Steve Jobs Birthday: भारतातील तीर्थाटनाने स्टिव्हला काय मिळाले? स्वप्न वास्तवात आणणारा अवलिया

उद्योगपती स्टिव्ह जॉब्ज यांचा २४ फेब्रुवारीला जन्मदिवस आहे. ‘ॲपल आयएनसी’चे (Apple Inc.) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते सर्वपरिचित आहेत.
steve jobs apple inc ceo
steve jobs apple inc ceoesakal

- मालिनी नायर

उद्योगपती स्टिव्ह जॉब्ज यांचा २४ फेब्रुवारीला जन्मदिवस आहे. ‘ॲपल आयएनसी’चे (Apple Inc.) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते सर्वपरिचित आहेत. त्यांच्या अभिनव दृष्टीकोनातून तंत्रज्ञान आणि भांडवली जगात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्याचा आढावा घेणे योग्य होईल. स्टिव्ह जॉब्ज यांचा बालपणापासून ते ख्यातनाम होण्यापर्यंतचा प्रवास हा नाविन्यपूर्णता, जिज्ञासा आणि चिकाटीचा प्रवास आहे.

स्टिव्ह जॉब्ज यांचा जन्म १९५५ ला भिन्नवंशीय आईवडिलांच्या पोटी झाला. स्टिव्ह यांचे जन्मदाते वडील अब्दुलफतेह जॉन जिंदाली हे होम्स येथे राहणारे एक सिरियन मुस्लिम होते. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेत आले होते. तर त्यांची आई जोनी कॅरोल शिबल (नंतरची सिम्सन) या स्विझ-जर्मन आणि जर्मन वंशाच्या अमेरिकन नागरिक होत्या.

अनेक सामाजिक दबावामुळे आईने स्विव्हला जन्मतःच दत्तक देऊन टाकले. स्टिव्हचा जन्म झाला तेव्हा अब्दुलफतेह आणि जोनी यांनी लग्न केलेले नव्हते. अब्दुलफतेह मुस्लिम असल्याने जोनी शिबलच्या पालकांचा लग्नाला विरोध होता. आणि हे मुल दत्तक देऊन टाकावे अशी गळ त्यांनी तिला घातली होती. जोनी आणि अब्दुलफतेह दोघेही तेव्हा खूपच तरूण होते आणि आपण मुलाचा सांभाळ करू शकणार नाहीत असे त्यांना वाटत होते.

कॅलिफोर्नियामधील पॉल आणि क्लारा जॉब्ज या जोडप्याने स्टिव्हला दत्तक घेतले. आपल्याला दत्तक दिलेले आहे हे स्टिव्हला पहिल्यापासूनच माहीत होते, पण आपल्या दत्तक पालकांना तो आपल्या खऱ्या पालकांप्रमाणे मानत असे. क्युपिटिनो कॅलफोर्निया येथेच जॉब्ज जोडप्याने स्टिव्हचे पालनपोषण केले. या ठिकाणाला आज आपण ‘सिलिकॉन व्हॅली’ म्हणून ओळखतो.

पॉल जॉब्ज हे उदरनिर्वाहासाठी वसुलीचे काम करायचे. फार लहानपणीच पॉल यांनी स्टिव्हची ओळख इलेक्ट्रॉनिक्सशी करून दिली. अतिशय लहान वयातच इलेक्ट्रॉनिकशी ओळख झाल्यामुळे स्टिव्हची तंत्रज्ञानाची रुची वाढण्यात मदत झाली.

१९७१ ते १९७६ ही वर्षे स्टिव्हसाठी सर्वात जास्त बदलाची वर्षे होती. १९७१ मध्ये त्यांची भेट स्टिव्ह वोझ्नियाक या महाविद्यालयीन मित्राशी झाली. ‘हेवलेट पेकॉर्ड’साठी काम करत असताना एका मित्राच्या माध्यमातून त्यांची ही ओळख झाली. वोझ्नियाकचा तंत्रज्ञानात मोठा रस होता. वोझ्नियाक हे स्टिव्हपेक्षा पाच वर्षांनी मोठे होते, पण ते लवकरच चांगले मित्र झाले. तंत्रज्ञान आणि लोकांची गंमत करणे (प्रँक) या दोन गोष्टींनी त्यांना जोडलेले होते.

