esakal | ‘रॉम-कॉम’चा शिलेदार
sakal

बोलून बातमी शोधा

Saptarang

‘रॉम-कॉम’चा शिलेदार

sakal_logo
By
मंदार कुलकर्णी k007mandar@gmail.com

कोण कधी विनोदवीराचा मान मिळवेल काही सांगता येत नाही. कार्तिक आर्यनच्या बाबतीत तर ही गोष्ट शंभर टक्के खरी. कोणताही गॉडफादर नसताना आणि विनोदाच्या माध्यमातून एवढं करिअर होऊ शकतं याची सुतराम कल्पना नसलेला कार्तिक आर्यन आज ‘रॉम-कॉम’चा म्हणजे ‘रोमँटिक कॉमेडींचा शिलेदार’ असं बिरुद खिशात टाकून बसला आहे. ‘प्यार का पंचनामा’ नावाच्या विचित्र नावाचा कुठला तरी चित्रपट येतो काय, तो तरुणांमध्ये जोरदार हिट होतो काय, त्यातल्या केवळ एका स्वगतातून कार्तिकची एंट्री विनोदाच्या क्षितिजावर होते काय- सगळंच नवल. पहिल्याच चित्रपटातून कार्तिकची गाडी अशी काही पळायला लागली, की त्याच्या एक्स्प्रेसची स्पर्धा त्याच्या पिढीतल्या तरी कुणालाही करता येत नाही, अशी सध्याची स्थिती आहे.

कार्तिकच्या करिअरमध्ये त्याच्या देखणेपणाचा वाटा असला, तरी त्याची स्वतःची मेहनत तेवढीच आहे. फक्त एवढंच नाही, तर एखाद्याचं आयुष्यच किती नाट्यपूर्ण असू शकतं त्याचीही ही कथा आहे. कार्तिक ‘मेले मे खोया हुवा लडका’ होता अशी एक कथा आहे. तो चार वर्षांचा असताना दिल्लीत हरवला होता आणि बऱ्याच तासांनंतर सापडला. बायोटेक्नॉलॉजी विषयात शिक्षण घेत असतानाच अभिनयातही त्याला रस होताच. फेसबुकवरून त्याला एका ऑडिशनची माहिती समजली, त्यात त्याचं लगेच सिलेक्शन झालं. या चित्रपटात दिग्दर्शक लव्ह रंजननं त्याला पाच मिनिटांचं एक स्वगत दिलं होतं. खरं तर चित्रपटांमध्ये एवढं मोठं स्वगत घालणं हा निव्वळ वेडेपणा होता. एवढं मोठं स्वगत घालायला ते काय नाटक आहे का? पण लव्ह रंजननं तो वेडेपणा केला आणि कार्तिकनंही अतिशय कन्विक्शननं ते स्वगत केलं...आणि तोच चित्रपटाचा ‘यूएसपी’ ठरला! ‘दो हफ्ते दिमाग चाटेंगी- ‘टेबल लेना है टेबल लेना है.’ पाच घंटे मॉलमे बिताकी सडीसी चप्पल उठाके ले आयेंगी. और फिर और दो हफ्ते दिमाग चाटेगी ‘टेबल लेना है टेबल लेना है’ हा डायलॉग कार्तिकनं ज्या प्रकारे म्हटलाय ते नुसतं पुन्हा एकदा युट्युबवर बघा. हसून पुरेवाट झाली नाही तरच नवल. कार्तिक अक्षरशः पॉपकॉर्नसारखा फुटतो हे स्वगत म्हणताना.

