प्रतापगडावर सोडला ‘जाणता राजा’चा संकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतापगडावर सोडला ‘जाणता राजा’चा संकल्प
प्रतापगडावर सोडला ‘जाणता राजा’चा संकल्प

प्रतापगडावर सोडला ‘जाणता राजा’चा संकल्प

-: मालोजीराव शिरोळे

वयाच्या २१ व्या वर्षी माझी आणि शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरे यांची ओळख झाली. त्यांच्यासोबत गड मोहिमेला जाण्यास सुरवात झाली. १९७५ च्या हिवाळ्यात एका पौर्णिमेच्या रात्री आम्ही प्रतापगडावर गेलो. पहाटे मला बाबासाहेबांनी झोपेतून उठवले आणि म्हणाले, ‘‘त्या झुंजार बुरुजाच्या इथे जा आणि पटकन अंघोळ करून या.’ बुरुजाच्या येथील तळ्यातील थंडगार पाण्याने अंघोळ करून मी आलो. त्यानंतर त्यांनी माझ्या हातात ओले कुंकू दिले आणि उजव्या हाताच्या बोटाने ‘श्री’ काढायला लावले. ‘श्री’ काढून झाल्यानंतर तो कागद हातात घेऊन बाबासाहेब म्हणाले, ‘‘आपण शिवाजी महाराजांवर भव्य नाटक तयार करायचे, आता तयारीला लागा.’’

या प्रसंगाने मी भारावून गेलो. बाबासाहेबांनी त्यांच्या कल्पनेतून, अभ्यासातून ‘जाणता राजा’ नाटकासाठी लिखाण सुरू केले. त्यातील पोवाडे, भारूड, लावणी, संवाद यावर काम सुरू झाले. त्यावेळी अनेक मोठे दिग्गज कलाकार, संगीतकार या नाटकासाठी गायन करण्यास तयार होते. पण बाबासाहेबांनी त्यास नकार देत, हे काम सर्वसामान्य घरातील मुलेच करतील असे त्यांना सांगितले. विश्रामबागवाड्यात नाटकाची तालीम सुरू झाली. जंगली महाराज रस्त्यावर झाशीच्या राणी चौकात लोणकर वाडा होता, तेथे एका स्टुडिओमध्ये नाटकाचे रेकॉर्डिंग सुरू झाले त्यानंतर काही भाग मुंबईतील एका स्टुडिओमध्ये केले. मी या सर्व घडामोडींचा साक्षीदार होतो. विश्रामबाग वाड्यात नाटकाची तालीम सुरू झाली. शिवाजी महाराज, माँ जिजाऊ साहेब यांच्यासाठी प्रत्येकी चार कलाकार होते. शिवाजी महाराज यांची देहबोली कशी असली पाहिजे, तलवार कशी घ्यावी, संवाद कसा करावा, हातवारे यावर स्वतः बाबासाहेब मार्गदर्शन करत. संध्याकाळपासून ते रात्री ११ पर्यंत तालीम सुरू असायची. नाटकाच्या पहिल्या प्रयोगात हडपसरच्या दिलीप तुपे यांनी मोठ्या शिवाजी महाराजांची भूमिका केली होती, त्यावेळी तुपे यांच्यामध्ये शिवाजी महाराज भिनविले होते, इतकी तयारी करून घेतली होती. तुपे नंतर नगरसेवक झाल्यानंतर माझा पुतण्या प्रवीण शिरोळे यांना शिवाजी महाराजांची भूमिका दिली. नाटकात घोड्यावरून शिवाजी महाराज येत असल्याचा प्रसंग असल्याने त्यास स्वतः बाबासाहेबांनी घोडेस्वारी शिकवली. ‘जाणता राजा’मध्ये लहान मुलांसाठीही अभिनय होता, त्यामध्ये ‘भुताटकी झाली बाई भुताटकी झाली,’ ‘चला चला चला लग्नाला चला,’ ‘आठवतो का गड्या तुला रे सोन्याचा नांगर’ अशी गाणी नाटकांमध्ये बाबासाहेबांनी रचली. नाटकातील भारूड, लावणीसाठी कृष्णदेव मुळगुंद यांच्याकडून नृत्य बसवून घेतले. यामध्ये आरती पवार, डॉ. लोहकरे यांनी नृत्य केले होते.

‘‘जाणता राजा’ नाटकातील खरा क्लायमॅक्स म्हणजे औरंगजेबाचे भाषण. यासाठी भारदस्त आवज आवश्‍यक होता, मराठीतील एका प्रख्यात अभिनेत्याने शिवाजी महाराज यांच्याबद्दल नाटक असल्याने विनामोबदला आवाज देण्याचे मान्य केले. त्यासाठी मुंबईतील स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग होणार होते, पण ऐनवेळी या अभिनेत्याने नकार दिला. पैसे वाया जाणार या चिंतेत बाबासाहेब होते, त्यावेळी बाबासाहेबांची गोंधळलेली अवस्था सिद्धार्थ काक यांनी पाहिली, त्यांनी चौकशी केली, बाबासाहेबांनी स्थिती सांगताच त्यांनी त्वरित औरंगजेबाचा आवाज देण्यासाठी तयारी दाखवली.

डेक्कन येथील श्रृति मंगल कार्यालयामध्ये भरणाऱ्या फाइल क्लबने बाबासाहेब पुरंदरे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. तेव्हा निनाद बेडेकर यांच्या आईने माझी ओळख बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी करून दिली. तेव्हा मी केवळ २१ वर्षाचा होतो. त्यानंतर बाबासाहेबांनी मला कधीच सोडले नाही. त्यांनी ‘‘राजे चला’ असा आदेश देताच आम्ही मोहिमेवर निघायचो, त्यामुळे मला त्यांच्या रूपात शिवाजी महाराज अनुभवता आले. आज ते सोडून गेले, गेल्या सहा दशकांपासून सुरू असलेला प्रवास थांबला, मी पोरका झालो.

(शब्दांकन : ब्रिजमोहन पाटील)

loading image
go to top