वोझ्नियाक यांनी बनवलेल्या एका उपकरणाच्या माध्यमातून फोन करून ते दोघे लोकांची गंमत करायचे. त्यानंतर १९७२ ला ओरेगन राज्यातील पोर्टलँड शहरातील रीड कॉलेजात स्टिव्हने प्रवेश घेतला. आश्चर्य म्हणजे त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा इलेक्ट्रॉनिक्सशी फारसा संबंध नव्हता. मानववंशसास्त्र, मानसशास्त्र आणि तत्वज्ञानाचा अभ्यास ते करत होते. पण, पहिल्या सत्रानंतरच त्यांनी हे विषय सोडून देण्याचे ठरवले.

पण, हे विषय पूर्णतः सोडून न देता इतर आवडत्या विषयांच्या वर्गात बसण्याची परवानगी त्यांनी मिळवली. आणि ते वर्ग होते कॅलिग्राफी, नृत्य व शेक्सपिअरच्या साहित्याचे. अनेकांना त्यांनी या वर्गात बसणे हे वेळ वाया घालवण्यासारखे वाटेल, पण यांचाच उपयोग नंतर त्यांना ‘ॲपल मॅकिन्टॉश’ बनवण्यात झाला.

स्टिव्हने १९७४ च्या सुरुवातीस ‘अटारी कॉर्पोरेशन’मध्ये व्हिडिओ गेम डिझायनर म्हणून काम केले. आणि भारतात जाऊन बौद्ध धर्माचा अनुभव घेण्यासाठी तीर्थाटन करण्यासाठी पैशांची बचत केली. कॅलिग्राफीचे वर्ग आणि भारतातील तीर्थाटन या दोन्ही गोष्टी स्टिव्हच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या ठरल्या.

तीर्थाटनाने स्टिव्हला काय मिळाले?

अगदी किशोरवायत ज्ञानाच्या शोधात स्टिव्ह भारतात आला. भारतातील त्याच्या वास्तव्यात त्याने अनेक महिने ध्यानधारणा आणि अध्यात्मिक गुरूंकडून शिकवणीत घालवली. तरुण स्टिव्हला येथे मोठ्या प्रमाणात फसवणूक आणि लुबाडणुकीचा अनुभव आला असला तरी आपण भारताकडून खूप काही शिकलो असे त्याला वाटत होते. भारतातील ग्रामीण भागातील लोक हे आपल्या बुद्धीपेक्षा अंतःप्रेरणेचा वापर करतात. आणि भारतातील लोकांची अंतःप्रेरणा ही बाकीच्या जगापेक्षा खूपच विकसित आहे, असे स्टिव्ह यांनी नमूद करून ठेवलेले आहे.

अंतःप्रेरणा ही बौद्धिक सामर्थ्यापेक्षाही अधिक शक्तीशाली गोष्ट आहे, अशी स्टिव्ह जॉब्ज यांची श्रद्धा होती. या श्रद्धेचा त्यांच्या कामावर मोठा प्रभाव होता. भारतातील अनुभवामुळे त्यांच्या अंतःप्रेरणेला उभारी मिळाली आणि ‘ॲपल’ची बिजे रोवली गेली. जी कंपनी नंतरच्या काळात जगातील सर्वात मौल्यवान कंपनी झाली. भारताने त्यांना अंतःप्रेरणेची शक्ती शिकवली. तंत्रज्ञान आणि व्यवसायाबद्दल त्यांचा दृष्टीकोन बनण्यात याची भूमिका महत्वाची ठरली. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर मुंडन करून ते भारतातून अमेरिकेत परतले.

'ॲपल’ची सुरुवात

भारतातून परतल्यानंतर स्टिव्ह वाझ्नियाक यांच्याशी ते अनेकदा भेटत राहिले. त्याच सुमारास ‘होम्बरू कम्युटर क्लब’ (Homebrew Computer Club) सुरू झाला होता. होम्बरू कम्युटर क्लबची स्थापना जॉर्डन फ्रेन्च आणि फ्रेड मूर यांनी केली होती. कॅलिफोर्नियातील सॅन मेतिओ कौंटी येथील मेनलो पार्क शहरात फ्रेन्च यांचे गॅरेज होते. या गॅरेजमध्ये ५ मार्च १९७५ रोजी क्लबची पहिली बैठक झाली.

