‘हसवाफसवी’ करणारा ‘खेळीया’

फक्त विनोद निर्माण करणाऱ्या भूमिकांबद्दल बोलायचं तर चिमणराव ते कृष्णराव हेरंबकर, तात्या विंचू ते नारबा, इनामदार ते आबा टिपरे, नाना पुंजे ते गणपतराव इतकी ‘लंबी पारी’ कुणाच्या वाट्याला आली असेल?
Comedian
ComedianSakal

भूमिकांमध्ये इतकं वैविध्य कुणाच्या वाट्याला आलं असेल? फक्त विनोद निर्माण करणाऱ्या भूमिकांबद्दल बोलायचं तर चिमणराव ते कृष्णराव हेरंबकर, तात्या विंचू ते नारबा, इनामदार ते आबा टिपरे, नाना पुंजे ते गणपतराव इतकी ‘लंबी पारी’ कुणाच्या वाट्याला आली असेल? अभिनय सोडा, लेखनात क्रिकेटपासून खुसखुशीत ललितलेखांपर्यंत आणि बोक्या सातबंडेच्या खोड्यांपासून ‘कागदी बाण’ मारण्यापर्यंतचं वैविध्य तर कमाल. अतिशय कुशल अभिनेते, लेखक असलेले दिलीप प्रभावळकर विनोदामध्ये असं काही वैविध्य दाखवतात, की ते एक ‘स्कूल’च बनून जातं. वैयक्तिक जीवनात कोणाचीही चेष्टा करणं, अनमान करणं या गोष्टींशी दुरान्वयानंही संबंध नसलेले दिलीप प्रभावळकर यांचा विनोदही तसाच निर्विष आहे. चिमणराव आणि आबा टिपरेंसारखाच गोड. ‘कथा दोन गणपतरावांची’सारख्या वेगळ्या वाटेवरचा चित्रपटात ‘ब्युफे’च्या केवळ एका प्रसंगातूनसुद्धा हास्याच्या तुषारांचं सिंचन करणारे प्रभावळकर ‘पहेली’मध्ये नुसत्या ‘बनवारी’ या नुसत्या हाकेनंसुद्धा छाप पाडू शकतात ते विलक्षण अशा अभिनयशैलीवर, अचूक निरीक्षणांवर आणि अफाट अशा विनोदबुद्धीवर.

काय काय गोष्टी कराव्यात? एकीकडे ‘लगे रहो मुन्नाभाई’मध्ये गांधीजींची भूमिका चोख, गंभीरपणे साकारूनसुद्धा प्रसंगनिष्ठ विनोदामुळे हास्यकारक स्थिती निर्माण करतात, तर दुसरीकडे ‘अलबत्या गलबत्या’मध्ये चेटकिणीला विनोदी बाज देऊन विनोद आणि भय यांचा एकत्र परिणाम तयार करण्याचं त्यांचं कसब दिसतं. गंमत बघा, ‘झपाटलेला’मध्ये सव्वीस वर्षांपूर्वीचा तात्या विंचूचा आवाज, ‘झपाटलेला-२’मध्ये तसाच. ‘एक डाव भुताचा’मध्ये भुताबरोबर राहणारा भोळा ‘मास्तुरे’ साकारणारे प्रभावळकर ‘पछाडलेला’मध्ये इनामदार नावाचं इरसाल भूत साकारून तेही वर्तुळ पूर्ण करतात. ज्येष्ठ नागरिकांच्या भूमिका साकारण्यात तर प्रभावळकर पीएचडी करू शकतील. ज्येष्ठांच्या इतक्या शेड्स क्वचितच कुठल्या कलाकारानं दाखवल्या असतील. नारबापासून टिपरेंपर्यंत पूर्ण धमाल. आणि हो, पुस्तकांमधला फास्टर फेणे चित्रपटात वाढलेल्या वयानं समोर येतो, तेव्हा खुद्द भा. रा. भागवत यांच्या भूमिकेसाठी प्रभावळकर यांच्याशिवाय दुसरं परफेक्ट नाव कुठलं? ‘चिमणराव’ या टीव्हीवरच्या पहिल्या मराठीत मालिकेत त्यांनी धमाल केली आणि मालिकांमधला साधेपणा हरवत असताना तो साधेपणा पुन्हा आणण्याची किमया केलेल्या ‘टिपरे’मध्येही त्यांनी तितकीच धमाल केली.

