ज्वालामुखीच्या जवळ जाताना... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Volcano

हवाई बेटं आइसलँड आणि इंडोनेशिया इथं काही जिवंत ज्वालामुखी आहेत आणि काही परवानगी जर मिळाल्या तर हे ज्वालामुखी जाऊन बघतासुद्धा येतात अशी माहिती मिळाली.

ज्वालामुखीच्या जवळ जाताना...

- मालोजीराव जगदाळे jagdaleomkar5@gmail.com

नॅशनल जिओग्राफिक किंवा डिस्कवरी चॅनेल बघताना बरेचदा ज्वालामुखीसंदर्भातली माहिती बघायला मिळायची. दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनेलवर आइसलँडमधील मेरादालीर आणि इंडोनेशियामधील आगुंग या ज्वालामुखींच्या उद्रेकांच्या बातम्या बघितल्या. या बातम्या बघून ज्वालामुखीबद्दल जे सुप्त आकर्षण होतं, त्याची जागा कुतूहलाने घेतली होती. त्यामुळे असा एखादा जिवंत ज्वालामुखी थेट त्या ज्वालामुखीच्या मुखावर उभं राहून बघता आला तर किती भारी होईल, असं वाटून जायचं. झालं, त्या अनुषंगाने शोधाशोध करायला सुरुवात केली. भारतात बघितलं तर मुख्य भूमीवर एकही जिवंत ज्वालामुखी नाहीये. भारतामध्ये येणाऱ्या बेटांपैकी अंदमानमधील बॅरेन आयलँडवर जिवंत ज्वालामुखी आहे; परंतु सर्वसामान्यांना या बेटावर जाता येत नाही.

हवाई बेटं आइसलँड आणि इंडोनेशिया इथं काही जिवंत ज्वालामुखी आहेत आणि काही परवानगी जर मिळाल्या तर हे ज्वालामुखी जाऊन बघतासुद्धा येतात अशी माहिती मिळाली. यात सगळ्यात जवळचा आणि परवानगी मिळण्याच्या दृष्टीने त्यातल्या त्यात सोपा पर्याय होता इंडोनेशियातील जावा बेटावरचा ब्रोमो ज्वालामुखी. भारतीयांसाठी इंडोनेशिया म्हणजे बाली असा सरळ सरळ हिशोब होता, त्यामुळे इंडोनेशियावरचं जावा बेट, तिथली शहरं आणि ज्वालामुखीपर्यंत पोहोचण्यासाठी करावं लागणारं नियोजन, हे माझ्यासाठी नवीन होतं.

काही परदेशी हौशी पर्यटकांनी या ब्रोमो ज्वालामुखीची सफर केली होती, त्यांना फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शोधलं आणि त्यांच्याकडून यासंदर्भातील अधिक माहिती गोळा केली. जावा बेट हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं बेट आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्तासुद्धा जावामध्येच आहे. भारतातून थेट फ्लाइट नसल्याने मुंबई ते क्वालालंपूर आणि क्वालालंपूर ते जकार्ता अशी फ्लाइट घ्यावी लागली.

पुढचा प्रवास आता खऱ्या अर्थाने ज्वालामुखीच्या बेसकॅम्पच्या दिशेने होणार होता. जकार्ता ते सूरबाया हे आठशे किलोमीटरचं अंतर फ्लाइटने, तर सूरबाया ते मलांग हे १०० किलोमीटरचं अंतर राज्य परिवहनच्या बसने पार करून मलांग शहरामध्ये मुक्कामासाठी पोहोचलो. या आधी मी किंवा माझ्या ओळखीच्या कोणत्याही पर्यटक मित्रांना या शहराबद्दल कोणतीही माहिती नव्हती, त्यामुळे आधीच सर्च करून ठेवलेल्या एका आंतरराष्ट्रीय हॉस्टेलमध्ये मी मुक्काम केला. आंतरराष्ट्रीय हॉस्टेलमध्ये वेगवेगळ्या देशांतील समवयीन पर्यटक आलेले असतात आणि एकत्र ग्रुपमधून या ज्वालामुखीपर्यंत पोहोचता येईल असा विचार मनात होता; आणि होस्टेलमध्ये पोहोचता क्षणी मला तिथं रिसेप्शनवरच दुसऱ्या दिवशी होणाऱ्या ब्रोमो ज्वालामुखीच्या टूरबद्दल माहिती मिळाली.