इलेक्ट्रॉनिक्समध्ये रस असणाऱ्या आणि तंत्रज्ञानस्नेही लोकांना संगणक उपकरणांची बांधणी करण्यासाठीची माहिती, सर्किट, ट्रेड पार्ट्स उपलब्ध करून देणे हा या व्यासपीठाचा हेतू होता. मायक्रो कम्युटर क्रांती आणि सिलीकॉन व्हॅलीतील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सच्या उदयात या क्लबने प्रभावी भूमिका निभावली. स्टिव्ह जॉब्ज आणि स्टिव्ह वोझ्नियाक होम्बरू कम्युटर क्लबमध्ये १९७५ पासूनच सहभागी होऊ लागले होते.

पर्सनली कम्युटिंगशी संबंध आल्याने स्टिव्ह जॉब्ज यांचा यात रस वाढला आणि येणारा काळ हा याचाच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. १९७५ मध्ये जेव्हा ‘६५०२ प्रोसेसर’ रिलीज झाला तेव्हा वोझ्नियाकने त्याआधारे संगणक बनवायला सुरुवात केली. १ मार्च १९७६ ला वोझ्नियाकने मशीन पूर्ण केले आणि होम्बरू कम्युटर क्लबच्या बैठकीत त्याचे सादरीकरण केले.

हा प्रयोग पाहून वैयक्तिक संगणक (पर्सनल कम्युटर) निर्माण करणारी कंपनी बनवण्याचा विचार स्टिव्ह जॉब्ज यांच्या मनात आला. यासाठी त्यांनी वोझ्नियाक यांना तयार केले. पैशांची जमवाजमव करण्यासाठी जॉब्ज यांनी त्यांची फोक्सवॅगन मिनिबस आणि वोझ्नियाक यांनी त्यांचे हेवलेट पॅकर्ड कॅलक्युलेटर विकले. यातून १३०० डॉलरची रक्कम जमा झाली.

जॉब्ज यांच्या कुटुंबाच्या गॅरेजमध्ये १९७६ ला त्यांनी आपले पहिले मशीन किंवा ‘ॲपल आय’ कम्युटर बनवले. पर्सनल कम्युटरचा मोठ्या प्रमाणात खप होईल असे जॉब्ज यांचे अंतर्मन सांगत होते. खरेतर पर्सनल कम्युटर लोकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करेल हे समजणारे स्टिव्ह जॉब्ज पहिले उद्योजक होते.

अनेकांना प्रश्न पडला होता की कंपनीला एका फळाचे नाव का दिले आहे? हे काम सुरू होते त्या काळात स्टिव्ह जॉब्ज फलहारी (केवळ फळ, दाळी, सुकामेवा खाणे) होण्याचा प्रयोग करत होते. त्याचप्रमाणे शब्दकोषात ‘अटारी’ कंपनीच्या आधी आपले नाव यावे अशीही त्यांची इच्छा होती. त्यामुळे कंपनीचे नाव ॲपल कम्युटर ठेवण्याचे त्यांनी सुचवले.

स्वतःच्याच कंपनीतून पायउतार

जॉब्ज यांच्या प्रोत्साहनाच्या जोरावर वोझ्नियाक यांनी ‘ॲपल II’ हे अधिक विकसित मॉडेल तयार केले. ज्यात पूर्ण कीबोर्ड होते आणि सर्व युनिट झाकण्यासाठी प्लास्टिक केसचा समावेश होता. जॉब्ज यांनी ॲपलसाठी निधी, वितरण आणि प्रसिद्धीचे व्यवस्थापन केले. आणि ॲपल II हा जगातील सर्वाधिक खपाचा पर्सनल कम्युटर बनला. लवकरच १३०० डॉलरने सुरू झालेला हा स्वयंअर्थसहाय्यित व्यवसाय लाखो डॉलरची कंपनी बनला.

स्टिव्ह जॉब्ज हे मायक्रो मॅनेजर म्हणून ओळखले जात. आपल्या उत्पादनाचे डिझाईन आणि मार्केटिंगवरच त्यांचे लक्ष होते असे नाही तर आपल्या कर्मचाऱ्यांना दिले जाणारे अन्न आणि त्यांना येण्याजाण्यासाठी दिली जाणारी वाहतुकीची सुविधा याकडेही त्यांचे बारीक लक्ष होते. त्यांची ही पद्धत सर्वांनाच आवडली असे नाही. अलिकडच्या काळात त्यांच्या नेतृत्वशैलीवर अति नियंत्रण ठेवणारा आणि निरंकुश म्हणून टीका झाली.

