नात्यांचा कॅलिडोस्कोप (मंदार कुलकर्णी)

मंदार कुलकर्णी k007mandar@gmail.com
रविवार, 9 डिसेंबर 2018

पणजीमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडला. नात्यांचे कंगोरे उलगडत नेणारे, माणूसपणाचा शोध घेणारे चित्रपट हे यंदाच्या इफ्फीचं वैशिष्ट्य. कॅलिडोस्कोपमध्ये कसं मूळ विशिष्ट आकारांच्या मिश्रणातून एकेक वेगवेगळे आकार दिसत जातात, तसेच हे चित्रपट म्हणजे "नात्यांचे कॅलिडोस्कोप' होते. दोन-तीन पात्रं घ्यायची, एखादं कथाबीज घ्यायचं आणि मग पात्रांशी एक प्रकारचा खेळ करत, प्रेक्षकांना गुंगवत एका विशिष्ट टप्प्यावर हा प्रवास सोडून द्यायचा, असं हे तंत्र. या महोत्सवातल्या एकूण चित्रपटांचा हा धांडोळा...

पणजीमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडला. नात्यांचे कंगोरे उलगडत नेणारे, माणूसपणाचा शोध घेणारे चित्रपट हे यंदाच्या इफ्फीचं वैशिष्ट्य. कॅलिडोस्कोपमध्ये कसं मूळ विशिष्ट आकारांच्या मिश्रणातून एकेक वेगवेगळे आकार दिसत जातात, तसेच हे चित्रपट म्हणजे "नात्यांचे कॅलिडोस्कोप' होते. दोन-तीन पात्रं घ्यायची, एखादं कथाबीज घ्यायचं आणि मग पात्रांशी एक प्रकारचा खेळ करत, प्रेक्षकांना गुंगवत एका विशिष्ट टप्प्यावर हा प्रवास सोडून द्यायचा, असं हे तंत्र. या महोत्सवातल्या एकूण चित्रपटांचा हा धांडोळा...

कुष्ठरोग झालेला, हातांची बोटंही झडलेला एक गृहस्थ. बेशाय त्याचं नाव. "नॉर्मल' जगापासून लांब एका "कॉलनी'मध्ये छोट्या घरात राहणाऱ्या या बेशायच्या पत्नीचा मृत्यू होतो आणि इतकी वर्षं तटस्थपणे जगणाऱ्या बेशायला एका क्षणी स्वतःचा भूतकाळ आठवायला लागतो. अचानक एके दिवशी तो चंबुगबाळं आवरतो आणि लहान असताना त्याला सोडून गेलेल्या पालकांच्या गावी जायला निघतो. "ओबामा' नावाचा दहा वर्षांचा अनाथ मुलगा त्याला येऊन चिकटतो आणि मग सुरू होतो या दोघांचा प्रवास. प्रवासात भली-बुरी माणसं भेटतात, चांगले-वाईट अनुभव येतात. एकीकडं हे दोघं विस्कटून जातात, त्याच वेळी सावरतातही. बेशाय दिसायला कुरूप असतो. त्याला सगळ्यांनी "बीस्ट' म्हटलेलं त्यालाही पटावं इतका कुरूप. ओबामा या प्रवासात एक टोपी बेशायच्या डोक्‍यावर घालतो. समोर एक पडदा असलेली ही टोपी. ""ही टोपी तू घाल म्हणजे तुझा चेहरा कुणाला दिसणार नाही,'' असं तो निरागसपणे सांगतो. बेशायला शेवटी त्याचे वडील भेटतात आणि ""इथल्या जगानं टोमणे मारून घायाळ करू नये म्हणून तुला सोडून गेलो होतो,'' असं सांगतात. आपण ज्यांना सोडून आलो होतो तीच आपली खरी माणसं असं बेशायला जाणवतं आणि तो पुन्हा "आपल्या माणसांच्या कॉलनी'त जायला निघतो. शेवटच्या क्षणी तो डोक्‍यावरची टोपी फेकून देतो; मात्र आता तो आपल्यालाही सुंदर वाटायला लागतो. कुसुमाग्रजांच्या "तो प्रवास सुंदर होता' या कवितेच्या ओळीची आठवण यावी असा हा सगळा प्रवास. आपला दृष्टिकोन बदलून टाकणारा.

...आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) यंदा खूप दाद मिळालेल्या "योमेडाइम' या चित्रपटाची ही कहाणी. नात्यांचा अर्थ उलगडून दाखवणारा आणि प्रेक्षकांना त्यांची वेगळी ओळख करून देणारा हा चित्रपट. या चित्रपटात बेशायचं काम करणारे रॅडी गमाल यांच्यासह प्रत्यक्ष शारीरिक व्यंग असलेले अनेक जण होते. अभिनय वगैरे काही माहीत नसलेले. अबू बकर शॉकी या केवळ 33 वर्षांच्या दिग्दर्शकानं त्यांच्याकडून करून घेतलेलं काम आणि चित्रपटात त्यानं घेतलेला माणूसपणाचा शोध थक्क करणारा होता. हा चित्रपट संपल्यानंतर किती तरी वेळ टाळ्या आणि शिट्ट्या वाजत राहिल्या, इतका विलक्षण अनुभव त्यानं दिला. "योमेडाइम'बरोबरच इतर अनेक चित्रपटांनी जगभरातल्या चित्रपटरसिकांना अक्षरशः घुसळवून टाकलं. नात्यांचे कंगोरे उलगडत नेणारे, माणूसपणाचा शोध घेणारे चित्रपट हे यंदाचं वैशिष्ट्य. कॅलिडोस्कोपमध्ये कसं मूळ विशिष्ट आकारांच्या मिश्रणातून एकेक वेगवेगळे आकार दिसत जातात, तसेच हे चित्रपट म्हणजे "नात्यांचे कॅलिडोस्कोप' होते. घटना-घडामोडींचा पसारा नाही, इतर पात्रांची खिचडी नाही की ठामपणे केलेलं "स्टेटमेंट' नाही. शास्त्रीय संगीतात गायक जसे सात सुरांतून अर्थाचं, अन्वयाचं, अमूर्त, निराकार असं एक वेगळंच विश्व उभं करतात, तसेच अनेक चित्रपट वाटले. दोन-तीन पात्रं घ्यायची, एखादं कथाबीज घ्यायचं आणि मग मग हळूहळू ते फुलवत न्यायचं. पात्रांशी एक प्रकारचा खेळ करत, प्रेक्षकांना गुंगवत एका विशिष्ट टप्प्यावर हा प्रवास सोडून द्यायचा, असं हे तंत्र. अनेक चित्रपटांत पात्रांची नावंसुद्धा शेवटपर्यंत कळली नाहीत; पण तरीही त्यांचा प्रवास, त्यांचं दुखणं, त्यांचं जगणं, त्यांचं वागणं क्षणोक्षणी भिडत राहिलं, मनात घर करून राहिलं हे या चित्रपटांचं वैशिष्ट्य. मूळ कथा सांगत असताना रूढार्थानं कोणतंही भाष्य करायचं नाही; मात्र प्रेक्षकांच्या मनात "स्टेटमेंट' तयार होत राहील याची काळजी घ्यायची ही खरं तर अवघड गोष्ट होती. मात्र, अनेक प्रतिभावंत चित्रकर्मींनी ते साध्य करून दाखवलं.

