विनोदांचा ‘अभिषेक’

‘इन्सल्ट कॉमेडी’ असा काही प्रकार असतो? म्हणजे अपमान करायचा आणि त्यावरूनही हशा मिळवायचा असा प्रकार? ‘कॅरेक्टर कॉमेडी’ असाही प्रकार असतो?
Comedy
ComedySakal

‘इन्सल्ट कॉमेडी’ असा काही प्रकार असतो? म्हणजे अपमान करायचा आणि त्यावरूनही हशा मिळवायचा असा प्रकार? ‘कॅरेक्टर कॉमेडी’ असाही प्रकार असतो? म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तिरेखेत जायचं आणि ती जे विनोद करू शकेल, तसेच विनोद करायचे? मुळात असे विनोद कुणी केले तर त्यांचा रागच नाही का येणार? एखाद्या सेलिब्रिटीचा अपमान केला तर तो त्या शोमध्ये सहभागी होईल तरी कसा?... थांबा थांबा मंडळी. विनोदांची ही नावं थोडी विचित्र वाटली तरी प्रत्यक्षात हा प्रकार आक्षेपार्ह अजिबातच नाही. उलट कपिल शर्मा किंवा कृष्णा अभिषेकसारखी मंडळी हा प्रकार करतात, तेव्हा ते हा विनोद वाह्यात होणार नाही याची काळजी घेतात. कारण या कॉमेडीला ‘इन्सल्ट कॉमेडी’ असं नाव रुढ झालं असलं, तरी हा रुढार्थानं अपमान नसतोच काही. बऱ्याचदा स्वतःलाच कमी लेखत आणि समोरच्याला अजिबात इन्सल्ट वाटणार नाही, उलट तोच या विनोदात जोरदार सामील होईल अशा प्रकारे ते एकेक पंचेस टाकतात आणि त्यातून प्रेक्षक हसूनहसून लोटपोट होतात. असा विनोद हा खरं तर आगीशी खेळ, कारण कुठल्याही क्षणी दोरी हातातून निसटली, की संपलं; पण कपिल, कृष्णा किंवा भारतीसिंगसारखे हुकमी विनोदवीर या किंवा इतरही नवविनोदांशी लीलया खेळतात.

खरं तर कपिल शर्मा हा विनोदांच्या नव्या प्रकारांत माहीर असणारा विनोदवीर सध्या त्याच्या सेलिब्रिटी स्टेटसमुळे विनोदवीराऐवजी मुलाखतवीरच बनू लागला असताना ही जबाबदारी सध्या घेतली आहे ती कृष्णा अभिषेकनं. भारतात कपिलपाठोपाठ टीव्हीवर सर्वाधिक लोकप्रिय असलेला विनोदवीर.

कपिलचा विनोद जितका लव्हेबल आहे, तितकाच कृष्णाचा विनोद शार्प आहे. तो काही मचूळ विनोद नाही; पण तो ‘एआयबी’सारखा कधी वादग्रस्तही ठरलेला नाही. कपिलचा विनोद हा ‘फॅमिली ह्युमर’ म्हटलं, तर कृष्णाचा विनोद हा ‘यूथ ह्युमर’ आहे. त्याचा स्वतःचा एक चाहतावर्ग नक्कीच आहे. अर्थात, कपिलच्या वादळामुळं कृष्णाचा विनोद थोडा झाकोळला आहे हेही तितकंच खरं. ‘कॉमेडी सर्कस’मध्ये कपिलला सर्वांत जास्त वेळा विजेतेपद मिळालं, तेव्हा ते कृष्णावर अन्यायकारक होतंच. एका सीझनमध्ये त्यानं संताप व्यक्त केला होता तो त्यासाठी.

