Volcanoes
Volcanoessakal

ज्वालामुखी आणि मिठाचं मैदान

पूर्वी पारंपरिक पर्यटनामध्ये साहसी पर्यटनाला अजिबातच स्थान नव्हते शक्यतो कोणताही पर्यटक वाट वाकडी करून तिकडे जात नसे.
Summary

पूर्वी पारंपरिक पर्यटनामध्ये साहसी पर्यटनाला अजिबातच स्थान नव्हते शक्यतो कोणताही पर्यटक वाट वाकडी करून तिकडे जात नसे.

- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com

नियमित पर्यटनासोबतच थोडी वेगळी वाट निवडून आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर असणाऱ्या आगळ्या वेगळ्या, थरारक आणि काहीतरी विशेष मिळवल्याची अनुभूती देणाऱ्या गोष्टी करणे म्हणजे साहसी पर्यटन अशी एक ढोबळ व्याख्या करता येईल. देशातल्या गोष्टीबाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्र आणि उत्तराखंड साहसी पर्यटना बाबतीत सर्वांत अग्रेसर राज्य म्हणता येतील. आपल्या राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास आणि वारसा लाभल्याने प्रत्येकाला गडकिल्ल्याविषयी एक आस्था आणि कुतूहल आहेच, आणि त्याच माध्यमातून पुढे त्या छंदाचे परिवर्तन नियमित ट्रेकिंग मध्ये होते. तर उत्तरेकडे बृहद हिमालय उत्तराखंडमध्ये असल्याने देशातून तसेच जगभरातून अनेक ट्रेकर्स तेथील उंच शिखरे पादाक्रांत करण्यासाठी दरवर्षी येत असतात. त्या अनुषंगाने मोठी आर्थिक उलाढाल तिथे होते. त्यामुळे साहसी पर्यटनाच्या माध्यमातून मोठी अर्थव्यवस्था उभी राहिलेले पहिले राज्य म्हणून उत्तराखंडकडे बघता येईल.

साहसी पर्यटनामध्ये साधारणतः दोन प्रकार पडतात एक म्हणजे सॉफ्ट अॅडव्हेंचर आणि दुसरं हार्ड एडवेंचर. सर्वसामान्यांना सहज करता येण्याजोगे , कमी धोका असलेले,अगदी वाजवी पूर्वतयारी करून करता येणाऱ्या गोष्टी सॉफ्ट अॅडव्हेंचर प्रकारात येतात याच्यामध्ये बंजी जंपिंग, रिव्हर राफ्टिंग, ट्रेकिंग (तांत्रिक मदतीशिवाय, ट्रेनरसह केलेले स्काय डायव्हिंग, जंगल सफारी, स्कींईंग इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. दुसऱ्या प्रकारामध्ये उंच गिरीशिखरांवरच्या मोठ्या मोहिमा, खोल समुद्रातील स्कुबा डायविंग, युद्धग्रस्त अथवा अस्थिर प्रदेशांना देशांना भेट देणे, हिच हायकिंग प्रकाराने फिरणे यांसारख्या गोष्टी येतात.

पूर्वी पारंपरिक पर्यटनामध्ये साहसी पर्यटनाला अजिबातच स्थान नव्हते शक्यतो कोणताही पर्यटक वाट वाकडी करून तिकडे जात नसे. उदाहरणार्थ राष्ट्रीय पातळीवर सांगायचं झाल्यास पूर्वी लेह लडाख मनाली इत्यादी भाग पर्यटक चार चाकी वाहनांनी फिरत असत, फक्त देवदर्शनासाठी हरिद्वार ऋषिकेश केदारनाथ बद्रीनाथ या तीर्थक्षेत्रांना भेटी देत असत. परंतु आता लेह ,लडाख ,मनाली, स्पिती ,काझा साठी मोठ्या प्रमाणावर बाईक राईडचे आयोजन केले जाते. ऋषिकेशला गेल्यावर कॅम्पिंग, रिव्हर राफ्टींग, बंजी जंपिंग करण्याकडेही भर दिला जातो. कोणी नैनिताल ला गेल्यास त्याची पावले आपसूक जिम कॉर्बेट जंगलाकडेही वळतात.

केदारनाथ बद्रीनाथ चे दर्शन घेणाऱ्यांपैकी अनेक जण वाटेत लागणाऱ्या व्हॅली ऑफ फ्लॉवर मध्ये सुद्धा ट्रेकिंग साठी जातात. हिमाचल प्रदेश मध्ये प्रसिद्ध असलेल्या हमता पास, खीर गंगा, केदारकंठ येथे ट्रेकिंग साठी तर लाखोंच्या संख्येने पर्यटक दरवर्षी येतात. तसेच बीर बिलिंग हे पॅराग्लायडिंग साठी आणि गुलमर्ग,ऑली हे स्कींईंग साठी जगप्रसिद्ध आहे.

