esakal | ‘लीजंड’ बनलेला विनोदवीर
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Saraf

‘लीजंड’ बनलेला विनोदवीर

sakal_logo
By
मंदार कुलकर्णी k007mandar@gmail.com

पडद्यावर साकारल्या जात असलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा अतिशय भिन्न- खरं तर गंभीरच म्हणावं असं व्यक्तिमत्त्व; बोलण्याची खालची पट्टी आणि शांत स्वभाव, विचार करून बोलण्याची सवय आणि पडद्यावरच्या सुप्रसिद्ध मिशीचा प्रत्यक्षात अभाव असं सगळं दिसलं, की हा माणूस एरवी ओळखता येत नाहीच... पण कॅमेरा सुरू होतो, किंवा रंगभूमीवरचा पडदा बाजूला जातो आणि हा माणूस अंतर्बाह्य बदलतो. थक्क व्हावं इतके एक्स्प्रेशन्स बदलतात, देहबोली बदलते; ‘पंचेस’, ‘पॉझेस’ची विलक्षण उधळण होते आणि प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर हसू आणणारी व्यक्तिरेखा साकार व्हायला लागते. मूळ व्यक्तिमत्त्वातल्या सभ्य चेहऱ्यावर बिलंदरपणाचा मुखवटा चढतो आणि मग धनंजय माने, म्हमद्या, इन्स्पेक्टर सर्जेराव शिंदे, प्रोफेसर धोंड, सखाराम हवालदार अशा व्यक्तिरेखा साकार व्हायला लागतात. संवादफेकीची विलक्षण पद्धत, भुवई उंच करत आणि डोळे मोठे करत बरोबर ‘पंच’ टाकण्याचं तंत्र आणि कमाल टायमिंग यांच्या बळावर दहा-पंधरा नव्हे, तर तब्बल पन्नासपेक्षा जास्त वर्षं प्रेक्षकांना सतत हसवत ठेवणारा हा खराखुरा हास्यसम्राट. ‘द’ अशोक सराफ!! मराठीत सर्वाधिक विनोदी चित्रपट करणारा कलाकार अशी ओळख असलेले अशोकमामा.

मराठीत विनोदाची लाट आणण्यासाठी कारणीभूत असलेल्या काही मोजक्या विनोदमूर्तींपैकी एक म्हणजे अशोक सराफ. एके काळी मराठीत विनोदी चित्रपट अशोक सराफ किंवा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नसे. ती लाट पुढे ओसरली, चित्रपटसृष्टीला अवकळा आली आणि नंतर नवा ‘श्वास’ही मिळाला; पण अशोकमामांची खेळी सुरूच राहिली. इतकी प्रदीर्घ खेळी खेळण्याचं आणि व्यक्तिरेखांमध्येही कमालीचं वैविध्य दाखवण्याचं भाग्य या जबरदस्त अभिनेत्याला मिळालं. त्यामुळे मराठीत ‘सुपरस्टार’ बिरुद सहजच त्यांना मिळालं.

अशोक सराफ पडद्यावर आले, की प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर आधीच एक हसू पसरतं, याचं कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही आहे. प्रत्येकाला हा माणूस आपला वाटतो. प्रत्येक घरात वातावरण हलकं ठेवणाऱ्या एखाद्या काकाला किंवा मामाला जे महत्त्व असतं तेच अशोकमामांना आहे. अशोक सराफ यांचं पडद्यावरचं वर्षानुवर्षं न बदललेलं दृश्यरूप आणि एनर्जी या गोष्टी जितक्या थक्क करणाऱ्या आहेत, तितकीच महत्त्वाची आहे ते त्यांची आणखी एक कामगिरी.

चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्हीमध्येही यशस्वी झालेल्या कलाकारांपैकी ते एक आहेत. चित्रपटांत ते ‘सुपरस्टार’ आहेत, तसंच रंगभूमीवर ‘मनोमिलन’पासून ‘व्हॅक्युम क्लीनर’पर्यंत अनेक नाटकांतून आणि छोट्या पडद्यावर ‘हम पांच’, ‘डोंट वरी हो जायेगा’ अशा मालिकांतून त्यांनी हुकमत गाजवली आहे.

