

संयुक्त राष्ट्राने नुकत्याच जारी केलेल्या २०२२ मधील जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये नेदरलँड पाचव्या क्रमांकाचा देश ठरला आहे.
- मालिनी नायर
नेदरलॅंडमध्ये शिक्षण हा सर्वांसाठी मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे परदेशी नागरिकांची मुलेही येथील सार्वजनिक शाळांमध्ये विनाशुल्क शिक्षण घेऊ शकतात. येथील शिक्षण उच्च दर्जाचे आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ते नावाजलेले आहे. विशिष्ट कौशल्य असलेल्या परदेशी नागरिकांचे नेदरलँडमध्ये स्वागत केले जाते. त्यांना चांगल्या सुविधाही पुरवल्या जातात. ही बाब परदेशी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे वरदान आहे.
संयुक्त राष्ट्राने नुकत्याच जारी केलेल्या २०२२ मधील जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये नेदरलँड पाचव्या क्रमांकाचा देश ठरला आहे. आनंदी देशांची गणना करण्यासाठी जगभरातील १५० देशांमध्ये सर्वेक्षण केले जाते. याशिवाय जागतिक आर्थिक मंचाच्या माहितीनुसार, २०१८ मध्ये परदेशी कुटुंबीयांना राहण्यासाठी नेदरलँड हा जगातील सर्वाधिक पसंतीचा देश ठरला होता. विशेष म्हणजे २०२१ मध्ये झालेल्या आणखी एका सर्वेक्षणात नेदरलँडमधील परदेशी नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा हा जगात दहाव्या क्रमांकावर आहे, म्हणजे अगदी जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटनच्याही पुढे. दरम्यान, मी सिंगापूरहून नेदरलँडला येऊन बरीच वर्षे झाली आणि भारतात राहूनही मला बराच काळ लोटला आहे.
तुम्ही परदेशी नागरिक म्हणून नेदरलँड येथे जोडीदारासोबत हाय स्कील व्हिसावर येणार असाल, तर तुम्हाला कामाच्या परवानगीचाही व्हिसा सहजपणे मिळतो. मी सिंगापूरला गेले, तेव्हा तिथे असे नव्हते. येथे केवळ आश्रित व्हिसाधारकालाच केवळ काम करण्याचीच नव्हे, तर त्या व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची, मालमत्ता खरेदी करण्याची आणि आरोग्यसेवेसारखे इतर फायदे मिळविण्याची परवानगी आहे. नेदरलँडमधील सर्व रहिवाशांकडे आरोग्य विमा असणे अनिवार्य आहे. याबाबत येथे कायदाच आहे. विशेष म्हणजे विम्याचे दर अत्यल्प आहेत आणि विमा समाजातील सर्व स्तरावर समान पातळीवर उपलब्ध आहे. विमा काढल्याच्या पहिल्या दिवसापासून वैद्यकीय सेवेचा लाभ घेता येतो. मी येथे आल्यानंतर माझ्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली होती. जवळपास चार हजार युरोच्या शस्त्रक्रियेसाठी मला केवळ ३०० युरो इतका खर्च करावा लागला. इतर खर्च विम्यातूनच झाला होता. वैद्यकीय सुविधा उच्च दर्जाच्या असून, त्याला सरकारचे अर्थसहाय्य आहे.
आर्थिक स्थितीबाबत नेदरलँड हा बळकट सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) असलेल्या देशांपैकी एक आहे. एका लहान देशासाठी ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. उच्च तंत्रज्ञान, उद्योग, तांत्रिक आणि सामाजिक नवकल्पना तसेच श्रम उत्पादकतेवर लक्ष केंद्रित करणारी अर्थव्यवस्था, हे त्यातील काही घटक आहेत. उच्चशिक्षित नागरिक, लवचिक धोरणे आणि उद्योजकांना त्यांची कार्यालये स्थापन करण्यासाठी सरकारकडून कंपन्यांना सवलती दिल्या जातात. वाहतूक तसेच माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राला या देशात सर्वाधिक लोकप्रियता आहे. त्यामुळे या क्षेत्रात नागरिक चांगल्या पद्धतीने काम करतात. युरोपातील सर्वात मोठे बंदर असलेले रॉटरडॅम हे पूर्णवेळ रोजगार देण्यास सक्षम आहे.