आपल्या शेजारील नेपाळवर हिमालयाची मोठी कृपादृष्टी आहे जगातील सर्वात उंच शिखर माउंट एवरेस्ट सोबतच सर्वाधिक अष्टहजारी हिमशिखरे इथे आहेत. नेपाळच्या वार्षिक उत्पन्नापैकी तब्बल आठ टक्के उत्पन्न हे साहसी पर्यटनाच्या माध्यमातून येते. पाच लाखांपेक्षा जास्त लोकांना या माध्यमातून रोजगार मिळतो यावरून आपल्याला याचा आवाका लक्षात येईल. दुबई जगभरातील पर्यटकांना जेट स्की आणि स्काय डायव्हिंग च्या माध्यमातून आपल्याकडे आकर्षित करत आहे. इंडोनेशियामध्ये तब्बल ७६ जिवंत ज्वालामुखी असून त्यापैकी आयजेन, क्रकाटॉआ, ब्रोमो हे सर्वांत प्रसिद्ध आहेत, आयजेन ज्वालामुखीतून पहाटे निघणाऱ्या निळ्याशार ज्वाला आणि लाव्हाला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. आइसलँड मध्ये सुद्धा अशा प्रकारचे जिवंत ज्वालामुखी आहेत, परंतु या सर्वांमध्ये निरागोंगो हा ज्वालामुखी त्याच्या उदरात असलेल्या अति प्रचंड लाव्हारसाच्या साठ्यामुळे प्रेक्षणीय आहे.

सततच्या युद्धामुळे व रोगराईमुळे अतिशय अस्थिर आणि असुरक्षित असलेल्या आफ्रिकेतील काँगो देशात हा ज्वालामुखी असल्याने मुळात पोहोचणे कठीण आहे. अनेक धाडसी पर्यटक येथे खाजगी सुरक्षा रक्षक भाड्याने घेऊन हा डोंगर बघायला येतात.

मागील दशकात अरब राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर उठाव झाले त्यामुळे येथील परिस्थिती अस्थिर बनली. इराक, सीरिया,लेबनॉन, येमेन,अफगाणिस्तान हे देश युद्धामध्ये होरपळले. यातील इराक ,सीरिया, लेबनॉन यांनी पर्यटकांना येण्याची मुभा दिली. या देशातील युद्धग्रस्त शहरांकडे सुद्धा परदेशी पर्यटकांचा ओढा पाहण्यात आला. आफ्रिकेतील इथिओपिया मध्ये अतिशय आगळ्यावेगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आहेत परंतु राजधानी अदीस अबाबा येथील सुरक्षिततेचा अभाव , हिंस्त्र आदिवासी टोळ्यांचे प्रदेश यामुळे हा देश फिरणे अडचणीचे आहे. येथील आवर्जून भेट देण्यासारखी ठिकाणे म्हणजे दानाकील डिप्रेशन हे समुद्रसपाटीपासून १०० मीटरपेक्षाही खाली असणारे जगातील सर्वांत उष्ण ठिकाण, दाल्लोल येथील सल्फ्युरिक ऍसिडचे उकळते झरे, तसेच मानवाची जिथून उत्पत्ती झाली त्या ओमो व्हॅलीचा प्रदेश , या प्रदेशात तेथील स्थानिक टोळ्यांचे नियम लागू असतात त्यामुळे कायदा आणि प्रशासन या भागातून गायब आहे.

दुर्दैवाने युरोप अमेरिकेतील पर्यटकांना मागासलेल जग बघण्याचं मोठं आकर्षण आहे, त्यामुळे सुरक्षिततेची हमी नसतानासुद्धा प्रशासन नसलेल्या सोमालिया, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक, दक्षिण सुदान, बुर्किना फासो यांसारख्या देशात आणि आत्ताच्या आधुनिक काळात सुद्धा मानवी गुलामगिरीची व्यवस्था असणाऱ्या मॉरिटानिया सारख्या देशांमध्ये सुद्धा काही धाडसी पर्यटक फिरताना दिसतात. अशा कायदा सुव्यवस्था नसलेल्या देशांमध्ये फिरण्या अगोदर स्थानिक भारतीय दूतावास यांचा सल्ला घ्यावा आणि प्रचंड पूर्वतयारीनिशी सुरक्षिततेची हमी असेल तरच या देशांमध्ये पर्यटनासाठी जावे. या बाबी सांगून पर्यटकांचा हिरमोड करण्याचा मुळीच हेतू नसून वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपण स्वतःच साहसी पर्यटनासाठी कितपत ''साहस'' करायचे याचे ताळतंत्र ठेवले पाहिजे.

