शांतता...रसभंग सुरू आहे! 

शांतता...रसभंग सुरू आहे! 

ख-या नाट्यप्रेमीसाठी सर्वांत भीतीदायक गोष्ट कोणती माहीत आहे? नाही नाटक वाईट असणं, कलाकार किरकोळ असणं वगैरे नाही...सर्वांत भीतिदायक गोष्ट म्हणजे आजूबाजूला मोबाईलनिरक्षर लोक असणं. तरुण, मध्यमवयीन लोक मोबाईलवर बोलतात, खूप बोलतात, इरिटेट करतात वगैरे आपल्याला माहीतच आहे.  त्यांच्याविषयी डोकेफोड करूच; पण मोबाईलनिरक्षर आजी-आजोबा हे एक वेगळंच प्रकरण आहे. 

हे आजी, आजोबा अतिशय छान पद्धतीनं नाटकाला आलेले असतात. त्यांना नाटक मनापासून बघायचं असतं. त्यांनी अनेक नाटकं आधी बघितलेली असतात, अनेक प्रकारची रंजक माहिती ते कुटुंबीयांबरोबर, मित्रमंडळींबरोबर शेअर करत असतात. एकूण छानच दृश्य असतं ते! नाटक सुरू व्हायच्या आधी एखादा फोन येतो. त्या आजी किंवा आजोबांना नाटक बघायची घाई असते, त्यामुळं ते कॉल लवकर आटोपता घेतातसुद्धा. चाणाक्ष नाट्यप्रेमी त्याची पुरेपूर नोंद घेतात. नाटक सुरू व्हायच्या आधी `मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा`, `स्विच ऑफ करा` वगैरे सूचना निवेदनात केल्या जातात, त्याही ते अगदी छान पद्धतीनं ऐकतात. मोबाईल सायलेंट मोडवर ठेवण्याबाबत केलेला एखादा विनोदसुद्धा ते गंमतीत घेतात. इथपर्यंत छान वातावरण असतं. आजींनी किंवा आजोबांनी मोबाईल सायलेंट मोडवर ठेवला असेल असं आपल्यालाही वाटत असतं, पण सायलेंट-बियलेंट मोडवर ठेवायचं ते इतरांनी किंवा मनात गुरुदेवांचा वगैरे धावा केला, तर मोबाईल आपोआप सायलेंट मोडवर वगैरे जात असावा असं त्यांना वाटत असावं. अर्थात नाट्यप्रेमीसाठी तोपर्यंतही काही प्रॉब्लेम नसतो. दरम्यानच्या काळात आजी एखादा वेलदोडा मैत्रिणीला देतात, आजोबा असतील तर त्यांच्यासाठी लिमलेटचं चॉकलेट वगैरे देतात आणि मग नाट्यानुभव घेण्यासाठी ही मंडळी सज्ज होतात. 

नाटक सुरू होतं. हळूहळू रंगायला लागतं. नाटकात एक सुरवातीलाच खून झालाय आणि प्रेक्षक त्या धक्क्यात आहेत. आता बहुतेक दुसराही खून होऊ घातलाय आणि खुनी कोण याचा अंदाज प्रेक्षकांना यायला लागलाय. प्रेक्षक खुर्चीला खिळून राहिले आहेत आणि घटना वेगानं घडतायत. आता एक फोन येणार आणि त्याच वेळी खुन्याचं नाव प्रेक्षकांना कळणार आहे. सगळे प्रेक्षक विलक्षण उत्कंठेनं त्या फोनची वाट बघतायत...

आणि नेमक्या याच उत्कंठेच्या क्षणी, अतिशय मोक्याच्या जागी बसलेल्या आजींचा फोन वाजतो. आजी स्वामी समर्थांच्या भक्त आहेत, त्यामुळं `श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ` हा रिंगटोन त्यांनी भक्तिभावानं लावलाय. त्यांना रिंगटोन व्यवस्थित ऐकू जावा म्हणून त्यांच्या नातीनं किंवा नातवानं त्याचा व्हॉल्युम हाय करून ठेवलाय, हेही चाणाक्ष प्रेक्षक ओळखतात. मोबाईल सायलेंट मोडवर न ठेवल्याबद्दल प्रेक्षक नाराज होतात हे खरंच, पण एखाद-दुस-या रिंगमध्ये आजी फोन बंद करतील, असा सार्थ विश्वासही त्यांना असतो. अनुराधा पौडवाल त्या रिंगटोनमध्ये अतिशय भक्तिभावानं स्वामी समर्थांचा गजर करत असतात आणि तो रिंगटोन बंद होणार याचा प्रेक्षकही धावा करत असतात. 

काही लोक `श्श`, `मोबाईल बंद करा` वगैरे म्हणतात. आजींचीही हीच भावना असते. `काय बाई एकेक लोक` असं त्या शेजारच्याला म्हणतातसुद्धा. फोन आपलाच वाजतोय हे त्यांच्या गावीसुद्धा नसतं. प्रतिभेच्या एका उत्कट क्षणी आजींना हा साक्षात्कार होतो आणि मग मात्र आजी कामाला लागतात. पर्समध्ये फोन शोधणं हे पहिलं काम. बहुतेक वेळा त्या पर्समधून चॉकलेट्स निघतात, दोन-चार किल्ल्या सापडतात, नातवंडाचं एखादं खेळणंसुद्धा येतं, पण फोन काही सापडत नाही. अखेर प्रेक्षकांच्या आणि कलाकारांच्या गेल्या जन्मीचं पुण्य म्हणून तो फोन एकदाचा हाती लागतो. 