व्यवसाय वाढल्यानंतर ॲपलच्या संचालक मंडळावर पेप्सीच्या माजी सीईओची नियुक्ती झाली. हा निर्णय स्टिव्ह जॉब्ज आणि त्यांच्या कंपनीला महागात पडला. ॲपलच्या संचालक मंडळाने १९८५ ला स्टिव्ह जॉब्ज यांना कंपनीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. ॲपलमधून जॉब्जची हकालपट्टी साधारण बाब नव्हती.

तत्कालीन सीईओ जॉन स्कली यांच्याशी झालेल्या वादावादीचा हा परिणाम होता. ॲपल II कडून ‘मॅकिन्टॉश’ ऑफीसमध्ये डॉलर्स वळवण्याची जॉब्ज यांची इच्छा होती. एका नव्या उत्पादनावर ते त्यांच्या टीमसोबत काम करत होते, ज्याला संचालक मंडळाने नकार दिला होता. त्यामुळे स्टिव्ह जॉब्जकडून मॅकिन्टॉशची जबाबदारी काढून घेण्यात आली आणि त्यांना कंपनी सोडण्यास भाग पाडले गेले.

नवी सुरुवात

ॲपलमधून काढून टाकले तेव्हा स्टिव्ह अत्यंत यशस्वी, धनसंपन्न आणि जगभरात सेलिब्रिटी होते. आता पुढे काय करावे यावर विचार करण्यासाठी त्यांनी पूर्ण उन्हाळा घालवला. धक्का बसूनही त्यांनी हा काळ आत्मपरिक्षण आणि शिकण्यासाठी घालवला. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या एका भाषणात ते एकदा म्हणाले होते की, मला तेव्हा ही गोष्ट जाणवली नव्हती पण ॲपलमधून काढून टाकणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट होती.

यशस्वी असण्याच्या ओझ्याची जागा पुन्हा एकदा नवशिक्या असण्याने घेतली, जिथे कशाचीच खात्री नव्हती. माझ्या काळातील हा सर्वात सर्जनशील कालखंड होता. व्यावसायिक आणि शैक्षणिक गरजा पूर्ण करणाऱ्या कम्युटर निर्मिती करणाऱ्या ‘नेक्स्ट’ ( NeXT) या फर्मची स्थापना त्यांनी केली. उत्पादनाची किंमत जास्त असल्याने मागणी कमी राहिली आणि हा प्रकल्प त्यांच्या अपेक्षेप्रमाणे उंची गाठू शकला नाही.

पण, ही गोष्ट त्यांना पुढे जाण्यापासून रोखू शकली नाही. १९८६ मध्ये फारशी फायद्यात नसणारी लुकासफिल्म कम्युटर ग्राफीक डिव्हिजन स्टिव्ह यांनी ५ मिलियन डॉलरला खरेदी केली. नंतर त्यांनी तिचे नामकरण पिक्सर (Pixar) असे केले. आपल्या नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील दृष्टिकोनाने त्यांनी कंपनीला कलाटणी दिली.

पहिला मॉडर्न कम्युटर ॲनिमेशन स्टुडिओ बनवणे आणि सांस्कृतिकदृष्ट्या क्रांतिकारक असलेला ‘टॉय स्टोरी’ हा चित्रपट बनवण्याचे श्रेय स्टिव्ह याना दिले जाते. यामुळे ॲनिमेटेड चित्रपटांसाठी बाजारपेठ खुली झाली आणि अर्थाच पिक्सरचे मू्ल्यही वाढले. जॉब्ज यांनी एक अपयशी ठरलेला उद्योग यशस्वी केला आणि २००६ साली पिक्सर डिस्नेला ७.४ बिलियनला विकून टाकली.

‘ॲपल’मध्ये पुनरागमन

ही कंपनी यशस्वी झाल्यामुळे टेकवर्ल्डचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. शिवाय त्यांना काढून टाकणे ही आपली चूक होती असे ॲपल कंपनीच्या संचालक मंडळाला वाटू लागले. स्कली यांच्या नेतृत्वाखाली ॲपलची कामगिरी ठीक सुरू नव्हती. १९८५ ते १९९७ च्या दरम्यान कंपनीची मोठी घसरण झाली. १९९७ मध्ये स्कली यांना पदावरून हटवण्यात आले आणि स्टिव्ह जॉब्ज यांना पुन्हा एकदा सीईओ म्हणून बोलावण्यात आले.

