‘ डिजिटल भटक्यां’ची जीवनशैली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lifestyle of digital

कोरोना महासाथीच्या काळात एक अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे लाखो लोकांना आपापल्या कार्यालयाचे काम घरून करण्याची सोय दिली गेली.

‘ डिजिटल भटक्यां’ची जीवनशैली

- मालोजीराव जगदाळे

कोरोना महासाथीच्या काळात एक अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे लाखो लोकांना आपापल्या कार्यालयाचे काम घरून करण्याची सोय दिली गेली. खरंतर कंपनी आणि कर्मचारी यांच्यासाठी ही विनविन सिच्युएशन होती, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना स्वतःच्या घरून किंवा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून काम करता येणे शक्य होते.

वर्क फ्रॉम पॉलिसीमुळे कार्यालय बंद असल्यामुळे कार्यालयांचे वीजबिल आणि देखभालीचे इतर खर्च वाचत होते. नंतरच्या काळात जेव्हा जेव्हा कार्यालये पुन्हा पूर्ववत सुरू झाली, त्या वेळी घरून किंवा इतर ठिकाणहून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ती कार्यालयीन बंधने नकोशी वाटू लागली. भारतातच नाही तर इतर सर्वच देशांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली.

कारण कुठूनही काम करण्याची त्या वेळी संधी असल्याने लोक हिल स्टेशन वरून पर्यटन स्थळी राहून इतर देशांमध्ये मोठ्या सुट्ट्यांना जाऊन तिथून काम करू लागली होती. पुन्हा नऊ ते पाच या चक्रात अडकणे आता यातल्या बऱ्याच जणांना जाचक वाटू लागले होते.

अमेरिकेत आणि युरोपात लाखो लोकांनी आपल्या नोकऱ्यांचे राजीनामे दिले. ऑक्टोबर २०२१ मध्ये साधारण याची सुरुवात झाली. ‘द ग्रेट रेसिग्नेशन वेव्ह’ असं याला म्हटलं गेलं. यातील बहुतांश लोकांनी जगभर भटकंती करता करता फ्रीलान्स पद्धतीने म्हणजे स्वतंत्रपणे तंत्रज्ञानाच्या मदतीने आपले काम करायला किंवा इतर कंपन्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सेवा द्यायला सुरुवात केली. या अशा पद्धतीने काम करणारे लोक हे डिजिटल नोमॅड किंवा डिजिटल भटके म्हणून ओळखले जातात.

डिजिटल नोमॅडची व्याख्या करायची झाली, तर कोणत्याही एका शहराशी किंवा देशाशी बांधील नसलेले, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञ असलेले आणि जगातील कोणत्याही देशातून लॅपटॉपद्वारे काम करू शकणारे लोक म्हणजे डिजिटल नोमॅड्स. ही जीवनपद्धती नवीन अजिबातच नाही. पूर्वीही लोक अशाप्रकारे काम करत असत; परंतु त्यांचे प्रमाण अतिशय तुरळक होते.

पण गेल्या सात ते आठ वर्षांत या संख्येत शेकडोपटींनी भर पडली आहे. याला कारण म्हणजे डिजिटल मार्केटिंग, डिजिटल ॲडव्हर्टायझिंग, ई-कॉमर्स, ब्लॉगिंग यांना आलेले सोन्याचे दिवस आणि सोशल मीडिया जसे की फेसबुक इन्स्टाग्राम, यू-ट्युब यांच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्नाचे चांगले स्रोत निर्माण होणे. स्वस्त होत असलेला विमानप्रवास, निरनिराळे देश आपल्या व्हिजा नियमांमध्ये आणत असलेली शिथिलता, याही गोष्टी याला कारणीभूत आहेत.

बालीमधील चांग्यू, मेक्सिकोमधील टूलुम, व्हिएटनाममधील हो ची मिन्ह आणि होई यान शहर, मलेशियामधील पेनांग, फिलिपाइन्समधील पालावान बेट, कंबोडियामधील सियाम रीप तसेच थायलंडमधीलच फुकेत आणि कोह फांगान बेटेसुद्धा डिजिटल भटक्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. हजारोंच्या संख्येने या ठिकाणी हे भटके राहतात.

बाली बेटावरील चांग्यू हे गाव चांग माई इतकेच लोकप्रिय आहे. मी स्वतः बालीमधील चांग्यू येथे काही दिवस राहिलो होतो, डिजिटल भटक्यांनी आवर्जून इथे येऊन राहावं म्हणून इथल्या सरकारने आणि स्थानिकांनी तिथे सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे आढळतात.

अगदी २५० रुपये प्रतिदिन पासून राहण्याची असलेली व्यवस्था, वाजवी दरात मिळणारे स्थानिक जेवण, अतिशय हाय स्पीड असे इंटरनेट तसेच मोठ्या प्रमाणावर को-वर्किंग कॅफेज इथे आहेत. लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंगची सोय, बसण्यासाठी डेस्कसारखी व्यवस्था हाय स्पीड वायफाय, कॉफी आणि नाश्ता या सुविधा अगदी वाजवी दरात जिथे दिल्या जातात, त्यांना को-वर्किंग कॅफे म्हणतात.

आठवड्याची किंवा महिन्याची फी भरून या कॅफेंचे सभासद होता येते. इथे जो डिजिटल भटक्यांचा मोठा समुदाय निर्माण झाला आहे तो एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ या वचनाप्रमाणे आठवड्यातून एकदा एकत्र जमतो आणि त्याद्वारे कामांच्या संधीची इतर माहितीची देवाणघेवाण होते.

