हणून ओळखली गेली. ही चीप काही लोकांच्या शरीरात बसवण्यात आली. ती लोकप्रिय झाल्यानंतर २००४ नंतरी तिला एफडीएची मंजुरी मिळाली.

अंपगत्व असलेल्या व्यक्तींसाठी ही मायक्रोचीप अत्यंत उपयोगी आहे. विंचस्टर विद्यापीठातील प्राध्यापक स्टीव्हन नॉर्दम यांनी ‘बायोटेक’ नावाची एक फर्म सुरू केली होती. त्यात त्यांनी अपंग व्यक्तींसाठी एक चीप बनवली. तिच्या मदतीने संबंधित व्यक्ती दरवाजा उघडू शकत होती. (व्यक्ती दरवाज्यानजीक गेल्यास तेथील सेन्सरकडून चीप स्कॅन केली जाते.) दरम्यान, कोविडमुळे अर्थचक्राचे गाडे रुतले असतानाही या कंपनीने ५०० हून अधिक चीपची विक्री केली. २०१८ मध्ये स्वीडनच्या चार हजारपेक्षा जास्त लोकांनी आपल्या हातात चीप बसवली होती. २०१८ मध्ये ‘बायहॅक्स इंटरनॅशनल’ या कंपनीने मायक्रोचिपिंगच्या बाजारात आपली हुकूमत गाजवली. ही कंपनी जोवान ओस्टरलॅंड यांनी स्थापन केली होती. ‘बायोहॅक्स’च्या उत्पादनाचा बहुतेक कच्चा माल स्टॉकहोम येथून येत असे. त्या काळात या कंपनीने बाजारात जोरदार मुसंडी मारली होती. एका इमारतीतील सर्व लोक इमारतीतील सर्व कामे चीपद्वारे अॅक्सेस करतात.

तंत्रज्ञानाचे फायदे

आपल्या घराचा, कार्यालयाचा दरवाजा उघडण्याची आपल्याला नेहमीच गरज भासते. दुकानात, सुपरमार्केटमध्ये खरेदी केल्यानंतर पेमेंट करावे लागते. जिम, क्लब, कार अॅक्सेस करावी लागते. सार्वजनिक दळणवळणाची सेवा वापरण्यासाठी तिकीट खरेदी करावे लागते. या सर्व कृतींसाठी वेगवेगळ्या उपकरणाची किंवा कार्डची गरज भासते आणि ते कार्ड आपल्याला नेहमी सोबत बाळगावे लागते. याउलट या कामासाठी काही मोबाईल अॅप्सदेखील आहेत; पण ही चीप एखाद्या व्यक्तीच्या हातात बसवल्यास वरील सर्व कृती सहजसोप्या पद्धतीने केल्या जाऊ शकतात. तसेच या चीपमुळे अनेक कार्ड, चाव्या, तिकीट सोबत बाळगण्याची गरज भासत नाही. ही चीप स्वीडनमध्ये इतकी लोकप्रिय झाली की तिथल्या सर्वात मोठ्या रेल्वे कंपनीने आपल्या संगणकांमध्ये तिकिटांऐवजी या चीपचा वापर करण्याचे निश्चित केले आहे. नेदरलँडमध्ये रोटरडॅममधील बाजा बीच क्लब, बार्सिलोनाच्या इतर शाखांमध्ये मायक्रोचिपिंगची परवानगी दिली. क्लबमधील सोयी-सुविधांच्या सहज आणि तत्काळ वापरासाठी, त्यांच्या ऑर्डर्स हाताळण्यासाठी, तसेच पेमेंट करण्यासाठी ही प्रणाली खूपच फायदेशीर ठरत आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवास करताना प्रवाशाची ओळख निश्चित करण्याची प्रक्रिया फारच वेळखाऊ व त्रासदायक असते; मात्र या चीपमुळे आपले पासपोर्ट, ओळखपत्र, परवाना या सर्व बाबी त्यात संग्रहित केल्या जातात. म्हणजे जिथे कागदपत्रे दाखवणे आवश्यक असते, त्या सर्व बाबी चीपच्या साह्याने सादर करता येतात. या प्रक्रियेत पासपोर्ट दाखवण्याऐवजी मायक्रोचीप बसवलेला हात दाखवायचा आहे. यामुळे विमानतळ, रेल्वेस्थानक, बसस्थानकांमध्ये व्यक्तीची ओळख पटवण्याचा वेळ वाचतो. त्याचप्रमाणे मायक्रोचीप एक विशेष कोड तयार करते. त्याद्वारे व्यक्तीची आरोग्यविषयक माहिती, वैद्यकीय इतिहास तपासला जातो. मधुमेह, हृदयविकार, दमा किंवा स्मृतिभ्रंशाचा आजार असलेल्या व्यक्तींसाठी ही चीप फायदेशीर ठरते. यामुळे तातडीच्या परिस्थितीत अचूक वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत होते. अमेझॉन आणि गुगलच्या स्वयंचलित यंत्रणेप्रमाणे ही चीप अनेक उपकरणांसाठी एकमेव नियंत्रक म्हणून काम करते. (उदा. कार सुरू करणे, टीव्ही सुरू करणे, घराचा दरवाजा उघडणे) महत्त्वाची बाब म्हणजे ही चीप परवाना असलेल्या शस्त्राशी जोडली जाऊ शकते. म्हणजे ते शस्त्र केवळ त्याच्या मालकालाच चालवता येईल, अशी त्याची रचना केली जाते. म्हणजे जरी कुणी त्या शस्त्राची चोरी केली तरी मायक्रोचीपशिवाय ते चालवता येणार नाही. सध्या ‘स्मिथ अँड वीसन’ तसेच ‘ब्राऊनिंग’ कंपनीने त्यांच्या बंदुकीत अशी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. याशिवाय त्या शस्त्रामध्ये जीपीएस ट्रॅकर लावल्यामुळे शस्त्र चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास त्याचे अचूक स्थान कळण्यास मदत होते.

इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) तंत्रज्ञानाने जगभरात झपाट्याने बदल घडवले आहेत. २०२० मध्ये जगात इंटरनेटशी जोडलेल्या साधनांची संख्या ३० हजार कोटी होती, ती २०२५ मध्ये ७५ हजार कोटीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे २०३० मध्ये एकट्या अमेरिकेत प्रत्येक व्यक्तीकडे किमान १५ गॅजेट्स असतील. माणसाला व्यक्तिगत सेवा देण्याच्या हेतूने कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेत डेटाचे विश्लेषण केले जाते; पण अशा प्रकारच्या उत्कृष्ट सेवेमुळे व्यक्तीचे खासगीपण मात्र संकटात सापडते.

मायक्रोचीप या सर्व दृष्टीने उपयोगी असली, तरी त्यामुळे खासगीपणाचा भंग होण्याचा मुद्दा उपस्थित होतोच. सरकार आणि इतर प्रशासकीय यंत्रणा व्यक्तीच्या खासगी माहितीशी तडजोड करणार नाहीत, व्यक्तीच्या हालचालींचा पाठलाग करणार नाहीत, याची पूर्णतः खात्री कुणाला आहे? व्यक्तीच्या सर्व हालचालींवर पाळत ठेवल्याने त्याला काही धोका उद्भवणार नाही का? त्यामुळे व्यक्तीची व्यक्तिगत ओळख आणि आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी ही यंत्रणा हॅक होण्याचादेखील मुद्दा आहेच. ही चीप त्वचेच्या आत बसवलेली असते. त्यामुळे शरीरात संसर्ग वाढण्याचा धोका उद्‍भवतोच. तसेच संबंधित व्यक्तीला एमआरआय करायचा असल्यास अडचण येऊ शकते. कारण एमआरआय कक्षात कोणताही धातू नेण्यास परवानगी नसते.

त्यामुळे एकूणच काय तर त्वचेखाली बसवलेली ही चीप अनेक फायदे आणि सोयी पुरवत असली, तरी सुरक्षितता, गोपनीयता जपत नसेल, तर ती निरुपयोगी आहे. यापैकी कुठल्याही बाबीविषयीचा ढिसाळपणा सायबर सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करू शकतो. असे असले तरी तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्याचा आणि घराचा केव्हाच ताबा मिळवला आहे. ही मायक्रोचीप बसवून घेण्यापूर्वी त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांपेक्षा नियमांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच सरकार आणि कंपन्यांनी या तंत्रज्ञानाला लोकांमध्ये घेऊन जाण्याआधी सुरक्षेसंबंधीचे अनेक नियम लोकांसमोर मांडले आहेत. जेणेकरून लोक डेटा चोरीला जाण्याची भीती न बाळगता निर्धास्तपणे या सोयीचा लाभ घेऊ शकतील.

nairmalini2013@gmail.com

Web Title: Malini Nair Writes Dealing With Subcutaneous Technology

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TechnologyMalini Nair
go to top