धार्मिक रुढींचे लक्ष्य महिलाच का?

आपण महिलांचे अधिकार, स्वातंत्र्य आणि आवडीनिवडींविषयी कितीही भरीव काम केले, तरी धर्म आणि समाज आपल्याला पुन्हा शून्यावर नेऊन सोडतो.
Women
WomenSakal
Summary

आपण महिलांचे अधिकार, स्वातंत्र्य आणि आवडीनिवडींविषयी कितीही भरीव काम केले, तरी धर्म आणि समाज आपल्याला पुन्हा शून्यावर नेऊन सोडतो.

- मालिनी नायर

आपण महिलांचे अधिकार, स्वातंत्र्य आणि आवडीनिवडींविषयी कितीही भरीव काम केले, तरी धर्म आणि समाज आपल्याला पुन्हा शून्यावर नेऊन सोडतो. समाजातील अशीच एक अमानवी प्रथा म्हणजे महिलांची केली जाणारी ‘सुंता’. जोपर्यंत आपण या कुप्रथेचा विरोध करत नाही, तोपर्यंत पुरोगामी समाज म्हणून आपण विकसित होणार नाही. महिलांना शारीरिक आणि मानसिक विकलांग बनवणाऱ्या या अमानवी प्रथेच्या विरोधात आपण निर्विवाद उभे राहिले पाहिजे.

जगभरात ६ फेब्रुवारी हा दिवस महिलांच्या जननेंद्रिय छेदाच्या परंपरेविषयी (सुंताविषयी) शून्य असहिष्णुता (Zero Tolerance for Female Genital Mutilation) दर्शवणारा म्हणून संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटनेकडून पाळला गेला. महिलांच्या जननेंद्रिय छेदाची म्हणजे सुंता करण्याची एक जुनी पारंपरिक पद्धत आहे, जी जगभरातील अनेक धर्मांमध्ये, संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून पाळली जाते. त्यामध्ये महिलांच्या योनीचा बाहेरील भाग अंशतः किंवा पूर्णतः काढून टाकला जातो. जगभरातील ३० देशांतील १२ कोटी महिला या प्रथेच्या पीडित आहेत, असे जागतिक आरोग्य संघटना सांगते. भारतातील बोहरा समाजात ही प्रथा प्रचलित आहे, ज्याला ‘खतना’ असेदेखील म्हणतात. यात योनीतील शिश्निकेचा पुढील भाग कापला जातो. (या भागामुळेच महिलांना लैंगिक उद्दिप्पन आणि समागमानंतरची उत्कटता अनुभवता येते.) ही प्रथा समाजाच्या श्रद्धा, प्रथा, रुढी, परंपरांसोबतच रुढी, विधी, सामाजिक रचनेचा भाग असते.

संशोधक लोअन्ना कत्सुन्नरी यांनी केलेल्या संशोधनानुसार सुंतेचे चार प्रकार असतात. पहिला असतो शिश्निका कापणे, ज्याला अरबीमध्ये ‘सुन्ना’ म्हणतात. ‘सुन्ना’मध्ये शिश्निकेच्या भोवतालची त्वचा आणि शिश्निकेचा काही भाग कापला जातो किंवा पूर्ण शिश्निकाच कापली जाते. दुसऱ्या प्रकारात शिश्निका आणि योनीपटलाच्या आतील भाग (labia) कापला जातो. तिसऱ्या प्रकारामध्ये शिश्निका तर कापली जातेच, सोबतच योनीपटलाच्या आतील आणि बाहेरील दोन्ही भाग कापल्यानंतर योनीच्या दोन्ही बाजू एकत्र शिवल्या जातात. ही प्रथा सोमालिया, इथिओपिया, केनिया आणि सुदानमध्ये मोठ्या प्रमाणात पाळली जाते. योनीच शिवल्यामुळे मूत्रविसर्जन होण्यासाठी तसेच मासिक पाळीवेळी रक्तस्राव बाहेर पडण्यासाठी फार कमी जागा मिळते. त्यामुळे महिलांना असह्य त्रास आणि वेदना सहन कराव्या लागतात. चौथा प्रकार तर त्याहूनही अधिक क्रूर असून त्यात योनीचा भाग टोचला जातो, त्याला छिद्र पाडले जाते तसेच प्रसंगी ते भाग जाळलाही जातो. सुंता करण्याची प्रथा जगभरात प्रचलित असून ९५ टक्के सुंता ही मुलगी एक दिवसाची असल्यापासून १६ वर्षांपर्यंत केली जाते. सुंता केल्याने महिलेची लैंगिक वासना नियंत्रणात राहते, असा विश्वास समाजात आहे. महिला कुमारी (व्हर्जिन) असेल, तरच ती लग्न करण्यास योग्य समजली जाते आणि त्यासाठी ती वयात येण्यापूर्वीच तिची सुंता होणे अनिवार्य आहे, अशी धारणा समाजात आहे. प्रतिगामी विचारांची ही प्रथा काही ठराविक देशांमध्येच नव्हे, तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, न्यूझीलंड, नॉर्वे, स्वीडन, स्वित्झर्लंड, अमेरिका यांसारख्या प्रगत देशांतील स्थलांतरितांमध्येदेखील ही प्रथा रूढ आहे.