ऑनलाइन ग्रुपच्या माध्यमातून हे भटके एकमेकांना राहण्याच्या सोयीपासून ते अगदी काम मिळवून देण्यापर्यंत मदत करताना दिसतात. वर्षातून एकदा यांचे मोठे वार्षिक संमेलनसुद्धा भरते. पाहिजे तसे आणि पाहिजे तिथे हव्या असलेल्या शहरात किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये राहण्याचा आणि फिरण्याचा आनंद घेता येत असल्याने ही जीवनशैली आता वेगाने लोकप्रिय होत आहे.

मी फुकेतमध्ये भटकंतीसाठी काही दिवस असताना एक अमेरिकन जोडपे मला भेटले, हाय-हॅलो करत थोडी ओळख वाढल्याने कळाले की ते डिजिटल नोमॅड आहेत. न्यूयॉर्कमधील ब्रूकलिनमधले स्वतःचे अपार्टमेंट दोन वर्षांसाठी भाड्याने देऊन हे दोघे जगभर फिरत होते, त्यांना फुकेत आवडलं आणि गेली एक वर्ष ते तिथेच राहत आहेत.

न्यूयॉर्कमधील त्यांच्या घराचा भाडं त्यांना दोन हजार डॉलर्स महिन्याचे मिळतं आणि इथे फूकेतमध्ये त्यांचा खर्च महिन्याला एक हजार डॉलरच्या पलीकडे जात नाही. म्हणजे दर महिना एक हजार डॉलर शिलकीत जातात, वर डिजिटल नोमॅड म्हणून काम करताना मिळणारी रक्कम वेगळीच. त्यातूनच त्यांनी फूकेतमध्ये व्हिला विकत घेतलाय.

नुकत्याच झालेया म्हणजे याच वर्षात केलेल्या आकडेवारीनुसार सध्या जगभरामध्ये ३५ कोटींपेक्षा अधिक डिजिटल भटके आहेत, जे जागतिक अर्थव्यवस्थेत दरवर्षी आठशे बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त भर घालत आहेत.

हे भटके स्वतःच्या कमाईचा ३५ टक्के हिस्सा मुक्काम असलेल्या देशात खर्च करतात त्यामुळे सध्या अनेक देश या डिजिटल भटक्यांना आपल्याकडे आकर्षित करत असून त्यांना या देशांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उद्युक्त करत आहेत.

या वर्षी ४२ पेक्षा अधिक देशांनी डिजिटल नोमॅड वर्किंग व्हिसा जारी केला असून या देशांमध्ये युनायटेड अरब अमिरात मधील दुबई, पोर्तुगाल, इंडोनेशिया, ग्रीस, मेक्सिको, हंगेरी, तैवान इत्यादी देशांचा समावेश आहे. ही जीवनशैली आकर्षक जरी वाटत असली तरी काही तोटे इथेही आहेत.

निवृत्तीचे वय नसणे, दर महिन्याच्या निश्चित उत्पन्नाची शाश्वती नसणे, ज्या देशात राहतो तिथल्या व्हिजा नियमांमध्ये कधीही बदल होणे, कधी कधी एकटेपणा जाणवणे, सतत देश बदलत असल्याने नागरिकांना सरकारकडून मिळतात तशा सोयी सुविधा न मिळणे, अनेक देशांमध्ये आरोग्य सुविधा अतिशय महागडे असल्याने आंतरराष्ट्रीय आरोग्य विमा धारण करणे अशी आव्हाने डिजिटल भटक्यांसमोर कायम असतात.

असं असूनसुद्धा आपल्या कामावर आणि आपल्या जीवनशैलीवर समाधानी असणाऱ्या लोकांमध्ये डिजिटल भटके नंबर १ ला आहेत. ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोक आपल्या कामाबद्दल समाधानी आहेत. येत्या तीन वर्षांत अजून काही कोटी लोक या जीवनशैलीचा स्वीकार करतील असा ट्रेंड आहे.

जगभर भटकत राहून काम करण्यासाठी फक्त तंत्रज्ञानविषयी कौशल्य असणे गरजेचे नाही, अनेक देशांमध्ये योगा ट्रेनिंग, स्कुबा डायव्हिंग, मार्केटिंग, आंतरराष्ट्रीय स्टॉक एक्स्चेंज, शाळांमध्ये इंग्रजी शिकवणे इत्यादी माध्यमातून भटक्यांना उत्पन्नाच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. मुक्त जीवनशैली, मनाप्रमाणे कोणत्याही देशात काम करण्याचे स्वातंत्र्य, स्वतःचे काम निवडण्याचे स्वातंत्र्य, तणाव मुक्त वर्क लाइफ बॅलन्स या गोष्टींमुळे लोकांचा ओढा डिजिटल नोमॅड होण्याकडे वाढत जाणार हे निश्चित.

युरोपियन किंवा अमेरिकन लोकांप्रमाणे मोठ्या प्रमाणावर भारतीय जरी अशी जीवन पद्धती स्वीकारण्याचे धाडस करत नसले तरीसुद्धा माझ्या भटकंती दरम्यान हिमाचल प्रदेशमधील मनाली, धरमकोट,

कसोल उत्तराखंडमध्ये ऋषिकेश अशा ठिकाणी अनेक महिन्यांपासून राहत असलेले आणि तिथूनच काम करणारे बरेच तरुण-तरुणी भेटले. डिजिटल भटक्यांचे जगातील सर्वांत आवडते शहर म्हणजे थायलंडमधील चांग माई. या शहराला डिजिटल नोमॅड कॅपिटल असेही म्हटले जाते. या लहानग्या शहरात स्थानिक लोकसंख्येइतकीच लोकसंख्या परदेशी नागरिकांची आहे.

टॅग्स :digitalsaptarang