२०२० मध्ये जगातील श्रीमंत देशांपैकी नेदरलँड हा १४ वा श्रीमंत देश आहे. वैयक्तिक जीवन आणि कामाच्या संतुलनाचा विचार केला, तर नेदरलँड शीर्षस्थानावर आहे. नेदरलँडमधील नागरिक अतिश्रम करत नाहीत. युरोपमधील Right to Disconnect या कायद्यामुळे नागरिक कुटुंबीयांसोबत आपला महत्त्वपूर्ण वेळ घालवतात. म्हणजेच कार्यालये किंवा कंपन्या कोणत्याही कारणासाठी कार्यालयाची वेळ संपल्यावर कर्मचाऱ्यांशी संपर्क साधू शकत नाहीत. जगात कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आले. परिणामी वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करण्याची संकल्पना रूढ झाली; परंतु नेदरलँडमध्ये वर्क फ्रॉम होम ही संकल्पना कोरोनाच्या काही वर्षापूर्वीच अस्तित्वात आली आहे. त्यामुळेच येथील अनेक कार्यालये लॉकडाऊन काळात चांगल्या पद्धतीने कामे करू शकली. परिणामी येथील नागरिक व्यवसाय बैठकांच्या स्पष्ट अजेंड्याबाबत आणि वक्तशीरपणाबाबत खूपच वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहेत. हीच वैशिष्ट्ये कामाची संस्कृती अधिक उत्पादक, कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवते. निरोगी आणि आनंदी जीवनशैली कायम राखण्यासाठी हा घटक महत्त्वाचा ठरतो, यावर सर्वांचे एकमत होईल. बहुतांश नागरिक त्यांच्या कुटुंबांचा आणि वैयक्तिक वेळ खर्च करून त्यांच्या कामात सतत व्यग्र असतात. येथील नागरिकांच्या चांगल्या आणि निरोगी आयुष्याबद्दल उच्च आयुर्मान ही बाब खूप काही सांगणारी आहे.
परदेशी मुलांसह येथील स्थानिक रहिवासी असलेल्या १८ वर्षांखालील मुलांना लाभ मिळण्याचे हक्क आहेत. मुलांचे कपडे, जेवण आणि शाळेच्या खर्चासाठी पालकांना मदत केली जाते. साहजिकच अनेक कुटुंबासाठी हा महत्त्वाचा लाभ आहे. २०२२ मध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी २३०.६९ युरो, ६ ते ११ वर्षे वयोगटातील बालकांसाठी २८०.१३ युरो आणि १२ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ३२९.५६ युरो प्रतितिमाही मदत देण्यात आली. येथील सरकारी शाळांमध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण (विद्यापीठ स्तरावरील आणि त्यावरील शिक्षण वगळून) मोफत पुरवले जाते. शिक्षण हा सर्व मुलांचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे परदेशी नागरिकांची मुलेही नेदरलँडमधील सर्व सार्वजनिक शाळांमध्ये विनाशुल्क शिक्षण घेऊ शकतात. याचा अर्थ असा आहे, की मुलांना प्राथमिक, माध्यमिक ते व्यावसायिक आणि उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण मोफत आहे.
शाळांना काही पालक लहान ऐच्छिक योगदान देतात. त्या निधीतून शाळेच्या सहली, पोहण्याचे धडे, क्रीडा दिवस आदी उपक्रम राबवले जातात. हे योगदान तुम्ही देशाच्या कोणत्या भागात राहता, तुमच्या वैयक्तिक कौटुंबिक उत्पन्नाची पातळी इत्यादीवर अवलंबून असते. मग ते २५० युरो प्रतिवर्ष ते २००० युरो प्रतिवर्ष दरम्यान कितीही असू शकते. एक कुटुंब सरासरी एका अतिरिक्त अभ्यासक्रमासाठी प्रतिवर्ष अंदाजे ८५० युरो देते; परंतु हाच खर्च जर मासिक पाहिला तर तो नगण्य आहे. याशिवाय येथील शिक्षण उच्च दर्जाचे आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ते नावाजलेले आहेत. येथील शाळा, महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवतात.