लागलीच पैसे भरून मी माझं नाव रजिस्टर करून टाकलं आणि सामान होस्टेलवर टाकून मी मलांग शहर भटकण्यासाठी निघालो. जुन्या काळातल्या इमारती, जुनाट रेस्टॉरंट्स, आधुनिक सोयी-सुविधांचा अभाव हे पाहून एकीकडे जकार्तासारखं शहर काळाच्या पुढे निघून जात असताना जावा बेटाच्या अगदी पूर्वेला असणारं हे मलांग शहर अजूनही १९८० च्या काळात जगतंय की काय असं वाटत होतं. इथल्या स्थानिक मार्केटमध्ये पटकन जेवण उरकून घेतलं आणि हॉस्टेलवर आलो, कारण पहाटे तीन वाजताच आम्हाला ब्रोमो ज्वालामुखीच्या दिशेने निघायचं होतं.

होस्टेलवर जमलेल्या, वेगवेगळ्या देशांतून आलेल्या पर्यटकांसोबत रात्री बराच वेळ गप्पा झाल्याने झोपायलाच बारा वाजले, त्यामुळे अक्षरशः फक्त तीन तासांतच झोपेतून उठून आवरून आम्ही सगळे रिसेप्शनला येऊन थांबलो. समुद्र सपाटीपासून ७६४१ फूट उंची असलेल्या या ब्रोमो ज्वालामुखीपर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय खडी चढण आणि राखेचं दहा किलोमीटरचं वाळवंट पार करून जावं लागतं, त्यामुळे साधारण SUV गाड्यांपेक्षा वेगळ्या अशा ४×४ च्या लँड क्रूजर गाड्या इथं वापरल्या जातात.

ब्रोमो, सुमेरू, बाटोक, कूर्सी, वाटांगान या पाच ज्वालामुखींच्या समूहापासून ब्रोमो सुमेरू राष्ट्रीय उद्यान बनलं आहे. थेट ज्वालामुखीला जाऊन भिडण्याआधी ब्रोमोच्या समोर असणाऱ्या आठ हजार आठशे फूट उंचीच्या पेनानजकान पर्वतावर आम्ही गेलो. आम्ही इथं पोहोचलो तेव्हा मोजकेच दहा-पंधरा जण होतो; पण जसजसा सूर्योदय जवळ येत गेला, तशी लोकांची संख्या वाढली आणि जवळपास हजार-बाराशे लोक इथं जमले. समोरील पर्वतावर सूर्याची पहिली किरणं पडतात आणि त्याचं अफाट दृश्य बघण्यासाठी इथं प्रचंड गर्दी होते. सूर्योदय पाहून झाल्यावर आम्ही आता ब्रोमोच्या दिशेने वाटचाल सुरू केली.

हजारो वर्षांपूर्वी इथं फक्त एकच ज्वालामुखी होता, तो म्हणजे महामेरू. हा महामेरू ज्वालामुखी फुटून त्याचं हे मोठं विवर तयार झालं आणि त्यामध्ये हे पाच लहान ज्वालामुखी निर्माण झाले. हा ज्वालामुखी असलेला संपूर्ण भाग हा हिंदुबहुल आहे. इथं यांना जावनीज हिंदू म्हणून संबोधलं जातं. इथं सुमेरू पर्वत शंकराचं, तर ब्रोमो पर्वत ब्रह्माचं निवासस्थान आहे असं समजलं जातं.

ब्रोमो शब्द हा ब्रह्माचा अपभ्रंश आहे. पंधराव्या शतकात मजापहित या हिंदू साम्राज्याने इंडोनेशियाच्या मोठ्या भागावर राज्य केलं होतं, त्याच्या खाणाखुणा आजही या भागात दिसतात. सुमेरू आणि ब्रह्मा ज्वालामुखीच्या उद्रेकातून जी राख जमिनीवर पडते, त्यामुळे इथं राखेचं वाळवंट तयार झालेलं आहे. हे वाळवंट पार करून गाड्या येथील पुरा लुहुर या हिंदू मंदिराजवळ थांबवाव्या लागतात. याला कारण असं आहे की, या मंदिराच्या बाहेर एक शिलालेख आहे, ज्याच्यावर असं लिहिलं आहे की, ‘आपले रथ इथंच थांबवून ब्रह्मा आणि सुमेरूच्या दर्शनासाठी जा.’ तत्कालीन राजाची ही आज्ञा आजही शिरसावंद्य मानली जाते आणि सर्व वाहनं या मंदिराच्या अलीकडेच थांबवली जातात.