"शॉपलिफ्टर्स' या जपानी चित्रपटात एकमेकांशी कोणताही संबंध नसलेलं, अपघातानं तयार झालेलं एक कुटुंब होतं. दुकानांतून चोऱ्या करणारं हे कुटुंब. मात्र, त्यांची एक अगदी वेगळी गोष्ट सांगत असताना रक्ताच्या नात्यांपेक्षा माणुसकीचं नातं किती श्रेष्ठ असतं हे दिग्दर्शकानं उत्तम पद्धतीनं दाखवलं. "पिजन' या चित्रपटात एक तरुण आणि त्यानं पाळलेली कबुतरं यांची गोष्ट सांगत असताना माणूसपणाच्या पलीकडचंही नातं दिग्दर्शिका उलगडून दाखवत होती. याच चित्रपटात सगळ्यांत शेवटी त्या तरुणानं आकाशात कबुतर सोडल्यानंतर हळूहळू वर जात राहणारा ड्रोन कॅमेरा आणि त्यानं अक्षरशः चितारलेला "बर्ड आय व्ह्यू' भावनांकडंही तटस्थपणे बघण्याचं इंगित दाखवणारा होता. "अँड ब्रीद नॉर्मली' या चित्रपटातही परिस्थितीमुळं एकत्र आलेल्या दोन आयांची कहाणी होती. नागेश कुकनूर यांच्या "डोर' चित्रपटाची आठवण करून देणारा हा चित्रपट. एका महिलेनं दुसरीला मदत केल्यानंतर दुसरी महिला ज्या प्रकारे शेवटी उपकारांची परतफेड करते, तो क्षण डोळ्यांत पाणी आणणारा होता. या चित्रपटातल्या अभिनेत्रींचं काम लक्षात राहणारं. पहिल्या मिनिटापासून प्रेक्षकांचं नातं त्यांच्याबरोबर तयार झालं, ज्यामुळं तो चित्रपट जास्त भिडला. "ट्रान्स्लेटर' हा चित्रपटही असाच. क्‍यूबामधल्या एका प्राध्यापकाला एका रुग्णालयात अनुवादक म्हणून काम करावं लागतं. चेर्नोबिलमधल्या रेडिएशनमुळं शेवटच्या टप्प्यातला कॅन्सर झालेली मुलं या रुग्णालयात आलेली असतात. त्यांचं ते सहन करणं बघताना हा प्राध्यापक मुलांच्या वेदनेशी एकरूप होतो. त्यातून तो कशा प्रकारे घुसमटून जातो आणि त्याचं वैयक्तिक आयुष्य कसं ग्रस्त होतं ते दाखवणारा हा प्रवास विलक्षण होता. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या प्राध्यापकाची ही कहाणी होती, त्याची दोन मुलं म्हणजे रॉड्रिगो आणि सेबॅस्टियन बॅरिउसो यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळं आपल्याच वडिलांच्या आयुष्याकडं ती किती तटस्थपणे बघतात आणि ते आयुष्य धाडसानं मांडतात हे बघणं थक्क करणारं होतं. "टू द डेझर्ट' या चित्रपटात एक जण एका तरुणीचं अपहरण करतो आणि एका वाळवंटातून प्रवास करताना त्या तरुणीला स्वतःचं सापडत जाणं हेही विलक्षण होतं. इम्तियाझ अलीच्या "हायवे'सारखाच हा चित्रपट होता; पण या "डेझर्ट'मध्ये दिग्दर्शकानं शेवटपर्यंत कोणतेही क्‍लू दिले नाहीत, त्यामुळं त्या तरुणीच्या मनातलं वादळ नंतरही प्रेक्षकांच्या मनात घोंघावत राहिलं. "लॉंगिंग' चित्रपटात एका मध्यमवयीन उद्योजकाला तत्कालीन गर्लफ्रेंडनं त्याच्यापासून तिला मुलगा झाल्याचं सांगणं आणि सतरा वर्षांच्या झालेल्या या मुलाचा नुकताच मृत्यू झाल्याचं सांगणं आणि त्यातून या उद्योजकाला मुलाचं आयुष्य उलगडत जाणं हे विलक्षण होतं. ब्लॅक ह्यूमरचा वापर किती उत्तमपणे करता येतो, हे या चित्रपटात दिसलंच; पण त्याचबरोबर पालकत्व म्हणजे काय याचाही अर्थ प्रेक्षकांच्या मनात अतिशय ठाशीवपणे उमटला.
जुन्या काळातल्या साहित्यिकांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट यंदा इफ्फीमध्ये दिसले. ओपनिंग फिल्म होती तीच मुळी "द ऍस्पर्न पेपर्स' या जेफ्री ऍस्पर्न या साहित्यिकाच्या आयुष्यातल्या काही गूढ प्रसंगांवर आधारित असलेली. कोलेट या जुन्या काळातल्या फ्रेंच साहित्यिकाच्या जीवनावर आधारित "कोलेट', ऑस्कर वाइल्डच्या आयुष्यातल्या शेवटच्या टप्प्यावर आधारित "द हॅप्पी प्रिन्स', एका लेखकाच्या मनातलं वादळ चितारणारा "वाइल्ड पिअर ट्री' असे चित्रपट इफ्फीमध्ये गाजले. साहित्यकृती आणि साहित्यिकाचं वैयक्तिक आयुष्य यांच्यातलं नातं कुठं तरी उलगडून पाहण्याचा हा प्रयत्न वाटला. या सगळ्याच चित्रपटांमध्ये जुन्या काळचं वातावरण उभं करण्यासाठी केलेले प्रयत्न अतिशय उत्तम होते. कलादिग्दर्शन, वेशभूषा आदी गोष्टी विलक्षण वाटल्या. महायुद्धांचं भूत चित्रकर्मींच्या डोक्‍यावरून उतरलं असलं, तरी वेगवेगळ्या देशांमधली यादवी, अंतर्गत संघर्ष आता चित्रपटांमधून दिसतोय. "डॉनबास,' "रेन ऑफ हॉम्स', "ब्रदर्स' अशा चित्रपटांमधून युक्रेन, सीरिया या देशांमधला अंतर्गत संघर्ष दिसला आणि तो अस्वस्थ करणारा होता.

