अभिव्यक्तीची अडवणूक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

attack on salman rashdi

विचारवंतांनी व्यक्त होणे हे त्यांच्यासाठी धोकादायक झाले आहे, याची पुनर्प्रचीती जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने अधोरेखित केले आहे.

अभिव्यक्तीची अडवणूक!

- मालिनी नायर nairmalini2013@gmail.com

विचारवंतांनी व्यक्त होणे हे त्यांच्यासाठी धोकादायक झाले आहे, याची पुनर्प्रचीती जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने अधोरेखित केले आहे. कलाकार आणि लेखकांना दडपण्यासाठी हिंसेचा वापर करण्यास सूट दिली जाऊ शकत नाही. लेखणी ही तलवारीपेक्षा ताकदवान असल्याचे म्हटले जाते, पण भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे धार्मिक भावना आणि राजकीय सत्तेच्या कैचीत सापडले आहे.

बुकर पुरस्कारविजेते लेखक सलमान रश्दी यांच्यावर गेल्या शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये चाकूने वार करण्यात आले. चौटोक्वा संस्थेत भाषण करण्यासाठी जात असतानाच त्यांच्यावर हल्ला झाला. ही संस्था पश्चिम न्यूयॉर्कच्या ग्रामीण भागात बफेलोच्या नैर्ऋत्येस ५५ मैलांवर आहे. सीएचक्यू २०२२ या कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते. रश्दींनी याआधीही या संस्थेत भाषण केलेले आहे. सत्तरीच्या पुढे असणाऱ्या रश्दींचा उपस्थितांना परिचय करून दिला जात असतानाच त्यांच्यावर हल्ला झाला. या हल्लेखोराला तात्काळ पकडण्यात आले. या २४ वर्षांच्या हल्लेखोराचे नाव हादी मातर असे आहे. तो अमेरिकेच्या न्यू जर्सीतील फेअरव्यू येथील रहिवासी आहे. त्याला ओळखणारे सांगतात, की हादी हा शांत आणि स्वतःच्याच कोशात राहणारा मुलगा आहे. तो नुकताच जॉर्डनला गेला होता. तिथून आल्यानंतरच त्याने हा हल्ला केला असे सांगितले जाते, पण याबाबत पुष्टी होऊ शकली नाही. रश्दी यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या मानेवर तीन, तर पोटात चार वार करण्यात आले होते. उजव्या डोळ्याजवळ एक आणि छातीवर एक वार झाला आणि मांडीही कापली गेली. काही दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर रश्दी आता हळूहळू बरे होत आहेत. त्यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी जाऊ शकते, पण आता ते स्पष्ट बोलू लागले आहेत. त्यांची विनोदबुद्धीसुद्धा शाबूत आहे, असे त्यांच्या मुलांनी सांगितले. निर्वासित लेखकांसाठी अमेरिका हे सुरक्षित आश्रयस्थान आहे आणि इथे ते सर्जनशील अभिव्यक्तीस्वातंत्र्य उपभोगू शकतात, असा त्यांच्या भाषणाचा विषय होता, पण त्यांच्याबाबत घडून आला तसा विरोधाभास कोणाबाबतही घडू नये.

रश्दी हे ब्रिटिश नागरिक आहेत. त्यांना साहित्यातील योगदानासाठी ‘नाईट’ या किताबाने गौरवण्यात आले आहे. ‘मिडनाईट्स चिल्ड्रन’ या कादंबरीला १९८१ ला बुकर पुरस्कार मिळाल्यानंतर रश्दी प्रकाशझोतात आले. त्यानंतर ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या त्यांच्या पुस्तकामुळे ते वादात सापडले. हे पुस्तक काही प्रमाणात प्रेषित महम्मद पैगंबरांच्या आयुष्यावर बेतलेले होते, ते महम्मद पैगंबर आणि कुराणाचा अपमान करते असे सांगितले जाते. त्यामुळे जगातील अनेक देशांनी यावर बंदी घातली. सलमान रश्दी आणि पुस्तकाच्या प्रकाशकांना ठार मारावे, असा फतवा १९८९ ला काढण्यात आला. इराणच्या अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी हा फतवा जारी केला होता. इराणमधील इस्लामी क्रांतीचा प्रणेता म्हणून त्यांना ओळखले जात असे.

तसेच त्यांना १९७९ मध्ये स्थापन झालेल्या इस्लामिक प्रजासत्ताकाचा रहबर (पहिला नेता) संबोधले जात असे. ऐतिहासिक आधार घेत त्यांनी ‘वेलात ए फकीह’ (कायदेपंडिताचे पालकत्व) ही संकल्पना मांडली. इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताकामागील प्रेरणा हीच होती. त्यानंतर ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी रश्दींचे पुस्तक जाळून निषेध नोंदवण्यात आला. मुस्लिम जगतामध्ये दंगली झाल्या. ज्यात ६० लोकांचा मृत्यू; तर शेकडो लोक जखमी झाले. पुस्तकाच्या प्रकाशकाची हत्या करण्याचाही प्रयत्न झाला. यानंतर ब्रिटनने रश्दींना २४ तास सुरक्षा पुरवली आणि त्यांना दशकाहून अधिक काळ लपून राहावे लागले. रश्दींनी असे सांगितले होते, की त्यांना इराणकडून दरवर्षी ‘प्रेमपत्र’ मिळत असे. त्यामुळे रश्दी हे जाणून होते, की इराण त्यांना मारण्याची शपथ विसरलेला नाही.