आतापर्यंत आपण सुंतांचे प्रकार आणि ही प्रथा कुठे पाळली जाते, याविषयी चर्चा केली; पण यातील समान भाग आहे ती महिला. सुंता करण्याच्या प्रथेमुळे महिलेच्या योनीच्या होणाऱ्या कुरूपतेचा विचार फार थोडे लोक करतात. सुंता झालेल्या ८० टक्के महिलांना लैंगिक सुख मिळवण्यात अडचणी येतात, ४५ टक्के महिला लैंगिक इच्छा गमावून बसतात, ४९ टक्के महिलांना समागमातून आनंद मिळत नाही, तर ६०.५ टक्के महिलांना समागमातील उत्कटता अनुभवता येत नाही. अनेक महिलांना रक्तस्राव, जखमेचा संसर्ग, पू होणे, अतिलघवी होण्यासारख्या समस्या निर्माण होतात. तसेच अशक्तपणा, मूत्रमार्गात संसर्ग होणे, वांझपणा, मासिक पाळीतील समस्या आणि समागमावेळी तीव्र वेदनेसारख्या समस्या उद्‍भवतात. जागतिक आरोग्य संघटनेने सहा आफ्रिकन देशांत केलेल्या सर्वेक्षणानुसार, सुंता झालेल्या महिलांना बाळंतपणावेळी अडचणी येतात. या प्रकारात शंभरपैकी दोन मुले जन्मतःच मरण पावतात; मात्र समाजावर असलेल्या सांस्कृतिक प्रभावामुळे कित्येक घटनांची तर नोंदच होत नाही. कारण सुंता हा सर्वमान्य नियम आणि महिलेवर केला जाणारा एक संस्कार आहे.

सुंता झालेल्या महिलांमध्ये शारीरिक त्रासासोबत काळानुरूप मानसिक आजारही बळावतात. अकारण भीती, उदासपणा, लज्जा, न्यूनगंडासोबतच पीटीएसडीसारखे (पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) आजार महिलांमध्ये आढळून येतात. पीटीएसडीमध्ये रुग्णाला वर्तमानातील एखाद्या घटनेमुळे जुन्या घटनेची आठवण उफाळून येते. त्यामुळे प्रसंगी रुग्ण चिंताग्रस्त होतो. समागमाच्या वेळी किंवा गर्भधारणा परीक्षणावेळी या रुग्णांची पीटीएसडीची लक्षणे तीव्रपणे समोर येतात. हा आजार जडलेल्या महिलांना वैद्यकीय आणि मानसोपचारतज्ज्ञांची वेळीच मदत मिळाली नाही, तर त्या आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. तसेच या महिलांना त्यांच्या कुटुंबीयांविषयी विशेषतः आईबद्दल अविश्वासाची भावना निर्माण होते. कारण आपली सुंता होण्यास अनेक जणी आपल्या आईला जबाबदार मानतात. अनेक समाजांमध्ये सुंता करण्याची प्रथा वंशाच्या एकतेचे आणि अंखडतेचे प्रतीक मानली जाते. ही प्रथा पाळणाऱ्या कुटुंबाला समाजात प्रतिष्ठा मिळते आणि जे कुटुंब प्रथा पाळत नाही, त्यांना समाजातून बहिष्कृत केले जाते. सुंता न झालेल्या अनेक मुलींचे लग्न होण्यास अडचणी येत असल्याच्याही घटना समोर आल्या आहे.

