esakal | विविधांगी मंचीय रूपं

बोलून बातमी शोधा

Bhau Kadam and Supriya Pathare

विविधांगी मंचीय रूपं

sakal_logo
By
मंदार कुलकर्णी k007mandar@gmail.com

हास्यरस हा प्रत्येकालाच जवळचा वाटणारा असल्यामुळं विनोद अनेक रूपांमधून आपल्याला भेटत राहतो. अलीकडे तो किती तरी मंचीय रूपांतून सादर होताना दिसतोय. नाटक हे त्याचं अतिशय जबरदस्त रूप आहे आणि विशेषतः मराठी रंगभूमीवर विनोदाचे विविध प्रकार कडकडून भेटतात हे जितकं खरं आणि ‘स्टँडअप कॉमेडी क्लब’सारखं त्याचं नवं रूप वाढतंय हे जितकं खरं, तितकेच त्याचे इतरही किती तरी मंचीय भाऊबंद वाढताना दिसतायत. विनोदनिर्मिती करणाऱ्या या मंचीय रूपांमधलं नावीन्य थक्क करणारं आहे.

टीव्हीवर वेगवेगळ्या कॉमेडी शोंमध्ये आपण स्किट्स बघतो. आता ही स्किट्स अनेक ठिकाणी प्रत्यक्ष सादर होताना दिसतायत. आज तुम्ही कोणताही पुरस्कार समारंभ बघा, ‘कोल्हापूर फेस्टिव्हल’ वगैरेंसारखे मंचीय कार्यक्रम बघा, अमुक कलाकाराचा ‘गौरव सोहळा’ वगैरे बघा-ते पंधरा-वीस मिनिटांच्या स्किट्सशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत अशी स्थिती आहे. टीव्हीवरच्या कॉमेडी शोंमधल्या कलाकारांना अशा स्किट्ससाठी प्रचंड मागणी असते आणि त्यातून मिळणारा पैसाही मोठा असतो. अनेक लेखकांनाही या मंचीय स्किट्सनी खूप साथ दिली आहे. मंचीय स्किट्स लिहून देणारी खास लेखक मंडळीही नावारूपाला आली आहेत आणि त्यातली काही आधीचेच वेगवेगळे पदार्थ थोडी वेगळी फोडणी घालून देत असतात हेही आपलं जाताजाता. मात्र, ही ‘स्किट्स इकॉनॉमी’ खूप वेगानं वाढते आहे यात काही वाद नाही. दुसरीकडे अनेक छोटी स्किट्स, नृत्यं, निवेदन हे सगळं एकत्र करून पूर्ण लांबीचे कार्यक्रमही तिकीट लावून सादर होताना दिसतायत.

पूर्वी मिमिक्री हा प्रकार विशेषतः ऑर्केस्ट्रॉंमध्ये असायचाच. गायक, वादकांना थोडा रिलीफ मिळावा हा त्यातला भाग असायचा. आज हा प्रकार मात्र कमी झाला आहे. मात्र, मिमिक्री आणि स्टँडअप यांचं मिश्रण करून सादर होणारे कार्यक्रम मात्र नक्कीच वाढीला लागले आहेत. दुसरीकडे एकपात्री विनोदी कार्यक्रम जितके वाढताना दिसत आहेत, तितकेच द्विपात्री कार्यक्रमही रंगमंचावर सादर होताना दिसत आहेत.

महाराष्ट्रात तर विनोदाची इतकी मंचीय रूपं आहेत, की विचारता सोय नाही. कुणी गणित विषय खेळीमेळीत सांगण्याचा कार्यक्रम करतं, तर कुणी बोलक्या बाहुल्यांचा वापर करून हास्याची पखरण करतं, तर कुणी वेगवेगळ्या विनोदी कविता सादर करून कार्यक्रम करतं. विनोदाची इतकी मंचीय रूपं देशाच्या इतर भागांमध्ये क्वचितच असतील. नाटकांबरोबरच दोन किंवा तीन एकांकिकांचे प्रयोगही होताना दिसतात. पुस्तकांचं वाचन करण्याचा अभिवाचन हा प्रकार तर गेल्या काही वर्षांत खूप रुढ झाला आहे आणि त्यातही विनोदी कथा, पुस्तकांचं अभिवाचन दाद मिळवताना दिसतंय.

