जगण्याच्या शोधात निर्वासित

ज्या प्रदेशात आपण जात आहोत तिथे सुरक्षित जागा मिळेल का, याचा विचार न करता लोक प्रवास करून धोका पत्करत आहेत.
refugee
refugeesakal

- मालिनी नायर, nairmalin2013@gmail.com

ज्या प्रदेशात आपण जात आहोत तिथे सुरक्षित जागा मिळेल का, याचा विचार न करता लोक प्रवास करून धोका पत्करत आहेत. उपजीविकेलाच धोका असल्याने आपली मातृभूमी सोडत आहेत. ग्रीसच्या समुद्रकिनाऱ्यावर अशाच माणसांना घेऊन जाणारी बोट बुडाली. यात तीनशे पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला. यातून युरोपमध्ये होणारी निर्वासितांची कोंडी उघड झाली. देशांतर्गत कलह, छळवणूक आणि गरिबीमुळे हजारो लोक तिकडे स्थलांतर करत आहेत.

पाकिस्तान सध्या अतिशय वाईट आर्थिक अरिष्टातून जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. २२० दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या दक्षिण आशियाई देशात गेल्या वर्षभरात विकास मंदावला आहे आणि महागाई वाढली आहे. अत्यावश्यक अन्नसाठा आयात करण्यासाठी देशाला मारामार करावी लागली.

परिणामी वितरण प्रणाली विस्कळित झाली. त्यामुळे चांगल्या भविष्याच्या आशेने युरोपची धोकायदायक वाट निवडणाऱ्या पाकिस्तानींची संख्या वाढते आहे. भूमध्य सागरातील सर्वात कठीण मार्ग मानल्या जाणाऱ्या ठिकाणी बुडून मरण पावलेल्या या निर्वासितांसाठी दुःख व्यक्त करण्यासाठी पाकिस्तानी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी तो दिवस राष्ट्रीय दुखवटा म्हणून जाहीर केला.

ही मासेमारी करणारी होडी लीबियाहून इटलीला जात असताना वाटेत ग्रीसच्या किनाऱ्याजवळ उलटली. यात ७५० हून अधिक लोकांना भरलेले होते. सीरिया, इजिप्त आणि पाकिस्तानमधील स्त्री, पुरुष, लहान मुले यात होती. नागरी स्वातंत्र्य, आर्थिक स्थैर्य संकटात सापडल्याने लोकांसमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आणि त्यांना निघून जाणे भाग पडले.

आपल्या अंधकारमय भविष्याला त्यागून युरोपीयन देशांमध्ये चांगल्या आयुष्याच्या आशेने जगण्यासाठी माणसे मिळेल तो पर्याय शोधत आहेत. भूमध्य सागरातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट असल्याचे युरोपियन युनियन कमिशनरने म्हटले आहे. या घटनेमुळे युरोपमध्ये होणाऱ्या बेकायदा स्थलांतराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. २०१६ पासून याच प्रकारे २५ हजार लोकांचे मृत्यू झाले आहेत.

मानवी वाहतूक करणाऱ्या टोळ्या युरोपीयन सीमा ओलांडण्यासाठी सर्वात धोकादायक मार्गाचा वापर करतात. हवाबंद कंटेनरपासून ते बेकार होड्यांपर्यंत. प्रवास करतानाची परिस्थिती ही फक्त बिकटच नसते, तर जीवाला धोका उत्पन्न करणारी असते. तिथे अनेकदा अन्न, पाणी तर नसेतच; पण कैकदा श्वास घ्यायला हवासुद्धा नसते. (अनेकदा हवाबंद कंटेनरमधून माणसे वाहून नेल्याचे प्रकार घडले आहेत.

जेव्हा हे कंटेनर इप्सित स्थळी पोहोचतात, तेव्हा त्यातली निम्मे लोक तर भूकमारी, तहानेने व्याकूळ होऊन, रोगाने किंवा ऑक्सिजनच्या कमरतेमुळे मेलेले असतात.) आणि तरीही दरवर्षी हजारो लोक असा प्रवास करतात. का? कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो.

ग्रीक कोस्ट गार्ड्सच्या भागात अशा प्रकारची दुर्घटना घडल्यामुळे जागतिक नेते, माध्यमे आणि इतर संस्था जोरदार टीका करत आहेत. बेकायदा स्थलांतरितांना किनारपट्टीच्या भागातून ‘टग बोटीं’चा वापर करून हाकलून देण्यासाठी किंवा ग्रीसच्या भागातील समुद्रात या बोटी येऊ न देण्यासाठी ग्रीस जी अनधिकृत कारवाई करतो, त्याला ‘पुश बॅक’ असे संबोधले जाऊ लागले आहे.