गंमत बघा, दादा कोंडके यांच्याबरोबर ‘पांडू हवालदार’ चित्रपट करणारे अशोकमामा आज सुबोध भावे आणि प्रसाद ओकबरोबर ‘एक डाव धोबीपछाड’ करतात, तेव्हा तितक्याच तडफेनं हसवण्याचं कौशल्य दाखवतात. ‘मंगला ग मंगला’ म्हणत नाचणारा, किंवा ‘धूमधडाका’मध्ये ‘व्याख्यावूंखूविंखी’ असा आवाज करत शरद तळवलकरांशी गप्पा मारत खोटी दाढी लावलेला ‘जवळकर’ पिटातल्या प्रेक्षकाच्या शिट्या मिळवायचा आणि आज ‘निशाणी डावा अंगठा’मधला हेडमास्तर, ‘एक डाव धोबीपछाड’मधला दादा दांडगे मल्टिप्लेक्समध्ये हसवतो. एनर्जी तीच, विनोदबुद्धी तीच, हसवणूक तीच.

मंडळी, विनोदाची एक मर्यादाही असते. आज हसवणाऱ्या गोष्टीचे उद्या संदर्भ बदलले, की ती हसवू शकत नाही, आजची हास्यकारक अभिनयशैली उद्या ओव्हरअॅक्टिंग वाटायला लागते. मात्र, अशोक सराफ या सगळ्याला अपवाद कसे ठरले आहेत हे गौडबंगाल आहे. इतकं थक्क करणारं सातत्य कोणत्याच विनोदवीराला क्वचितच दाखवता आलं असेल.

याचं कारण विनोद असाच असतो असं जणू अशोक सराफ यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या गळी उतरवलं आहे. विनोद असावा तर अशोक सराफ यांच्यासारखा, अभिनय असावा तर अशोक सराफ यांच्यासारखा असं लोकांना वाटायला लागतं इतक्या हुकमतीनं अशोकमामांनी ते काम केलंय. त्यांच्याबरोबरचे अनेक विनोदवीर नंतर ‘आऊटडेटेड’ झाले; पण अशोक सराफ यांनी विनोदाला सार्वकालिकता दिली. त्यांनी त्यांच्यातला निरागसपणा त्यांच्या विनोदाला दिला आणि त्यांच्यातल्या सभ्यपणाही त्यांच्या विनोदाला दिला, त्यामुळेही त्यांचा विनोद सार्वकालिक झाला. आजही त्यांचा धनंजय माने मेमेमधूनसुद्धा ‘हा माझा बायको’ आणि ‘तुमचे सत्तर रुपयेही वारले’ असं म्हणत हसवतो, टीव्हीवर ‘अशी ही बनवाबनवी’ लागला, की व्हॉट्सॲपवर त्याच चर्चा व्हायला लागतात, यात विशेष नाहीच. ‘धनंजय माने इथंच राहतात’ या शीर्षकाचं नाटक येणं हे विलक्षणच नाही का?

या सुपरस्टारनं नुकतंच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलं आहे आणि या वयातही त्यांची हसवण्याची तडफ तीच आहे. सध्या कोरोनामुळे नाट्यगृहं बंद आहेत म्हणून, नाही तर उद्या नाट्यगृहं सुरू झाली, की ‘व्हॅक्युम क्लीनर’मध्ये मामा रंगभूमीवर येतील. प्रेक्षागृहात टाळ्या, शिट्यांचा गजर होईल, हास्याचा दणदणाट उडेल...पण पडदा बंद झाला, तरी या विलक्षण अभिनेत्याची विलक्षण कारकीर्द प्रेक्षकांच्या मनात कायमच लखलखत राहील हे जास्त महत्त्वाचं!!

loading image