परत आल्यानंतर एका नव्या दृष्टीकोनासह कंपनीला एका नव्या दिशेने घेऊन जाण्यासाठी त्यांनी पावले टाकली. १९९८ मध्ये जॉब्जच्या नेतृत्वाखाली ॲपलने ऑल इन वन ‘आय मॅक’ (iMac) कम्युटर सादर केला. हा कम्युटर पारंपरिक डेस्कटॉपपेक्षा वेगळा होता. आपली डिझाईनची जाणीव वाढण्याचे श्रेय स्टिव्ह यानी रीड कॉलेजात केलेल्या कॅलीग्राफीच्या क्लासला नेहमीच दिले.

तिथे ते सेरिफ आणि सॅन्स-सेरिफ टाईपफेसबद्दल शिकले होते. विविध शब्दांमधल्या जागेचे कॉम्बिनेशन बदलण्यासंबंधीची ती गोष्ट होती. टायपोग्राफी उत्कृष्ट का बनते हे त्यांना त्या क्लासेसमध्ये शिकायला मिळाले होते, ज्याचा प्रभाव त्यांच्यावर नेहमी राहिला. याचा उपयोग त्यांनी मॅकन्टॉश कम्युटर डिझाईन करण्यासाठी केला. ‘मॅक’ हा सुंदर टायपोग्राफी असणारा पहिला कम्युटर होता.

तसेच, अनेक टाईपफेस व प्रमाणानुसार अंतर असलेले फॉन्ट यात होते. स्टिव्ह जॉब्ज यांनी कॅलिग्राफी क्लासेस केले नसते, तर आजही पर्सनल कम्युटर असते की नाही याबद्दल शंका आहे. त्यामुळे कम्युटरमध्ये आज जे टायपोग्राफीचे विविध पर्याय दिसत आहेत ते स्टिव्ह यांच्या छंद म्हणून केलेल्या कॅलिग्राफी क्लासेसमुळे!

१९९९ मध्ये त्यानी वाय-फाय तंत्रज्ञानासह आय बूक (iBook) सादर केले. ज्यात काही शैली अद्ययावत केलेली होती. २०११ मध्ये आय पॉड (iPod) सादर करण्यात आला. यात संगीतप्रेमींना आपली आवडती गाणी ऐकणे शक्य होते. त्याचवर्षी आय ट्यून्स (iTunes) सादर करण्यात आले. पण, अजूनही सर्वोत्तम उत्पादन यायचे होते.

संगणक, सीडी प्लेअर आणि फोन या सर्वांचे काम करू शकणारे आणि ग्राहकांच्या पॉकेटात बसणारे उपकरण बनवण्याची स्टिव्ह यांची इच्छा होती. आणि त्यानंतर त्यांनी आय फोन (iPhone) आणि आय पॅडची (iPad) निर्मिती केली. या नाविन्यपूर्ण उत्पादनांमुळे ॲपलला एक सर्वश्रेष्ठ कंपनी आणि स्टिव्ह जॉब्ज यांना एक सर्जनशील व दूरदृष्टीचा नेता म्हणून मान्यता मिळाली. वेगळी वहिवाट निर्माण करणारा आणि स्वप्न वास्तवात आणणारा म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले. १९९० आणि २००० च्या उत्तरार्धात ॲपलचे उत्पादन आपल्याकडे हवेच असे सर्वांना वाटू लागले.

स्टिव्ह यांचा वारसा

ऑक्टोबर २०११ मध्ये जेव्हा स्टिव्ह जॉब्ज यांचे निधन झाले तेव्हा ॲपल आयएसीची ब्रँड व्हॅल्यू २१४ बिलियन डॉलर इतकी होती. या कंपनीची स्थापना १९७६ ला दोन तरुणांनी आपल्या गॅरेजमध्ये केवळ १३०० डॉलरने केली होती हे लक्षात घेतले पाहिजे. टीम कुक यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आजही ही कंपनी यशाच्या पायऱ्या चढत आहे.