इफ्फीमधले यंदाचे चित्रपट हे असे प्रेक्षकांना कवेत घेणारे होते. अनेक देशांची संस्कृती वेगळी होती, भूगोल वेगळा होता, परंपरा वेगळ्या होत्या; पण त्या सगळ्याच्या आत असलेलं माणूसपण प्रेक्षकांना भिडत राहिलं. एकीकडं सगळं जग जवळ येत असताना रक्ताची, पारंपरिक नाती दुरावत चालली आहेत. माणसांमध्ये, नात्यांमध्ये होत असलेले बदल प्रत्येकाला जाणवतायत; पण ते शब्दांत मांडता येत नाहीत. मात्र, या चित्रकर्मींना हा सगळा "जगण्याचा अमूर्त पसारा' चौकटबद्ध करण्यात यश आलं. सगळ्या चित्रपटांमध्ये कमालीची तंत्रसज्जता होती; पण "प्रयोगासाठी प्रयोग' असा हट्ट नव्हता. कथांच्या अनेक शक्‍यता होत्या; पण तरीही त्या शक्‍यतांचे दोरे मोकळे सोडण्याची प्रगल्भता दिग्दर्शकांमध्ये होती. शब्दांचा नेमका, नेटका वापर होता, तितकंच या शब्दांच्या पलीकडचं चित्रभानही विलक्षण होतं. अनेक ठिकाणी दिग्दर्शकांनी चित्रकोडी घातली होती. ती उलगडून बघण्याची प्रक्रिया कमालीची आनंददायी होती. काही ठिकाणी अर्थाचं ओझंच लेखक-दिग्दर्शकांनी मनावर घेतलं नव्हतं. ते प्रेक्षकांवर सोडून दिलं होतं. हे अर्थांचं ओझं बाळगण्याची मजाही काही औरच होती. चित्रपट या माध्यमाचा जास्तीत जास्त वापर करून तयार केलेल्या कलाकृती होत्या, तितकंच त्यांच्यातल्या पात्रांच्या मनाच्या तळापर्यंत जाण्याचं भान जास्त महत्त्वाचं होतं. हे सगळे चित्रकर्मी एकेका व्यक्तिरेखेच्या मनाच्या तळापर्यंत गेले म्हणूनच प्रेक्षकही तिथपर्यंत जाऊ शकले. अर्थात प्रत्येकच प्रेक्षकाला त्या त्या व्यक्तिरेखेच्या मनाचा तळ सापडलाच असा दावा नाही करता येणार...पण तिथपर्यंत जाण्याचा प्रवासही सुंदर होता! "योमेडाइम'मधल्या बेशायला जसा प्रवासात स्वतःचाच "चेहरा' सापडला, तसाच प्रेक्षकांनाही या चित्रपटांमधल्या प्रवासाच्या निमित्तानं स्वतःच्याच मनातला एखादा कोपरा सापडत राहिला...हाच कोपरा आता पुढचा प्रवास सोपा करेल, एवढं मात्र नक्की!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mandar kulkarni write iffi article in saptarang