कृष्णाचं एक वैशिष्ट्य मात्र इतर सगळ्या विनोदवीरांहून वेगळं बनवतं ते म्हणजे त्याचं मल्टि-टॅलेंटेड व्यक्तिमत्त्व. तो जितका उत्तम विनोदी अभिनय करू शकतो, तितकाच गंभीरही अभिनय करू शकतो. नृत्यापासून स्टंट्सपर्यंतही सगळी हिरोगिरी तो करू शकतोच. त्यामुळेच भोजपुरी चित्रपट नावाच्या एका वेगळ्याच कोपऱ्यातल्या सृष्टीत त्यानं ‘सेन्सेशन’ तयार केलं आहे. त्याच्या चित्रपटांची नावं धमाल आहेत. ‘दे दे प्रीतिया उधार,’ ‘लंडनवाली से नेहा लगाई बो,’ ‘हमार राजू दरोगा नंबर वन’ ही नुसती नावं ऐकली तरी हसू येतं. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘बोल बच्चन’, ‘क्या कूल है हम’सारख्या चित्रपटांत त्याची वाटचाल सुरू आहे. कपिल शर्मासारखा ‘फक्त हिरोच बनायचं’ असा अट्टाहास नसल्यानं त्याची हळूहळू मस्तपैकी वाटचाल सुरू आहे.

कृष्णा एखादा पंच टाकताना बघायचं. पंच टाकण्याआधी त्याचे डोळे विलक्षण लकाकतात. त्याच्या व्यक्तिमत्त्वात एकीकडे शाळेतल्या वर्गातल्या सेक्रेटरीमध्ये असतो, तसा किंचित ‘आय एम द बेस्ट’ असा आविर्भाव असतो, त्याच वेळी लहान मुलाचा निरागसपणाही असतो. त्यामुळेच इतरांपेक्षा तुलनेत टोकदार विनोद असूनही तो विनोद वर्तुळात अनेक वर्षं टिकून राहिला आहे. कपिल शर्मा आज टीव्हीवरचा सुपरस्टार असला, तरी त्यानं सहभाग घेतलेले विनोदी कार्यक्रम मोजकेच आहेत. त्या तुलनेत कृष्णानं मात्र ‘कॉमेडी नाइट्स’, ‘कॉमेडी बचाओ’, ‘गँग्ज ऑफ हसींपूर’, ‘द ड्रामा कंपनी’, ‘एंटरटेनमेंट के लिये कुछ भी करेगा’ अशा एक ना अनेक कार्यक्रमांत भाग घेऊन व्यापकता सिद्ध केली आहे. किंबहुना आज कपिलचा स्वतंत्र शो सुरू झाला, त्याला कारणीभूतही कृष्णाच ठरला आहे. ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ कार्यक्रमाचा कृष्णा स्टार होता. त्याच्या या स्टारडममुळे कपिलला कमी महत्त्व मिळायला लागलं. त्यातूनच त्यानं स्वतःचाच शो सुरू केला. गंमत म्हणजे हा इतिहास असताना कृष्णा दुय्यमत्व स्वीकारून कपिलच्या शोमध्ये आता सहभागी व्हायला लागला आहे हे विशेष आहे. चक्र पूर्ण होतं ते असं.

अर्थात कृष्णा पूर्णपणे वादातीत आहे असं मात्र नाही. एकेकाळचा सुपरस्टार गोविंदा याचा तो भाच्चा; पण मध्ये अशा काही घटना घडल्या, की गोविंदानं कृष्णाबरोबर टीव्हीवर कोणत्याही कार्यक्रमात सहभागी व्हायचं नाही असं ठरवून टाकलंय. आता या गोष्टीवरही ‘कॉमेडी सर्किट’मध्ये विनोद होत असले, तरी तो एक सल कृष्णाला असणारच. अर्थात अजून एक सल तर मात्र नक्की आहे. कृष्णाकडे विनोदाचा जबरदस्त सेन्स आहे, हजरजबाबीपणाचं वरदान आहे, नायकासाठीचे सगळे गुण आहेत, इतर विनोदवीरांपेक्षा सरस अभिनयाचं ‘ॲडव्हांटेंज’ आहे, व्यक्तिरेखांमधलं वैविध्य आहे आणि भरपूर पैसेही मिळत आहेत...पण छोट्या पडद्यावरच्या विनोदवीरांतलं ‘नंबर एक’चं स्थान नाही. ते कपिलभाईंनीच घेऊन ठेवलंय....कृष्णाच्याच भाषेत सांगायचं तर त्याला ‘बाबाजी का ठुल्लू’ मिळालाय हेच खरं!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com