साहसी पर्यटनामध्ये बाईक रायडिंग किंवा कार ड्रायव्हिंग द्वारे मोठा पल्ला गाठणे हे फक्त भारतापुरतेच मर्यादित राहिले नसून याच्या कक्षा विस्तारून आता महाराष्ट्रातून नेपाळ भूतान सोबतच थेट सिंगापूर गाठण्यापर्यंतचा पल्ला पार केला आहे. अशा आंतरराष्ट्रीय बाईक राईड साठी अनेक कागदोपत्री सोपस्कार पार पाडावे लागतात परंतु हौसेला मोल नसतेच. अशीच व्हिएतनामधील दक्षिणेकडील हो ची मिन्ह शहर ते उत्तरेकडील हनोई यांना जोडणारी तब्बल २७०० किलोमीटरची बाईक राईड अतिशय प्रसिद्ध आहे. मुख्य म्हणजे पर्यटकांच्या सोयीसाठी बाईक भाड्याने घेऊन ती दोन्हीपैकी कोणत्याही शहरात ड्रॉप करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

नुकतीच ब्राझीलची राजधानी रिओ दी जानेरो ते पेरूची राजधानी लीमा यांना जोडणारा तब्बल सहा हजार किलोमीटर आजचा हायवे बनवला गेला. अटलांटिक महासागरापासून सुरू झालेला हा प्रवास ॲमेझॉन चे जंगल ,अँडीज पर्वतरांगा यांना पार करत प्रशांत महासागरा जवळील लीमा शहरात येऊन संपतो. या माध्यमातून ब्राझील, बोलिविया, पेरू, चिले या दक्षिण अमेरिकेतील देशांची अतिशय जवळून ओळख होते. बोलिविया मध्ये सालार दे उयुनी ही शेकडो किलोमीटर पसरलेले मिठाचे मैदान आहे. मिठाच्या मैदानावरील पाण्याच्या बारीक थरावर आभाळाचे प्रतिबिंब पडल्यामुळे आभाळ व जमीन एकच आहे असा भास निर्माण होतो त्यामुळे जगातील सर्वात मोठा आरसा म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. कला संस्कृती आणि इतिहास यांची अतिशय सुंदर सांगड असलेला प्राचीन खुश्कीच्या मार्गाचा (सिल्क रुट) प्रवास सध्या लोकप्रिय होऊ लागलेला आहे. सिल्क रूट वर येणाऱ्या उझबेकिस्तान, कझाकस्तान आणि किरगिझस्तान या देशांचा त्यात समावेश आहे. भारतीयांना या देशांचा इ व्हिसा उपलब्ध असल्यामुळे या प्रवासाचे नियोजन करणे तसेच सहज शक्य आहे.

साहसी पर्यटनाच्या माध्यमातून अनेक गोष्टी शिकता येतात. छंद म्हणून स्कुबा डायविंग शिकत असाल तर या छंदाचे रूपांतर तुम्ही करिअरमध्ये करू शकता, थायलंड मधील कोह ताओ या लहानशा बेटावर जगातील अग्रगण्य स्कुबा डायविंग प्रशिक्षण केंद्रे आहेत. ट्रेकिंग मध्ये रस असेल तर उत्तरकाशी मधील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मॉउन्टेनरिंग येथून आपण तांत्रिक प्रशिक्षण प्राप्त करू शकता. चेक रिपब्लिक मध्ये सुट्टीला गेला असाल तर चक्क विमान उडवायला शिकू शकाल. मॉस्को मध्ये रणगाडा चालवण्याचा आणि MIG २९ या फायटर जेट मधून उड्डाण करण्याचा सुद्धा अनुभव घेता येईल. पर्यटक म्हणून फ्रान्समध्ये असाल तर फ्रान्समध्ये जगातील सर्वात वेगवान अशी F-१ कार शिकण्याची आणि चालवण्याची संधी उपलब्ध आहे. एकंदरच काय तर आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात सुद्धा आपण छोट्या-मोठ्या धाडसी गोष्टी करतच असतो की तसंच पूर्ण काळजी घेऊन एखादं साहसी पर्यटन करायला काय हरकत आहे.

(लेखक जगभर भटकंती करत असतात, त्यांचा साहसी पर्यटनावर भर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com