ग्रीकच्या सागरी गस्त घालणाऱ्या पथकाकडून अनेकदा अशा जहाजांना अन्न व पाणीपुरवठाही केला जातो; परंतु ते या होड्यांना किनाऱ्यावर येऊ देत नाहीत. कारण सीमेच्या आत आल्यावर या निर्वासितांना शरणार्थींचा दर्जा मिळेल आणि त्यांना आश्रय, सुरक्षा प्रदान करावी लागेल; पण या घटनेत हे जहाज पूर्णतः बुडण्याआधी सात तासांपर्यंत पाण्यात वाहत जात राहिले.

हेही लक्षात घेतले पाहिजे, की रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशातील निर्वासितांना ग्रीस आणि सायप्रसने परवानगी दिली आहे. हे कायदेशीर स्थलांतरित या देशांमध्ये आल्यापासून तिथे रियल इस्टेट आणि इतर व्यवसायांना चालना मिळाली आहे.

युक्रेनियन आणि रशियन नागरिकांना कायदेशीर आश्रय दिला जातो; पण सीरियन, पाकिस्तानी, इजिप्शियन नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी धोकादायक मार्ग पत्करावा लागतो, हे असे का? खरे तर दोन्हीकडील स्थलांतराची कारणे सारखीच आहेत. यात ‘वंश’ ही गोष्ट महत्त्वाची भूमिका बजावते.

आपल्याला आठवत असेल, की गेल्या वर्षी एका प्रख्यात पत्रकाराने आणि राजकारण्याने असे म्हटले होते की, युक्रेनमधील श्वेत केसांच्या, निळ्या डोळ्यांच्या लोकांना वाचवणे आणि त्यांना इतर युरोपीयन देशांमध्ये आश्रय देणे हे स्वतःच्याच लोकांना वाचवण्यासारखे आहे. सीरियन, इजिप्शियन आणि पाकिस्तानी लोक यात बसत नाहीत.

स्थलांतरितांबाबत युरोपीयन देशांचे धोरण वर्षानुवर्षे अधिक कठोर होत आहे. २०१५-१६ मध्ये लाखो स्थलांतरित युरोपच्या दारात दाखल झाले, तेव्हा युरोपने त्यांना सामावून घेण्यात असमर्थता दर्शवली. कारण हे लोक त्यांच्या अर्थव्यवस्थेला काहीही हातभार लावणार नव्हते, तसेच देशातील संसाधनांचा उपभोग मात्र घेणार होते.

ग्रीसच्या किनारपट्टीवर घडलेल्या अपघाताबद्दल युरोपीयन कमिशनने नाराजी व्यक्त केली आहे. पण, वस्तुस्थिती ही आहे की युरोपीयन कमिशनने प्रत्येक युरोपीयन देशाला आपल्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यास सांगितले आहे. जेणेकरून बेकायदा स्थलांतरितांना आत येता येऊ नये.

ज्या देशात स्थलांतर होते त्या देशावरील ओझे वाढते हे आपल्याला दिसते. कोविड, ऊर्जासंकट, युक्रेन-रशिया संघर्ष यामुळे युरोपीयन देशांना याची जाणीव होऊ लागली आहे की, त्यांनी सर्वप्रथम स्वतःचेच हित पाहिले पाहिजे. देशातील करदात्या नागरिकांच्या कुटुंबांच्या सुरक्षेची आणि कल्याणाची काळजी न घेणे हे त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करण्यासारखे आहे.

तसेच याचा निवडणुकीवरही परिणाम होऊ शकतो, जो कोणत्याही राजकीय पक्षाला नको आहे. दुसऱ्या बाजूला आपल्या देशातील आर्थिक संकट, गृहयुद्धे, नागरी संघर्ष यातून सुटका करून घेण्यासाठी जे गरीब देशातील नागरिक जीव धोक्यात घालून स्थलांतर करत आहेत, त्यांनाही मदतीची गरज आहे. जर त्यांना अधिक चांगल्या ठिकाणी आश्रय मिळाला नाही, तर त्यांना राहण्यासाठी ठिकाणच उरणार नाही.