पण १९९८ मध्ये इराणच्या सुधारणावादी राष्ट्रपतींनी सांगितले, की रश्दींचा माग काढण्याचा आणि त्यांना मारण्याचा आमचा हेतू नाही. फतवा रद्द झाल्यानंतर रश्दी जगासमोर आले. नंतर त्यांनी ब्रिटन सोडले आणि अमेरिकेत राहायला गेले. तिथे त्यांनी ६५५ पानांचे ‘जोसेफ अँतोन’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला ब्रिटनचा ललितेतर विभागातील सर्वोच्च पुरस्कार ‘सॅम्युअल जॉन्सन’ मिळाला.

त्यानंतर २०१२ मध्ये एका अर्ध-अधिकृत इराणी धार्मिक संस्थेने रश्दींना मारण्यासाठीची रक्कम २.८ दशलक्ष डॉलर्सवरून ३.३ दशलक्ष डॉलर इतकी वाढवली आणि हा फतवा अमलात आणण्याचा प्रयत्न रश्दींचे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ३४ वर्षांनी शुक्रवारी करण्यात आला. सॅटॅनिक व्हर्सेसचे जपानी भाषेत भाषांतर करणाऱ्या हितोशी इगाराशी यांना ते शिकवत असलेल्या कॉलेज कॅम्पसमध्येच भोसकून ठार मारण्यात आले. या पुस्तकाचे इटालियन अनुवादक एटोरे कॅप्रिओलो यांच्यावर त्यांच्या मिलानमधील अपार्टमेंटमध्ये चाकूने वार करण्यात आले. याचे नॉर्वेजियन प्रकाशक विल्यम नायगार्ड यांच्यावर १९९३ मध्ये त्यांच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला, पण या हल्ल्यातून ते बचावले. पुस्तकाचे तुर्की अनुवादक अजीज नेसिन यांना मारण्यासाठी ते राहत असलेल्या हॉटेलवर जाळपोळ करण्यात आली, यात ३७ जणांचा बळी गेला.

रश्दी किंवा त्यांच्या पुस्तकाशी संबंधित असलेल्यांनाच असा त्रास सहन करावा लागला असे नाही; नव्वदच्या दशकात बांगलादेशच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांनाही लोकांच्या द्वेषाचा सामना करावा लागला. तसेच त्यांच्याविरोधात फतवेही काढण्यात आले. त्यांना त्यांचा देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. सध्या त्या कोलकात्यात राहतात. त्यांना त्यांच्या साहित्य कृतीसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत, पण त्या कधीही मुक्त संचार करू शकतील आणि स्वतःच्या देशात पाऊल ठेवू शकतील याची शक्यता नाही. महायुद्धाच्या काळात जेव्हा नाझींनी ज्यूंचा नरसंहार केला, तेव्हा ऑस्ट्रियन लेखक ह्युगो बेटौअर यांनी ‘द सिटी विदाऊट ज्यूज’ हे पुस्तक लिहिले होते. व्हिएन्नामधील सर्व ज्यूंना हद्दपार केल्यामुळे प्रचंड अनागोंदी माजली आहे आणि यामुळे गंभीर आर्थिक पडझड झाली आहे, असे यात लिहिण्यात आले होते. ह्युगो यांना कम्युनिस्ट समजणाऱ्या नाझींना हे रुचले नाही. त्यांना एका नाझीने गोळी घालून ठार मारले. तसेच हे जर्मन संस्कृतीच्या रक्षणासाठी आवश्यक होते, असे याचे समर्थन केले, पण त्याला शिक्षा झाली नाही. त्याला मनोरुग्ण ठरवून रुग्णालयात पाठवण्यात आले. दोन वर्षांनंतर त्याची निर्दोष सुटका करण्यात आली. आयझॅक बाबेल यांनी भ्रष्टाचाराविरोधात ‘मारिया’ नावाचे नाटक लिहिले होते, जे स्टॅलिनच्या विरोधात असल्याचे समजले गेले. हे नाटक बळजबरी बंद पाडण्यात आले. त्याला ‘अ-मानव’ घोषित करण्यात आले. त्यानंतर त्याला गोळी घालून ठार केले गेले आणि लावारिस वस्तू म्हणून सार्वजनिक कबरीत टाकण्यात आले. पुतीनच्या रशियावर लिहिणाऱ्या अॅना पोलितकोव्हस्काया यांना पुतीन यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच गोळ्या घालून ठार करण्यात आले. सरकारविरोधात लिहिण्यासाठीच त्या ओळखल्या जात असत. त्याआधी त्यांना मारण्याचे नऊ अयशस्वी प्रयत्न झाले होते.