टू बी फ्रँक, कुठल्याही कलाकाराला न जमलेली आणखी एक जबरदस्त गोष्ट प्रभावळकर यांनी केलीय. कुठली माहितेय? त्यांनी स्वतःच्या बहिणीला जन्माला घातलंय!! दीप्ती प्रभावळकर-पटेल-लुमुंबा!! बरोबर. ‘हसवाफसवी’ नाटकातली धमाल व्यक्तिरेखा. लेखकाची अफाट कल्पनाशक्ती, कमाल अभिनय, अतिशय सूक्ष्म विनोदबुद्धी यांच्या बळावर काहीही करू शकतात ते.

प्रभावळकर यांच्या भाग्यात एक गोष्ट आहे, ती म्हणजे ‘अनुदिनी’ या त्यांच्या सदरावर ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका झाली. ‘चुकभूत द्यावी घ्यावी’ या नाटकावर मालिका झाली. वेगवेगळ्या कार्यक्रमांत साकारलेल्या व्यक्तिरेखांना जोडून ‘हसवाफसवी’सारखं विलक्षण नाटक त्यांनीच लिहिलं. या सगळ्याच कलाकृतींमध्ये अर्थातच मुख्य भूमिका त्यांनी नजाकतीनं कशा केल्या ते आपण बघितलंच. ‘बटाट्याची चाळ’सारख्या त्यांच्या आवडत्या पुस्तकातल्या काही भागाचं अभिवाचन करण्याचंही भाग्य त्यांच्या वाट्याला आलं. लेखन करताना प्रभावळकर मनात व्यक्तिरेखांचा अभिनय करत असतात आणि अभिनय करताना मनात लेखकाच्या भूमिकेत जात असतात. फार अफाट क्षमता आहे ही. लेखन आणि अभिनय यांची प्रभावळकर यांनी केलेली कमाल बघायची, तर कोंबडीविक्री करणारे, नाना पुंजे चक्क सौंदर्य स्पर्धेत जिंकल्यावरची मुलाखत युट्यूबवर बघावी. लेखन, कायिक-वाचिक अभिनय सगळी अशक्य धमाल आहे ती.

बाकी चेहऱ्यावर ‘साळसूद’ भाव असणाऱ्या प्रभावळकरांच्या मनात मात्र एक खोडकर मूल आहे आणि ते कधीकधी बरोब्बर बाहेर येत असतं. त्यांची निरीक्षणं इतकी सूक्ष्म असतात, की त्यातून काय जन्माला येईल सांगता येत नाही. त्यामुळेच ते इतक्या कमाल भूमिका साकारू शकतात. त्यांचा विनोद सहज, ओघवता, न टोचणारा आहे याचं कारण त्यांच्या आतला माणूस तितकाच साधा, प्रेमळ आहे हे वेगळं सांगायला नकोच.

चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांत छाप पाडणारी कामगिरी करणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक असलेले प्रभावळकर. त्यांच्या भावदर्शनानं किती जणांना रडवलं आणि हसवलं असेल याची गणतीच नाही. ‘अलबत्या गलबत्या’मधली त्यांची चेटकीण आता नव्या पिढीचा वैभव मांगले साकारतोय, ‘हसवाफसवी’मधले कृष्णराव हेरंबकर पुष्कर श्रोत्रीकडे गेलेत; पण दिलीप प्रभावळकरांनी साकारलेली या आणि अशा भूमिकांची छाप प्रत्येकाच्या हृदयात आहे. त्यांच्या आत्मचरित्रपर लेखनाला त्यांनी ‘खेळीया’ हे योग्य नाव दिलंय. ‘हसवाफसवी’चा खेळ खेळणाऱ्याला दुसरं काय म्हणायचं?

(हे सदर आता समाप्त होत आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com