राजकारणासाठी धर्मकारण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजकारणासाठी धर्मकारण!
राजकारणासाठी धर्मकारण!

राजकारणासाठी धर्मकारण!

- मालिनी नायर

धर्म नव्हे, तर राजकारणामुळे हे जग आणि त्यातील लोक अनेक गटांत विभागले गेले आहेत. राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखाद्या अल्पसंख्याक धर्माच्या लोकांना लक्ष्य करण्याची विकृती सध्या सर्वत्रच बळावल्याचे दिसत आहे. सर्वच देशांमधून हे सारे चालू आहे.

भारतीयांची २०२२ ची पहाटच अशा विकृतीने भरलेल्या एका घटनेने उगवली. समाजमाध्यमांवर असलेल्या विविध क्षेत्रातील १०० महिलांच्या छायाचित्रांवर आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्यांना पोलिसांनी गजाआड केले. ‘बुलीबाई’ ॲपवर हे सारे घडत होते. या ॲपवर हे असे उद्योग करणाऱ्यांनी शिख नावांचा वापर केला होता. या बुलीबाईचा पहिला अवतार ‘सुली डील्स’ या नावाने अस्तित्वात आला होता. या ॲपवरही अल्पसंख्याक धर्मीय महिलांच्या छायाचित्रांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली जात होती. समाजमाध्यमांवर कार्यरत असलेल्या नामवंत महिलांची छायाचित्रे यासाठी वापरण्यात आली. या महिलांचा राजकीय आणि सामाजिक प्रभाव आहे. त्या सध्याच्या राजकीय-सामाजिक परिस्थितीवरून सत्ताधारी पक्षाविरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या आहेत.

‘बुलीबाई ॲप’ प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर ॲपचा निर्माता २१ वर्षीय नीरज बिष्णोई याला गुरुवारी दिल्ली पोलिसांनी अखेर अटक केली.

अल्पसंख्याक धर्मीय व्यक्ती वा व्यक्तींना लक्ष्य करण्याचे हे भारतातील पहिलेच उदाहरण नाही. २०२१ हे वर्ष संपत असताना धार्मिक विद्वेष उफाळून आलेला पाहायला मिळाला. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पसंख्याक धर्मीयांविरोधात तिरस्कार पसरविण्यात आला. अल्पसंख्याक धर्मीयांवर हल्ले चढविण्यात आले. हिंसाचाराचा हा काळा अध्याय अगदी नाताळपर्यंत संपलेला नव्हता. नाताळाच्या दिवशी एकमेकांना विविध भेटवस्तू दिल्या जातात. प्रेम वाटले जाते. त्याच दिवशी नेमका हा विद्वेष उफाळून आला. नाताळ साजरा होत असलेल्या विविध राज्यांतील चर्चवर हल्ले चढविण्यात आले. खासकरून आसाममध्ये. धर्मगुरू आणि शुभाशीष घेण्यासाठी उपस्थित लोकांना मारहाण करण्यात आली. नाताळाचा सोहळा काही क्षणांत विस्कटला गेला.

डिसेंबर २०२० मध्ये मध्य प्रदेशात सुमारे ५०० लोकांच्या जमावाने कॅथॉलिक शाळेच्या आवारातील सामानाची तोडफोड केली होती. हातात लोखंडी कांबी आणि दगड घेऊन एक टोळी शाळेत घुसली होती. यात शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हॅटिकन सिटीत जाऊन पोप फ्रान्सिस यांची भेट घेत असताना हे घडत होते, हा त्यातील विचारात घेण्यासारखा एक मुद्दा म्हणावा लागेल. या भेटीतच त्यांनी धार्मिक-जातीय सलोखा जपला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. नाताळचे औचित्य साधून त्यांनी हाच संदेश जनतेपर्यंत पोहोचवला; पण कथनी आणि करणी यातील फरक कळायला सुज्ञांना वेळ लागला नाही. भाजपशासित राज्यांत चर्चमध्ये जाऊन धुडगूस घालणाऱ्या गुंडांचा केसही कुणी वाकडा करू शकले नाही. इतकं की, त्या त्या राज्यांतील भाजप सरकारांनी डोळे मिटून घेतले होते. आग्य्रातील ख्रिश्चन मिशनरी शाळेबाहेरील जागेत सांताक्लॉजचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आल्यानंतरही पोलिस आणि कारभार हाकणाऱ्या यंत्रणांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.