हे अतिशय विनोदी स्वगत संपूर्णपणे एकाच शॉटमध्ये चित्रीत झालंय. तब्बल साडेपाच पानांचं हे स्वगत कार्तिकनं पाठ केलं आणि ते सलग चित्रीत झालं. हा तेव्हाचा एक विक्रम होता. किंबहुना कार्तिकची ऑडिशनच या जबरदस्त स्वगतावर झाली होती. कार्तिक तेवढ्याच विक्रमावर थांबलेला नाही. पहिलं स्वगत जोरदार हिट झाल्यानंतर ‘प्यार का पंचनामा २’मध्ये त्याची जबाबदारी वाढली. त्या चित्रपटात तर तब्बल सात मिनिटांचं स्वगत आहे. मूळ सीन तब्बल तेरा पानांचा आहे. तो तेरा मिनिटांचा आहे. तो नंतर कापून सात मिनिटांचा करण्यात आला.

‘प्यार का पंचनामा’ मधलं स्वागत हा एक धक्का होता. त्यात प्रेमात मुलांचे काय हाल होतात हे सांगण्यात आलं होतं ज्यावर एरवी कुठल्या चित्रपटांत फार कधी लक्ष गेलेलं नसतं. नंतर मात्र ‘प्यार का पंचनामा २’ मध्ये असं स्वगत असणार याची प्रेक्षकांना आधीच कल्पना होती आणि अर्थातच अपेक्षाही होती. त्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे ते स्वगत उत्तम असलं, तरी पहिल्याइतकं जबरदस्त नाही हेही लक्षात घेतलंच पाहिजे. बाय द वे, ‘प्यार का पंचनामा’ ही ‘स्लीपर हिट’ आहे. म्हणजे तो रिलीज झाल्याझाल्या हिट नाही झाला. हळूहळू त्याची माऊथ पब्लिसिटी वाढत गेली आणि तो हिट झाला. हीसुद्धा खरं तर एक वेगळीच गोष्ट.

कार्तिक खरा खुलला तो ‘सोनू के टिटू की स्विटी’ या चित्रपटामुळे. ‘चित्रपटांमधला स्टँडअप कॉमेडियन’ ही ओळख त्यानं पुसून टाकली. तिथं त्याच्यावर स्वगताचं ओझं नव्हतं. ‘प्यार का पंचनामा’ मधलाच सनी सिंग आणि तो या दोघांनी या संपूर्ण चित्रपटात जी काही धमाल केली, त्यातून सनी आणि कार्तिक या दोघांचीही एक ओळख तयार झाली आहे.

कार्तिक हा पुढचा आयुष्मान खुराना आहे. ‘लव्ह आज कल’ चित्रपटाचं नवं व्हर्जन करताना आणि त्याला थोडा खुसखुशीत तडका देण्यासाठी इम्तियाज अलीला त्याला घ्यावंसं वाटलं आणि फक्त तेवढंच नाही, तर ‘भुलभुलैय्या’, ‘दोस्ताना’ वगैरे चित्रपटाच्या ‘पार्ट २’ चा ‘पार्ट’ बनण्याचीही संधी केवळ त्याला त्याच्या विनोदाच्या टायमिंगमुळे मिळते आहे. आणि हो, ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू के टिटू’ चेही पुढचे भाग आणण्याची तयारी सुरू आहेच. कार्तिकचे चॉकलेट बॉय लूक्स आणि त्याचं सिंगल असणं ही ॲसेट असली, तरी अशा गोष्टींवर विनोदाची इमारत उभी राहत नसते. कार्तिकच्या संवादफेकीमध्ये एक विलक्षण ताकद आहे आणि त्याचमुळे त्याच्यासाठी खास संवाद लिहिले जातात. अर्थात केवळ ‘संवादवीर’ असता तर तो इथपर्यंत पोचलाच नसता हेही महत्त्वाचं.

कार्तिक आजच्या पिढीचा नव-विनोदवीर आहे, यात काही वाद नाही. त्याला अवकाशसंशोधक व्हायचं होतं म्हणे. ती इच्छा पूर्ण झाली नसली, तरी त्याच्यासाठी यश-किमान पहिल्या चित्रपटात तरी अक्षरशः आभाळातून पडलंच की! विनोद ही हसण्यावारी नेण्याची गोष्ट नाही, हे त्याच्या करिअरचा ‘पंचनामा’ केला तर त्यातून दिसतं, हे बाकी खरं!

loading image
go to top