समाजाच्या या दबावापोटी, समाजात सन्मान मिळेल म्हणून अनेक जण सुंता प्रथेचा पुरस्कार करतात. इस्लाम आणि ख्रिश्चन समूहात धर्माचा आदेश म्हणून ही प्रथा पाळली जाते; मात्र सध्या अनेक मुस्लिम महिला या प्रथेविरुद्ध बोलत आहेत. या महिलांच्या मते कुराण किंवा बायबलमध्ये कुठेही सुंता करण्याविषयी सांगितलेले नाही. व्यभिचार हे पाप मानले असले, तरी पती किंवा जोडीदारासोबत लैंगिक सुख मिळवण्याला धर्मग्रंथात निषिद्ध मानण्यात आलेले नाही. जगण्याचा आणि शारीरिक सन्मानाचा, समान संधी आणि हिंसेपासून संरक्षणाचा तिचा अधिकार आहे. १८ वर्षांखालील मुलीची सुंता केल्याने तिच्या बालहक्काचे उल्लंघन होते. महिलेचा किमान शारीरिक आनंद आणि रचना हिरावून घेणाऱ्या प्रथेचे कोणतेही समर्थन योग्य नाही. सुंता केल्यामुळे होणारा त्रास कल्पनेपलिकडचा आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक रुढी-परंपरांमध्ये महिला या कायमच लक्ष्य ठरतात. महिलांना स्वतःची आवडनिवड काहीच नसते. त्यांच्या इच्छेची मालकीही त्यांच्याकडे ठेवली जात नाही. महिलेला वैयक्तिक आनंद उपभोगण्यावर बंधने लादली जावीत, याबाबत जगभरात पाठिंबा मिळणे, हे खरंच क्लेशकारक आहे.

संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या निधी (यूएनएफपीए) च्या अहवालानुसार, जगातील चारपैकी एका मुलीची सुंता केली जाते. ही संख्या जगभरात ५.२ कोटी इतकी आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही प्रथा आता वैद्यकीय क्षेत्रात पैसे कमावण्याचे साधन झाले आहे. एका मुलीची सुंता करण्यासाठी डॉक्टर ९५ डॉलर (साधारण सात हजार रुपये) घेतात. त्यामुळे सुंता करण्याची प्रक्रिया ही त्रासदायक नव्हे, तर महागडी झाल्याची कल्पना येईल.

२०२२ ला नुकतीच सुरुवात झाली आहे आणि जगभरातील ४०.२ लाख मुलींवर सुंता करण्याची टांगती तलवार असल्याचे यूएनएफपीएचा अहवाल सांगतो. ‘यूएनएफपीए’च्या मते २०३० साली २० लाखांहून अधिक मुलींना या त्रासदायक, अन्यायकारक प्रथेला सामोरे जावे लागेल. एक महिला म्हणून माझ्यासाठी हा मन हेलावणारा विचार आहे. आपण कितीही महिलांच्या अधिकार, स्वातंत्र्य आणि निवडीविषयी गप्पा मारल्या, काम केले, तरी धर्म आणि समाज आपल्याला पुन्हा पुन्हा शून्यावर नेऊन सोडतो. जोपर्यंत आपण एकत्रित या अमानवी प्रथेचा विरोध करत नाहीत, तोपर्यंत एक समान आणि पुरोगामी समाज म्हणून आपण उभे राहणार नाही. महिलांना शारीरिक आणि मानसिक विकलांग करणाऱ्या या अमानवी प्रथेच्या विरोधात आपण निर्विवाद उभे राहिले पाहिजे. नुकताच ६ फेब्रुवारीला महिलांच्या सुंताविरोधात शून्य असहिष्णुता दाखवणारा दिवस साजरा झाला. त्या वेळी या अमानवी प्रथेविरोधात ज्या महिला आणि पुरुषांनी समर्थन दिले, त्यांची मी प्रशंसा करते. आपण एकजूट दाखवून आवाज उठवल्यास धर्म आणि संस्कृतीच्या नावावर महिलांवर हिंसा लादणाऱ्या या दुष्ट व घृणास्पद प्रथेचे निर्मूलन शक्य आहे.

nairmalini2013@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com