ख्रिश्चनांविरोधातील हिंसाचाराच्या घटनांवर लक्ष ठेवून असलेल्या ‘पर्सेक्युशन रिलिफ’ या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालानुसार, भाजपचे सरकार केंद्राच्या सत्तेत आल्यानंतर म्हणजेच २०१४ नंतर ख्रिश्चनांसंबंधी दुजाभाव वाढण्यास सुरुवात झाली. हे प्रमाण २०१६ ते २०१९ या कालावधीत ६० टक्क्यांनी वाढले. ‘युनाटेड ख्रिस्तीयन्स फोरम’ आणि ‘असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स’ आणि ‘युनायटेड अगेन्स्ट हेटेड’ यांनी सादर केलेल्या एका संयुक्त अहवालात २०२१ वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत अनेक चर्चवर ३०५ हल्ले करण्यात आले. यातील ३२ घटना या एकट्या कर्नाटक राज्यातील आहेत. धर्मांतरविरोधी कायदा संमत करणारे कर्नाटक हे देशातील नववे राज्य आहे. धर्मस्वातंत्र्याच्या हक्काचे संरक्षण कायद्यांतर्गत कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला. प्रलोभनांच्या आधारे अर्थात फसवणुकीच्या मार्गाने वा काहीतरी देऊ (कपडे, पैसे, मोफत शिक्षण इत्यादी) करून एखाद्याचे धर्मांतर घडवून आणणे, हा या कायद्याने गुन्हा आहे. या कायद्याचा भंग करणाऱ्यांना दहा वर्षे कारावासाची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.

हिंदू धर्माचे नेते म्हणवून घेणारे काही जण तर मुस्लिमांना ठार मारण्याची भाषा नेहमीच करतात. उत्तराखंडमधील हरिद्वार येथे नुकतीच धर्मसभा पार पडली. त्यात मुस्लिमांचे तर सामूहिक शिरकाण करण्याची गरळ ओकण्यात आली. यासाठी त्या नेत्याने शस्त्रसज्जतेचीही गरज बोलून दाखवली. त्याचा व्हिडीओ सर्वत्र प्रसारित झाला. अशा धर्मांधांविरोधात कारवाईसाठी राज्य सरकारने एकही प्रभावी पाऊल उचलले नाही. उलट अशा विकृतांना पाठीशी घालण्यासाठी राजकीय शक्तींचा वापर कसा केला जात आहे, हेच त्यातून दिसले. या सभेतील प्रबोधानंद गिरी हे भाजप नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसले. त्यांनी या सभेच्या मंचावरून ‘सफाई’ची भाषा केल्याचेही ऐकिवात आहे. उपस्थित जनसमुदायाला त्यांनी ‘मारा किंवा मरा’ असे आवाहनही केल्याचे बोलले जाते.

अन्य एका वक्त्याने तर बांगलादेशातील रोहिंग्या मुस्लिमांची ‘सफाई’ करण्यासाठी ज्या पद्धतीने लष्करी बळाचा वापर करण्यात आला, तसाच तो भारतातील मुस्लिमांची ‘सफाई’ करण्यासाठी व्हावा, याचे समर्थन केले. अन्य एक वक्ता तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची हत्या करण्याची इच्छा होती, असे बरळल्याचे ऐकू येत आहे. त्या मंचावरील एकाने तर ख्रिसमसनिमित्त राज्यातील सर्व हॉटेल बंद ठेवण्यासच सांगितले पाहिजे, असे सांगून द्वेषभावनेचा कळसच गाठला. हरियाना सरकारने तर मुस्लिमांची शुक्रवारची नमाज बंद पाडणाऱ्यांची पाठच थोपटायची शिल्लक ठेवली आहे. मोकळ्या जागेत धर्मप्रार्थनेला परवानगीच देण्यात येऊ नये, या मताचे हरियाना सरकार आहे. तशी जाहीर भूमिका या सरकारने वारंवार मांडली आहे. याखेरीज या सरकारमधील नेत्यांच्या पाठीराख्यांनी तर नमाज रोखल्याने त्याचे काय परिणाम भोगावे लागतील, याची किंचितही तमा बाळगलेली नाही.