सीरियन लोक मोठ्या राजकीय संकटाला तोंड देत आहेत आणि त्यांच्याच देशात त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला आहे. गेल्या दशकात इजिप्तला मोठ्या प्रमाणात राजकीय आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. आपल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी इजिप्त अजूनही संघर्ष करत आहे. अशाच प्रकारचे आर्थिक संकट आता पाकिस्तानात उभे राहिले आहे.

चांगल्या जगण्याच्या आशेनेच लोक तुलनेने चांगली स्थिती असणाऱ्या प्रदेशाकडे पलायन करतात. आणि या लोकांचा प्रवास काही सोपा नाही. निम्मे-अधिक लोक कधीही अवैध मार्गाने स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत नाहीत. जे करतात त्यांना नेहमीच आश्रय मिळतोच, असे नाही. एकतर त्यांना संघर्षग्रस्त देशांमध्ये परत पाठवले जाते किंवा तुरुंगात टाकले जाते. त्यामुळे हे लोक एकप्रकारे आपले नशीब पणाला लावत असतात.

अशा प्रकारच्या अवैध प्रवासात सामील झाल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची खात्री नसते, अगदी स्वतःच्या जीवाचीही नाही. त्यामुळे ज्यांना असा जीवघेणा निर्णय घेणे भाग पडते त्यांच्यासाठी ते किती कठीण असेल, याची कल्पना करा.

मग यावर उपाय काय? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की जगात संपत्तीचे वाटप हे अतिशय असमान आहे. त्यामुळे अवैध मानवी वाहतूक इतक्या लवकर थांबणार नाही. स्थलांतरित नेहमीच चांगल्या जीवनाच्या आशेने धोकादायक प्रवास करतात आणि युरोप, अमेरिका हे प्रगत देश त्यांना रोखण्यासाठी आपल्या सीमा अधिक बंदिस्त करत नेत आहेत.

मग हे लोक जातील कुठे आणि त्यांच्या मानवी हक्कांचे काय? बेकायदेशीर स्थलांतरितांमुळे पडणारा आर्थिक भार देशांनी उचलावा, अशी अपेक्षा करणे योग्य नाही; पण जे देश आर्थिक संकटाचा सामना करत आहेत, त्या देशात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने निधी वाढवला, तर लोकांना चांगल्या जीवनाच्या आशेने इतर देशांत पळून जाणे कदाचित भाग पडणार नाही.

तसेच, प्रगत राष्ट्रात जाण्यासाठी एक कायदेशीर मार्ग ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून गरीब देशातील लोकांना गरज पडेल तेव्हा एक सुरक्षित जागा मिळेल. संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर आंतरराष्ट्रीय धर्मादाय संस्था दर वर्षी कोट्यवधी रुपये निधी जमा करत असतात. त्यातील काही निधी ते अशा स्थलांतरितांच्या सोयीसाठी का वापरत नाहीत?

जोपर्यंत अशा लोकांचे स्थलांतर घडवून आणण्यासाठी कायदेशीर पावले उचलली जाणार नाहीत, तोपर्यंत ग्रीसच्या किनाऱ्यावरील घटनेसारख्या हृदयद्रावक घटना घडत राहतील. शेवटी मानवता महत्त्वाची आहे आणि जीवन मौल्यवान आहे- मग ते रशियन, युक्रेनियन, सीरियन किंवा पाकिस्तानी कुणाचेही असो. नाहीतर जगात गरीब-श्रीमंत, काळे-गोरे-ब्राऊन ही दरी वाढतच जाईल.

जीवन पवित्र मानले जाते; पण माणसाला जगाच्या एका भागातून दुसऱ्या भागात प्रवेश करण्यासाठी अटी आणि शर्ती लागू केल्या जातात. खरेतर पृथ्वी एकच आहे. हा किती विरोधाभास आहे. जोपर्यंत लोक आपली मानसिकता बदलणार नाहीत, तोपर्यंत देश स्थलांतराबाबत आपली धोरणे बदलणार नाहीत.

जोवर मानवता हेच सर्वात मोठे मूल्य होणार नाही, तोवर आपल्याला युद्धे, राजकीय आणि आर्थिक संकटे, पर्यावरण संकट दिसतच राहतील. लोक आपल्याच घरातून पलायन करत चांगल्या जीवनाच्या शोधात अशा विनाशकारी मार्गावर जात राहतील आणि खुल्या असुरक्षित समुद्रात, खच्चून भरलेल्या जहाजात आपले प्राण गमावत राहतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com