२०१२ मध्ये अॅपलने ४ इंच डिस्प्ले असणारा, जलद आणि अतिशय कमी आकाराचा आय फोन ५ बाजारात आणला. २०१६ मध्ये एअर पॉड्स सादर केले गेले. याने वायरलेस हेडफोनच्या जगात क्रांती केली. २०२० मध्ये ॲपलने एआरएम आधारित ॲपल सिलिकॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिप्सचा वापर सुरू केला.

अमेरिकन उद्योग जगतात ट्रिलियन डॉलर मार्केट कॅपपर्यंत पोहोचणारी टीम कुक यांच्या नेतृत्वाखालील ॲपल ही पहिली कंपनी ठरली. फेब्रुवारी २०१४ पर्यंत अॅपल आयएनसीचे बाजार भांडवल अंदाजे २.८१५ ट्रिलियन डॉलर इतके आहे.

कंपनीची सातत्याने होणारी वाढ आणि विकास यातून स्टिव्ह यांचा कंपनीवर पडलेला प्रभाव दिसून येतो. त्यांच्या नाविन्यपूर्णतेचा वारसा ॲपलला दिशादर्शक ठरतो आहे. स्टिव्ह यांची दृष्टी, एकमेवाद्वितीय डिझाईन, सौंदर्यदृष्टी, सर्जनशीलता आणि अंतःप्रेरणा यांनीच ॲपलला आजचे स्थान मिळवून दिले आहे हे कुणीही नाकारणार नाही.

स्टिव्ह जॉब्ज यांची जीवनशैली आणि नवोन्मेषी वृत्तीने जगभरातील उद्योगांना प्रभावित केले आहे. तंत्रज्ञान, नाविन्यपूर्णता आणि उत्पादन विकास यामधील त्यांच्या कर्तृत्वाचा प्रभाव जगावर आजही कायम आहे. जिज्ञासू वृत्ती, पुढाकार घेणे आणि सर्व बाबींकडे तपशीलात लक्ष देण्याची सवय हे त्यांच्या यशाचे गमक आहे.

एक जिज्ञासू लहान मुलगा ते ॲपलचा सह-संस्थापक होण्यापर्यंतचा प्रवास हा त्यांच्या दूरदृष्टी आणि दृढनिश्चयाचे द्योतक आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘‘स्टिव्ह जॉब्ज हे आमच्या पिढीचे एडिसन आणि आधुनिक जीवनाचे शिल्पकार होते’.

स्टिव्ह जॉब्ज यांची सेवाभावी वृत्ती त्यांनी स्वतः फार कमी वेळा समोर आणली. पण, आता हे सर्वांच्या समोर आले आहे की एक उद्योगपती असण्याशिवाय ते एक परोपकारी वृत्तीचे माणूस होते. शिक्षण आणि लोकांच्या जगण्यावर त्यांनी अब्जावधी रुपये खर्च केले. शाश्वत व्यवसाय पद्धती जेव्हा प्रचलित नव्हती तेव्हापासून ते याचा अवलंब करत आले आहेत.

आजही ॲपल आयएनसी त्यांचे उत्पादन करण्यासाठी पुनर्वापर करण्यायोग्य सामग्रीचा वापर करते. २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे जे संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यावर त्यांचा भर आहे. कोणतेही ज्ञान वाया जात नाही याचे स्टिव्ह जॉब्ज हे एक यशस्वी उदाहरण आहे. आपल्या दत्तक पित्याकडून ते जे गॅरेजमध्ये शिकले त्यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांचा रस निर्माण झाला.

ते जे कॅलिग्राफी क्लासमध्ये शिकले त्याचा उपयोग त्याना उत्पादनाचे डिझाईन करण्यात झाला. आपल्या अंतःप्रेरणेचा आवाज ऐकण्याचे शिकल्यामुळे नवीन उत्पादनांची निर्मिती करणे आणि त्यांची विक्री करण्याचे मार्ग त्यांना सापडत गेले. ॲपलची स्थापना केली तेव्हा स्टिव्ह जॉब्ज यांचे वय केवळ २० वर्षे होते.

यावरून आपल्याला समजेल की वय महत्वाचे नसून सुस्पष्ट आणि रुळलेली वहिवाट मोडणारा दृष्टीकोन महत्वाचा असतो. आणि या सर्व गोष्टींमुळे तंत्रज्ञानाच्या जगात अमूल्य योगदान देणारा माणूस म्हणून आपण त्यांचे सदैव स्मरण करत राहू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com