आंतरराष्ट्रीय मंचावरून नरेंद्र मोदी हे सलोख्याची आणि धर्मऐक्याची भाषा करतात. हे कथनी म्हणून ठीक आहे; पण प्रत्यक्ष करणीत म्हणजे कृतीत पाहायला गेल्यास स्थिती त्याच्या उलट आहे. मोदींच्या नुकत्याच झालेल्या युरोप आणि व्हॅटिकन सिटीतील दौऱ्यात विश्वबंधुत्वाचा संदेश साऱ्या जगाला दिला. बहारिन, संयुक्त अरब अमिराती, मालदीव, पॅलेस्टाईन, सौदी अरेबिया आणि अफगाणिस्तानच्या वतीने बहाल करण्यात आलेले सर्वोच्च नागरी पुरस्कार आणि सन्मानांनी भारतीयांची मान निश्चितच अभिमानाने फुलून आली. भारत हा प्रगती, सेक्युलर आणि सहिष्णू असल्याचे चित्र आंतरराष्ट्रीय स्तरावर उभे करायचे आणि मायदेशी परतल्यानंतर सारे काही खुंटीला टांगून धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवणाऱ्यांना मोकळे मैदान करायचे, अशी ही नीती आहे.

एका अर्थाने भाजपने हिंदूंच्या तुष्टीकरणाचे राजकारण सुरू ठेवले आहे. निवडणुकांचे राजकारण काय ते यालाच म्हणतात. भाजपच्या या धोरणाला कुठेही अटकाव निर्माण होत नाहीच; पण उलट विजयाची शाश्वती असते. जम्मू-काश्मीर, गुजरात, हिमाचल प्रदेश, मणिपूर, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या साऱ्या समस्या उद्‍भवल्या आहेत, हे सांगता येऊ शकेल. बहुसंख्याक हिंदू राष्ट्रात (८० टक्के हिंदू) ‘हिंदू खतरे में’ या आवईमागचा अर्थ ज्यांना समजला त्यांना भाजपचे निवडणुकांचे राजकारण समजून घेण्यास वेळ लागणार नाही.

बरं, जगाच्या इतर कानाकोपऱ्यातही धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध विद्वेष पसरवला जात आहे. त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. यामागे राजकीय लाभाचा उद्देश आहे. म्यानमार लष्कराने सुरू ठेवलेला रोहिंग्या मुस्लिमांचा नरसंहार तर जगाला हादरवणारा आहे. म्यानमार हा प्रामुख्याने बौद्धधर्मीयांचा देश आहे आणि बुद्धाला शांततामय जीवन प्रिय होते; पण मिठानेच जर त्याची चव सोडली तर दोष कुणाला द्यायचा? नागरी हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वशक्तीनिशी लढणाऱ्या आंग सांग स्यू ची यांच्या हृदयालाही रोहिंग्या मुस्लिमांची सामूहिक कत्तल पाहून पाझर फुटला नाही, याला काय म्हणायचे? १९९१ मध्ये स्यू ची यांना लष्करी हुकूमशाहीविरोधात उभे राहिल्याबद्दल शांततेसाठीचे नोबेल पारतोषिक बहाल करण्यात आले होते. एका सर्वोच्च नेत्याच्या वृत्तीतला फरक पुन्हा विचार करायला लावणारा आहे.