जगभरातील अनेक लेखकांना गेल्या अनेक वर्षांत तुरुंगात टाकण्यात आले आहे. यात इजिप्तमधील अहमद नाजी, गलाल अल बेहेरी, चीनमधील लिऊ शिओबो, नुरमुहेमेट यासिन, शोकजांग, सिरीयामधील फराज अहमद बिरकदार, ताल अल-मल्लौही, तुर्कीमधील रॅमोन एसोनो इबाले, इक्वेटोरियल गिनी, अस्ली एर्दोगान, जॉर्जियामधील इराकली काकबादझे, मलेशियामधील झुनार, इस्राईल व पॅलेस्टाईनमधील डॅरेन टाटूर, सौदी अरेबियामधील अश्रफ फयाद, कतारमधील महम्मद अल-अजामी ही त्यापैकी काही नावे आहेत. या सर्वांनी एक तर प्रस्थापितांविरोधात लिहिले आहे, सत्तेतील सर्वोच्च नेत्याच्या भ्रष्टाचाराबद्दल किंवा धार्मिक श्रद्धांबद्दल लिहिले आहे, ज्याने लोकांच्या भावना दुखावल्या. भारतातही प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसैन यांच्या देवतांच्या चित्रांना वादग्रस्त ठरवले गेले. त्यांच्याविरोधात प्रचंड निदर्शने झाली आणि त्यांना भारत सोडून कतारला जाण्यास भाग पाडले गेले. आमीर खान, अक्षय कुमार आणि कंगना रनौतसारख्या अभिनेते-अभिनेत्रींवर बहिष्कार टाकला जातो. खरे तर या कलाकारांच्या कामांवर बहिष्कार टाकण्याच्या लोकांच्या अधिकाराच्या विरोधात मी नाही, जोपर्यंत कलाकारांना किंवा त्यांच्या जवळच्या लोकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात नाहीत. लोकांना वाटेल त्या गोष्टीवर आणि व्यक्तीवर बहिष्कार टाकण्याचा अधिकार आहे.

जगातील सर्व साहित्यिक रश्दी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत आहेत. या पार्श्वभूमीवर इराणी सरकारकडून आलेले विधान निराशाजनक म्हणावे लागेल. दूरचित्रवाणीवरील एका पत्रकार परिषेदत इराणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानी यांनी सांगितले, की या हल्ल्यात इराणचा हात नाही, पण त्यानंतर ते म्हणाले, की या हल्ल्याला रश्दी स्वतः आणि त्यांचे समर्थकच जबाबदार आहेत. दुर्दैवाने, लेखन हे खरोखरच एक धोकादायक काम बनले आहे. कादंबरी, समाजमाध्यम, कविता, गीत, पत्रकारिता आणि ब्लॉग या सर्वांमुळे लेखकांच्या जीवनात वादळ येऊ शकते. कोणताही पूर्वग्रह बाळगला नाही, तरच भाषण आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा हक्क बजावला जाऊ शकतो. याचा अर्थ असा नाही, की कलाकार आणि लेखकांनी लोकांच्या भावनांविषयी बेजबाबदार असावे, पण कलाकार आणि लेखकांना दडपण्यासाठी हिंसेचा वापर करण्यालाही सूट दिली जाऊ शकत नाही. लेखणी ही तलवारीपेक्षा ताकदवान असल्याचे म्हटले जाते. आजच्या युगात तर सत्यापेक्षा काहीच महत्त्वाचे असू शकत नाही. पुस्तकांच्या पानांवर, इंटरनेटवर शब्द रेंगाळत राहतात आणि त्यांच्यात सामर्थ्य असेल तर ते हळूहळू पसरतातच. त्यामुळे लेखकाचे काम सोपे आहे असे म्हणणे हे पृथ्वी विश्वाची केंद्र आहे असे म्हणण्याइतकेच खोटे आहे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे धार्मिक भावना आणि राजकीय सत्तेच्या कैचीत सापडले आहे. सध्या हा तराजू विरुद्ध दिशेला झुकला आहे. जोपर्यंत जग इतिहासातील पूर्वग्रह, राजकीय आणि धार्मिक दडपण झुगारून देत नाही, तोपर्यंत हा तराजू संतुलित होणार नाही.

हल्ल्यानंतर सावरताहेत सलमान रश्‍दी

  • रश्‍दी यांच्या मानेवर तीन, पोटात चार वार करण्यात आले होते.

  • उजव्या डोळ्याजवळ एक आणि छातीवर एक वार झाला आणि मांडीही कापली गेली.

  • काही दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर रश्दी आता हळूहळू बरे होत आहेत.

  • त्यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी जाऊ शकते, पण आता ते स्पष्ट बोलू लागले आहेत.... हळूहळू ते सावरताहेत...

  • रश्दी याच्या पुस्तकाशी संबंधित असलेल्यांनाच त्रास सहन करावा लागला असे नाही; नव्वदच्या दशकात बांगलादेशच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांनाही द्वेषाचा सामना करावा लागला. त्यांच्याविरोधात फतवेही काढण्यात आले.