इथून पुढे सुमारे दोन किलोमीटर राखेचं वाळवंट पायीच पार करावं लागतं, मग आपण पायथ्याशी येऊन पोचतो. समोर ब्रह्मा ज्वालामुखी आणि ब्रह्माच्या मागे सुमेरू ज्वालामुखी आपल्याला अगदी हाताच्या अंतरावर दिसायला लागतात. अर्ध्या तासाची चढण चढल्यावर आपण शंकराच्या एक मोठ्या पिंडीजवळ येऊन पोहोचतो. इथं ब्रह्मा ज्वालामुखीबद्दलचा माहिती फलक दिलेला आहे. इथून पुढे ज्वालामुखीच्या मुखापर्यंत पोहोचण्यासाठीची खडी चढाई सुरू झाली.

एखाद्या मोठ्या कारखान्याची घरघर ऐकू यावी असा आवाज आता ऐकू येत होता. संपूर्ण ब्रह्मा ज्वालामुखी हा अतिशय ठिसूळ असलेल्या ओलसर मातीपासून बनलेला आहे, त्यामुळे ज्या ज्या वेळी इथं उद्रेक होतो, त्या त्या वेळी या ज्वालामुखीचा चेहरामोहरा आणि मुखाचा आकार बदलत राहतो. दर काही महिन्यांनी सुमेरू आणि ब्रह्मा या दोहोंचे मोठे उद्रेक होत असतात, त्यामुळे हा भाग पर्यटकांसाठी कित्येक दिवस बंद असतो. माझं नशीब चांगलं की, मी गेलो तेव्हा ब्रह्मा ज्वालामुखी पाहण्यासाठी खुला होता.

वर पोहोचताक्षणी एक विस्मयकारक दृश्य दिसलं. धडधडत्या ज्वालामुखीच्या तोंडावर श्रीगणेशाची मूर्ती विराजमान होती. आमच्या गाइडने अशी माहिती दिली की, मजापहित साम्राज्याच्या काळापासून ही मूर्ती तिथं विराजमान आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे अनेकदा ही मूर्ती नष्ट झाली; परंतु पुन्हा भाविकांनी ही मूर्ती इथं बसवली. ज्वालामुखीच्या तोंडावरून दिसणारा नजारा केवळ अद्‍भूत होता.

ज्या विवरामध्ये किंवा कॅल्डरामध्ये हा पाच ज्वालामुखींचा समूह आहे, तो प्रदेश म्हणजे पृथ्वीवरचा अजिबातच वाटत नव्हता. ब्रह्मा ज्वालामुखीच्या तोंडावरून खाली वाकून बघताना धुरांचे लोट आणि त्याच्याखाली तळाशी उकळणारा द्रवपदार्थ दिसत होता. ज्वालामुखीच्या तोंडावर एक अतिशय अरुंद अशी पायवाट आहे, ज्याच्यावरून संपूर्ण मुखाला फेरी मारता येते. एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला ज्वालामुखी, त्यातच पायांखाली भुसभुशीत जमीन, त्यामुळे ही वाट अतिशय धोकादायक झाली आहे. तरीसुद्धा जीव मुठीत घेऊन गाइडच्या मदतीने ही प्रदक्षिणा पूर्ण केली आणि ज्वालामुखीचे वेगळे कंगोरे आम्हाला बघायला मिळाले.

दरवर्षी जून-जुलै महिन्यात मजापहित राजघराण्याच्या वंशजांकडून यज्ञ कसादा हा विधी केला जातो, ज्यामध्ये लाखो जावनीज हिंदू सहभागी होतात. सर्वांत पवित्र मानल्या जाणाऱ्या या ब्रह्मा ज्वालामुखीला संतुष्ट करण्यासाठी त्याच्या मुखामध्ये कोंबड्या, अन्नधान्य, फुलं, कपडे इत्यादी गोष्टी प्रसाद म्हणून टाकल्या जातात. ज्वालामुखीला देव मानून त्याची अशा प्रकारे आराधना करण्याचा हा जगातील एकमेव वैशिष्ट्यपूर्ण सोहळा आहे आणि हा हिंदू धर्माशी निगडित आहे हे विशेष. भारतीय पर्यटकांनी बालीच्या पलीकडे जाऊन जावा, सुमात्रा बेटांवर असणारे निसर्गाचे चमत्कार आवर्जून पहायला हवेत.

(लेखक इतिहास अभ्यासक असून त्यांनी साहसी पर्यटन स्वरुपाची भटकंती अनेक देशात केली आहे.)

टॅग्स :saptarang