उजव्या विचारसरणीकडे पूर्णपणे झुकल्याने ‘इस्लामची भीती’ उभी करण्यात आली. त्यातूनच अल कायदासारख्या दहशतवादी संघटना जन्माला आल्या. युरोप खंडातील ख्रिश्चनांच्या मुस्लिमविरोधी भावनांच्या तुष्टीकरणासाठी स्थलांतरितांचे संघर्ष उभारण्यात आले. फ्रान्समध्ये अल्पसंख्य मुस्लिमांची संख्या ५० लाख इतकी आहे. २०२०मध्ये या देशात हल्ल्याच्या २३५ घटना घडल्या. तर मशिदींवरील हल्ल्यांच्या घटनांत ३५ टक्के वाढ झाली. फ्रान्सचे विद्यमान अध्यक्ष इमॅनुअल मॅक्रॉन यांच्या संमतीने २०२० मध्ये कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्याच्या आधारे काही संघटना इस्लामचा प्रसार करीत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार मशिदी आणि अशा संघटनांवर बारीक लक्ष ठेवण्यात आले. ऑक्टोबर २०२० मध्ये प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र विद्यार्थ्यांमध्ये शेअर केल्याच्या कारणावरून सॅम्युअल पॅटी यांचा खून करण्यात आला. त्या वेळी पॅटी हे त्यांच्या विद्यार्थ्यांना अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर वर्गावर शिकवत होते. (प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र त्याआधी शार्ली हेब्दो या नियतकालिकांत छापून आले होते.) पॅटी यांनी व्यंगचित्र शेअर केल्याच्या घटनेचा जाणीवपूर्वक प्रसार मुस्लिमांमध्ये करण्यासाठी ऑनलाईन माध्यमांचा वापर करण्यात आला. १८ वर्षीय रशियन मुस्लिम तरुणाच्या रक्त उसळले आणि त्याने पॅटी यांच्या मानेवर सुरा फिरवला. यानंतर फ्रान्स सरकारने मशिदींभोवतीचा चौकशीचा फास आवळत आणला. फ्रान्सच्या गृहमंत्रालयाने आजवर देशातील ९९ मशिदींमध्ये पाहणी केली आहे. त्यातील २१ मशिदी बंद करण्यात आल्या आहेत; तर सहा मशिदींविरोधात न्यायालयात खटला लादण्यात आला आहे.

फ्रान्समध्ये एप्रिल २०२२मध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. अर्थ सरळ आहे, गैरमुस्लिम लोकसंख्येची मते स्वतःच्या पदरात पाडून घेण्यासाठी मॅक्रॉन यांनी प्रयत्न केले नाहीत, तर नवल!

मुस्लिमबहुल देशही धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्यात मागे नाहीत. बांगलादेश हे त्याचे ठळक उदाहरण म्हणता येईल. हिंदूंविरोधात हल्ला करण्यात या देशाने कोणतीही कसर सोडलेली नाही. एकूण १७ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात ९ टक्के लोकसंख्या हिंदूंची आहे. बरं, यासाठी बांगलादेशातील बहुसंख्याकांना कोणतीही शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. आइनओ सलीश केंद्र (आस्क) या मानव हक्क संघटनेच्या म्हणण्यानुसार, २०१३ पासून बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांची संख्या ३६,०० इतकी आहे. दुर्गापूजेच्या वेळी मूर्तीच्या चरणाशी कुराणाची प्रत ठेवल्याचा व्हिडीओ प्रसारित झाल्याच्या घटनेनंतर मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांनी मंदिरांवर हल्ला चढवला. याविरोधात हिंदू संघटनांनी जोरदार निदर्शने केली; परंतु बांगलादेशी सरकारने मूलतत्त्ववाद्यांना दुखावण्याचा जराही प्रयत्न केला नाही.

ख्रिस्तीविरोध पाहिला तर नायजेरियातील बोको हराम ही संघटना आघाडीवर आहे. २०२१ चे पहिले २०० दिवस बोको हरामने ३,४६२ ख्रिस्ती मुली आणि ३००० महिलांचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवले होते. याशिवाय चर्चवरील हल्ले नित्याचेच. बोको हरामने ३०० चर्च लक्ष्य केली होती.

जागतिक लोकसंख्या २०२१ अहवालात जगात तीन प्रमुख धर्मांचा प्रभाव आहे. यात ख्रिश्चन (दोन अब्ज ४० कोटी), इस्लाम (एक अब्ज ९० कोटी) हिंदू (एक अब्ज १० कोटी) या धर्मांचा समावेश आहे. जगात या तीनच धर्मांतील वर्चस्वाच्या लढाईचा विचार केल्यास एकाने दुसऱ्याचे वर्चस्व झुगारून दिले आहे. याउलट स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय धोरणावर भर देण्यात आला आहे. धर्म धर्माच्या ठिकाणी आहेत; परंतु धर्मालाच पाया मानून आपल्या हीन राजकीय तत्त्वांना जागतिक मान्यता मिळविण्याच्या वेडगळपणातून हिंसाचाराची आग सातत्याने भडकावत ठेवली आहे. ही आग कायमचीच नियंत्रणात आणायची असल्यास जनतेला नेत्यांच्या मनातला कावा कळायला हवा. तो कळल्यास जगाची दिशा अधोगतीकडून प्रगतीकडे वळलेली असेल.

nairmalini@gmail.com

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :religionMalini Nair
loading image
go to top