टीव्हीवरच्या कॉमेडी शोंमुळे तयार झालेल्या स्वतःच्या ब्रँडचा वापर करून तो मंचीय कार्यक्रमांमध्ये तिकिटांच्या रूपांत ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न तर कित्येक कलाकार करताना दिसतायत. यात उलटा प्रकार असतो. म्हणजे म्हणजे तो विशिष्ट कलाकार केंद्रस्थानी घेऊन लेखक स्क्रिप्ट लिहितात आणि तो कार्यक्रम सादर केला जातो. यात एखादं स्किट असतं, त्या कलाकारानं सादर केलेली स्टँडअप कॉमेडी असते, किंवा त्या कलाकाराची स्क्रिप्टेड मुलाखत असते. म्हणजे पूर्ण तयारी करून, स्क्रिप्ट लिहून सादर केलेली. त्या कलाकाराच्या चाहत्यांना पूर्णपणे खूश करणं हे या कार्यक्रमाचं काम. ‘सुनील ग्रोव्हर लाइव्ह’, ‘जॉनी लिव्हर लाइव्ह’ असे बरेच कार्यक्रम हे स्टँडअप आणि नाटक यांच्या मधले आहेत. कपिल शर्मा, कृष्णा अभिषेक वगैरे मंडळींनी तर भारतातच नाही, तर परदेशांमध्ये असे कार्यक्रम विलक्षण लोकप्रिय केले आहेत.

मंचीय रूपांमधली कॉमेडी जास्त हसवते असं एक निरीक्षण आहे. मग ते स्टँडअप असो, मिमिक्री असो, स्किट असो, एखाद्या विनोदी कलाकाराचा लाइव्ह शो असो, किंवा इतर कुठला हास्यकारक कार्यक्रम. यात सामूहिक संमोहन नक्कीच असतं. दुसरं म्हणजे जसजसे तुम्ही हसत जाता, तसे ताणमुक्त होत जाता आणि जसे ताणमुक्त होत जाता, तसे आणखी मोठमोठ्याने हसायला लागता. विनोदाच्या ज्या मंचीय कार्यक्रमांबद्दल आपण बोलतोय, त्यांचा आस्वाद प्रत्यक्ष उपस्थित राहूनच जास्त चांगला घेता येतो. हेच कार्यक्रम तुम्ही शूट करून घरी बघितलेत, तर तितकं हसू येणारही नाही कदाचित. मंचीय रूपातल्या कॉमेडीला ‘बुकमायशो’, ‘तिकेटीज’सारख्या प्लॅटफॉर्म्सनी जास्त हात दिला आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रातल्या गणेशोत्सव वगैरे उत्सवांतल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या गरजेनंही हात दिला आहे. आणि हो, परदेशांतल्या मंडळींमुळेही अशा मंचीय विनोदी कार्यक्रमांची गरज आणि प्रयोग या दोन्ही गोष्टी वाढल्या आहेत. आता हळूहळू या मंचीय कार्यक्रमांमध्ये प्रोजेक्टर, एलईडी स्क्रीन्स, नृत्यं वगैरेचाही वापर वाढला आहे. शेवटी काही म्हणा, समोरच्या प्रेक्षकांतून येणारा लाफ्टर ही एक झिंग असते. तिची भूल भल्याभल्यांना पडते. ही झिंग जोपर्यंत कायम आहे आणि नवीन प्रयोगांची आस आहे तोपर्यंत ही मंचीय रूपं दिसतच राहतील. कोरोनानं या एक्स्प्रेसला तूर्त ब्रेक दिला ही गोष्ट खरी असली, तरी ती नवीन रूपं घेऊन धावतच राहील यात काही शंका नाही.