नेदरलँड हा देश उच्च कौशल्य असलेल्या परदेशी नागरिकांचे स्वागत करतो. जेव्हा ते या देशात राहायला येतात तेव्हा त्यांना चांगल्या सुविधाही पुरवल्या जातात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे करसवलतीच्या बाबतीत ३० टक्के कपातीचा नियम होय. म्हणजे विशिष्ट रोजगारासाठी नेदरलँडमध्ये येणाऱ्या उच्च कौशल्यप्राप्त स्थलांतरितांचा करलाभ होय. पात्रतेचे निर्धारित निकष पूर्ण केल्यानंतर कार्यालये किंवा कंपन्या परदेशी कर्मचाऱ्यांना त्यांच्या एकूण मिळकतीच्या ३० टक्क्यांवर संपूर्ण करसवलत देऊ शकतात. नेदरलँडमध्ये काम करणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्याला ही सवलत नोकरीच्या पहिल्या पाच वर्षांमध्ये मिळते. ही बाब लक्षात घेता परदेशी कर्मचाऱ्यांसाठी हे एक मोठे वरदानच ठरते.
काही कारणास्तव दीर्घकालीन वर्क व्हिसावर असलेल्या परदेशी व्यक्तीने नोकरी गमावल्यास त्यांना तत्काळ देश सोडण्याऐवजी दुसरी नोकरी शोधण्यासाठी सुमारे दहा महिन्यांचा वाढीव कालावधी दिला जातो. इतर देशांमध्ये दिल्या जाणाऱ्या फायद्यांच्या तुलनेत हा सर्वात मोठा फायदा आहे. इतकेच नव्हे, तर नेदरलँडमध्ये दहा वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलेला कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर राज्य निवृत्तिवेतनासाठी पात्र ठरतो. वरील सर्व गोष्टींव्यतिरिक्त नेदरलँड्स हा कमी भ्रष्टाचार असलेला, कमी गुन्हे, परोपकारी, सौहार्द ठेवणारा, सामाजिक सुरक्षा असणारा आणि बेरोजगारांना मिळणाऱ्या फायद्यांमध्ये सरस ठरतो. माझी येथील आवडती गोष्ट अशी आहे, की तुम्हाला कुत्रे, मांजरी, पक्षी, कोंबड्या, बदक, इतर पक्षी इत्यादी प्राण्यांना वाढविण्यासाठी हा देश अनुकूल आहे. किंबहुना रस्त्यावर भटके कुत्रे आणि मांजरी नसलेला हा जगातील एकमेव देश आहे. एकूणच डच समाज हा अतिशय सहिष्णू असून, वंश, जात, धार्मिक श्रद्धा, लैंगिक प्रवृत्ती किंवा सामाजिक स्थिती यासंदर्भात समानतेवर दृढ विश्वास ठेवतो. येथे राजकारणाला स्थान आहे; परंतु जनतेच्या हितापुढे ते कधीही जात नाही. युरोपियन युनियनमध्ये महत्त्वाचे योगदान देणारी तसेच भरभराट होणारी लोकशाही आणि अर्थव्यवस्था असूनही येथील नेते मंडळी कोणतेही ढोंग किंवा बडेजाव करत नाहीत. येथील पंतप्रधान सामान्य व्यक्तीप्रमाणे आपल्या कार्यालयात सायकलने जातात. मला नेहमीच वाटते की नेदरलँड हा प्रदूषणमुक्त देश असण्याचे कारण म्हणजे येथे सायकलसाठी प्रत्येक रस्त्याच्या बाजूला स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आले आहेत. येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम असून बहुतांश नागरिक त्याचा प्रभावीपणे वापर करतात.
आनंद आणि उच्च जीवनाच्या गुणवत्तेत नेदरलँड हा उच्च स्थानावर आहे. याबाबत इतर देशांशी तुलना करता येत नसली, तरी एक भारतीय म्हणून मला माझ्या देशात राहून आनंद मिळतो, त्यापेक्षा एक स्त्री म्हणून गुणवत्तापूर्ण जीवन आणि महिला म्हणून मिळणारी सुरक्षा उत्तम आहे. अतिरिक्त काम करणारी आणि कमी पगार मिळणारी लोकसंख्या, बेसुमार बेरोजगारी, आरोग्य सेवा आणि शिक्षणाचा उच्च खर्च, उच्च राहणीमान आणि प्रचंड भ्रष्टाचार, विशेषतः महिलांवरील उच्च गुन्हेगारीचे प्रमाण, गरीब पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सुविधा तसेच एकूणच जीवनमानाचा दर्जामुळे भारत प्रभावित झाला आहे. आनंदी देशांच्या यादीत भारत सध्या १३१ व्या स्थानावर आहे. भारतातही राहणीमानाच्या दर्जात समानता येईल, तो दिवस लवकरच येईल, अशी आशा आहे.
nairmalini2013@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.