खरं तर हा कॉल कट करण्यात अवघड काहीच नसतं. पण बहुतेक आजी-आजोबांसाठी कॉल आल्यावर रिसिव्हचं बटण दाबायचंच हा नियम असतो. त्या क्षणी कॉल रिसिव्ह केला नाही, तर सगळी पितरं भेटायला येतात, किंवा त्या महिन्याच्या पेन्शनमधून पैसे कट होतील, अशी भीती असते बहुतेक त्यांना. त्यामुळं आजी मग तो रिसिव्ह करण्यासाठी जंगजंग पछाडतात. अंधार असल्यामुळं काही दिसत नसतं. रंगमंचावर खुनी स्वतःचं नाव सांगण्यासाठी ताटकळलेला असतो, अनुराधा पौडवाल स्वामी समर्थांचा गजर करत असतात, प्रेक्षक खाऊ की गिळू अशा नजरेनं बघत असतात आणि आजींना मात्र काय वाटेल ते करून कॉल रिसिव्ह करायचा असतो. त्या रिसिव्हचं बटण शोधत असतात.  

...अखेर ते बटण एकदाचं सापडतं. गजर बंद होतो. एका क्षणाची शांतता... पण आता कॉल रिसिव्ह केल्यामुळं बोलणं आलंच. बहुतेक वेळा हा फोन ज्येष्ठ नागरिक संघातल्या मैत्रिणीचा, शेजारणीचा वगैरे असतो. आजी आता मात्र सगळे प्राण कानांत आणतात आणि मग बोलायला लागतात. `अगं नाटकात आहे` अशी सुरवात त्या करतात आणि मग मात्र पलीकडच्या मैतरणीला विलक्षण आनंदाचं भरतं येतं. नाटक कुठलं याची चर्चा होते, ते कसं आहे याचंही परीक्षण होतं. प्रेक्षक एव्हाना चिडलेले असतात, एखादं वाक्य ओरडत असतात, रंगमंचावरचे कलाकारही मनातून प्रचंड रागावूनही त्यांच्या कामावर परिणाम होऊ देत नाहीत. एखादा प्रेक्षक असं वागत असला, तरी बाकीचे विलक्षण तळमळीनं नाटक बघतायत याची जाणीव त्यांना असतेच. नाटक सुरू राहतं, पण आता त्यात रंगत नसते. खुन्यानं आणखी एखादा खून वगैरे केला, तरी प्रेक्षकांना आता धक्का बसत नाही. नाटकातली जानच निघून जाते. 

इकडं आजींनाही शेजारची मैत्रीण बहुतेक खूण करते, किंवा आजोबा असले तर ते काही सांगतात आणि अखेर फोन बंद होतो. आजींना या महागड्या फोनची खरंतर गरज नसते. पण गुड मॉर्निंगचे मेसेजेस पाठवणं आणि ते रिसिव्ह करणं, जांभळं खाल्ल्यामुळं कॅन्सरसुद्धा बरा होऊ शकतो वगैरे माहिती पाठवणं वगैरे गोष्टींसाठी बहुतेक परदेशातल्या त्यांच्या मुलीनं किंवा मुलानं तो फोन घेऊन दिलाय. शिवाय लहान, तरुण मुलांना असतं तसं ज्येष्ठ नागरिकांनाही `पिअर प्रेशर` असणारच की. आजींचा फोन बंद होतो, तेव्हा खुन्याला इन्स्पेक्टरनं पकडलेलं असतं. रंगमंचावर पडदा पडतो आणि मोबाईलनाट्यावरही एकदाचा पडदा पडतो. आपल्या मोबाईलमुळं इतक्या जणांचा रसभंग झालाय हे त्यांच्या गावीही नसतं. मोबाईल वेळीच स्विच ऑफ करणं किंवा सायलेंट मोडवर ठेवणं हा भाग कुणी का करत नाही असा प्रश्न नाट्यप्रेमींच्या मनात रेंगाळत राहतोच. मोबाईल जॅमरच लावायला पाहिजे असंही मत कुणी तरी क्षीण आवाजात मांडतं. त्या किंवा आजी, आजोबांनासुद्धा असंच वाटत असतं हीही गंमत. 

हे सगळं चालू असताना इतर लोकही रसभंगयज्ञात भर घालत असतात. `हां बोल ना` म्हणणारा तरुण अखंड बोलत असतो. नाटकातली रहस्यकथा संपेपर्यंत त्याच्या प्रेमकथेनं पूर्णविराम घेतलेला असतो. केवळ फेसबुकवर `वॉचिंग अमुक अमुक` असं टाकण्यासाठी सहकुटुंब आलेले आयटीतले गृहस्थ नाटक बघताबघता कॉन्फरन्स अटेंड करत असतात, एखाद्या काकांनी नाटक बघताबघता शेतीचा व्यवहार पूर्ण केलेला असतो, एखादी तरुणी व्हॉट्सअॅप बघताबघता अधूनमधून नाटक बघत असते. नाटक संपल्यावर मात्र हे सगळे जण जागे होतात. अतिशय नाईलाजानं मोबाईल खिशात किंवा पर्समध्ये ठेवतात. या सगळ्यांचा रसभंगयज्ञ पूर्ण झालेला असतो...लक्षात येतं ते इतकंच, की त्या यज्ञात कलाकारांची तळमळ, नाट्यप्रेमींची निष्ठा यांच्या मात्र समीधा पडलेल्या असतात....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com